माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ सप्टेंबर, २००८

जयहिंद राव!

"देवसाहेब! हे बघा कोण आलेत!"
कार्यालयात प्रवेश करताक्षणीच आमच्या सुरक्षा रक्षकांनी माझे लक्ष वेधले. खरं तर मी साहेब वगैरे काही नाही; पण त्या अर्धशिक्षित सुरक्षारक्षकांपेक्षा जरा दोन बुकं जास्त शिकलेलो असल्यामुळे मला ते साहेब म्हणतात इतकेच. तर सांगायचा मुद्दा इतकाच की त्यांनी माझे लक्ष वेधले तेव्हा त्यांच्या जवळ एक मध्यमवयीन व्यक्ती बसलेली दिसली. मी माझ्या नेहमीच्या सवयीने "वंदे मातरम्‌" असे त्याला म्हणून अभिवादन केले.त्यावर लगेच त्याने "जयहिंद" असे म्हणून मला प्रतिसाद दिला. :)
त्याची चौकशी केल्यावर जी माहीती कळली ती अशी.... त्याचे नाव ’ जे.एच.राव’ असे होते आणि आधी तो एकवायुदल अधिकारी होता. आता तिथून सेवानिवृत्ती घेऊन आमच्या कार्यालयात एक अधिकारी म्हणून दाखल झालेला आहे. सुरुवातीची दोन वर्ष त्याने दिल्लीत काढल्यावर तो आता मुंबईत बदलीवर आलाय. मी त्याचे यथोचित स्वागत केले आणि त्याला आमच्या वरीष्ठांकडे घेऊन गेलो. ही आमची पहिली मुलाखत!

राव माझ्यापेक्षा वरचा अधिकारी होता हे त्याला नंतर माझ्या वरीष्ठांकडून कळले पण तरीही त्याच्या वागण्यात तसे काहीच आढळले नाही. वागण्यात तो अतिशय सरळ होता आणि कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तो प्रत्येकाला अहो-जाहो करत असायचा.राव जसजसा रुळत गेला तसतसे हळूहळू त्या अहो-जाहोचे एकेरी संबोधनात रुपांतर झाले. आम्ही त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने लहान लोकंही मित्रत्वाच्या अधिकारात त्याला अरे-तुरे करू लागलो. बघता बघता तो आमच्यातलाच एक झाला.आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तो नेहमी ’जयहिंद’ असे म्हणून समोरच्याला अभिवादन करायचा. त्यामुळे त्याचे नाव आपोआपच ’जयहिंद राव’ असेच झाले.(त्याच्या नावातली आद्याक्षरं देखिल योगायोगाने जे.एच अशीच होती. पण त्याचे पूर्ण रूप वेगळे होते.)

साधारण साडेपाच फूट उंची,काळा-सावळा वर्ण,तेल चोपडलेले चपचपीत केस आणि त्यांचा व्यवस्थित पाडलेला भांग, दिसायला नाकी-डोळी नीटस असे काहीसे रावचे रुपडे होते. बोलताना नेहमी प्रत्येक वाक्याची सुरुवात ’भ’काराने सुरु होणार्‍या शिवीने आणि वाक्याचा शेवट ’म’काराने सुरु होणार्‍या शिवीने होत असे. सुरुवातीला आम्हाला ते जरा विचित्र वाटले पण नंतर नंतर त्याचे काहीच वाटेनासे झाले कारण एरवी रावचे बोलणे अतिशय सभ्य असेच होते.

राव हा माजी सैनिक असल्यामुळे त्याला मिलिटरी कॅंटीनमधून सवलतीच्या दरात सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळत. आमच्या कडे रावसारखेच इतरही काही माजी सैनिक होते. पण केवळ राव हाच सर्वांना त्याच्या कार्डावर अशा वस्तु एकही जास्तीचा पैसा न घेता आणून देत असे. अशा वेळी समोरचा माणूस झाडूवाला आहे की आपला वरीष्ठ आहे हे तो बघत नसे. सगळ्यांना आपल्याला मिळणार्‍या सोयी-सवलतींचा लाभ देत असे.मात्र एक गोष्ट तो कुणालाही कधीच देत नसे आणि ती म्हणजे ’दारू!’
महिन्याला एका विशिष्ठ प्रमाणातच त्याला ती मिळत असे आणि ती त्याला स्वत:लाच कमी पडायची. जे इतर माजी सैनिक स्वत: पीत नसत ते, ही अशा तर्‍हेने त्यांना मिळणारी दारू चक्क बाजार भावाने विकत आणि राव ती त्यांच्याकडून बाजारभावाने विकत घेत असे.

राव त्याच्या कामात हुशार होताच पण त्या व्यतिरिक्त तो बहुश्रुतही होता. रावची आणि माझी विशेष मैत्री जमली ती कशी? हे मलाही तसे एक कोडेच आहे.कारण एक माणूस म्हणून राव जरी लाख माणूस होता तरी रावचे दारू आणि सिगरेटचे व्यसनही मला माहित होते आणि मी एरवी अशा लोकांपासून चार हात दूरच राहातो. रावच्या लेखी मात्र मी एक सच्चा माणूस होतो आणि दिलेल्या शब्दाला जागणारा होतो..हे मला त्याच्याचकडून कळले होते.ह्या गोष्टीचे कारण असे की मी रावला वेळोवेळी उसने पैसे देत असे. आश्चर्य वाटले ना? अहो वाटणारच! कारण माझ्यापेक्षा जास्त पगार त्याला होता. मग अशा रावला मी कशी मदत करत असे आणि का?....

त्याचे काय आहे की आमच्या कार्यालयात आधी गजा नावाचा एक सहकारी ’फंड’ चालवायचा. दर महिन्याला अमूक एक रक्कम प्रत्येकाकडून त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे गोळा करून ती गरजवंताला/ना मासिक दोन रूपये व्याजाने देऊ केली जायची.
ह्यातून मिळणारे व्याज वर्षाच्या शेवटी सर्व सभासदांना त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वाटले जाई. ह्या योजनेमुळे बर्‍याच जणांची सोय होत असे.पण गजा फंड बंद करून अचानक नोकरी सोडून गेला आणि अशा गरजवंतांना पैशाची चणचण जाणवू लागली. गजानंतर एक दोघांनी पुढाकार घेऊन हे फंड प्रकरण हाताळायचा प्रयत्न केला पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण हे लोक ते पैसे गरजवंतांना देण्याऐवजी स्वत:च वापरू लागले. ह्यातून जी गरज निर्माण झाली ती एका प्रामाणिक व्यवस्थापकाची जी इतरांच्या मते मी पूर्ण करू शकत होतो आणि म्हणून सगळ्यांनी मला गळ घातली फंड सुरु करण्याची.मला खरे तर ह्या भानगडीत पडायची अजिबात इच्छा नव्हती. विशेष करून लोकांकडून पैसे मागण्याच्या बाबतीत माझा भिडस्तपणा मला त्रासदायक व्हायचा. कैक वेळेला कर्जाऊ दिलेले माझेच पैसे मी परत मागताना मलाच अजिजी करायला लागायची. माझे पैसे गेले तरी ते नुकसान एक वेळ मी सोसू शकत होतो पण सार्वजनिक पैशाबाबत असे करून चालणार नव्हते. तिथे माझ्या सचोटीबद्दल शंका निर्माण होऊ शकली असती आणि ते मला कधीच आवडले नसते त्यामुळे मी आधी नकारच दिला. पण माझ्या जवळच्या मित्रांपैकी ’दादा’ने देखिल गळ घातली आणि पैसे वसुलीचे माझ्यावर सोपव असे सांगून धीर दिला. दादा हा नावाप्रमाणेच दादा होता त्यामुळे मी मग जास्त आढेवेढे न घेता फंड सुरु केला.(दादाबद्दल सविस्तर ह्या लेखांमध्ये वाचा.)
ह्या फंडाचा फायदा खर्‍या गरजवंतांना द्यायचा असे माझे तत्व होते आणि त्याप्रमाणे मी वागत होतो. प्रत्येकाची परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन मी कर्ज देत असे.त्यामुळे कुणा एकाला अवाच्या-सवा कर्ज दिले असे होत नसे. त्यामुळे जमा रकमेपैकी पाच दहा टक्के रक्कम माझ्याकडे नेहमी शिल्लक राहात असे ज्याचा उपयोग आयत्या वेळी कुणाला पैसे लागले तर होत असे. ह्या गोष्टीचा फायदा बर्‍याच वेळेला रावला होत असे कारण महिन्याच्या शेवटी शेवटी त्याला पैश्यांची तंगी जाणवत असे आणि माझ्याकडून वेळेवर खसखस न करता पैसे मिळत असल्यामुळे तोही खुश असायचा.एक तारखेला पगार झाला की आठवणीने तो ते पैसे आणून देत असे. हा त्याचा गुण फारच थोड्या लोकांच्यात होता. अशा ह्या रावला मी नेहमी दारू-सिगरेट सोडण्याचा सल्ला देत असे पण त्याचा त्यावर काडीमात्रही परिणाम होत नसायचा. तो आपल्याच नशेत असायचा.त्याची ही सवय सुटावी म्हणून मी कधी कधी त्याला कर्जाऊ पैसे द्यायला नकार देखिल दिला होता पण राव माझं बारसं जेवलेला होता. तो इतर कुणाला तरी पुढे करून पैसे घ्यायचा आणि आपला शौक पुरवायचा.असो.

सुरुवातीला राव कार्यालयात आणि कार्यालयाच्या वेळेत दारू कधीच पीत नसे.पण कसे कुणास ठाऊक पण तो हळूहळू गुपचुपपणे कार्यालयातही थोडी थोडी पिऊ लागला हे माझ्या नजरेतून सुटले नाही. मी त्याला त्याबद्दल चांगलेच झाडत असे पण त्याने ते कधीच मनावर घेतले नाही.(हे मी कोणत्या अधिकारात करत असे मला माहीत नाही आणि रावने देखिल मला कधी उलट उत्तर कसे केले नाही हे कोडे देखिल कधीच उलगडले नाही)उलट वेळप्रसंगी तो मलाच आग्रह करायचा आणि माझा अपेक्षित नकार ऐकून पुन्हा आपल्या नशेत धुंद राहायचा.मग मी त्याला टाळायला लागलो. मला भिती एकाच गोष्ठीची वाटत होती की हे जर वरिष्ठांना कळले तर रावची नोकरी जाईल. एरवी चांगला असलेला एक माणूस निव्वळ ह्या दारूपायी फुकट जातोय हे मला बघवत नव्हते पण मी काहीच करू शकत नव्हतो कारण मी त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकारानेही छोटा होतो.

रावचे दारू पिणे हळूहळू वाढू लागले. आधी तो कार्यालयात असताना अतिशय मर्यादित पीत असे आणि ते फारसे कुणाच्या लक्षात येत नसे.अशा वेळी राव अतिशय शांत दिसत असे. पण जसजसे त्याचे दारुचे प्रमाण वाढायला लागले तसे त्याचे वर्तन बदलायला लागले.जसजशी दारू चढायला लागायची तसतसा तो भांडखोर व्हायला लागायचा. एरवी देवभोळा असणारा राव अशावेळी समस्त ३३कोटी देवांची यथेच्छ निंदानालस्ती करायचा. क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढवायचा.

मधल्या काळात आम्ही काही जणांनी त्याला सुधारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.म्हणजे तो थोडाफार सुधारला देखिल. नाशिक की कुठे तरी जाऊन विपश्यना शिबिरात हजेरी लावून आला. काही दिवस छान गेले आणि एक दिवस पुन्हा रावने भर ऑफिसात राडा केला. त्या दिवशी तो अक्षरश: ’फुल्ल’ होता. त्याला स्वत:च्या देहाचीही शुद्ध नव्हती.बसल्या जागीच पॅंट ओली केली त्याने. दारूचा वास आणि त्यात त्याच्या मुताच्या वासाने एक संमिश्र वास धारण करून सगळ्यांच्या नाकातले केस जाळले. त्याच्या आसापासही कुणी जायला तयार होईना. अशात त्याने रडायला सुरुवात केली. अक्षरश: धाय मोकलून रडायला लागला तो...जणू काही त्याची कुणी प्रिय व्यक्ती मरण पावली असावी.
दारू प्यायल्यावर एरवी आक्रमक होणारा हा प्राणि आज इतका धाय मोकलून का रडतोय हे कुणालाच कळेना. लोक आपापसात तर्क लढवत होते पण कुणीच त्याला त्याबद्दल काही विचारण्यासाठी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. त्याचे कारण असे की एकदोघांनी त्याला समजवण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचे धाडस केलेही होते पण तो त्यांच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा तेही मागे हटले.

हा हा म्हणता ही बातमी आमच्या साहेबांपर्यंत पोचली आणि रावची खबर घ्यायला खुद्द साहेब येताहेत असे कळले तेव्हा सगळीकडे पांगापांग झाली. मनात आले, ’गेली आता रावची नोकरी!कोण वाचवणार ह्याला आता?’
आणि खरंच साहेब आले. त्यांनी रावची अवस्था पाहिली आणि ते हतबुद्धच झाले. इतका जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो? पण डोकं शांत ठेवून आधी झाडूवाल्याकडून ती जागा साफ करवून घेतली आणि मग रावजवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागले.

रावने साहेबांनाही मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला हळूच दूर केले.मग हळूहळू त्याच्याकडून माहीती करून घ्यायला लागले. मधे मधे राव खिशातली ’चपटी’ काढून साहेबाच्या देखतच आचमनं करत होता. वर साहेबालाही घेण्याचा आग्रह करत होता. तसे साहेबही ’घेणार्‍यातले’ होते;नाही असे नाही, पण स्थळं-काळाचं भान ठेऊन. इतकंच कशाला,राव आणि साहेब एकत्र बसूनही पीत असत...पण ते साहेबांच्या घरी. ऑफिसात कधीच नाही.... आणि इथे राव साहेबांना घ्यायचा आग्रह करत होता. साहेबांनी हळूच त्याच्या हातातून बाटली काढून घेतली आणि झाडूवाल्याकडे देऊन त्याला संडासात ओतून टाकायला सांगितली.

रावच्या असंबद्ध बडबडीतून शेवटी असे लक्षात आले ते असे.. सहा एक महिन्यापूर्वीच हैद्राबादमध्ये त्याची लग्न झालेली मोठी मुलगी एका मुलीला जन्म देऊन बाळंतपणातच वारली होती . रावचा जावई देखिल हैद्राबादेतच नोकरी करत होता आणि त्याच्या घरी त्या तान्ह्या मुलीला सांभाळणारे कुणीच नसल्याने ती जबाबदारी रावच्या बायकोवर येऊन पडली होती. ह्या गोष्टीचा परीणाम म्हणून रावला इथे मुंबईतएकटेच राहावे लागत होते. मुलीच्या अकाली निधनाचे दु:ख आणि त्यात पुन्हा पत्नी जवळ नसल्याने येणारा एकटेपणा..ह्यामुळे तो पूर्ण गांजून गेलेला. अशा अवस्थेत दारू हाच एक जवळचा मित्र असे समजून राव त्याच्या जास्तच आहारी गेला होता.

साहेबांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आणि रावला काही दिवसांची सुटी देऊन हैद्राबादला पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. पटापट सुत्र हलली आणि तिकीट वगैरेची व्यवस्था झाल्यावर साहेबांनी दादाला पाचारण केले आणि रावला हैद्राबादच्या गाडीत बसवायची आज्ञा दिली. सोबत कार्यालयाची गाडी आणि चालक देखिल दिला. दादाने रावला बाबापुता करून समजावले आणि मोठ्या मुश्किलीने हैद्राबादच्या गाडीत बसवले. त्याही अवस्थेत राव दिसेल त्याच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करत होता.दादालाही सोडायला तो तयार नव्हता त्यामुळे नाईलाजाने दादादेखिल त्याच्या बाजूला बसून राहीला. शिट्टी वाजली,गाडी सुरु झाली. बाहेरून येणार्‍या थंडगार हवेमुळे आणि दिवसभराच्या थकव्यामुळे राव आडवा झाला आणि पाहता पाहता झोपेच्या आधीन झाला.तो शांत झोपलाय हे पाहिले आणि दादा दादरला उतरला आणि कार्यालयात त्याने दूरध्वनी करून साहेबांना हा वृत्तांत कळवला. साहेबांनी त्याला शाबासकी दिली आणि तिथूनच घरी जायची परवानगी दिली.

महिन्याभराने सुटी संपवून राव बायको आणि नातीसह मुंबईत आला.बायको महिनाभर राहून नातीसह पुन्हा हैद्राबादला गेली. बायको मुंबईत असेपर्यंत रावचे रूप पाहण्यासारखे होते. सकाळी पूजा करून,कपाळावर गंध लावून येणार्‍या रावचे प्रसन्न रूप पाहून खूप बरे वाटायचे. ह्या काळात सिगरेटचे सेवन खूपच मर्यादित झालेले होते आणि दारूदेखिल संपूर्णपणे बंद होती.
पण बायको गेल्यावर पुनः राव पूर्वपदावर आला. सिगरेटचे प्रमाण वाढले आणि दारुदेखिल पुन्हा सुरु झाली.

रावच्या व्यसनाची ही गोष्ट न संपणारी आहे पण शेवटी एक दिवस तिचाही शेवट झालाच.
असेच व्यसनात राहून कशीबशी नोकरी करत राव एके दिवशी सेवानिवृत्त झाला. त्या दिवशी त्याने त्याच्या पठडीतल्या लोकांना दारूने आंघोळ घातली आणि अतिशय आनंदाने तो हैद्राबादला गेला.दोनतीने महिन्यांनी राव काही वैयक्तिक कारणांसाठी मुंबईत येऊन आम्हाला भेटून गेला तेव्हाचा राव आजही नजरेसमोरून हटत नाही. तेव्हा रावच्या चेहर्‍यावर एक विलक्षण असे सात्विक तेज विलसत होते. त्याच्या बायकोत काय जादू होती माहीत नाही, पण तिच्या सहवासात असताना राव सर्व व्यसनं विसरायचा.रावची बायको खूपच धार्मिक होती आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा पगडा राववर पडल्यामुळे रावमध्ये होणारा सकारात्मक बदल पाहून नेहमीच असे वाटत आलंय की जर रावला पत्नीचा सहवास अखंडपणे लाभला असता तर...

आणि काही दिवसातच बातमी आली...रावची बदली झाली...त्याला वरचे बोलावणे आले....देवाज्ञा झाली.
ऐकून खूप वाईट वाटले. आत्ता कुठे त्याच्या जीवनात चांगले दिवस येत होते आणि अचानक हे असे का व्हावे?
इश्वरेच्छा बलियसी! दुसरे काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: