माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

११ डिसेंबर, २००७

समिधा: एक मनमोकळे आत्मकथन!


वेदशास्त्रसंपन्न घुले घराण्यातील,अतिशय सनातन वातावरणात वाढलेली एक सुंदर तरूणी आणि दाढी, जटा,कफनी व दंडधारी,आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतलेला एक संन्यासी ह्यांच्यातील ही प्रेमकथा आहे. पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि वयात भरपूर अंतर असूनही विवाहबद्ध होतात. ह्यातील ती सुंदर तरुणी म्हणजे सौ.साधनाताई आमटे आणि तो संन्यासी म्हणजे मुरली देवीदास उर्फ बाबा आमटे हे सांगितल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ही सत्यघटना आहे.

सुखवस्तु, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून दारिद्र्य आणि खाचखळग्यांनी भरलेले आयुष्य जाणिवपूर्वक स्वीकारणे हे येरा-गबाळाचे काम नोहे हेच खरे. बाबा आमट्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाची मर्जी सांभाळत, वेळप्रसंगी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्या समाजसेवी कामात सर्वस्वी झोकून देणे म्हणजे एक प्रकारचे असिधारा व्रतच होय आणि हेच व्रत सौ. साधनाताई आजवर अखंडपणे पाळत आलेल्या आहेत. त्यातील सर्व घटनांचे त्रयस्थपणे केलेले निवेदन "समिधा" ह्या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहे.

लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ हा प्रणयाराधनेत गेल्यानंतर हळूहळू बाबांच्या अलौकिक कार्याला साधनाताईंनी डोळसपणे वाहून घेतले. पहिला कुष्टरुग्ण पाहिल्यावर झालेली बाबांच्या मनाची अवस्था,त्याची सेवा करण्यासाठी साधनाताईंनी दिलेले अनुमोदन आणि प्रत्यक्ष सहभाग ह्याचे वर्णन वाचले की कळते की शिव-शक्तीचे मीलन म्हणजे काय असते. बाबा म्हणजे कामाचा झपाटा. त्यात चूक झालेली त्यांना अजिबात चालत नाही. अशा वेळी साक्षात जमदग्नीचा अवतार असलेल्या बाबांची मर्जी सांभाळणे आणि त्यावेळी त्यांच्या रोषाला पात्र ठरलेल्या व्यक्तिला पाठीशी घालून ती चूक आपल्यावर ओढवून घेणे; ही सगळी तारेवरची कसरत करणार्‍या साधनाताई म्हणजे साक्षात मायमाऊलीच होत.

जसजसा व्याप वाढत गेला तसतशी कामे वाढत गेली. सगळ्यांचा स्वयंपाक करणे(रुग्ण आणि इतर साथीदार), भांडी घासणे ही कामे साधनाताई एकट्यानेच करत. वर चार चार गाईंचे दुध काढणे, कुणाचे दुखले-खुपले बघणे, आपापसातील वाद सोडवणे आणि बाबांची सेवा करणे वगैरे असंख्य कामे त्या न थकता, न कंटाळता सतत हसतमुख राहून करतात हे वाचले की जाणवते की श्रमासारखा खरा आनंद दुसरा कशात नाही. अर्थात हे सगळे त्याच करू जाणे. सामान्य माणसाचे ते काम नाही.

उजाड, ओसाड जागी बस्तान बसविणे, साप,विंचूंचे आगर असलेल्या ठिकाणी सहजपणे वावरणे हे आपल्यासारख्या शहरात वाढलेल्या पांढरपेशांना कसे जमेल? पण लाडा-कोडात आणि सुखवस्तु वातावरणात वावरलेली ही स्त्री किती धिटाईने ह्या सर्व प्रसंगात वागते हे पाहिले की मग घरातल्या पाली-झुरळांना घाबरणार्‍या आपल्यासारख्यांना आपलीच कींव करावीशी वाटते. साधनाताईंच्या आणि बाबांच्या बाबतीत मात्र जितकी परिस्थिती विपरीत तितकाच काम करण्याचा उत्साह वाढतो हे पदोपदी जाणवते.

साधनाताईंचा हा जीवनप्रवास वाचताना पदोपदी आपण थक्क होत जातो. डॉ.प्रकाश आणि डॉ.विकास ह्या मुलांचे बालपण, डॉ.प्रकाशची पत्नी डॉ. मंदा ह्यांच्याबद्दलची कृतज्ञता, प्रकाश-विकास ह्यांनी बाबांचे समर्थपणे पुढे चालवलेले कार्य, बाबांचे भारत-जोडो अभियान, मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन वगैरे वगैरे आणि त्या अनुषंगाने येणारी माहिती देखिल ह्या आत्मकथनात वाचायला मिळेल. तसेच बाबांची नियमित आजारपणं,त्यावेळची झालेली साधनाताईंची धावपळ आणि मनाची घालमेल, त्यातून बाबांचे सही सलामत वाचणे हे सगळे वाचताना आपणही नकळतपणे त्यात सामील होतो.

प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. त्यात किंचित बदल करून मी म्हणेन की "प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक ’कर्तबगार’ स्त्री असते. अशा कर्तबगार स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पुरुष उच्चपदी पोचू शकणार नाही हे मात्र नक्की.

बाबा आमटे ह्यांचे आजवरचे लोकोत्तर समाजकार्य तर जगजाहीर आहेच. ह्या कार्यात तितकीच समर्थपणे साथ देणार्‍या साधनाताईंची ही सगळी कहाणी साहजिकच बाबांच्या भोवतीच गुंफलेली आहे. बुद्धिमान आणि कर्तबगार पती असलेल्या पत्नींच्या आत्मचरित्रात पतीकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिलेले आढळेल. त्या तुलनेत हे आत्मचरित्र खूपच वेगळे आहे.

प्रत्येकाने हे आत्मकथन जरूर वाचावे असे मी आवाहन करतो.

५ टिप्पण्या:

Shreya's Shop म्हणाले...

नक्कीच वाचायला हवे. धन्यवाद,परीक्षणाकरता.

vivek म्हणाले...

वा देवसाहेब,

आमटेसाहेब व त्यांच्या पत्नीच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकताच तुमच्या या पुस्तक परिक्षणाने निर्माण केली आहे. साहित्यातल्या "पुस्तक परिक्षण" या प्रकारातही तुम्ही हळूहळू (खरं म्हणजे "भराभर" असंच म्हणायला पाहिजे) जम बसवताय हे पाहून "अत्यानंद" होतोय. दिवसभर जालावर संचार करुन तुम्हाला पुस्तक वाचायला वेळ कसा मिळतो यावर एकदा एक लेख लिहून काढा. म्हणजे "वाचायला वेळ का झाला नाही" याची शंभर कारणे देऊ शकणार्‍या आमच्यासारख्या "वाचनचुकार" (की टुकार ?) माणसांना मोलाचं मार्गदर्शन होईल. "पेर्ते व्हा" सारखं "वाचते व्हा" असं काहीतरी लिहा आता. "वाचाल तर वाचाल" हे येवढ्या वेळा रिक्षेवर वाचून सुद्धा आम्ही अजून "वाचत" नाही.

देवा, मला "वाचवा" !!!!!!

Meenal Gadre. म्हणाले...

लेख खूप छान आहे. त्या दोघांचेही फोटो हवेत इथे.

प्रमोद देव म्हणाले...

मीनल, तुझ्या सुचनेची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केलेय.

Meenal Gadre. म्हणाले...

फोटो टाकल्यावर आता शब्दांना कसा अधिक उठाव आला.