माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ सप्टेंबर, २००८

संगीत चिवडामणी स्वर’बास’कर पंडीत मोदबुवा!

संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.म्हणजेच, एकूण काय तर, संगीत सगळ्यांना आवडतं. हां,आता त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत,सुगमसंगीत,चित्रपटसंगीत वगैरे करत करत अगदी हल्ली तरुणांच्यात प्रचलित असलेले पॉप/रॅप पर्यंत असे कोणतेही प्रकार असतील.ह्यातला एक तरी प्रकार आवडत असलेला माणूस माझ्या दृष्टीने संगीत रसिकच आहे. तर सांगायचा मुद्दा काय की संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि संगीतकार,गायक,वादक वगैरेंना चांगल्या प्रकारची प्रतिष्ठाही आहे.

आता नमनाला घडाभर नाही तरी वाटीभर तेल गेलंय तेव्हा मूळ मुद्याकडे वळतो. आधी माझी ओळख करून देतो. हो,हल्ली अशी प्रथाच आहे. आपणच आपली ओळख द्यावी लागते त्याशिवाय लोक हिंगं लावूनही विचारत नाहीत.तर, मी आहे न्हाणी घराण्याचा गायक आणि संगीतकार मोद. पण ’पंडीत मोदबुवा’ अशी पदवी मला खुद्द अण्णांनी दिलेय.(आता अण्णा कोण ते विचारू नका. महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला अण्णा आणि बाबूजी कोण ते माहीत नसेल तर मग तुम्ही खरे मराठी असूच शकत नाही.)तेव्हा ती मला माझ्या नावापुढे लावणे क्रमप्राप्तच आहे. मला लहानपणापासून संगीताची(मुलगी नव्हे! ;))आवड आहे. तेव्हा माझा आवाजही चांगला होता पण मला संगीत शिकण्याची संधी मात्र मिळाली नाही. असं असलं तरी श्रवण मात्र भरपूर केलंय. आकाशवाणी हे सर्वात प्रभावी माध्यम आहे आणि ह्या माध्यमाद्वारेच माझी अनेक गायक कलाकार आणि संगीतकारांशी ओळख झाली ती त्यांच्या शैलीची. ऐकलेल्या प्रत्येक गाण्याची नक्कल तर मी हुबेहुब करत असे. मात्र माझा आवाज सर्वच प्रकारच्या गाण्यांना अनुकुल नव्हता त्यामुळे माझ्या पहाडी आवाजाला अनुकुल असणारे गायन प्रकारच मी जास्त निवडू लागलो. त्यात मुख्यत्वे समरगीतं,स्फुर्तीगीतं,पोवाडे वगैरे प्रकार असतच पण मा.दिनानाथ,श्रीपादराव नेवरेकर,वसंतराव देशपांडे ह्यासारख्यांची दणदणीत आवाजातली नाट्यगीतं गायला मला फारच आवडायची.
इतरांची गाणी गाता गाता मला गाण्यांना चाली देण्याचाही नाद लागला. शालेय अभ्यासक्रमात त्या वेळी आम्हाला कवि बा.भ बोरकर,कुसुमाग्रज,पाडगावकर,वसंत बापट,अनिल वगैरे सगळ्या दिग्गज कवींच्या कविता असत.त्या कविता शाळेत म्हणण्याची तेव्हा एक विशिष्ट पद्धत असे. बहुतेक सगळ्या कविता त्या पद्धतीने आम्ही म्हणत असू. पण चौथीला आम्हाला एक केणी नावाचे गुरुजी होते त्यांनी एक कविता स्वत: चाल लावून आम्हाला शिकवली. ती कविता कुणाची होती ते आता आठवत नाही पण त्याचे बोल साधारण असे होते.... जा हासत खेळत बाल निर्झरा आनंदाने गात...
ती चाल नेहेमीच्या कविता गायनापेक्षा नक्कीच वेगळी होती आणि त्यावरून मग स्फुर्ती घेऊन मी मला आवडणार्‍या कवितांना चाली लावू लागलो.
माझ्या आठवणी प्रमाणे माझी पहिली चाल होती कवि मंगेश पाडगावकरांच्या ’सत्कार’ ह्या कवितेला.... पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.....असे त्याचे शब्द होते. मला संगीतातल्या रागांची,तालांची नुसती नावं माहीत आहेत पण ते ओळखता येत नाहीत त्यामुळे ती चाल कोणत्या रागातली होती हे माहीत नाही पण आज आठवायचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की ती चाल त्यावेळी गाजणार्‍या एका सिनेगीतासारखी होती. अगदी जरी हुबेहुब नव्हती तरी देखिल साधारण तसा भास होईल अशी होती. अर्थात चाल लावताना माझ्या नजरेसमोर ती प्रसिद्ध चाल नव्हती पण नंतर त्यातलं साम्य लक्षात आलं आणि गंमतही वाटली. माझा नैसर्गिक कल हा रागदारीकडे असल्यामुळे माझ्या चालीही तशाच प्रकारे रागानुवर्ती असतात असा माझा अनुभव आहे. पण तो कोणता राग असतो हे मला नका विचारू कारण तेवढंच मला जमत नाही. :)
आता जेव्हा मी त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की मला आवडणारी जी काही खास गाणी आहेत ती साधारणपणे दरबारी,मल्हार आणि त्याचे प्रकार,भैरवी,हमीर,यमन,मालकंस...वगैरे रागातली असतात. तेव्हा ही माझी पहिली चाल बहुतेक करून दरबारीच्या अंगाने जाणारी असावी असा तर्क आहे.
मी अशीच एका कवितेला चाल लावली होती जी ’रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ ह्या भीमसेनांनी गायलेल्या गाण्याच्या अंगाने जाणारी होती. कारण जरी मला भीमसेनांची गायकी कळत नव्हती तरी अनुकरणीय नक्कीच वाटायची आणि माझ्या आवाजाला अनुकुल देखिल होती. आता माहीत झालंय की तो राग हिंडोल आहे म्हणून. पण तेव्हा हे माझ्या ध्यानी-मनी देखिल नव्हतं.

आज ह्या आठवणी येण्याचं कारण असं की हल्लीच, माझं, माझ्या एका संगीतकार मित्राशी बोलणं सुरु होतं. विषय अर्थातच संगीत हा होता.नेहमीप्रमाणे मी त्यांना विचारलं की.. सद्या काय सुरु आहे?
तेव्हा एका भक्तीगीतावर ते काम करताहेत असं कळलं. लगेच मी म्हटलं की... ऐकवा की मग त्याची चाल.
ते म्हणाले की.. अजून पूर्ण नाही झालं काम.
मी आपलं उगीच त्यांना चिडवण्यासाठी म्हटलं तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. मी लावतो चाल.
त्यांनीही मला गंमत म्हणून लगेच गीताचा दुवा दिला आणि म्हणाले..तिथे जावून वाचा आणि लावा चाल.
मी लगेच त्या दुव्यावर जाऊन शब्द वाचले आणि मला लगेच चाल सुचली. त्यांना म्हटलं की ...झाली की चाल तयार.
तर म्हणाले...पाठवा ध्वनिमुद्रित करून.
आता आली का पंचाईत? इतके दिवस मी जे काही करत होतो ते सगळं स्वान्त सुखाय होतं. आता ध्वनिमुद्रण करायचं म्हणजे पीडाच की. त्यातून आता माझा आवाज साफ खलास झालेला.एकेकाळी मला माझ्या आवाजाचा सार्थ अभिमान होता पण आज मात्र तो घशातल्या घशातच अडकतो. आता काय करणार?
मी आपलं आता नाही,मग करू म्हणून टाळायला लागलो आणि ते माझ्या पाठी लागले..करा,करा..म्हणून.
मग काय केली हिंमत आणि एकदाचं केलं ध्वनीमुद्रण. मग त्याचे मप३ रुपांतर कसं करायचं तेही त्यांनीच सांगितलं आणि शेवटी सगळे सोपस्कार होऊन एकदाची चाल त्यांच्याकडे रवाना केली. मला खात्री होती की आता ह्यानंतर पुन्हा काही ते आपल्याशी ह्या विषयावर बोलणार नाहीत. पण...
अहो आश्चर्य म्हणजे त्यांना ती चाल आवडली आणि ती चक्क ’यमन’ रागातली निघाली. आता बोला.
अजून एक दोघा जणांना चाल ऐकवली. त्यानाही आवडली असं त्यांनी सांगितलं. मग काय हो, मी मुद्दाम कविता वाचायला सुरुवात केली आणि बघता बघता आठ-दहा कवितांना चाली लावल्या.
सर्वात आधी आमच्या ह्या गुरुवर्यांना ऐकवायच्या आणि मग काही खास मित्रांना...असा प्रकार सुरु झाला. आमचे गुरुवर्य अगदी चिकाटीचे निघाले. न कंटाळता ते नित्यनेमाने माझी चाल ऐकून त्यांचे स्पष्ट मत त्यावर द्यायचे. इथे एक गंमत सांगण्यासारखी आहे.

चाल लावली,ती ध्वनिमुद्रित केली,ती मप३ मध्ये रुपांतरीत केली की गुरुवर्यांना पाठवायचो. मग गुरुवर्य मिस्किलपणे सांगायचे...ही तुमची चाल आधीच अमूक अमूक संगीतकाराने चोरलेय बरं का! ;)
आणि त्याचा पुरावाही सादर करायचे.
आता आली का पंचाईत? तद्माताय मी आपला मेहनत करून इतकी मस्त चाल लावतोय आणि ती गुरुवर्यांकडे पोचण्याआधीच कैक वर्ष आधी कुणी तरी चोरलेली असायची? ;) बरं ते संगीतकारही कुणी ऐरे-गैरे नसायचे. चांगले नावाजलेले आणि मलाही जे आवडत असत.पण म्हणून त्यांनी चक्क माझ्या चाली चोरायच्या म्हणजे काय? छे छे! हे भलतंच!त्याऐवजी माझ्याकडे एखादी चाल मागितली असती तर मी अशीच दिली असती आनंदाने ! जाऊ द्या झालं, असं म्हणून मग मी त्याच गीताला अजून वेगळ्या चाली लवायचो. तरीही तीच बोंब! कुणी तरी माझी नवी चाल देखिल आधीच चोरलेली निघायची. मग मीही मनात म्हटलं...आपण मनातच म्हणू शकतो... जाऊ द्या. आपल्यामुळे कुणाचं भलं होत असेल तर कशाला त्रागा करा. करा लेको मजा. चोरा माझ्या चाली.
मग काय मी कोण माझ्या चाली चोरतोय वगैरे बघायचं सोडूनच दिलं.आपण आपलं चाली रचत राहायच्या इतकंच ठरवलं आणि तेव्हापासून गुरुवर्यांनाही सांगितलं....ह्या पुढे मला सांगत जाऊ नका कुणी कोणती चाल चोरली ते. बिनधास्त चोरू द्या त्यांना. हवं तर तुम्हीही चोरा. ;)

आता चाली लावून गायल्यावर त्या गुरुवर्यांव्यतिरिक्त ज्या इतर काही लोकांना ऐकवायला लागलो त्यांचेही मजेशीर अनुभव आले.
एक प्रातिनिधिक अनुभव पाहा...शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तशी.
आमचा एक महाजालावरील दूरस्थ पुतण्या आहे. त्याला जेव्हा पहिली रचना पाठवली तेव्हा त्याचा उत्साह असा काही होता की यंव रे यंव. म्हणाला...काका,चाल पण मस्त आहे आणि आवाजही मस्त आहे.
मनात म्हटलं..चला,कुणाला तरी आवडतंय.
मग त्याला दुसरे गाणं पाठवलं. ह्यावेळी प्रतिसाद जरा थंड होता तरी आवडलं असं म्हणाला पण मग तो मला टाळायला लागला.महजालावर मी उगवताना दिसलो रे दिसलो की तो अंतःर्धान पावायला लागला.माझ्या लक्षात आला सारा प्रकार. असे दोनचार दिवस गेले. मग एक दिवस एका गाफील क्षणी पकडलं त्याला आणि म्हटलं....बाबा रे, असं तोंड चुकवू नकोस. ह्यापुढे तुला माझ्या चाली आणि गाणी कधीच ऐकवणार नाही असा शब्द देतो. तेव्हा कुठे त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याचा तो "हुश्शऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" म्हणून सोडलेला सुस्कारा इथपर्यंत ऐकायला आला मला. ;)

अजून एक छान आणि बोलकी प्रतिक्रिया मिळाली ती एका छोट्या मुलीकडून. तिचे बाबा माझं कुठलंतरी गाणं ऐकत होते आणि त्यामुळे साहजिकच त्या मुलीनेही ते ऐकलं. ती चटकन आपल्या बाबांना म्हणाली....हे असं फाटकं फाटकं गाणं बंद करा. :)

माझ्या एका मित्राने माझं गाणं ऐकून तर मला एक फार मोठी पदवीच देऊन टाकली. "संगीत चिवडामणी" अशी आणि त्याला पुढे अजून एक शेपूटही जोडलं.. स्वर खेच......रं! संगीतात चिवडा-चिवड करतो म्हणून ’संगीत चिवडामणी’आणि स्वर खेचत खेचत गातो म्हणून ’स्वर खेच....रं’ असे त्याचं स्पष्टीकरणही देऊन टाकलं.
दुसर्‍या मित्राने त्यात थोडा बदल करून म्हटलं.... "संगीत चिवडामणी स्वर’बास’कर "(आता तरी बास कर रे!) किंवा "संगीत चिवडामणी स्वर खरखर" (आवाजात इतकी खरखर आहे की...)ह्यापैकी जी हवी ती पदवी घे . मग मी विचार केला कोणती पदवी आपल्याला जास्त शोभेल? आणि पक्कं करून टाकलं.

तेव्हा आजपासून मी आहे "संगीत चिवडामणी स्वर’बास’कर-खरखर-खेच...रं पंडीत मोदबुवा!"
कसं वाटतंय माझं नवं नाव? भारदस्त आहे ना? उच्चारायला जड जातंय? मग असं करा. नुसतं "संचिस्वबाखखे पंडीत मोदबुवा" म्हणा!
जमेल ना हे? ;)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: