कुलूत वेळ घालवण्यात आमच्या दृष्टीने आता खास काही मतलबच नव्हता तेव्हा आम्ही सरळ मनालीच्या दिशेने निघायचं ठरवलं...पण रस्त्यात एक जवळच कोणत्या तरी देवीचे मंदिर होते ते पाहायला आमच्या बरोबरची मंडळी उतरून गेली...मी आपला चालकाबरोबर तिथेच बसून राहिलो. बराच वेळ झाला तरी कुणी येईचना. तेवढ्यात माझा भटक्या वाजू लागला...सगळी मंडळी मंदिरातच होती...तिथे प्रसाद भक्षणासाठी(तिकडच्या भाषेत भंडारा म्हणतात)बसले होते...मलाही बोलावत होते....सकाळी केलेल्या न्याहारीनंतर काहीच खाल्लेलं नव्हतं आणि आता दुपारचे दोन वाजून गेले होते...खरं तर रस्त्यात कुठे हॉटेल/ढाबा दिसेल तिथे गाडी थांबवायची असेही ठरलेले होते आणि अचानक ह्या मंडळींनी आपली योजना बदलून इथे मंदिरातच प्रसादाचं जेवण जेवायला सुरुवातही केलेली...हो,नाही, करता करता मलाही त्यांनी पटवलं आणि मग मीही तिथे जेवायला जाऊन बसलो....बराच वेळ माझ्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं...अगदी खरं सांगतो...ज्या देवळात मी देवाचं दर्शनही घेण्यासाठी गेलेलो नव्हतो तिथेच जाऊन प्रसादाचं जेवण जेवावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आणि ते योग्यही नव्हतं ...पण आपल्या बरोबरच्यांची मनं राखण्यासाठी केवळ नाईलाज म्हणून मी तिथे गेलो...त्यामुळे, मला कुणी जेवण वाढायला येत नव्हते ते एका दष्टीने बरेच झाले असे मी मनातल्या मनात समजत होतो...पण आमच्यापैकी एकाला ते सहन झाले नाही आणि त्याने त्या तिथल्या स्वयंसेवकांचे लक्ष माझ्याकडे वेधलं...झालं,माझ्यासाठीही ताट आणलं गेलं...रिकामंच होतं...बराच वेळ ते रिकामं ताट माझ्यासमोर होतं...मी हळूच इकडे तिकडे पाहून उठायचा निर्णय घेतला...पण हाय रे दैवा...माझी ती चाल ओळखून एक स्वयंसेवक चपळाईने माझ्या ताटात भात वाढून गेला..त्याच्या मागोमाग डाळ आणि ऊसळ वाढणारे स्वयंसेवकही चटाचट आले आणि मग मला जेवावंच लागलं...समोर भरलेलं ताट असतांना त्याला लाथाडून जाणे कसे शक्य होते...अन्न हे पूर्णब्रह्म...हे मनावर बिंबवलं गेलं होतं लहानपणापासून.
ज्या देवाला मी भेटायला गेलो नव्हतो...आमच्या भावकीतलाच असणार म्हणा तो...तरीही. ;) तो म्हणाला असेल...
इतक्या लांब येऊनही मला न भेटता जातोस...एकवेळ ते ठीक आहे रे...पण पानावर बसूनही जेवायलाही तयार नाहीस? इतका कसला आलाय माज? ते काही नाही, कसा जेवत नाहीस ते बघतोच मी...अरे वाढा रे त्याच्या पानात...म्हणत जणू काही त्याने मला जेवायला भागच पाडले होते. ;)
जेवण साधेच होते पण मला त्यांची पातळसर उसळ खूप आवडली...मिश्र कडधान्यांची होती...डाळ आंबट(खाटी) असल्यामुळे मला नाही आवडली....पण जे काही एकदा वाढलं ते संपवून मी चपळाईने उठलो...आणखी काही वाढायच्या आत...म्हटलं...हमने भी कच्ची गोलियॉं नही खेली है( की.. खाई है?)....हाहाहा...आपलं हिंदीही असं तसंच...पण समजलं असेल त्या आमच्या हिमाचलातल्या भावक्याला....आणि सरळ हात धुवायला निघालो...तिथल्या रिवाजाप्रमाणे आपलं आपण ताट-भांडं उचलून घेतलं(इतरांचं पाहून),तिथल्या धुण्याच्या जागी नेऊन ते धुतलं आणि बाजूच्या ओट्यावर ठेवलं...मला अशा ह्या स्वावलंबनाची सवय असल्यामुळे तसे गैरसोयीचे असे काहीच वाटले नाही...मी तर उलट असे म्हणेन...की रोज इथे किती श्रद्ध/अश्रद्ध(माझ्यासाखेच)लोक येऊन जेवून जात असतील कुणास ठाऊक...आणि इतक्या सगळ्यांची चोख व्यवस्था ठेवणे तर महाकर्मकठीण...त्यामुळे हे स्वावलंबन अशा ठिकाणी राबवणे मला तरी योग्यच वाटतं.
असो...एकूण काय...दाने दाने पे लिख्खा है खानेवालेका नाम...ह्या म्हणीप्रमाणे माझेही नाव तिथल्या खाण्यावर लिहिलेले होते. :)
त्यानंतर आम्ही निघालो मनालीच्या दिशेने...भात खाल्ला की मला सुस्ती येतेच...पुढच्या सीटवर बसून तर ती जास्तच यायला लागली होती...कारण बाहेर चक्क ऊन तळपत असल्यामुळे आता गाडीतले वातानुकुलनही जोरात होते...इथे ही हवा सारखी अशीच बदलते.. ह्यावर चालकानेही शिक्कामोर्तब केले...त्यामुळे भाताची सुस्ती अधिक थंडगार वातावरण...मी डुलक्या घ्यायला लागलो...इतरजण तर केव्हाच झोपले होते....खरं तर मला प्रवासात झोप येत असली तरी मी सहसा झोपत नाही...आपण झोपलो तर आजूबाजूच्या दृष्यांना मुकणार...रोज थोडेच अशा ठिकाणी येणार आहोत आपण?त्यामुळे जमेल तसा जागे राहण्याचा प्रयत्न करत, मध्ये डुलकी घेत,जागा झाल्यावर आजूबाजूला दिसणारा निसर्ग टिपण्यासाठी प्रग्राची कळ दाबत होतो...चालत्या गाडीतून....कधी समोरच्या काचेतून तर कधी बाजूच्या काचेतून दृष्य टिपणं सुरूच होतं.
साधारण पाच वाजण्याच्या सुमारास आम्ही मनालीला पोचलो...आता पुन्हा हॉटेल शोधायचे होते...म्हणजे आमचं आरक्षण झालेलं होतंच...पण ते नेमकं हॉटेल अशा नव्या(आमच्यासाठी नव्या) ठिकाणी शोधणं इतकं साधं नव्हतं. नैना रिसॉर्टस असे त्या हॉटेलचं नाव होतं...आता गंमत पाहा...आम्हाला ह्या नावा व्यतिरिक्त काहीच माहीत नव्हतं...चालकालाही काहीच माहीत नव्हतं...एकदोन ठिकाणी गाडी थांबवून विचारूनही घेतलं....पण कुणालाच काही माहीती नव्हती. मग काय पुन्हा स्थानिक संयोजकाशी(शिमल्यानंतर आम्हाला स्थानिक संयोजकाचा दूरध्वनी क्रमांक मिळालेला होता) बोलणं झालं...त्याने नाव बरोबर असल्याचं सांगितलं...मग गाडी पुढे जातच राहिली...रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या हॉटेलच्या पाट्या पाहात पाहात आम्ही नदीवरचा पूल पार करून दुसर्या बाजूला गेलो...तरी अजून हॉटेलचा पत्ता नव्हता....शेवटी पुन्हा एकदा स्थासंशी संपर्क...ह्यावेळी रस्त्याचे नाव,जवळची काही खूण असे विचारून घेतले....चला, आम्ही तसे योग्य मार्गावरच जात होतो....त्या विशिष्ट रस्त्यावर(रस्त्याचं नाव होतं..वशिष्ठ आश्रम रोड) पोचलो....ती खूणही सपडली पण...तिथे तशा नावाचे हॉटेलच नव्हते...त्याच्या जवळपास एक नैना लॉज होता...पुन्हा स्थासंशी संपर्क...त्याला जरा झापलंच..मग त्याने सांगितलं...की त्या हॉटेलचं आता नाव बदललंलय....आधीचं नैना रिसॉर्टस बदलून आता नैना रॉकलॅंड झालंय...आणि ते तिथेच वशिष्ठ रोडवर आहे...आता ह्या नव्या नावाचा शोध सुरु झाला आणि मग तिथल्या आजूबाजूच्या लोकांनीही...होय,अशा नावाचं हॉटेल इथेच आहे...असे,असे इथून वर चढून जा..म्हणून एक चढणीचा रस्ता दाखवला...हे राम! कुठे भलतीकडेच,आडरस्त्याला हे हॉटेल आहे?...आमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह. ह्या लोकांना काय दुसरी चांगली जागा सापडली नाही काय?
एकदोन वळणं घेत घेत गाडी वर चढून गेली...चढ चांगलाच जबरदस्त होता आणि अचानक गाडी थांबवावी लागली...तिथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु होते....आतापर्यंत चढून आलेला रस्ता तसा साधाच होता आणि मधेच हे डांबरीकरण?
बरीच इंजिनियर,कामगार मंडळी तिथे जमलेली होती,काम अगदी जोरात सुरु होतं....आम्हाला वर जायचं होतं पण रस्ता तर बंद के्लेला होता...पाच-दहा मिनिटे तो प्रकार पाहून चालकाने हॉर्न वाजवून इशारा केला...वर जाऊ द्या म्हणून...त्यावर त्यांच्यापैकी कुणीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही...सगळे आपले ढिम्म!आमच्या गाडीच्या पुढेच एक मालगाडी गेलेली होती....त्यातली खडी उतरवण्याचं आणि आणि तिथेच रस्त्यावर झारीने ओतलेल्या गरमागरम डांबरावर ती खडी पसरण्याचं काम शिस्तीत सुरु होतं....इतक्यात,वरून दोनतीन गाड्या आल्या...त्यांनाही तिथे थांबवून ठेवण्यात आलं...दहा-पंधरा मिनिटे ते खडी पसरण्याचे काम सुरु होते...मग ती मालगाडी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभी राहिली...वरच्या गाड्या आमच्या बाजूने खाली उतरल्या आणि मग आम्हाला वर जाण्यासाठी परवानगी मिळाली....गाडी वर गेली आणि वळणावर तिथेच एक खडीदाब्या(रोडरोलर) मागे-पुढे होत होता...हॉर्न वाजवून त्याला बाजू देण्यास सांगितले...त्यानेही दहा मिनिटे खाल्ली...शेवटी एकदाचे तिथून निसटलो आणि वर पोचलो....तरीही हॉटेलचा पत्ता नव्हता. :(
अजून दोन वळणं बाकी होती...त्यातलं एक वळण पार करून वर गेलो...गाडी तिथेच उभी केली कारण वरच्या रस्त्यावर एक गाडी उभी होती. गाडीच्या बाहेर पडून वरच्या दिशेला पाहिलं...तिथे काय आहे हे दिसत नव्हतं पण एखादं हॉटेल असणार ह्याची मात्र खात्री झाली.चालतच वर चढून गेलो..एका विवक्षित ठिकाणी पोचलो आणि मग डाव्या बाजूला हॉटेल दिसू लागलं...पण नाव काय असावं? ते काही दिसतंच नव्हतं....मग अजून थोडा चढ चढून आणि बर्याच उंच ऊंच पायर्या चढून वर पोचलो... हॉटेलच्या प्रांगणात प्रवेश केला...तिथला एक सेवक दिसला...त्याला हॉटेलचे नाव विचारले...हुश्श! तेच होते..आम्ही इतका वेळ शोधत होतो तेच.
मग मॅनेजरकडे जाऊन चौकशी केली...त्याला आमचे आरक्षण असल्याचे सांगितले...ओळख पटवून खात्री झाली...आमच्यासाठी तिथे दोन खोल्या राखून ठेवलेल्या...मग भराभर सुत्रं हलली...हॉटेलवाल्यांनीच खाली जाऊन आमचं सामान वर उचलून आणलं. पहिल्या मजल्यावरच्या दोन खोल्या आमच्यासाठी होत्या....तो पहिला मजलाही आपल्या इथला तिसरा मजला वाटावा इतके चढे अंतर हॉटेल मॅनेजरच्या खोलीपासूनचे होते....मनातल्या मनात आमच्या मुंबईच्या सहल आयोजकाला सगळेजण शिव्या देत होते...कुठे खबदाडात आम्हाला आणून टाकलं होतं त्याने..म्हणून.
हॉटेल सेवकाबरोबर आम्ही जिना चढून वर गेलो...त्याने खोल्या उघडून सामान आत नेऊन ठेवले आणि तो गेला. खोल्या मात्र अतिशय उत्तम सजवलेल्या आणि सुखसोयींनी युक्त होत्या...खोल्यांना जोडूनच बाहेर सज्जा होता...पडदे बाजूला सारून,दार उघडलं आणि सज्ज्यात पाऊल टाकलं मात्र...........
अहाहा! काय रमणीय दृष्य होतं ते. दूरवर साक्षात हिमशिखरं आम्हाला साद घालत होती...खाली बियास नदीचं वळणं वळणं घेत वाहणारं खळाळतं,आरस्पानी स्वरूप,हिरवाईने नटलेले पर्वत,त्यात दिसणारी रंगीबेरंगी घरं,छाया-प्रकाशाचा अनोखा खेळ... वेड लावणारे असे ते दृष्य आम्ही सगळेच किती तरी वेळ न्याहाळत बसलो...छायाचित्र तर वेगवळ्या पद्धतीने घेतली....
इतका वेळ त्या सहल आयोजकाला मनातल्या मनात शिव्या देणारे आम्ही आता त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करायला लागलो...वा, काय पण जागा शोधलेय!जणू काही स्वर्गात आलोय असं वाटतंय!
२ टिप्पण्या:
आपले (मना)लि"खाण" आवडले पण संस्थळाला नांव पूर्वानुभव का दिले हा प्रश्न पडला... काही समर्पक सुचले तर अवश्य सांगावे ही विनंती कारण लेखन तर अनुभवोपरांत दिसते आहे म्हणून...
चंशिकुम कळायला जरा वेळ लागला पण ट्यूब लाईट विना इलेक्ट्रॉनिक चोक सुद्धा सावकाश भरपेटली
प्रश्न,लिखाण आवडल्याचे कळले आणि आनंद झाला.प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
पूर्वानुभव हे नाव जेव्हा ठेवले तेव्हा माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांबद्दलच मी लिहीत गेलो...त्या जसजशा सांगून संपायला आल्या..तेव्हापासून आता ताज्या घटना सांगायला सुरूवात केलेय.
आता हे कसं झालंय माहितेय का...मुलाचं नाव जन्माच्या वेळी ठेवलं गेलं... बाळ! आता ते बाळ म्हातारं झालं तरी त्याचे नाव ’बाळ’च राहणार नाही का? ;)
मुलगी असती तर,निदान लग्नानंतर तरी नाव बदलता आलं असतं. :)
टिप्पणी पोस्ट करा