माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१८ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १४

रामूच्या विक्षिप्तपणाचे एकेक नमूने असे आहेत की ते आठवले की मी पुन्हा त्या जून्या काळात पोहोचतो.

सुरुवातीला आमच्या कार्यालयाची वेळ सकाळी सव्वा दहा ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत असे. वेळेआधी दहा मिनिटे कार्यालयात पोहोचणे आणि वेळेनंतरच बाहेर पडणे ह्याबाबतीत आम्ही सगळेचजण दक्ष होतो. आता खरे तर ह्यामधे आम्ही विशेष काही करत होतो अशातला भाग नव्हता. आम्ही नियमांचे यथायोग्य पालन करत होतो इतकेच. पण तरीही ह्याबाबतीत रामू खूष नसायचा. वेळेवर कार्यालयात पोहोचण्याची त्याची व्याख्या वेगळीच होती.

बर्‍याचदा तो खूपच लवकर म्हणजे नऊ-साडेनऊलाच कार्यालयात येऊन बसत असे. आम्ही आमच्या नियमित वेळी म्हणजे सव्वा दहाच्या आधी तिथे पोहोचल्यावर त्याच्यासमोर ठेवलेल्या हजेरी-पुस्तकात सह्या करताना त्याचे व्याख्यान ऐकून घ्यावे लागे. आता का म्हणून काय विचारता राव? अहो आम्हालाही हाच प्रश्न पडत असे. त्यावर रामूचे असे खास उत्तर होते..... कार्यालयात साहेब(म्हणजे रामू बरं का!) येण्याच्या आधी जो कर्मचारी येईल तो वेळेवर आला असे धरले जाईल आणि साहेबानंतर जो येईल तो उशीरा आला असे समजून त्याला हे व्याख्यान ऐकून घ्यावे लागे.

आता साहेब जर सकाळी सकाळी आठ वाजता जरी आला तरी त्यानंतर अर्ध्या मिनिटांनी आलेला कर्मचारी देखील उशीरा आला असे गणले जाईल आणि साहेब दूपारी १२-१ वाजता जरी आला तर त्याच्या आधी अर्धा मिनिट आलेला कर्मचारी हा वेळेवर आलाय असे धरले जाईल असा काहीसा विक्षिप्तपणाचा त्याचा नियम होता.

आता मला सांगा की जर सव्वा दहा ते सव्वा पाच ही कार्यालयाची वेळ ठरल्यानंतर हे असे रोजच रामूच्या लहरीप्रमाणे बदलणारे वेळेचे बंधन पाळणे कसे शक्य होते. आम्ही त्याला हे सांगूनही बघितले की,सर,इफ यू डू नॉट ऍग्री विथ दी शेड्युल (आधीपासून ठरलेली वेळ) देन टेल अस दी एक्सॅक्ट टाईमिंग फॉर आवर अटेंडन्स. वुई शॅल फॉलो इट. बट डोंट से दॅट वुई आर लेट! पण त्याचा आपला एकच हेका की तुम्ही माझ्या आधी कार्यालयात हजर पाहिजे. आता हा माणूस त्याच्या मर्जीप्रमाणे कोणत्याही वेळी येणार आणि वर आम्हालाच ऐकवणार हे आम्ही कसे सहन करायचे? शक्य तरी होते काय? मग आता ह्यावर उपाय काय? उपाय तर सुचत नव्हता पण काढायला तर लागणार होता.

मग आम्ही सात जणांनी आपली डोकी एकमेकांवर घासली(शब्दश: नाही) आणि त्यातून एकच मार्ग दिसला तो म्हणजे जशास तसे वागायचे. मग ठरले तर! रामूलाच दमात घ्यायचे.

दूसर्‍या दिवशी आम्ही नेहमी प्रमाणे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कार्यालयात प्रवेश केला तर रामू आलेलाच होता. आम्ही सगळे एकदमच सह्या करायला गेलो तर म्हणाला, मिस्टर,यू ऑल आर लेट अगेन आय से! आय टोल्ड, यू पीपल टू कम ईन टाईम अँड यू ऑल हॅव नॉट ओबेड माय ऑर्डर्स आय से! आय विल इश्यू यू मेमो आय से!
तेव्हढ्यात चिंटूने पहिला चेंडू टाकला.
सर,व्हेन डीड यू केम? (साहेबालाच प्रतिप्रश्न!)
नाईन तट्टी आय से!... रामू
सर वुई केम ऍट नाईन फिफ्टीन आय से! गजा रामूची नक्कल करत बोलला. रामू एकदम आश्चर्यचकितच झाला; पण सावरून बोलला, देन व्हेयर वेअर यू? आय हॅव नॉट सीन यू आय से!
साब, हम चाय पी रहे थे. हमने तुमको देखा आते समय. आज तुम लेट है!... इति पदू.

ह्या आकस्मिक हल्ल्याने रामू गारद झाला आणि त्याने आम्हाला सर्वांना सह्या करायला हजेरी-पुस्तक दिले. रामू हा असा बालीशपणा बर्‍याच वेळा करायचा. खरे सांगायचे तर साहेब बनण्याचे कोणतेही गुण त्याच्यात नव्हते. एक नशीब आणि दुसरे चमचेगिरी ह्या भांडवलावरच तो इथपर्यंत आला होता. त्यामुळे आम्ही त्याच्याशी कोणत्याही भाषेत(अनौपचारीक)बोललो तरी चालत असे. लहान मुलासारखेच रागवायला आणि खूष व्हायलाही त्याला वेळ लागत नसे.

क्रमश:

१७ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १३

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आमच्यावर फक्त दोनच साहेब होते. त्यात एक मद्रासी आणि दुसरा एक मराठी होता. मद्रासी हा आमच्या मुंबई कार्यालयाचा क्रमांक एकचा साहेब होता आणि मराठी दोन क्रमांकाचा साहेब होता. ह्या मद्राशाचे नाव रामचंद्रन असे होते;पण आम्ही सगळेजण त्याच्या अपरोक्ष त्याला 'रामू' म्हणत असू. दुसरे मराठी साहेब लघाटे म्हणून होते. त्यांचा मात्र आम्ही मान राखत असू.

तर हा रामू हा तसा विक्षिप्त प्राणी होता. त्याला रागवायला आणि थंड व्हायला अजिबात वेळ लागत नसे. अत्यंत संशयी,तितकाच बालीश आणि हावरटही होता. चमचेगिरी आणि मस्केबाजी मधे बहुदा त्याने पीएचडी केलेली असावी. नाही म्हणायला तो दूरसंचार आणि दळणवळण ह्या विषयातला पदवीधर अभियंता होता; पण त्याचे त्या विषयातले ज्ञान अगदीच कामचलाऊ होते. पण तरीही तो मुंबई शाखेचा प्रमुख होता. त्याच्या विक्षिप्त आणि बालीश वागण्याचा प्रसंगी आम्हाला त्रासही होत असे;पण जास्त करून त्यामुळे मनोरंजंच होत असे. एखाद्या विनोदावर तो अगदी मनसोक्त हसत असे आणि त्यावेळी त्याची लांबलचक जीभ बाहेर काढून एका विशिष्ठ पद्धतीने तो हसत असे (कुत्रे नाही का जीभ बाहेर काढून बसतात त्या पद्धतीने). आम्हाला त्याच्या त्या हसण्याचीच खूप मजा वाटायची. त्याच्या मनात असेल तर तो तासंतास आमच्याशी घोळक्यात उभा राहून गप्पा मारत असे. त्यावेळी त्याची उभे राहण्याची पद्धतही अतिशय मजेशीर होती. दोन्ही पायांची कात्री सारखी रचना करून आणि दोन्ही हात पाठीशी बांधून तो उभा राहत असे. मधनं मधनं आळोखे-पिळोखेही देत असे. कधी कधी जोरजोरात जांभया देत असे.

ह्या उभे राहण्यातही त्याची अजून एक विशेष अशी लकब होती. तो दोन्ही पायांची कैची आणि पाठीमागे हातांची कैची करून उभा असतानाच मधून मधून पुढेही सरकत असे. त्यावेळी त्याच्यासमोर उभ्या असणार्‍या व्यक्तिला अजून मागे व्हावे लागे. असेच बोलण्याच्या नादात तो त्या समोरच्या व्यक्तीला हळूहळू भिंतीला टेकवत असे आणि अगदी त्या व्यक्तीला चिकटत असे आणि एखादे गुपित सांगितल्यासारखे त्याच्याशी बोलत असे. आम्हाला,बहुतेक सगळ्यांना त्याची ही सवय माहित असल्यामुळे आम्ही त्याच्या त्या हालचाली बरहुकूम आपली स्थिती बदलत असू आणि त्याच्या कचाट्यात कधी न सापडता त्यालाच भिंतीवर आपटवत असू; पण आमचा 'अंकल’(ज्योसेफ) हा त्याचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्याच्या हालचालींकडे दूर्लक्ष झाल्यामुळे त्याच्या कचाट्यात सापडत असे. वरून बोलताना रामुची थुंकीही उडत असे. त्यामुळे नेहमी अंकल वैतागत असे;पण प्रत्येकवेळी नेमका तोच सापडायचा आणि मग आम्हाला विचारायचा,शी रे! तो रामू काय होमो हाय काय? जवा बी मी बगतो तो मलाच चिटकतो. तुमाला कोनालाबी कसा चिटकत नाही?
मग गजा त्याला सांगत असे, अरे अंकल,तू त्याचे अगदी मन लावून ऐकतोस ना म्हणून तो तुझ्यावर खूष आहे. आम्ही कसे एकदम सेफ डिस्टन्स ठेऊन असतो. तू कशाला एव्हढा इनव्हॉल्व होतो त्याच्या थापांमधे? जस्ट टेक लाईटली मॅन! ही इज जस्ट फेकींग! नाऊ ऑनवर्डस कीप वॉच ऑन हीज मूव्हमेंटस अँड ऍडजस्ट युवर्सेल्फ! ओके?
अंकल मान डोलवत असे ; पण पुढच्या वेळी देखिल तोच सापडे आणि पुन्हा गजाची लेक्चरबाजी चालायची. पण अंकल आणि रामू दोघेही सुधारले नाहीत.

कार्यालयात पोहोचल्यानंतर आम्हा सातजणांचे(मी,पदू,ज्यो,गजा,दादा,चिंटू आणि यश. कधी कधी सदानंदही असे.) सामुदायिक चहापान चाले. मी एकटा कॉफी पिणारा आणि बाकी सगळे चहाबाज होते. अशा वेळी नेमका एक दिवस रामू आला आणि आरडा-ओरड करायला लागला.
कमॉन आय से! डोंट टेक टी ऑल ऑफ यू ऍटे टाईम आय से!
गजाने त्यातला मतलब ओळखला(ह्या असल्या बाबतीत गजा कमालीचा हुशार होता). त्याने लगेच उठून त्याला बसायला खूर्ची दिली आणि आपला चहा त्याच्यापुढे सरकवला.
रामू खोट्या विनयाने, नो,नो करत राहिला;पण गजाने त्याला गोड गोड बोलून तो चहा प्यायला लावलाच. झालं! चहा प्यायल्यावर रामू एकदम खूष! मग अतिशय सौम्यपणे, डोंट टेक टी टुगेदर आय से! यु नो!इट लुक्स ऑड आय से! वगैरे सांगून लगेच गायब.

त्या दिवसापासून तो रोज आमच्या त्या चहाच्या वेळी येऊन घुटमळत असे आणि गजा त्याला लगेच चहा प्यायला बसवत असे. आता आम्हाला वाटले हा चहा, गजा स्वतःच्या पैशाने पाजतोय;पण बेटा म्हणतो कसा? अरे तो एका चहामधे खूष आहे ना? आपल्याला त्रास देत नाही ना? मग, ह्या चहाचे पैसे आपण सगळे मिळून देऊ या! काय कशी आहे माझी आयडिया?
मी म्हटले, गजा,लेका आयडिया चांगली आहे;पण हे आपल्याला आणि त्यालाही शोभत नाही. एका यक:श्चित चहासाठी जो माणूस असल्या गोष्टी खपवून घेतो तो उद्या अजूनही काही नाटके करू शकेल; आणि खरे सांगायचे तर तो चहा त्याला तूच पाजतोस असा त्याचा समज आहे आणि त्याचा तू पुरेपूर फायदा घेतो आहेस हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे.
काय फायदा घेतला मी सांग ना?.... इति. गजा.
किती सीएल(कॅज्युएल लीव्ह-- आकस्मिक रजा) वाचवल्यास ते सांग ना? अरे आम्हाला सगळं माहित आहे. उगीच मोठेपणाचा आव आणू नको..... इति. पदू.
गजाचा आवाजच बसला.
ह्याच गजाने मधल्या काळात कार्यालयाला दांड्या मारूनही अजून त्याच्या बाराच्या बारा (वर्षाला बाराच असतात)आकस्मिक रजा शाबूत होत्या त्या केवळ ह्या चहाच्या जोरावर.

क्रमश:

१६ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १२

दादाच्या 'दादागिरीचा' हा दुसरा किस्सा ऐका.

आमच्या कार्यालयाचे काम जसजसे वाढू लागले तसतसे नवीन कर्मचारी भरती होऊ लागले. त्या काळात बरेच अभियांत्रिकी पदवीधर(बीई-इलेक्ट्रॉनिक्स) भरती झाले. आम्ही जे आधी भरती झालो होतो ते सगळे आता सेवाकालामुळे ज्येष्ठ झालो होतो;पण हे येणारे नवे अभिभावक मात्र पदाने आमच्या वरचे होते. ह्या येणार्‍या लोकांची आम्ही जरा मजा करावी म्हणून एक खेळ खेळत असू. हा खेळ, जो उमेदवार पहिल्या दिवशी कार्यालयात रुजू होण्यास येत असे त्यावेळीच होत असे. एका खोलीत दादा,चिंटू आणि गजा हे तिघे बसत. कार्यालयाच्या दरवाजातून एखादा उमेदवार आत आला की मी त्याची कागदपत्रे पाहून त्याला हे तिघे बसलेल्या खोलीत घेऊन जात असे.

दादाचे आणि चिंटूचे वजनदार व्यक्तिमत्व, गजाचे त्याच्या बोकडदाढीमुळे (फ्रेंच कट) एखाद्या साहेबासारखे दिसणे ह्यामुळे आलेल्या त्या उमेदवारावर विलक्षण छाप पडत असे. मग चिंटू त्याच्या फर्ड्या इंग्लिशमधे त्यांची माहिती विचारून घेत असे. तो उमेदवार 'सर‌,येस सर' करत करत अतिशय अदबीने त्याची उत्तरे देई. मग गजा काही तरी जुजबी प्रश्न विचारत असे. त्याची उत्तरे देऊन झाली की मग दादाकडे सगळ्या नजरा लागत. दादाचा आणि इंग्लिशचा खास दोस्ताना असल्यामुळे तो काहीच बोलत नसे. फक्त त्या व्यक्तिची सगळी कागदपत्रे अतिशय बारकाईने बघत असल्याचे नाटक करत असे आणि मग त्याला रुजू करून घ्या असे खूणेनेच सांगत असे. तो उमेदवार माझ्याबरोबर त्या खोलीच्या बाहेर पडला की मागे हास्याचा मोठा स्फोट झाल्याचे ऐकून उमेदवार गोंधळला की मग आम्ही त्याला पुन्हा खोलीत बोलावून वस्तुस्थिती समजावून देत असू. मग नाईलाजाने त्यालाही ह्या हास्यकल्लोळात सामील व्हावे लागे.

अशाच एका प्रसंगी जगदीश नावाचा गुजराथी उमेदवार आला. त्याच्याबरोबर हे सगळे नाटक चालू असेपर्यंत तो अतिशय दडपणाखाली होता;पण हे सगळे नाटक होते असे त्याला आम्ही नंतर सांगितल्यावर त्याने तिथेच आई-माई वरून शिव्या द्यायला सुरुवात केली. दादाने उठून खिशातून रामपुरी काढून त्याच्यासमोर उघडल्यावर तो थरथर कापायला लागला आणि 'मारा बाप! मरी गयो'! म्हणत पळत सुटला.

हा जगदीश दिसायला एखाद्या 'सडक-सख्याहरी' सारखा होता. तोंडात अखंड शिव्या असायच्या. एकदा शिव्या देणे सुरु झाले की त्याच्या शिव्या संपतच नसत. 'लाखोली' म्हणतात तसला प्रकार होता. मात्र तो दादा आणि चिंटूला टरकून होता आणि त्यांच्याशी अतिशय नरमाईने वागत असे. हा जगदीश वेळेच्या बाबतीत एकदम पक्का होता. आमच्या कार्यालयात चार पाळ्यात काम चालायचे. ह्यातील ज्या पाळीचा हा प्रमुख असायचा त्यातील सगळ्यांना तो अखंड शिव्या देत असे‌. समजा बारा वाजताची त्याची पाळी असली की कार्यालयाच्या मुख्य दरवाजापाशी ११-४५ वाजता येऊन उभा राहायचा. ११-५५ झाले की तो आत येत असे. तोपर्यंत बाहेर सीगारेट फूंकत उभा राही. येण्याजाण्याच्या बाबतीतच नव्हे तर जेवायला जाताना आणि न्याहरीच्या वेळाही अगदी काटेकोरपणाने पाळत असे. काम मात्र यथातथा असे. तो अभियांत्रिकी पदवीधर कसा झाला हे मात्र एक कोडे होते. त्याच्यापेक्षा आम्हालाही त्या विषयातले जास्त ज्ञान होते हे वेळोवेळी सिद्ध झालेले होते;पण पदवी असल्यामुळे तो आमच्यापेक्षा वरच्या पदावर काम करत असे आणि जमेल तशी मग्रुरीही करत असे.

असेच एकदा एकाला त्याने धमकावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ज्याला धमकी दिली तो एक सदगृहस्थ होता. मारामारी,भांडणं अशा क्षुद्र गोष्टींपासून नेहमीच चार हात दूर असे. अतिशय सौम्य स्वभावाच्या त्या माणसाला अशी धमकी मिळाल्याने साहजिकच तो अतिशय चिंताक्रांत झाला. माझ्याशी बोलताना त्याने मला सहजच ही गोष्ट सांगितली आणि मी ती दादाच्या कानावर घातली. दादाने पुढचा मागचा विचार न करता भर कार्यालयात जगदीशला झोडपले.

जगदीश ही तक्रार घेऊन वरीष्ठांकडे गेला;पण त्याच्या बाजूने एकही व्यक्ति साक्षीदार म्हणून उभी राहिली नाही. मग जगदीशच्या बरोबरचा एक वर्मा नावाचा अधिकारी तिथे होता. त्याची साक्ष काढावी असे जगदीशने साहेबांना सांगितले. साहेबाने वर्माला बोलावले आणि आम्ही चिंतेत पडलो. कारण वर्मा हा एकदम स्वच्छ चारित्र्याचा आणि खरे ते बोलणारा माणूस होता. आता त्याच्या साक्षीवर सगळे अवलंबून होते. वर्माने दादावर जगदीशद्वारे केलेल्या आरोपावर अतिशय मुत्सद्दीपणे आपली साक्ष दिली.
तो म्हणाला, सर, मी त्यावेळी कामात होतो आणि काय नेमके झाले हे मला खरेच माहित नाही!

वर्मा धडधडीतपणे खोटे बोलला होता(धर्मराजानंतर खोटे बोलणारा हा 'आधुनिक धर्मराज' आहे-इति. दादा) त्यामुळे तक्रार निकालात निघाली आणि दादावर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट जगदीशलाच एक प्रेमपत्र(मेमो) मिळाले. वर्माचा दादावर एका अनामिक कारणाने जीव होता. त्यांचे नातेच सख्ख्या भावासारखे असावे इतका वर्मा त्याची काळजी घेत असे आणि म्हणूनच त्याच्या खोटे बोलण्याचे कारण आम्हाला पटले नव्हते तरी पचले होते. असो.
ह्यानंतर दादाने जगदीशला धमकी दिली, तू बाहेर पड,मग बघतो.

संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर धमकी दिल्याप्रमाणे दादाने जगदीशला चर्चगेटपासून ते शिवाजी टर्मिनसपर्यंत पाठलाग करत करत आणि कार्यालयाच्या हद्दीपासून १००मीटरच्या पुढे गेल्यावरच चोप दिला आणि तोही मुका मार बरंका! कुठेही रक्त येणार नाही ह्याची काळजी घेत(आहे की नाही ! दादा कायदे जाणून होता ह्याचा हा पुरावा). दुसर्‍या दिवशी कार्यालयात आल्यावर जगदीशने एक भले मोठे पत्र साहेबांना लिहून पाठवले आणि त्यात आदल्या दिवशी दादाने त्याची जी धुलाई केली होती त्याचं साद्यंत वर्णन करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. साहेबांनी जेव्हा दादाला ह्या बाबतीत विचारले तेव्हा दादाने आपण त्याला मारल्याचे कबूल केले आणि कार्यालयाच्या बाहेर १००मीटर अंतरापुढे केलेल्या कुठल्याही कृत्याचा जबाब द्यायला आपण बांधील नसल्याचेही ठासून सांगितले. साहजिकच साहेबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी जगदीशला हवी असल्यास पोलीसात तक्रार कर असे सांगितले. हा गुन्हा कार्यालयात घडलेला नसल्यामुळे आपण ह्याबाबतीत काहीही कारवाई करू शकत नाही असेही वर सांगितले.

त्यानंतर दादाने जगदीशला जाऊन दम दिला, तू जर पोलीसात गेलास तरी माझे काहीही वाकडे होणार नाहीच पण मग मी तूझी फुल्टूच करेन हे लक्षात ठेव. शाना असशील आता शिस्तीत राहा आणि कुणाला पीडू नको! जगदीशने दादाचे पाय धरले आणि प्रकरण तिथेच समाप्त झाले.त्यानंतर पुन्हा कधी जगदीशने कुणाला त्रास दिला नाही.क्रमश:

ते रम्य दिवस!भाग ११डावीकडून: मी(चश्मीश), दादा आणि चिंटू कार्यालयात एका पार्टी दरम्यान!
हे छायाचित्र साधारणपणे १९७२-७३ मधील आहे. छायाचित्रकार आहे गजा.

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात दादा हा खरा 'दादा'होता हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर त्या काळातले काही किस्से ऐका. दादाच्या खिशात नेहमीच रामपुरी चाकू असायचा आणि कार्यालयात तो त्याचा प्रत्यक्ष जरी उपयोग करत नसला तरी वेळप्रसंगी समोरच्याला घाबरवण्यासाठी तो रामपुरी उघडून दाखवत असे. त्याचे लखलखते पाते बघितले की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडत असे(आता मला कळले की एखाद्याला गुंड का म्हणतात ते; अहो उत्तर साधे आहे! घाबरगुंडी उडवतो तो गुंड! आहे की नाही सोपी व्याख्या!).

दादाने बरेच यांत्रिक शिक्षणक्रम केलेले होते. टर्नर,फिटर,मशिनिस्ट,वेल्डर वगैरे वगैरे. त्यामुळे कोणत्याही यंत्राबद्दलचे त्याचे ज्ञान सखोल होते. लेथ मशीन,ड्रील मशीन,ग्राईंडर,वेल्डींग मशीन वगैरे यंत्रे हाताळण्यात तो कुशल होता. त्या यंत्रांकडून काम करून घेणे आणि त्यांची देखभाल करणे हे त्याचे नेहमीचे मूळ काम होते. ह्या व्यतिरिक्त तो कोणतेहि पडेल ते काम करत असे. जिथे कुणी हरला तिथे तुम्ही दादाला कामाला लावा. आपली सगळी बुद्धी,कौशल्य आणि शक्ती वापरून तो ते काम यशस्वी करत असे.

एकदा दादा आपल्या रामपुरीला, धार काढण्याच्या यंत्रावर(ग्राईंडर) धार काढत होता. नेहमी तो काम करताना त्यात रंगून जात असे. आताही तशाच अवस्थेत असताना आमचा सर्वात मोठा साहेब( हा मद्रासी होता) तिथे आला. त्याने ते बघितले आणि करु नये ते साहस केले. त्याने दादाला जरा गुश्श्यातच विचारले, व्हाट आरायू डुईंग आय से?
प्रश्न ऐकून दादाची समाधी भंग पावली. त्याने मागे वळून बघितले तर साहेब उभा आहे आणि जाब विचारतोय.

दादाने तो लखलखता रामपुरी त्याच्यावर रोखला आणि म्हणाला, देखता नही धार लगा रहेला है! अंधा है क्या?
साहेब, दादाचा तो अवतार बघून एकदम सर्दच झाला. इकडे-तिकडे बघत असताना मी त्याला दिसलो तसा मला म्हणाला, ए मिस्टर यु टेल हीम नॉट टू डू सच थिंग्ज हीयर आय से!('आय से' हे त्याचे पालूपद असायचे)
मी काही बोलायच्या आत दादाने त्या साहेबाची कॉलर धरली आणि त्याला विचारले, मरने का है क्या बोल? तेरे साथ उसको भी छील के रख दूंगा! क्या समझा? अभी चूपचाप चला जा नही तो घुसाड दूंगा!

मी मागच्या मागेच सटकलो. ह्या लोकांच्या भानगडीत मी कशाला उगीच मरू? साहेब तर पाणी-पाणी झाला होता. दादाचा तो हिंस्त्र चेहरा,हातातला चमचमणारा रामपुरी आणि आजूबाजूला मदतीला कोणीच नाही हे पाहून त्याने हात जोडले आणि गयावया करत दादाची माफी मागितली आणि पुन्हा असा प्रश्न कधीच विचारणार नाही अशी ग्वाही दिली तेव्हा कुठे दादाने त्याची कॉलर सोडली आणि साहेबाने लगेच तिथून पलायन केले.

थोड्याच वेळात ही बातमी सगळीकडे पसरली. गजा आणि चिंटूने जाऊन दादाचे अभिनंदन केले. साहेबाची चांगली जिरवली म्हणून दादाचे कौतुक केले. मी मात्र सगळे स्थिरस्थावर झाल्यावर लांबूनच (लांबूनच बरं का!) दादाला म्हणालो, दादा, तू हे जे काही केलेस ते चांगले केले नाहीस. कदाचित तुझी नोकरीही जाईल. ह्या साहेबाने दिल्लीला तुझ्या ह्या प्रतापाबद्दल कळवले ना तर तुला घरी बसावे लागेल. तेव्हा आता ह्यापुढे जरा जपून वाग!
दादाने फक्त एकदा माझ्याकडे तुच्छतेने बघितले आणि म्हणाला, अरे तो मद्रासी घरी जित्ता जायेल काय? त्याला वर रिपोर्ट तर करू दे, नाय त्याची फूल्टू केली ना तर बापाचे नाव नाय लावणार. आणि तू त्याची चमचेगिरी कशाला करतोस? कोण लागतो तुझा तो ?
मी आपला तिथून काढता पाय घेतला. मनात म्हटले, जे झाले ते चांगले झाले नाही. आता ह्यावर काही तरी उपाय केला पाहिजे. पण काय करणार?

इथे साहेब सॉलीड तापला होता पण दादाचे ते हिंस्त्र रूप त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते आणि त्यामुळे वर दिल्लीला ह्याबद्दल कळवण्याची हिंमत करू शकत नव्हता आणि तिथे दादा विजयोन्मादात मश्गुल होता. काही तरी करायला पाहिजे होते आणि ते मलाच करावे लागणार होते. कारण सगळे दादाच्या बाजूने होते(विरोधात जाऊन मरायचे थोडेच होते कोणाला?) पण दादाला रोखण्याची शारिरीक क्षमता तर माझ्यात नव्हती. मग त्याला रोखायचे कसे? नीट विचार करून मी मनाशी एक निर्णय घेतला.

दुसर्‍या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर हिंमत करून मी दादाला म्हटले, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू शांतपणे ऐकणार असशील तर बोलू काय?
माझ्याकडे आपादमस्तक न्याहाळत दादा म्हणाला, बोल. तुझ्या सारख्या जंटलमन भटाला मी नाय कसा बोलनार?
मग मी कालच्या प्रसंगाबद्दल त्याला नीट समजावून सांगितले(त्याने ऐकून घेतले हे खरंच एक आश्चर्य होते).मी म्हणालो, " हे बघ दादा, आपण इथे नोकरी करायला येतो. तो आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणूनच ना? मग इथे आल्यावर इथले काही नियम आपल्याला पाळायलाच हवेत असे मला वाटते. तू एक कुटुंबवत्सल माणूस आहेस हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या कोणत्याही वाईट कृत्त्यामुळे तुझ्या घरच्यांना हाल भोगावे लागले तर तुला ते आवडेल काय?
दादा म्हणाला, कुनाची माय व्यालेय माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला? फुल्टू करून टाकेन त्याची!
मी म्हणालो, दादा तू एखाद्याची फुल्टू केलीस तर पोलीस तुला सोडतील काय? तू पण जेलमधे जाशील. कदाचित फाशीही होईल आणि तुझे कुटुंब रस्त्यावर येईल. हे सगळे तुझ्या करणीमुळे. दुसर्‍याचा त्यात कोणताही हात नसेल. बोल,तुला चालेल काय असे त्यांचे हाल झालेले? तू एकाला मारशील आणि तूही मरशील. मधल्या मधे ह्या तुझ्या कुटुंबाचा काय दोष आहे? विचार कर जरा!

मी त्याला तसेच सोडून माझ्या कामाला लागलो. जेवणाच्या सुट्टीनंतर दादा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ए भटा! तुज्या बोलन्यात पाईंट हाय! पन मी गप्प बसलो तर तो मा**** मद्रासी माजा काटा काडेल त्याचे काय? त्याला वाटेल की मी त्याला घाबरलो आनि तो एकदम चढून बसेल. तेच्यावर उपाय काय?
मी दादाला म्हणालो, अरे तो तुला घाबरतोय. आता तो तुझ्या वाटेला जाणार नाही;पण तूही आता हे असले चाळे ह्यापुढे करु नकोस. जरा सभ्य माणसाप्रमाणे वाग. तुझ्यातल्या ताकदीचा चांगल्या गोष्टींसाठी वापर कर. कामात तर तू कुशल आहेसच. तेव्हढा माथेफिरूपणा जरा कमी कर म्हणजे बघ तुझ्याबद्दल साहेबासकट सगळ्यांना कसा आदर वाटायला लागेल ते!

माझ्या सुदैवाने (आणि त्याच्याही!) त्या बोलण्याचा खरोखरच चांगला परिणाम दादावर झाला आणि हळूहळू दादा बदलत गेला. हे सगळे मला त्यावेळी कसे सुचले आणि मी ते कसे बोललो हे आज मागे वळून पाहताना मलाही आश्चर्यकारक वाटतेय;पण दादा आता,ह्या घडीला माझा सख्खा मित्र असल्यामुळे मला त्याच्याकडून जे कळले ते असे! का कुणास ठाऊक पण पहिल्यापासूनच तो मला मानत होता. कदाचित माझ्यातल्या वेगळेपणामुळे असावे! नक्की सांगणे त्यालाही कठीण वाटते

१५ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १०

कुणी आजारी असला की चालला दादा त्याला बघायला. वेळप्रसंगी तिथे सोबत म्हणून बसायची देखिल ह्याची तयारी. बर्‍याचशा सरकारी इस्पितळात दादाची ओळख निघतेच. कसे म्हणून काय विचारताय? अहो त्याचा एखाद्या व्यक्तिशी कोणत्याही निमित्ताने संबंध आला की दादा ती ओळख ठेवतोच;प्रसंगी वाढवतो. त्या व्यक्तिला आपल्या माहितीचा,ज्ञानाचा फायदा देतो. त्यामुळे ती माणसेही बांधली जातात आणि अशा ओळखीतून ओळखी वाढवत दादा लोकांची कामे बिनबोभाट करत असतो. माणसे जोडण्याची एक अद्भूत कला त्याच्या ठायी आहे. अपघात,मयत वगैरे प्रसंगी दादा हवाच. अपघातात मृत झालेल्या सग्यासोयर्‍यांची शवागारात जाऊन ओळख पटवणे असो अथवा पोस्टमॉर्टेम केल्यानंतर शवाचा ताबा घेणे असो, त्याच्या शिवाय एक पाऊलही टाकता येत नाही.

ओळखीत कुणाचे मयत झाल्यास दादाला पहिली खबर जाते आणि मगच नातेवाईकांना. दादा तातडीने तिथे पोचतो आणि सर्व भार आपल्या शिरावर घेतो. ह्या ठिकाणी धर्म,पंथ,जात-पात काही निषिध्द नाही. हिंदू,मुसलमान,ख्रिश्चन,बौध्द वगैरे कोणत्याही धर्माच्या मयताचे सगळे सोपस्कार ह्याला माहित असतात.त्याच्या देखरेखीखाली इतर लोक पटापट कामे करत असतात. अशा वेळी दादासारखी 'अनुभवी' माणसेच लागतात.

बर्‍याच हिंदू मित्रांच्या बरोबर तो पुढे नाशिकलाही जातो. पुढचे जे काही धार्मिक सोपस्कार करायचे असतात ते करणारे तिथले घाटावरचे ब्राह्मणही दादाला ओळखतात. मग यजमानाच्या(मयत व्यक्तीचे नातेवाईक) ऐपतीप्रमाणे क्रियाकर्म करण्यासाठी योग्य ब्राह्मणाची निवड करणे हेही दादाच ठरवतो.
बाळंतपणापासून ते व्यक्तिच्या अंत्य संस्कारापर्यंत प्रत्येक गोष्टींची अशी परिपूर्ण माहिती असणारा दादा हे काय रसायन आहे हे कळणे कठीण आहे. हे सगळे करूनही त्याची विनोदबुध्दी शाबूत आहे.

एकदा आमच्या कार्यालयात असताना त्याला मी विचारले, दादा तू सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार?
दादाने मला हळूच डोळा घातला आणि म्हणाला, आता गंमत बघ.
बाजूलाच बसलेल्या आमच्या एका सहकार्‍याला त्याने मुद्दामच संभाषणात ओढले. हा आमचा सहकारी एकदम रंगाने काळा रप्प होता. त्यामुळे दादा त्याला 'डायमंड' म्हणत असे. तसेच दुसर्‍या कोणाचा नुसत्या कल्पनेतही आर्थिक फायदा होत असेल तरी त्याच्या पोटात दुखत असे.

दादा आणि डायमंडमधला हा संवाद वाचा...
तर काय आहे डायमंड, मी सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार माहित आहे?
काय करणार आहेस?
मी एक ट्रॅव्हल सर्विस सुरु करणार आहे.
ट्रॅव्हल सर्विस?
खांदेकर ट्रॅव्हल सर्विस!
पण तुझे आडनाव तर पाटील आहे. मग खांदेकर कशाला? आणि जरा शुध्द बोल, खांडेकर असे!
अरे बाबा, खांदेकर म्हणजे खांदा देणारे अशा अर्थी!
मला नीट समजले नाही!
सांगतो. नीट समजावून सांगतो. बघ हल्ली लोकसंख्या वाढल्यामुळे लोक स्वतंत्र राहू लागले. घरात कुणाचे मयत झाल्यास स्मशानात पोचवायला चार माणसे मिळायला पण मारामार असते.मग अशा लोकांना मदत करण्यासाठी माझी योजना आहे!

खांदेकर ट्रॅव्हल्स सर्विस सादर करत आहे एक अभिनव योजना:(सद्या फक्त हिंदूंसाठी)

मुडदा तुमचा बाकी काम आमचा(हे केवळ यमक जुळवण्यासाठी बरं का)!

म्हणजे काय नीट समजाव मला!
तर बघ एकदा मुडदा हातात आला की त्याच्या जातीप्रमाणे आणि त्याच्या नातेवाईकांच्या ऐपतीप्रमाणे आमचे पॅकेज आहे.
१)सगळी क्रियाकर्म साग्रसंगीत करायची असतील १०,००० रुपये.
(ताटी बांधण्यापासून ते नाशिकला जाऊन रक्षा विसर्जनापर्यंतचा सगळा खर्च सामील)रडणारी माणसे आणि भजनी मंडळ ह्यांचा खर्च वेगळा

२)झटपट अंत्यसंस्कार: ५००० रु.(ताटी बांधण्यापासून ते विद्युतदाहिनीत नेण्यापर्यंत आणि रक्षा मुंबईच्या समुद्रात विसर्जित करण्यापर्यंत)

हे ऐकल्यावर डायमंड लगेच म्हणाला, आयला म्हणजे तू भरपूर पैसा मिळवणार आहेस! पण हे चांगले नाही. तू दु:खी लोकांकडून पैसे घेणार तुला पाप लागेल(लागलं पोटात दुखायला).
दादा म्हणाला, अरे बाबा अंत्यसंस्कार करण्याचे पण एक शास्त्र असते आणि सगळ्यांनाच ते माहित नसते. मी त्यांचे दु:ख हलके करण्यासाठीच तर ही योजना काढलेय. आता त्यांनी एकदा मुडदा माझ्या ताब्यात दिला की ते रडायला मोकळे. एकदम टेन्शन फ्री! काय? कळले की नाही. आणि हो हा देवही माझ्या बरोबर आहे. तो मंत्र-बिंत्र म्हणेल. त्यालाही मिळेल धंदा!
मी हे सगळे मजेत घेत होतो आणि तेव्हढ्यात डायमंडने पुढचा प्रश्न केला.... मी काय करू? मला पण त्यात पार्टनरशिप दे ना!
दादा म्हणाला, तुझ्यासाठी एकदम महत्वाचे काम आहे. तू पिंडाला शिवणारा कावळा हो! काय? आयडिया कशी आहे?
आणि आम्ही दोघेही खो-खो करून हसायला लागलो.

डायमंड खूप संतापला पण दादाचे तो काहीच वाकडे करू शकत नसल्यामुळे चडफडत बसला.

६ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग ९

दादाबद्दल ह्या अगोदर बरंच लिहिलंय; पण दादाचा अजून एक गुण सांगण्यासारखा आहे. अगदी रात्री-बेरात्री देखिल त्याला कुणीही बोलावलं तरी हातातलं काम टाकून तो त्या व्यक्तिच्या मागे धावणार. बाळंतपण,बारसं,वाढदिवस,मुंज,लग्न सारख्या ठिकाणी तो हजर राहणारच. बोलावणं साधे असो अथवा अगत्याचे असो तो हजेरी लावणारच आणि आहेरही घसघशीत करणार. एव्हढच काय कुणी त्याला एखाद्या कार्यात मदत हवी आहे असे सांगितले की हा माणूस तिथे कार्यालयावर अगदी सक्काळी सकाळी हजर होणार. तिथे अगदी साध्या हमालीपासून ते वधुवरांना लागणार्‍या सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था करणार. कुणाला भटजी हवा,कुणाला आचारी-पाणके हवे; दादावर सोपवून निश्चिंत व्हा. पुलंनी 'नारायण' हे पात्र ह्या दादाला बघून तर निर्माण केले नाही ना असे वाटावे इतके साम्य.

कुणाला पळून जाऊन लग्न करायचे आहे. का? तर घरचे परवानगी देत नाहीत. दादाला शरण जा. दादा सगळी व्यवस्था करतो. त्याच्याकडे अशा तर्‍हेची लग्न लावणारे भटजी आहेत. जिथे लग्न लागतात अशी निर्मनुष्य अथवा भर वस्तीतील पण कुणाला फारशी माहित नसलेली देवळे त्याला माहित आहेत. तिथले व्यवस्थापक,कंत्राटदार,त्यांचे जेवणावळींचे दर अशी यच्चयावत माहिती असते. दादा म्हणजे एक चालते बोलते संस्थान आहे.

हे कमीच म्हणून की काय त्याचे इतरही सामाजिक कार्य चालते. ऐकून आपल्याला धक्का बसेल की तारुण्याच्या बेहोषित तरूण-तरूणी नको ते करून बसतात आणि मग कुठे वाच्यता होऊ नये,इज्जत जाऊ नये म्हणून दादाला शरण जातात. मग दादा त्या दुर्दैवी तरूणीचा नामधारी पती होऊन त्या तरूणीची अशा अवस्थेतून सुटका करण्यासाठी एखाद्या सरकारी आरोग्यकेंद्रात नेऊन तिचा भार हलका करतो. जो तरूण त्यात गुंतला असतो तो शेळपट असल्यामुळे दादालाच कैक जणींचे नामधारी पती बनावे लागलेय. ह्या नामधारी पती प्रकरणावरून मी दादाला कैक वेळेला छेडले असता त्याने मला दिलेले उत्तर हे केवळ दादाच देऊ जाणे.

मी त्याला म्हटले,"अरे तू इतक्या वेळा त्या आरोग्यकेंद्रात निरनिराळ्या तरूण मुलींबरोबर जातोस आणि आपण त्यांचा नवरा आहे हे सांगून त्यांची सुटका करतोस. मग तिथे असणारे डॉक्टर,परिचारिका आणि इतर लोक तुला चांगलेच ओळखत असतील ना?"
दादा "हो" म्हणाला.
"मग ते कसे मानतात तुला त्या सर्वांचा नवरा?"
दादा म्हणाला,"हे बघ माझा हेतू शुध्द आहे. संकटात सापडलेल्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो आणि त्या बदल्यात माझी कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नसते. त्या आरोग्य केंद्र चालवणार्‍यांना काही औपचारिकता पूर्ण करावी लागते आणि त्यासाठी त्या तरूणीची संमती लागते आणि साक्षीला तिचा पती(नामधारी असला तरी) असावा लागतो. माझ्या खोट्या वागण्यामुळे त्या लोकांचे जर काही वाईट न होता भलेच होणार असेल तर ते तरी कशाला आडकाठी करतील? माझ्या क्षणिक खोट्या वागण्यामुळे जर दोन तरूण व्यक्तींची आणि त्यांच्या घरच्यांची लाज शाबूत राहणार असेल तर मला हे करायला कोणताही संकोच बाळगण्याचे काहीच कारण नाही. ही एक समाजसेवाच आहे असे मी मानतो. कुणाला पटो वा ना पटो. माझा हेतू एकदम साफ आहे. बस्स. मन चंगा तो कटोतीमे गंगा!"

दादाचा अजून एक गुण म्हणजे मैत्री करणे आणि ती निभावणे. उदा.तो माझा मित्र आहेच;पण त्याच्याशी मी जर एखाद्या व्यक्तिची जुजबी ओळख करून दिली की दादा त्यालाही आपला मित्र मानत असतो मग भले ती व्यक्ति त्याला विसरली तरी चालेल. खरे तर बर्‍याच वेळेला तो एक औपचारिकतेचाच भाग असतो आणि आपण सहसा ते विसरुनही जातो. पण दादाच्या सगळं लक्षात राहते.त्याला कळायचा अवकाश की तो कुणाच्याही दु:खाच्या प्रसंगी सांत्वनासाठी हजर असतो.

३ फेब्रुवारी, २००७

'दिल्लीवर स्वारी!'अंतिम भाग.

मित्रांचे आव्हान मी स्वीकारले आणि त्या तयारीला लागलो. खाली आलो आणि त्या छोट्या-छोट्या इमारतींच्या आसपास फिरून बघितले. माझ्या त्या अवस्थेत मला एकाने हटकले. माझे दिशाहीन फिरणे त्याला संशयास्पद वाटले असावे. मी त्यालाच प्रश्न केला...भाईसाब, यहांसे बाहर जानेका कोई रास्ता है क्या?
मला नीट न्याहाळत त्याने प्रतिप्रश्न केला, आप कौन है? कहांसे आये हो और कहांपे जाना है?
मी: मैं यहांपे विवेक लॉजमें ठहरा हूं. मुझे नाश्ता करना है. यहांपे कोई छोटामोटा होटल है क्या?
तो: आप नई दिल्ली स्टेशनपे जाओ,यहांसे नजदीक है!
मला तिथेच तर जायचे नव्हते, कारण तिथे जाण्यासाठी मला राक्षसासमोरून जावे लागले असते आणि पुन्हा कालच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली असती. मला हे सगळे टाळायचे होते आणि बाहेर निघण्याचा वेगळा मार्ग शोधायचा होता. म्हणून मी त्याला म्हटले, नई दिल्ली स्टेशनपे तो बहोत भीड है. यहां और कोई दुसरी जगह हो तो बताईये!
माझी मात्रा लागू पडली आणि त्याने तिथल्याच एका बोळकांडीतून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवत सांगितले,आप यहांसे चलते जाओ. बाहर जानेके बाद एक लंबी सडक लगेगी. वह 'पहाडगंज'(विभागाचे नाव) जायेगी. वहांपे आपको अच्छासा मद्रासी होटल मिलेगा. डोसा,इडली वडा ऐसा सब तुम्हारे लोगोंका खाना मिलेगा!
मनातल्या मनात म्हणालो, आयला!म्हणजे मी ह्याला मद्रासी वाटलो की काय? बाकी मद्रासी काय आणि मराठी काय, मला काहीही समजू दे ना. रस्ता दाखवला ना झाले तर मग. आपले काम झाल्याशी मतलब!

मी त्याचे आभार मानले आणि त्या बोळकांडीतून पुढे चालत जाऊन ती 'लंबी सडक' बघून आलो. आता ही सडक आम्हाला कुठे नेणार होती ते माहीत नव्हते;पण राक्षसाच्या तावडीतून चुपचाप सटकण्याचा त्याक्षणी तो एकमेव मार्ग मला तरी दिसत होता. तसाच उलट्या पावली परत आलो आणि माझा इरादा मित्रांना सांगितला. ते सर्व ऐकून सगळे सर्दच झाले. चुपचाप पळून जाताना त्याने पकडले तर काय? अशी भीती व्यक्त करू लागले. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सगळे भेकड आहात. काल रात्री जर तुम्ही माझी साथ दिली असतीत तर आज हा प्रसंग आलाच नसता. काल रात्रीच्या वेळी तुम्हाला सोडून मी कुठेही जाऊ शकलो असतो; पण केवळ मित्रत्वाच्या नात्याने मी तुमच्यासाठी माघार घेतली होती. आज सुद्धा तुम्ही अशीच कच खाणार असाल तर मग मी माझ्या रस्त्याने जाणार. तुम्हाला बरोबर यायचे असेल तर या, नाहीतर मी चाललो! असे म्हणून मी माझे सामान उचलले आणि दरवाजाच्या दिशेनं निघालो. लगेच तिघेही धावत आले आणि म्हणाले, बाप्पा,तू म्हणशील ते करतो पण आम्हाला असे वार्‍यावर टाकून जाऊ नकोस. जे व्हायचे ते होईल. आम्ही तू म्हणशील तसे करू!

मग मी सामान तिथेच ठेवून त्या तिघांना खाली नेले आणि ती चोरवाट दाखवली. सगळ्यांनी एकदम खाली न उतरता, एकेकट्याने आपले सामान घेऊन त्या लंबी सडकवर जाऊन दुसर्‍याची वाट बघायचे असे ठरले. मी सगळ्यांच्या शेवटी निघायचे असे सांगितल्यावर त्यांचे चेहरे खुलले. ठरवल्या प्रमाणे एकेक जण आपले सामान घेऊन त्या बोळकांडीतून विनाव्यत्यय जाऊ लागले. शेवटी माझी पाळी आली. मी खोलीवरनं एक नजर फिरवली. कोणाची काही वस्तू मागे राहिली नाही ह्याची खात्री केली आणि बॅग उचलून खोलीबाहेर पडणार एवढ्यात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. मी बॅग बाजूला ठेवली आणि येणार्‍या व्यक्तीबद्दल अंदाज करू लागलो. तो राक्षसाचा नोकर पुन्हा आम्हाला खाली बोलवायला आला होता. मी त्याला लगेच येतो असे सांगून कटवले. तो माझ्या मार्गातून दिसेनासा झाल्याची खात्री केली आणि लगेच 'सुटलो.' मला ठरलेल्या ठिकाणी पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे ते तिघे चिंताग्रस्त दिसत होते;पण मला पाहून त्यांच्या जीवात जीव आला. आता खरा प्रश्न होता जायचे कुठे आणि कसे?

रस्ते सुनसान होते. कोणतेही वाहन तर नव्हतेच;पण रस्त्यावर माणसांची वर्दळ पण जवळ जवळ नव्हतीच. आम्ही आपले बॅगा सावरत सावरत दिशाहीन अवस्थेत रस्ता जाईल तिथे चाललो होतो. मधनं-मधनं मागे वळून बघत होतो कुठे शत्रुसैन्य पाठलाग तर करत नाहीना? पण दूर दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हते. ते मद्रासी हॉटेल देखील अजूनपर्यंत कुठेच दिसले नव्हते. सकाळपासून फक्त चहा पोटात गेला होता आणि आता पोटात कावळे कावकाव करत होते;पण एकही हॉटेल सद्दष्य ठिकाण दिसत नव्हते. चालून चालून थकलो होतो आणि वरून सूर्य आग ओकत होता. कुणाला काही विचारावे तर 'बंद' असल्यामुळे क्वचितच कोणी भेटत होते. तरी देखील मोठ्या आशेने पाय ओढत ओढत आम्ही कसेबसे चालत होतो. एव्हढ्यात सुध्या ओरडला. बाप्पा तिकडे बघ लिहिलेय 'बृहन महाराष्ट्र भवन.' अरे सापडले. चल आपण तिकडे जाऊ. आपली राहण्याची आणि खाण्याची सोय होईल!

वादळात भरकटलेल्यांना किनारा दिसावा आणि जगण्याची आशा जागृत व्हावी तसे काहीसे आम्हाला झाले. आम्ही मोठ्या उत्साहाने तिथे पोहोचलो. तिथून सामानासह बाहेर पडणारी काही मंडळी आम्ही पाहिली आणि आम्हाला जागा मिळणार अशी खात्री झाली. लगबगीने आम्ही व्यवस्थापकांकडे गेलो. आम्ही काहीही बोलायच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितले ’जगह नही है!’
माझी तर खसकलीच. मी बोललो,आम्ही मुंबईहून आलोय,मराठी आहोत. आमच्याशी मराठीत बोलायच्याऐवजी सरळ हिंदी काय फाडताय?
शांतपणे ते सद्गृहस्थ म्हणाले, तुम्ही मराठी आहात असा काय शिक्का मारलाय काय तुमच्या कपाळावर? इथे जागा मागायला कोणीही येते,बोलल्याशिवाय आम्हाला कसे कळणार की कोण कुठला भाषक आहे ते?
मी म्हणालो,अहो तुम्ही बोलायला संधी देखिल दिली नाहीत आणि असे परस्पर जागा नाही म्हणून कटवताय काय? आम्ही एवढ्या लांबून आशेने आलोय तर आमची काही तरी व्यवस्था करा की!
व्यवस्थापक म्हणाले, अजून दोन दिवस तरी आम्ही तुम्हाला जागा देऊ शकणार नाही. आजच्या 'संसद घेराओ' कार्यक्रमासाठी आलेली मंडळी दोन दिवसापासूनच इथे येऊन थडकली आहेत आणि ती एवढ्या लवकर इथून हालणार नाहीत. मग मला सांगा,मी तुम्हाला जागा कुठून देऊ?

आता माझ्या लक्षात आले,सकाळी तो हमाल म्हणाला ते खरेच आहे. सध्या दिल्लीत रिकामे हॉटेल मिळणे शक्यच नव्हते. आता काय करायचे? मोठा गंभीर प्रश्न होता! आम्ही आपापसात विचारविनिमय केला आणि ठरले की ह्या अवस्थेत लटकत राहण्यापेक्षा आपण मुंबईला परत जाणेच श्रेयस्कर ठरेल. व्यवस्थापकाना आम्ही जेवण-खाण्या विषयी काही सोय होईल का म्हणून विचारले तेंव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाहेरच्या कुणासाठीही ते अशी व्यवस्था करू शकणार नव्हते असे कळले. मग त्यांना नवी दिल्ली स्टेशनकडे जाण्याचा रस्ता विचारला. तो मात्र मोठ्या आनंदाने त्यांनी आम्हाला स्वत: उठून बाहेर येऊन दाखवला. धन्य तो मराठी माणूस आणि धन्य ते आम्ही सारे!

ह्या ठिकाणाहून नवी दिल्ली स्टेशनवर पायी जायला किमान पाऊण तास लागेल असे कळले. पुन्हा एकदा आम्ही सामान उचलले आणि स्टेशनच्या दिशेने निघालो. आमच्या सुदैवाने रस्त्यात एक छोटेसे खानपानगृह आम्हाला दिसले. त्याचा मालक सरदारजी होता. आम्हाला बघून तो अदबीने पुढे आला आणि आसनस्थ होण्याची विनंती केली. लगेच थंडगार पाणी आणून पुढ्यात ठेवले. एका क्षणात चौघांनी घटाघट पाणी प्यायले आणि मग एकदम जीवात जीव आल्यासारखा वाटला.
गरम क्या है? ह्या आमच्या प्रश्नाला छोले-बटुरे असे उत्तर मिळाले. मग आम्ही तेच मागवले. पदार्थ छानच होते आणि भूक सपाटून लागली असल्याने सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारला. खाणे आटोपल्यावर आम्ही लस्सी मागवली. दोन मिनिटातच तो बैरा परत आला म्हणाला,साब,दही कम है. सिर्फ दो लस्सी ही बन पायेगी. चार नही बनेगी!
मी त्याला म्हणालो, कोई बात नही,तुम दो लस्सी चार ग्लासमें ले आओ.
तो मान हालवून गेला आणि नंतर चार ग्लास भरून लस्सी घेऊन आला. आम्ही लस्सी मजा चाखत चाखत फस्त केली. त्या बैर्‍याला बील आणायला सांगितले. पण तो म्हणाला, साब पैसा काउंटरपेही देना,इधर बील नही देत!
आम्ही सरदारजीकडे गेलो. बैर्‍याने आम्ही खाल्लेल्या पदार्थांच्या यादीत चार लस्सी असे सांगितले. मी त्याला टोकले आणि म्हटले,चार नही,दो!
तो:चार ग्लास लस्सी लाया तो था!
मी: तुमने तो बोला की सिर्फ़ दो लस्सी बनेगी इतनाही दही है, तो चार लस्सी कैसी हुई?
तो: आपने तो बोला की दो लस्सी चार ग्लासमें लाओ, बोला था ना?
मी : हां,मैने बोला था. लेकीन दो ग्लास लस्सीके चार ग्लास कैसे बनाये?
तो: "आपने बोला तो मैने दहीमे पानी मिलाके चार ग्लास बनाये.
मी: जब तुमने दो ग्लासके चार ग्लास बनानेके लिये पानी डाला इसका मतलब लस्सी असली नही थी.
तो: ऐसे कसे असली नही होगी,मैने खुदने बनायी थी. वो असली ही थी. आप चार लस्सीके पैसे देना.

इतका वेळ आमचा संवाद ऐकणार्‍या सरदारजीने मध्येच तोंड घातले. ऐजी,पाईसाब की गल है? मेणु समझादे तुसी!
मी : देखो सरदारजी हम लोक मुंबईसे आये है. हमको धरमपाजी(हे माझ्या ऑफिसातील मित्राचे नाव बरं का.... गरम धरम नव्हे) ने बोला था की दिल्लीमें जाओगे तो पहाडगंजमे एक सरदारजीका ढाबा है(हे लोक छोटेखानी हॉटेलला ढाबा म्हणतात. उधरकी लस्सी पीके देखो,जनमभर याद रखोगे. ऐसी लस्सी पुरे दिल्लीमे कही नही मिलेगी. इसीलिये आपके पास खास लस्सी पीने आये थे, लेकिन निराश होकर जा रहे है! आणि मग घडलेले लस्सी पुराण मी त्याला समजेल असे सांगितले आणि म्हटले, अभी मै धरम पाजी को क्या बताऊं? लस्सी की क्वालिटी घट गयी है,लस्सी पानीदार हुई है! बोलो,क्या जवाब दुं?
सरदारजी एकदम शरणच आला. तो म्हणाला, प्राजी, माफ करना जी! ऐ बेवकुफ्के वास्ते मेरा नाम खराब ना करो. तुसी मेरा मेहमान हो. शामको वापस आओजी,मै अपने हातोंसे त्वाडेवास्ते लस्सी बणाउंगा! तुसी फिकर ना कर. ऐसी लस्सी पिलाउंगा की जिंदगीभर करतारसिंगदा नाम भुलोगे नही. लेकीन भगवानके वास्ते धरमपाजी को मत बताओ. इतना बडा आदमी दुखी हो जायेगा!
माझ्या लक्षात आले की बहुतेक ह्याची धरमपाजी च्या बाबतीत गल्लत झालेली दिसतेय म्हणून मी सफाई देण्यासाठी म्हणालो, प्राजी,धरमपाजी....माझे बोलणे अर्धवट थांबवून मला तो अजिजीने म्हणाला,पाइसाब,किरपा करके धरमपाजी को कुछ ना बताना. मेरी मानो,आप मेरे मेहमान है और मै आपसे पैसे कैसे ले सकता हुं? लेकिन शामको जरूर आना!

मी त्याला आमची परिस्थिती समजावून सांगितली. राहायला जागा नाही म्हणून आम्ही मुंबईला परत कसे जात आहोत वगैरे गोष्टी सांगितल्यावर सरदारजी खट्टू झाला. त्याने आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन तीन ठिकाणी टेलीफोन करून बघितले पण त्याला यश आले नाही. निराश मनाने त्यांने आम्हाला निरोप दिला. जाता जाता धरमपाजी ला ’सतश्री अकाल’ सांगायला विसरला नाही. विषण्ण मनाने आम्ही देखील स्टेशनच्या मार्गाला लागलो.
दिल्लीत आल्यापासूनचा हा पहिलाच 'माणुसकीचा' हृद्य अनुभव, आम्हाला दिल्ली सोडताना मिळण्यामागे काय योग होता न कळे!

समाप्त.

'दिल्लीवर स्वारी!'भाग५

अंथरुणावर पडल्या पडल्या दिवसभराच्या घटनांचा पट डोळ्यांसमोर उलगडत होता. दिवसभरातले उलटसुलट वागणे,महनीय व्यक्तींबद्दल अपुर्‍या ज्ञानातून केलेली टिकाटिप्पणी वगैरे सर्व गोष्टींची उजळणी करता-करता झोप कधी लागली कळले नाही.

कसल्या तरी हादर्‍याने मी धडपडून जागा झालो. उठून पहिला चष्मा लावला आणि पाहिले तर दिन्या स्वत:चा पलंग सोडून माझ्या बाजूला येऊन झोपला होता. मी त्याला त्याच्या जागेवर जाऊन झोपायला सांगितले. तो गयावया करून मला म्हणाला, बाप्पा,मी तुझ्या बाजूलाच झोपतो. मला सारखी भीती वाटतेय की तो राक्षस येऊन आपल्याला मारणार आहे. तू त्याला काय-काय बोललास. तो आता आपल्याला सोडणार नाही. आणि ती खिडकी पण बंद कर,त्याला गज नाहीत. तो तिकडून आत येईल!
मी त्याला समजावून सांगितले, अरे बाबा,आपण दुसर्‍या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहोत,आणि तो राक्षस बाजूच्या बैठ्या घरात आहे.(त्या लॉजची रचना जरा वेगळीच होती. रस्त्याला लागून एका बैठ्या घरात काही खोल्या होत्या आणि काही खोल्या मागच्या बाजूला दुसर्‍या एका एकमजली इमारतीत होत्या. ह्या दोन्हींमध्ये एक छोटेसे अंगण होते). तो इथे कशाला धडपडायला येणार आहे. तू गुपचुप आपल्या जागेवर जाऊन झोप!
पण काही उपयोग झाला नाही. आमच्या बोलण्याच्या आवाजाने सुध्या आणि पद्या पण उठले. त्या दोघांना पण दिन्यासारखीच भीती वाटत होती;पण ते मोठ्या नेटाने आतापर्यंत झोपायचा प्रयत्न करत होते. दिन्याचे बोलणे त्यांना पण पटले आणि सगळ्यांनी लांब-लांब झोपण्याऐवजी तीन पलंग एकत्र जोडून त्यावर एकत्र झोपावे असे त्या तिघांचे एकमत झाले. त्याप्रमाणे त्यांनी अजून दोन पलंग माझ्या पलंगाला जोडले आणि पटापट झोपी गेले. मला अशा तर्‍हेने झोपायची सवय नव्हती,म्हणून मी थोडावेळ बसूनच होतो. ते तिघे गाढ झोपल्याची खात्री झाल्यावर मी त्या वेगळ्या राहिलेल्या पलंगावर जाऊन अंग टाकले. थोड्या वेळात मला पण झोप लागली.

मला जाग आली तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते. मी उठून प्रात:र्विधी उरकले आणि खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा अजूनही दिल्ली झोपेतच होती. त्या इमारतीच्या बाजूला अशाच छोटेखानी इमारती दाटीवाटीने उभ्या होत्या. क्वचित एक-दोन ठिकाणी जागही दिसत होती. मी हळूच दरवाजा उघडून बाहेर गेलो. बाहेर त्या लॉजचा नोकर आपले अंथरूण आवरत होता. चहा कुठे मिळेल ह्या माझ्या प्रश्नावर आमच्यात पुढील संवाद झाला.
मी: यहां चाय कहां मिलेगा?
तो: साब, इतने जल्दी आपको इधर किधर भी चाय नही मिलेगा.
मी: तो इस वक्त चाय कहां मिलेगा? तुम नही पिला सकते क्या?
तो: नही साब हमारे यहां ८बजे के बाद ही चाय मिलेगा. आपको अभी पिनी है तो नई दिल्ली ठेसन जाना पडेगा.
मी: वो तो बहुत दूर है यहांसे.
तो : नही साब खाली तीन मिनट का रास्ता है.
मी: चलो, मेरेको दिखाओ.
तो मला खाली घेऊन आला. तिथेच राक्षस आडवा घोरत पडला होता. त्याला ओलांडून आम्ही बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर त्याने मला तिथूनच नवी दिल्ली स्टेशन दाखवले. त्या लॉज पासून सहज चालत जाण्याएवढे ते अंतर होते; आणि रात्री सरदारजीने आम्हाला अर्धा तास दिल्ली फिरवून मग इथे आणले होते हे माझ्या लक्षात आले. मी त्या नोकराचे आभार मानले आणि नवी दिल्ली स्टेशनकडे निघालो.

मी तिथे माझ्या चालीने मोजून ५ मिनिटात पोचलो. स्टेशनवर बघितले तर जबरऽऽदस्त बंदोबस्त होता. पोलीस,रेल्वे पोलीस, एस.आर.पी वगैरेंमुळे स्टेशनाला छावणीचे स्वरूप आले होते. तिथेच स्टेशनाच्या आवारात बाहेरून आलेल्यांची हीऽऽ गर्दी होती. मी एका हमालाकडे विचारणा केली तेंव्हा कळले की सध्या दिल्लीतील यच्चयावत हॉटेले,लॉज,रेल्वेचे विश्रांतीगृह अशी सगळी ठिकाणे भरलेली असल्यामुळे लोकांना इथे रेल्वेच्या आवारात राहण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. मनातल्या मनात त्या सरदारजीला धन्यवाद दिले. काल जर आम्ही हट्टाने बाहेर पडलो असतो आणि कुठेच जागा मिळाली नसती तर? तर कदाचित आमच्यावर देखिल हीच पाळी आली असती. असो. तिथेच चहा प्यायला. वर्तमानपत्र विकत घेतले आणि आता कुठेही जाण्याची घाई नसल्यामुळे रमतगमत,वाचतवाचत लॉजवर आलो. अजूनही तो राक्षस आणि माझ्याबरोबरचे कुंभकर्ण घोरत पडले होते.

वर्तमानपत्राचे पहिले पान तर आजच्या 'संसद भवनाला घेराओ' आणि तत्संबंधी बातम्यांनी ओसंडून वाहत होते. दिल्लीमध्ये सगळीकडे बंद पाळला जाणार होता. बस,रिक्षा,टॅक्सी तसेच सर्व खाजगी वाहने रस्त्यावर उतरणार नाहीत असे म्हटले होते. खान-पानगृहे सोडली तर इतर सर्व दुकाने बंद राहतील असे त्यात म्हटले होते. म्हणजे ’आमचे दिल्लीदर्शन बोंबलले म्हणायचे’ असा विचार मनात आला आणि मग आता काय करायचे हा यक्षप्रश्न आ वासून पुढे उभा राहिला.

साडेसातच्या सुमारास मंडळी उठली. प्रात:र्विधी उरकले. तोपर्यंत चहा आला. त्याचबरोबर नोकराने मालकाचा निरोप आणला की सकाळी ८ वाजल्यापासून(आत्ता ह्या घडीला साडेआठ वाजत होते) नवीन दिवस सुरू होतो तेंव्हा त्याचे भाडे भरायला या.
हे असले काही असते हे आमच्या पैकी कुणालाच माहीत नव्हते. माझा तर असा 'गोऽड' समज होता की काल रात्री बारा वाजता भरलेले खोलीचे भाडे आज रात्रीच्या बारावाजेपर्यंतचे असते. त्यामुळे मी निश्चिंत होतो; पण हा राक्षस आता आम्हाला काही स्वस्थ जगू देणार नाही असे दिसत होते. मी मित्रांना म्हणालो,गेलो आपण बाराच्या भावात! आता काय करायचे?
ते तिघेही माझ्यावर खेकसायला लागले. म्हणत होते की हे सगळे तुझ्या कालच्या नाटकामुळे घडत आहे. मी त्यांना समजवायचा प्रयत्न करत होतो पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काय असेल ते आता तूच निस्तर! असे म्हणायला लागले.

'दिल्लीवर स्वारी!'भाग ४

दिल्ली स्टेशनवर आम्ही उतरलो तेव्हा रात्रीचे साडे-दहा वाजले होते. आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीत पाऊल ठेवले होते;त्यामुळे आता इतक्या रात्री जायचे कुठे हा प्रश्नच होता. मुंबईहून निघताना काही लोकांनी सल्ला दिला होता की सरळ महाराष्ट्र भवनात जाऊन राहायचे. आता एव्हढ्या रात्री ह्या अनोळखी जागी हे महाराष्ट्र भवन शोधायचे कुठे? तेव्हढ्यात एक सरदारजी आपली रिक्षा घेऊन आमच्या जवळ आला आणि आम्हाला कुठे जायचे आहे म्हणून विचारू लागला. सुध्याने लगेच तोंड उघडले, किधर भी होटल्मे रेहेनुकु मिलेंगा क्या?
मी त्याला मध्येच अडवत सरदारजीला धेडगुजरी भाषेत म्हणालो, पाजी(प्राजी चा अपभ्रंश) हमे महाराष्ट्र भवन जाणा है जी, तुसी लेके चलोगे?
तो लगेच तयार झाला. आम्ही चौघे आणि आमचे सामान,एव्हढे सगळे त्या रिक्षातून कसे जाणार हा प्रश्न मला पडला होता;पण सरदारजीने तो सहज सोडवला . तिघे मागच्या सीटवर आणि पुढे त्याच्या बाजूला मला बसवले, सामान कसे तरी कोंबले आणि त्याने रिक्षा सुसाट हाणली.

साधारण अर्धा तास त्याने आम्हाला दिल्ली फिरव-फिरव फिरवली आणि एका गल्लीमध्ये एका जुनाट इमारतीजवळ आणून थांबवली. पटापट आमचे सामान उतरवले आणि गडी समोरच असलेल्या दरवाज्यातून आत गेला सुद्धा. सुध्या,पद्या आणि दिन्या सुद्धा त्याच्या पाठोपाठ आत गेले. मी बाहेरच रेंगाळलो. महाराष्ट्र भवनाची पाटी कुठे दिसते काय म्हणून बघू लागलो;तर तसे काहीच मला दिसले नाही. उलट 'विवेक लॉज' अशी एक छोटेखानी पाटी दिसली. मी बाहेरच थांबलो हे बघून तो सरदारजी मला बोलवायला बाहेर आला. मी त्याला ती पाटी दाखवली आणि विचारले, इधर लिखा है विवेक लॉज तो महाराष्ट्र भवन किधर है?
साब अभी बहुत रात हुई है,आप इधरही रुकिये,कल आपको महाराष्ट्र भवनमे पहुचाऊंगा!इति सरदारजी.
मी म्हणालो, तुमने हमको फँसाके इधर लाया,हमको अभीके अभी महाराष्ट्र भवन मे जाना है!
तेव्हढ्यात सुध्या बाहेर आला. त्याने मला खेचत आत नेले. आत बसलेला व्यवस्थापक चांगला दणकट दिसत होता. त्याने माझे स्वागत केले, आइये साब. आपको बहुत अच्छा कमरा दिया है!
म्हणजे,मी बाहेर असताना, आमच्या ह्या तिघा दोस्तांनी खोली देखिल निवडली होती. मी ठामपणे म्हणालो, हमको इधर रेहनेकाच नही, हमको महाराष्ट्र भवनमे जाने का है. ये सरदारजीने हमको फँसाके इधर लायेला है. इसको आपसे कमिशन मिलता होगा इसिलिये ये हमको इधरिच लाया!
सुध्या गयावया करून मला म्हणाला, अरे आता रात्रीचे ११ वाजून गेलेत,आपण कुठे शोधत फिरणार ते महाराष्ट्र भवन. चल आज इथेच झोपू आणि उद्या सकाळी महाराष्ट्र भवना मध्ये जाऊ! आणि त्याने त्या व्यवस्थापकाकडे चावी मागितली.

पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. त्या व्यवस्थापकाने मला समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला पण मी माझा हट्ट चालूच ठेवला आणि माझे तिघे मित्रही माझी मनधरणी करून थकले. ह्या सरदारजीने आम्हाला इथे फसवून आणल्याचा मला सात्त्विक संताप आला होता आणि म्हणूनच मी देखिल हटून बसलो होतो. कोणाच्याही विनवणीला मी भीक घालत नाही हे बघितल्यावर त्या व्यवस्थापकाने मला दरडावणीच्या स्वरात म्हटले, आपको इधर रहेनाही पडेगा. अभी इसी वक्त आप कही नही जायेंगे!
अशा भाषेत माझ्याशी कोणीही बोलले तर मी कधीच खपवून घेत नाही. मी त्याला त्याच भाषेत उत्तर दिले, हमको इधर रेहेनके लिये तुम(अजून माझे हिंदी मराठीच्या वळणाने जात होते) मजबूर नही कर सकता है. हम जायेंगे और जाके दिखायेंगे. कौन मायका लाल हमको रोकता है मैं देखता हुं!
असे म्हणून मी माझे सामान उचलले आणि दरवाजाच्या दिशेने निघालो. माझा हा पवित्रा बघितल्यावर तो व्यवस्थापक जागेवरून उठला आणि माझ्या कडे धावला. त्याच वेळी त्याच्या नोकरांनी मला दरवाज्यातच अडवले. तो माझ्या समोर येऊन उभा राहिला म्हणण्यापेक्षा उभा ठाकला हे म्हणणे जास्त योग्य होईल. सहा फुटापेक्षा अधिक उंच,आडव्या अंगाचा असा तो राक्षसी देह आणि त्याच्यासमोर मी म्हणजे एक 'चिलट' वाटत होतो. त्याच्या फुंकरीने देखील उडून गेलो असतो. माझ्या हातातील सामान त्याने सहजपणे हिसकावून घेतले आणि म्हणाला, हमारे यहां आया हुआ मेहेमान ऐसे कैसे जा सकता है. उसकी खातिरदारी करनेका मौका हम कभी नही छोड सकते. आपको आज की रात तो रुकनाही पडेगा. अभी आप यहांसे कल सुबह ही बाहर जा सकते है!

त्याच्या त्या आविर्भावाने क्षणभर मी घाबरलो. वाटले,आज काही आपली धडगत नाही. हा राक्षस वेळप्रसंगी शारीरिक मारहाण देखिल करेल; आणि ह्या अपरिचित शहरात आपल्या मदतीला कोण येणार?(ते तिघे केंव्हाच गळपटले होते, भीतीने थरथर कापत कोपर्‍यात उभे होते) काय करावे, माघार घ्यावी की आवाज चढवावा?(नेहेमीच विपरीत परिस्थितीत माझा मराठी बाणा आणि अहंकार असा उफाळून येतो असा अनुभव आहे.)मी असा विचारमग्न असताना त्याने त्या नोकराला आमचे सामान खोलीत नेऊन ठेवायची आज्ञा केली. ते ऐकल्यावर सगळा धीर एकवटून (जे काय होईल ते होईल असा विचार करून) टीपेच्या आवाजात मी त्या नोकरावर ओरडलो, हात नही लगाना सामानको. अभी तो मेरा निश्चय पक्का हुआ,मैं यहां एक पल भी नही रुकुंगा! आणि त्या राक्षसाकडे बघून म्हणालो, मेहेमानको हम देवता समझते है और आप लोग कैदी समझके अटकाके रखते है. अरे मैंने सुना था की दिल्ली दिलवालोंकी होती है,लेकिन यहां आकर पता चला की ये शहर तो ठगोंका शहर हैं. यहां मेहेमाननवाझीके नामपे पर्देसीयोंको लुटते हैं. ऐसे शहरमें मैं एक पल भी रहना नही चाहता. मैं जा रहा हुं, किसीकी ताकत हैं तो रोक लो. मैं मुंबई वापस जाउंगा तब वहांके लोगोंको कहुंगा की दिल्ली दिलवालोंकी नही बल्कि लुटेरोंकी है. मुंबईके सरदारजी टॅक्सी ड्रायव्हर कितने इमानदार और भरोसेमंद होते है. नही तो ये सरदारजी! सरदारके नामपे कलंक हैं!
मी माझ्या मित्रांना आज्ञा केली, चला! असे मुर्दाडासारखे शेपट्या घालून बसलात म्हणून हा राक्षस माजलाय. चला,आपला मराठी बाणा दाखवा! पण कसले काय न कसले काय! त्या तिघांचे पाय जमीनीला चिकटून बसल्याप्रमाणे ते तिघे निश्चल उभे होते.

नाही म्हटले तरी माझ्या आवाजाचा परिणाम त्या राक्षसावर झालाच. तो विचार करत असावा. हा प्राणी,फुंकर मारली तरी उडून जाईल असे ह्याचे शरीर आणि त्यात आवाज मात्र भीम गर्जनेसारखा(ह्या आवाजाने मला वेळोवेळी साथ दिली आहे). प्रकरण वाटते तितके सामान्य नाही.(हे सगळे मी मनातल्या मनात)मला कळेना काय करावे. मित्र हालायला तयार नाहीत. आम्ही एकत्र आलो होतो;त्यामुळे त्यांना सोडून जाणे योग्य वाटेना आणि इथे राहावे असे देखिल वाटत नव्हते. तेव्हढ्यात इतका वेळ गप्प असलेला सरदारजी मला हात जोडून,गयावया करत म्हणाला, बाबूजी,गुस्सा थूक दो. मैं माफी मांगता हूं. मेरे वजहसे आपको तकलीफ हुई. लेकिन कृपा करके मेरे नियतपे शक मत किजिये. मैं आपको ले चलता हूं वहां,जहां आपका मन हो. लेकिन दिल्लीवालोंके बारेमे ऐसी बात मत सोचो. हम भी मेहेमानको भगवान ही समझते हैं. मैं भी असली सरदार हूं और मेरे बम्बईके सरदारपाईजी जितना पाक हूं!(इथे मी आश्चर्यचकित झालोय! बाण वर्मी लागला म्हणायचा!)
सरदारजीचा बुरूज ढासळलेला बघताच राक्षस पण एकदम निरवानिरवीची भाषा करू लागला. तो म्हणाला, बाबूजी,आप को मैं प्यार मोहोब्बतसे कहता हूं की आप इतने रातको और कहीं नही जाना. मैं आपको सबसे अच्छी रूम देता हुं और वो भी आधे भाव मे. अभी आप, ना मत कहना,नही तो मुझे बहुत बुरा लगेगा. आज तक हमारे यहांसे कोई भी ग्राहक नराज होकर वापस नही गया. आप हमपे कृपा किजिये!(आश्चर्याचा कडेलोट! मला तर वाटले होते मुंबईला जर परत गेलोच तर हातपाय दिल्लीतच सोडून जावे लागणार!)

हा सगळा परिणाम मला अपेक्षित नव्हता. त्यामुळे काय करावे ह्या विचारात मी होतो. तिघे मित्र आणि हे दोघे माझ्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते. माझे मन मला सांगत होते, बाबा रे आता अतिशहाणपणा पुरे आणि आलेली संधी हातची घालवू नकोस.केलेस तेव्हढे नाटक बस्स कर!
मी त्यांच्या विनंतीला मान म्हणून रुकार दिला आणि वातावरण निवळले. आम्हाला एका प्रशस्त खोलीत चार स्वतंत्र पलंग देऊन ’गूड नाईट’ करून राक्षस निघून गेला आणि आम्ही अंथरुणावर अंग टाकले तेंव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते.

'दिल्लीवर स्वारी!'भाग ३

लग्न थाटामाटात पार पडले. पण मित्रांच्या अनुपस्थितीमुळे माझा जीव तिथे रमला नाही. त्या सर्व राजस्थानी वातावरणात मी मला उपराच वाटत होतो. नेमीचंद मात्र मधून-मधून माझ्या आसपास राहून माझा एकटेपणा कमी करायचा प्रयत्न करत होता. रात्री खूप उशीराने वधूसहित वरात परतली. नेमीचंदने माझी झोपण्याची व्यवस्था त्याच्या बरोबरच केली. सकाळपासूनच्या धावपळीने अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागली. सकाळी खूप लवकर जाग आली. प्रातर्विधी उरकून चहा-पान झाल्यावर मी माडीवर परतलो. अजूनही सगळेजण शांतपणे झोपले होते. लग्न होऊन गेले असल्यामुळे आता इथे राहण्यात विशेष स्वारस्य नव्हते. इथून पुढच्या प्रवासाची तयारी करणे क्रमप्राप्त होते. पण हे कुंभकर्ण उठतील तेंव्हाच पुढच्या हालचालींना वेग येणार होता. हळूहळू एकेक जण उठू लागला. गप्पा-टप्पा सुरू झाल्या. ह्या वेळी मात्र सर्वजण शुद्धीवर असल्याचे जाणवले. मी सगळ्यांना लवकर तयारी करायला सांगितले. त्यांना उद्देशून म्हणालो, आपल्याला आता पुढे दिल्लीला जायचे आहे तेंव्हा चला पटापट उठा आणि तयारी करा!
माझे बोलणे ऐकून सगळे चक्रावले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज लग्न झाले की मगच निघायचे असे होते(त्यांच्या साठी कालचा दिवस उजाडलाच नव्हता). मला त्यांना सगळी कालची रामकहाणी सांगावी लागली;पण कुणाचाच विश्वास बसेना. एव्हढ्यात नेमीचंद आला. त्याचेही तसेच उत्तर ऐकून मग मात्र त्यांना आपली चूक उमगली. आपण कशासाठी आलो आणि केले काय? हे समजल्यावर त्यांना स्वत:ची लाज वाटायला लागली. ते नेमीचंदची क्षमा मागायला लागले. नेमीचंदने त्यांना त्याच्या वडिलांची क्षमा मागा असे सांगितले;पण कोणाचीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत होईना. मग मी पुढाकार घेतला. सगळ्यांना कसेबसे तयार करून नेमीचंदच्या वडिलांना भेटवले;त्यांची क्षमा मागायला लावले. त्यांनीही मोठ्या उदारपणे त्या सगळ्यांना क्षमा केली आणि दुपारचे जेवण जेवूनच पुढच्या प्रवासाला जाण्याची परवानगी दिली.
ह्या सर्वांची तयारी होईपर्यंत मी जरा इकडे तिकडे भटकून गाव बघून घेतले. परत आलो तो रात्रीची वरातीची घोडी तिथेच बांधलेली आढळली. मोतद्दाराला मस्का लावून तिच्यावर स्वार झालो आणि फोटो काढून घेतला(मुंबईहून खास आणलेल्या फॊटॊग्राफरने तिथे काढलेला हा पहिला फोटो).

दुपारची जेवणे आटोपल्यावर आम्ही चौघे जण (मी,दिन्या,पद्या आणि सुध्या)नेमीचंद आणि त्याच्या घरातील सर्वांचा निरोप घेऊन दिल्लीकडे प्रस्थान ठेवले. आम्ही ज्या मार्गाने जाणार होतो त्या मार्गावर अजमेर आणि जयपूर अशी काही प्रेक्षणीय स्थळे होती. ती बघूनच दिल्ली गाठायची असे ठरवूनच आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू केला. अजमेरला उतरल्यावर तिथे नेमके काय पाहायचे हे माहीत नव्हते. विचारल्यावर कळले की 'ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तीचा दर्गा' ही एकच पाहण्यासारखी जागा आहे. आम्ही एक उपचार म्हणून तो पाहून घेतला. बाकी थोडा वेळ इकडे तिकडे भटकण्यात आणि खरेदी करण्यात घालवला. मी इथूनच खास माझ्यासाठी राजस्थानी 'मोजडी' आणि आई व मोठ्या बहिणीसाठी खास 'बांधणी' पद्धतीच्या दोन साड्या घेतल्या.(बहिणीला साडी अजिबात आवडली नाही. पण योगायोग असा की ह्या साडीमुळेच तिचे लग्न जमले)इथून आम्ही जयपुरला गेलो. संपूर्ण शहर बघितले. जगप्रसिद्ध 'हवामहल' बघितला. हे शहर आम्हा सगळ्यांना खूप आवडले. त्यानंतर आम्ही दिल्लीच्या वाटेला लागलो.

गाडीत आमच्या समोर एक प्रौढ जोडपे बसले होते. त्यांच्यातील पुरुषाचे आमच्या बोलण्याकडे बारीक लक्ष होते. बराच वेळ आमचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ह्याची चौकशी केली. आम्ही दिल्लीला जात आहोत हे ऐकून त्यांनी दिल्लीला जाण्याचे कारण विचारले. आमचा दिल्लीदर्शन करण्याचा विचार त्यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले की ते(दिल्लीदर्शन) आम्हाला पुढच्या दोन दिवसात घडणार नाही. कारण विचारले तेव्हा कळले की दुसर्‍या दिवसापासूनच दिल्लीत जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली संसद भवनाला घेराओ घालण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे आणि देशाच्या काना-कोपर्‍यातून त्यासाठी तरुण-तरुणींचे जथ्थे दिल्लीच्या दिशेने येत आहेत. आमच्या समोर बसलेली व्यक्ती कोण होती ह्याचे मला कुतूहल होते म्हणून मी धीर करून त्यांना त्यांचे नाव विचारले. ते होते थोर सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भाव्यांचे पट्टशिष्य 'श्री.वसंतराव नारगोळकर' आणि त्यांच्या पत्नी 'सौ.कुसुमताई नारगोळकर'. वर्तमानपत्रात त्यांचे सर्वोदय चळवळी संबंधीचे लेख मी वाचले होते;त्यामुळे मला त्यांना प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला.

त्यानंतर मग बोलणे साहजिकच सध्यस्थितीवर म्हणजेच राजकारणावर सुरू झाले. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की सध्या त्यांनी विनोबांची साथ सोडून ते जयप्रकाश नारायणांबरोबर काम करत आहेत. विनोबांच्या पट्टशिष्या कडून हे ऐकले आणि मी पटकन बोलून गेलो, विनोबा मूर्ख आहेत!
नारगोळकराना ते आवडले नाही .ते म्हणाले, अरे अजून तुला खूप दुनिया बघायची आहे. असे एकदम एव्हढ्या मोठ्या माणसाला तू मूर्ख कसे ठरवतोस? असे बोलू नये!
त्या वेळी मी ऐन तारुण्याच्या जोषात होतो(मगरुर होतो म्हणा ना), समोरचा कोण आहे,त्याची थोरवी,योग्यता काय आहे आणि आपली लायकी काय आहे असले 'क्षुद्र' विचार मनाला शिवत नसत. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असला प्रकार होता. शाळेत असताना विनोबांविषयी त्यांच्या लहानपणातील चुकीच्या वागण्याविषयीचा एक धडा होता आणि त्यात त्यांच्या आईने त्याना उद्देशून म्हटलेले 'विन्या,तू मूर्ख आहेस' हे वाक्य कुठे तरी स्मरणात होते. तेव्हढ्या भांडवलावर मी देखिल त्याना मूर्ख ठरवून मोकळा झालो होतो. त्यातून माझा कल हा जास्त करुन 'सावरकरवादी' विचारांकडे असल्यामुळे हे सगळे अहिंसावादी,सर्वोदयवादी किंवा तत्सम सगळे मवाळ लोक मला मूर्खच वाटत. त्यामुळे मी त्याच आगाऊपणाने त्यांच्याशी वितंडवाद घालू लागलो.

नारगोळकर हे हाडाचे कार्यकर्ते होते. कोसबाड सारख्या मागासलेल्या भागात राहून आदिवासींची उन्नती करण्याचे कार्य ते करत असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अनुभवाची जोड होती आणि मी मात्र फक्त आजपर्यंत वर्तमानपत्रातील लेख,अग्रलेख इत्यादि वाचून आपण सर्वज्ञ आहोत असा आव आणत होतो. माझे मतपरिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यानी दिल्ली येईपर्यंत केला;पण माझ्या अडेलतट्टु स्वभावापुढे त्यांचे काहीच चालले नाही. तरी देखिल दिल्ली आल्यावर मोठ्या मनाने त्यानी मला, ’अनुभवातून शिकशील’ असा आशीर्वाद दिला आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.

'दिल्लीवर स्वारी!'भाग २

माझ्या अंगाईगीत गाण्याचा परिणाम म्हणून की काय ;) दिन्या चुळबूळ करायला लागला. मनात म्हटले, आता हा काय नवीन प्रताप दाखवतोय कुणास ठाऊक! हळूहळू तो उठून बसला. त्याने इकडेतिकडे बघितले आणि त्याचा उजवा हात सारखा नाकाकडे न्यायला लागला. मी प्रथम लांबूनच निरीक्षण केले. नेमके काय काय करतो ते तर बघूया असा विचार करत होतो. इतक्यात पद्याने दिन्याकडे धाव घेतली आणि त्याला रडत रडत विचारायला लागला, दिन्या,मम्मी खंय गेली रे!
दिन्याला प्रश्न कळला की नाही माहीत नाही. तो आपला एकटक आपल्या नाकाच्या शेंड्याकडे बघत बघत उजव्या हाताने आपले नाक पकडायचा प्रयत्न करत होता,पण ते काही त्याच्या बोटाच्या चिमटीत सापडेना. म्हणून त्याने ओरडायला सुरुवात केली. माझे नाक कुठे गेले, ए बाप्पा(मला तो ह्याच संबोधनाने पुकारत असे) माझे नाक कुठे गेले रे?
मी पुढे सरकलो आणि त्याचा हात नीट धरून तो त्याच्या नाकावर ठेवला आणि म्हटले, हे बघ तुझे नाक. नाक म्हणजे काय पेन किंवा रुमाल आहे हरवायला ?
त्याने बोटाच्या चिमटीत नाक पकडले आणि म्हणाला, साल्या बाप्पा,तू माझा खरा दोस्त आहेस. माझे हरवलेले नाक शोधून दिले! असे म्हणून नाक सोडले आणि मला मिठी मारायला लागला. मी लगेच मागे सरकलो.

मला असल्या लोकांच्या सहवासात राहण्याचा मनस्वी तिटकारा आहे. इथे नाईलाज म्हणून मी थांबलो होतो. शक्य असते तर केव्हाच ह्यांच्यापासून दूर निघून गेलो असतो. पण आता मी परमुलुखात होतो आणि ते सुद्धा ह्या लोकांबरोबर एक मित्र म्हणून आलो होतो. तेंव्हा प्राप्त परिस्थितीला कसेही करून तोंड द्यायलाच हवे होते. मी असा विचार करतोय तोपर्यंत दिन्या पुन्हा आपले नाक शोधायला लागला.
ए बाप्पा पुन्हा हरवले माझे नाक. शोधून देना. तू माझा खरा मित्र आहेस ना, मग पुन्हा शोधून दे ना!
आता मला वैताग आला होता; पण रणांगण सोडून पळ काढणे माझ्या रक्तात नसल्यामुळे मी त्यावर लगेच तोडगा काढला. सुध्याला म्हणालो, सुध्या लेका नुसता हसतोस काय? ह्या दिन्याचे नाक हरवले आहे ते शोध ना!
त्यावर तो अजून हसत सुटला आणि टाळ्या वाजवत मोठ्या-मोठ्याने ओरडू लागला, दिन्याचे नाक हरवले,बरे झाले. पद्याची आई गेली मजा आली!
हे पालुपद त्याने सुरू केले आणि दिन्या आणि पद्याभोवती गोल-गोल फिरायला लागला. दिन्या त्याला आपले 'नाक शोधून दे' म्हणून आर्जव करायला लागला तर पद्याने ’मम्मी खंय गेली!’ हा धोशा लावला.

आता माझ्या लक्षात आले की हे तिघे पूर्णपणे भांगेच्या अमलाखाली गेलेत. अहो माझ्याही आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. आतापर्यंत ऐकून होतो पण आज ह्याची देही ह्याची डोळा अनुभवत होतो. त्यामुळे मी ठरवले आता ह्यांची जरा मजा करूया;म्हणून मी दिन्याला हाक मारली आणि म्हणालो, दिन्या! हे बघ तुझे नाक माझ्या हातात आहे!
लगेच दिन्याने आर्जवं करायला सुरुवात केली, ए बाप्पा,दे ना! दे ना बाप्पा! बाप्पा देना नाक! ए बाप्पा देना नाक!
आणि ह्या आर्जवांची आवर्तनं सुरू झाली. मी त्याच्या जवळ हात नेला की ते नाक घ्यायला तो पुढे सरसावायचा. मी चटकन हात मागे घेतला की पुन्हा आर्जवं सुरू. तिथे सुध्याचे हसणे,टाळ्या वाजवणे आणि चिडवणे सुरूच होते आणि पद्याचे रडगाणे चालूच होते. थोडा वेळ मला पण गंमत वाटली; पण हे किती वेळ चालू राहणार अशी भीतियुक्त शंका देखिल मनात यायला लागली. ह्याच्या नाकाचा काही तरी सोक्षमोक्ष लावावा म्हणून मी ते नाक खिडकीतून बाहेर टाकले असे दिन्याला म्हणालो(लहान मुलांना आपण फसवतो ना अगदी तसेच; बाकी लहान मुले आणि आताचे हे तिघे ह्यांच्यात ह्या घडीला तरी कोणताच फरक नव्हता). मला वाटले तो आता गप्प बसेल;पण कसले काय आणि कसले काय? तो उठला आणि खिडकीच्या दिशेने धावला. त्या खिडक्यांना गज नव्हते. तो त्या खिडकीवर चढायचा प्रयत्न करत होता;त्याला तिथून उडी मारायची होती; नाक शोधायला जायचे होते. क्षणभर मी गडबडलो. पण लगेच पुढे धावत जाऊन त्याला ओढले आणि खिडकीपासून लांब आणून बसवले. आता हा नवीनच ताप झाला होता डोक्याला. दोन-दोन मिनिटांनी तो उठून खिडकीकडे जायचा प्रयत्न करत होता आणि मी त्याला खेचून पुन्हा लांब नेत होतो. शेवटी एक युक्ती केली. त्याला सांगितले की त्याचे नाक सुध्याला लावले आहे. तो लगेच सुध्याचे नाक ओढायला लागला. आपले नाक मागू लागला. आता सुध्याचे हसणे बंद झाले आणि ओरडणे सुरू झाले. दोघे एकमेकांची नाके खेचायला लागले. सगळाच राडा होऊन बसला.

आता ह्यातनं ह्यांना आणि मला कोण वाचवणार म्हणून मी चिंता करत होतो तेव्हढ्यात नेमीचंद अगदी देवदूतासारखा धावून आला. त्याने हे चाळे बघितले आणि प्रथम त्याला ह्याचे हसू आले पण त्या हसण्याची जागा हळूहळू संतापाने घेतली. नेमीचंद हा खरेच एक सरळमार्गी मुलगा होता. अतिशय शांत आणि प्रेमळ होता. त्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड मनस्ताप होत होता. एकीकडे मित्रांना वाईट वाटू नये म्हणून त्यांची मर्जी सांभाळणे आणि दुसरीकडे ह्यातील काहीही वडिलांपर्यंत पोचणार नाही ह्याची खबरदारी घेणे अशा पेचात तो अडकला होता. तो आता आम्हाला चहाला बोलावायला आला होता;पण हे प्रकरण बघून तो मला एकट्यालाच चल असे विनवू लागला. मी दिन्याचे नाक प्रकरण आणि त्यावरून त्याचे खिडकी-उडी नाट्य त्याला सांगितल्यावर त्याने तिथेच चहा पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले आणि तो तिथून निघून गेला. परत मी त्या माकडांच्यात एकटाच राहिलो.

हळूहळू पद्या वळणावर येण्याची चिन्हे दिसू लागली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे रडणे आणि आईचा शोध घेणे बरेच कमी झाले होते. मी बोलत होतो ते थोडे -थोडे त्याच्या डोक्यात घुसायला लागले होते. पण सुध्या आणि दिन्याचा धिंगाणा अजून सुरूच होता. तेव्हढ्यात दिन्याने ओकारी होत असल्यासारखे चाळे करायला सुरुवात केली. पुढच्या कल्पनेनेच मला शिसारी आली. मी पद्याला कसे तरी समजावले आणि त्याने त्याच्या दादाला म्हणजे दिन्याला मोरीकडे नेले आणि दिन्याने भस्सकन ओकायला सुरुवात केली. एक सेकंद जरी उशीर झाला असता तरी त्याने ते 'सगळे' सुध्याच्या अंगावर केले असते. त्या दुर्गंधीने मलाच मळमळायला लागले. काय करावे काहीच सुचेना. अती सुगंध अथवा दुर्गंधाची मला कमालीची ऍलर्जी असल्यामुळे माझ्या जीवाची तगमग सुरू झाली; पण मी मला मोठ्या शिकस्तीने जेमतेम सावरले. तेव्हढ्यात नेमीचंद नोकरासह चहा घेऊन आला. त्याने हे बघितले आणि त्याचे टाळकेच सरकले. तो तसाच चहासकट परत गेला आणि त्या नोकराला ते सगळे साफ करायला सांगितले. मला त्याने खुणेनेच खाली बोलावले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी खाली गेलो.

मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि इतके बरे वाटले म्हणून सांगू! शब्दच तोकडे पडतील! चहा पिऊन,जरा इथे-तिथे पाय मोकळे करून मी पुन्हा माडीवर आलो तोपर्यंत साफसफाई झाली होती. हसण्या-रडण्याचा भर ओसरला होता आणि मंडळी पुन्हा पेंगायला लागली होती. ह्या तिघांव्यतिरिक्त जे अजून चार जण राहिले होते त्यातला तो छायाचित्रकार(४ गोळ्या) अस्ताव्यस्त आडवा पडला होता. जिवंत आहे की मेला आहे अशी शंका वाटावी इतका गाऽऽऽढ झोपला होता. त्यामुळे त्याचा त्रास नव्हता. पण एका गोष्टीची काळजी वाटत होती की हा संध्याकाळच्या वराती पर्यंत शुद्धीवर येतो की नाही. अजून दोन तास बाकी होते पण त्याची हालचाल जाणवत नव्हती. मंदपणे हालणारा छातीचा भाता त्याच्या जिवंतपणाची साक्ष देत होता. एरवी तो ज्या स्थितीत झोपला होता तसाच्या तसा जवळजवळ ५-६ तास झोपून होता. बाकीचे तिघे केश्या,पक्या आणि गोट्या(प्रत्येकी १-१ गोळी) जागृत होण्याची चिन्हे दिसत होती. आता हे तिघे काय गुण उधळताहेत हे कुतूहलही होते आणि दडपण पण होते.

अर्धा एक तासात हे तिघे उठून बसले. आजूबाजूला बघितल्यावर साहजिकच त्यांना अपरिचित वातावरण दिसले. त्यामुळे ते काही वेळ तसेच मंदपणे बसून राहिले. पहिल्यांदा पक्या माझ्याकडे बघून म्हणाला, च्यायला बाप्पा, तू माझ्या घरी कधी आलास? ह्या केश्या आणि गोट्या बरोबर तर नव्हतास?
मी त्याला आठवण करून दिली, लेका पक्या,अरे आपण इथे राजस्थानात नेमीचंदच्या गावी आलोत. हे तुझे घर नाही. ही तुझी भांग बोलते आहे. तुला चढली आहे. जरा शुद्धीवर ये!
लगेच पक्या.... मी शुद्धीवरच आहे. तूच शुद्धीवर नाहीस. च्यायला माझ्या घरी येऊन मलाच दादागिरी दाखवतोस? गोट्या, त्याला घे रे कोपच्यात! आणि केश्या तू पण उठकी लेका! आपल्याला पिक्चरला जायचंय विसरलास वाटते?
केश्याने हळूच मान वर करून बघितले आणि पुन्हा गुडघ्यात मान घालून बसल्या बसल्या पेंगायला लागला.परत पक्या... ए गोट्या,आपण बाप्पाला पण पिक्चरला नेऊ या काय? बोल,तू,तू काय बोलतोस? बोल!
गोट्या उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हता. अजूनही तो संभ्रमित अवस्थेत बसून होता. एकटक आढ्याकडे बघत. एकटा पक्याच पकपक करत होता. त्याच्या बोलण्याला कोणी प्रतिसाद देत नाही असे पाहून त्याने बाजूलाच झोपलेल्या सुध्या आणि दिन्याला ढोसायला सुरुवात केली. ५एक मिनिटांनी ते दोघे उठून बसले आणि आपापसात काहीतरी असंबद्ध बडबडायला लागले. हळूहळू गोंधळ वाढायला लागला.

मला भीती वाटत होती की जर मित्राचे वडील आत्ता ह्या क्षणी आले तर त्यांना तरी हे ओळखतील की नाही? हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. खाली रस्त्यावर(ही माडी रस्त्यावरच होती) माणसांची वर्दळ वाढायला लागली. बँडवाले आलेले जाणवत होते. कारण मधून मधून बासरी किंवा ढोलाचा हळुवार आवाज (पूर्वतयारी चालली असावी) यायला लागला होता. तो आवाज ऐकून दिन्या पेटला. तो खिडकीजवळ जाऊन पुन्हा तिथून खाली उतरायचा प्रयत्न करायला लागला. सगळ्यांना बोलवू लागला, ए, चला चला! गणपतीची मिरवणूक येतेय. चला नाचायला चला!
मी पटकन पुढे झालो आणि त्याला आत ओढला आणि गादीवर झोपवले. मला शिव्या देत,माझ्याशी झटापट करत तो उठायचा प्रयत्न करत होता;पण मेंदूवर भांगेचा अंमल असल्यामुळे त्याला धड उभे सुद्धा राहता येत नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पावले वाजली. मला आता खात्रीच पटली की आतापर्यंत लपवून ठेवलेली ही वार्ता जर नेमीचंदच्या वडिलांना कळली तर आपली काही धडगत नाही. मी धडधडत्या अंत:करणाने येणार्‍या व्यक्तीची वाट बघू लागलो. सुदैवाने तो नेमीचंदच होता आणि आम्हाला वरातीसाठी बोलवायला तो आला होता. छायाचित्रकाराला उठवायचा प्रयत्न फोल ठरला. तो दादच देत नव्हता. इतरांची अवस्था देखिल असून नसल्या सारखीच होती. म्हणून मी एकट्यानेच चलावे असे नेमीचंदने मला सुचवले. मी त्याला दिन्याचा पुन्हा एकदा सुरू झालेला खिडकी पराक्रम सांगितला आणि अशा अवस्थेत मी कसा येऊ म्हणून विचारले. त्याच्या कडे पण उत्तर नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पुन्हा पावले वाजली आणि नेमीचंद लगेच खाली उतरला. त्याचा अंदाज बरोबर ठरला. साक्षात त्याचे वडीलच त्याच्या समोर उभे होते. नजरेनेच त्यांनी इतर सगळे कुठे आहेत म्हणून विचारले आणि नेमीचंदने मान खाली घातली. त्या परिस्थितीत मला त्याची खूप दया आली. पण मी तरी काय करणार? त्याला बाजूला सारून वडील वरती आले. समोरची सोंगे बघून ते हबकूनच गेले. अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या छायाचित्रकाराला त्यांनी लाथेने ढोसून बघितले आणि मला म्हणाले, हे सगळे केव्हापासून चालले आहे? आणि तू एकटा ह्यांच्यात कशाला अडकून राहिला आहेस? चल खाली चल, ह्यांना लोळू दे खुशाल डुकरासारखे !
मी त्यांना दिन्याचा खिडकी-प्रताप सांगितला,आणि म्हणून,कसे येऊ असे विचारले. त्यावर त्यांनी एका भरभक्कम गड्याला बोलावले. खिडक्या बंद करून कुलुपं लावली आणि त्याला देखरेखीसाठी तिथे बसवून मला घेऊन खाली आले.
सचिंत चेहर्‍याने नेमीचंद खाली उभा होता. त्याच्या कडे बघून म्हणाले, अरे कसले मित्र जोडलेस? लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायला. हा एकच मुलगा सज्जन आहे. त्याच्यामुळे आज आपली सर्वांची इज्जत वाचली. त्या दिन्याने खिडकीतून खाली उडी मारली असती तर आज काय प्रसंग ओढवला असता कल्पना करवत नाही. ह्यापुढे हे तुझे इतर दोस्त आपल्या घरी आलेले मला चालणार नाही.

वरातीचा थाट जबरदस्त होता. जयपुराहून खास मागवलेला पोलिस बँड, त्यामागे नटून थटून नाचगाणी करणारे राजस्थानी कलाकार. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या डोक्यावर घेऊन चालणारे ते रुबाबदार फेटेवाले आणि नटले -सजलेले स्त्री-पुरुष-मुले असा मोठा रुबाब होता ह्या वरातीचा. मोठ्या मानाने त्यांनी मला नवर्‍या मुलाच्या घोडी पाठोपाठ असणार्‍या सजवलेल्या मोटारीत नेमीचंदच्या बरोबरीने बसवले आणि वरात धीम्या गतीने वधूच्या घराकडे रवाना झाली.

'दिल्लीवर स्वारी!'भाग १

नमस्कार मंडळी. बंगलोर, मद्रास नंतर आपण आता जाणार आहोत दिल्ली दौर्‍यावर. ही दिल्लीवारी खरे तर बंगलोर(१९७३) आणि मद्रास (१९७७) ह्यांच्या मधल्या काळात म्हणजे १९७५ साली मी माझ्या काही जुन्या शाळकरी मित्रांबरोबर केली होती. तर आता ऐका त्याबद्दलची गंमत.

माझा एक शाळकरी वर्गमित्र नेमीचंद हा राजस्थानी जैन. तो माझ्यापेक्षा ३-४ वर्षाने मोठा होता. त्याचे लग्न देखील झाले होते आणि आता त्याच्या धाकट्या भावाच्या, लखीचंदच्या लग्नाला त्याने आम्हा सर्व खास मित्रमंडळीला बोलावले होते. लग्न राजस्थानातील एका खेडेगावात. तिथे जाण्याच्या तिकिटभाड्याचे पैसे त्यानेच भरले आणि आम्ही ६-७ मित्र त्याच्या घरच्या ४०-५० मंडळींबरोबर तिथे जायला निघालो. निघायच्या अगोदर आम्ही ३-४ मित्रांनी असे ठरविले होते की आपण लग्न आटोपल्यावर तिथूनच दिल्लीला जाऊ आणि आसपासचा परिसर पाहून दिल्लीहूनच परतीची गाडी पकडू. आम्ही राजस्थानला जायला निघालो तेव्हा फेब्रुवारी जवळ जवळ संपत आलेला होता. त्यामुळे थंडी वगैरेचा प्रश्न नव्हता आणि म्हणून दिल्लीला जायला हरकत नाही असे सर्वांचेच मत पडले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व वर्‍हाडी एका खास आरक्षित रेल्वे डब्यातून राजस्थानला निघालो. अंगात तरुणाईची मस्ती असल्यामुळे एकमेकांची टिंगलटवाळी,फिरक्या घेणे वगैरे चालू होते. लखीचंद आणि नेमीचंद आमच्यात अधून-मधून सामील होत असत. तसेच त्यांची समवयस्क चुलत-मावस-मामे-आते वगैरे भावंडे आमच्यात थट्टामस्करी करण्यासाठी सामील होत. ह्यातील काहींची नवीनच लग्ने झालेली होती म्हणून मधून-मधून आपल्या गृहलक्ष्मीला भेटून येत. प्रवास रात्रीचा होता पण आमच्या साठी मात्र ती रात्र नव्हतीच. प्रत्येकाला बोलण्याचा इतका सोस होता की किती बोलू आणि किती नको अशीच सगळ्यांची परिस्थिती झाली होती. शाळा सोडल्यानंतर जवळ-जवळ ७वर्षांनी आम्ही असे सगळे एकत्र जमलो होतो त्यामुळे इतक्या वर्षांच्या गप्पा साठलेल्या होत्या आणि ह्या गप्पाष्टकामुळे कुणालाच झोप येत नव्हती‌. संपूर्ण प्रवास आम्ही डोळे टकटकीत उघडे ठेवूनच केला‍. झोपेचे नाव सुध्दा येऊ दिले नाही. दुसर्‍या दिवशी दुपारी आम्ही त्याच्या गावाला पोहोचलो. तिथे जाई पर्यंत जेवणाची वेळ झाली होती आणि तिकडचे लोक जेवण तयार ठेवूनच आमची वाट पाहात होते. गेल्या-गेल्या हात-पाय धुऊन जेवायला बसवले. भुकेच्या पोटी दोन घास जरा जास्तच गेले आणि मग जिचा इतका वेळ विसर पडला होता ती 'झोप' आली आणि आम्ही तिच्या स्वाधीन कधी झालो कळले सुध्दा नाही.


नेमीचंद आम्हाला उठवायला आला तेंव्हा संध्याकाळचे ६वाजले होते आणि वातावरणात गारवा जाणवत होता. आम्हाला खरे तर उठावेसे वाटत नव्हते; पण आम्ही त्या गावचे पाहुणे होतो आणि आमच्या बरोबर चहा-पाणी घेण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी खोळंबली आहेत असे कळले म्हणून नाइलाजाने उठावे लागले. हे सर्व आम्हाला अगोदर माहीतच नव्हते. वर्‍हाडाबरोबर काही खास नवर्‍या-मुलाची मुंबईकर मित्रमंडळी येणार आहेत तेव्हा त्यांचे आगत-स्वागत मोठ्या इतमामातच झाले पाहिजे हा तिकडचा जणू अलिखित कायदा होता असे काहीसे असावे त्यामुळे आम्हाला तिथे फार सन्मानाने वागवले जात होते. आमच्या ६-७ जणांसाठी एका प्रशस्त माडीवर राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. गुबगुबीत गाद्या-गिरद्या,अतिशय सुबक अशा रजया. तसेच खास राजेशाही खुर्च्या वगैरे सरंजाम बघितला आणि आम्ही वेडावूनच गेलो. अहो आम्ही सर्व कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसं होतो. आम्ही ह्या गोष्टी फक्त सिनेमातच बघितल्या होत्या आणि इथे साक्षात त्या सर्वांचा उपभोग घेण्याचे सुख आम्ही अनुभवत होतो;अशाने माणूस वेडावणार नाही तर काय? ह्या वेडात भर म्हणून की काय अजून एक गोष्ट घडली. राजस्थानातच नाही तर एकूणच उत्तर हिंदुस्थानात (हिंदी भाषिक पट्टा म्हणूया) 'भांग' सेवनाचे बरेच प्रस्थ आहे. आपल्याकडे जसे घाटावरचे लोक तोंडात दाढेखाली तंबाखूची गोळी ठेवतात तशीच इथली बरीच मंडळी भांगेची गोळी तोंडात ठेवतात. काहीजण थंडाईच्या स्वरूपात घेतात. जसजशी सवय वाढते तसतशी गोळ्यांची(सेवनाची) संख्या वाढते. आणि त्यातच मोठेपणा मानण्याची सवय लागलेली. त्यावर पैजा देखील लागतात... एका वेळी जास्त गोळ्या कोण खातो म्हणून.

तर असेच काही भांगेकस तरुण आम्हाला भेटायला आले. बोलता बोलता भांगेच्या गोळ्यांचा विषय निघाला. मग कोण किती गोळ्या पचवतो ह्यावर थापा-गप्पा झाल्या. मग हळूच एकाने पिलू सोडले. तुमच्यापैकी कोणाची आहे काय हिंमत आमच्या बरोबर स्पर्धा करायची? ह्यात भर घालायला नेमीचंदची काही चुलत-मावस भावंडे देखिल होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १-२ गोळ्यांनी काहीच होत नाही. ३-४ तरी घ्यायला पाहिजे तेव्हाच खरी मजा येते. मी ह्या सर्व भानगडींपासून पहिल्या पासूनच चार हात दूर होतो त्यामुळे मैदानात राहिले ६ मित्र आणि एक आमच्या बरोबर खास मुंबईहून लग्नाचे फोटो काढण्यासाठी आणलेला छायाचित्रकार(हा नेमीचंदचा कौटुंबिक छायाचित्रकार) असे सात जण. त्या सगळ्यांनी ते आव्हान स्वीकारले. ह्यातले काही पट्टीचे 'पिणारे' होते. त्यांना वाटले आपण 'ते' पितो त्यापुढे 'ह्याची' काय मातब्बरी.
मी आपला सगळ्यांना समजावत होतो की, बाबांनो असं काही करू नका. तुमच्या ह्या अशा करण्यामुळे आपल्या सर्वांची बदनामी होईलच पण आपल्या मित्राच्या वडिलांची सुध्दा नाचक्की होईल(ह्या गावात ते अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जायचे). आपण इथे लग्नाला पाहुणे म्हणून आलो आहोत ह्याचे भान ठेवा आणि हे रंगढंग आपापल्या घरी गेल्यावर करा.
पण माझे कोणीच ऐकेना. हा कार्यक्रम दुसर्‍या दिवशी सकाळी करायचे त्या सगळ्यांनी ठरवले. गोळ्यांचा बंदोबस्त ते गाववाले करणार होते. रात्री जेवणाच्या वेळी ही गोष्ट मी नेमीचंदच्या कानावर घातली म्हणून त्याने ही सर्वांना समजवायचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. मित्रांनी त्याचे बोलणे थट्टेवारी नेले आणि ’तसे काही होणार नाही, उगीच घाबरू नकोस’ वगैरे मुक्ताफळे उधळली.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नवर्‍या मुलाची घोडीवरून वरात निघून ती नवरीच्या घरी जायची होती आणि त्यात आमची उपस्थिती अत्यंत आवश्यक होती. ह्या वरातीच्या वेळी आम्ही हजर राहायचे आहे हे आम्हाला त्याच्या वडिलांनी बजावून सांगितले. आम्ही सर्वांनी होकारही भरला होता. सकाळी नास्त्याचे वेळी ह्या सर्वांनी तिथे असणार्‍या वडील मंडळींचा डोळा चुकवून, कुणी एक,कुणी दोन तर कुणी तीन अशा गोळ्यांचे सेवन केले. नंतर दुपारच्या जेवणापर्यंत काहीच कार्यक्रम नव्हता म्हणून आम्ही माडीवर परत आलो. तास दोन तास मंडळी गप्पा मारण्यात रंगली आणि बोलता बोलता एकेक जण झोपायला लागला‍. जेवणाची वेळ झाली तरी कोणी उठवूनही उठेना म्हणून मग मी एकटाच जेवायला गेलो. मला बघितल्यावर नेमीचंदच्या वडिलांनी बाकीचे कुठे आहेत म्हणून विचारले. ते येतातच आहेत असे सांगून मी नेमीचंदला शोधायला पळालो. तो सापडल्यावर मी त्याला झाला प्रकार सांगितला. नेमके काय झाले असावे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने ७-८ ताटे भरून परस्पर माडीवर पोहोचवायला सांगितली. आम्ही दोघे माडीवर आलो आणि पुन्हा ह्या सर्वांना उठवायचा प्रयत्न केला पण कोणी उठेचना. ताटं तशीच झाकून ठेवली आणि आम्ही दोघे जेवायला खाली गेलो.

जेवण उरकून तासाभरानं आम्ही दोघे परत आलो. त्यांना उठवायचा प्रयत्न केला. जेमतेम ते उठले,कसे तरी अन्न पोटात ढकलले आणि पुन्हा झोपले. नेमीचंदने कपाळावर हात मारून घेतला, म्हणाला, कशाला मी ह्यांना बोलावले असे वाटतंय. आता माझ्या वडिलांना हे कळले तर एकेकाला हंटरने फोडतीलच आणि बरोबर मलाही चोपतील. निदान संध्याकाळी वराती पर्यंत शुध्दीवर आले तर नशीब म्हणायचे.
विषण्ण मनाने तो निघून गेला आणि मी त्या कुंभकर्णांच्या सहवासात एकटा पडलो. काय करावे मला सुचेना. वेळ जात नव्हता. कोणी उठण्याचे नाव घेत नव्हते. वाट बघण्या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नव्हते.बर्‍याच वेळाने एकजण हालचाल करू लागला. हा पद्या होता. माझा वर्गमित्र दिन्याचा धाकटा भाऊ. त्याने एकच गोळी खाल्ली होती. उठल्या उठल्या तो रडायला लागला. मला कळेना हा रडतोय का? मी त्याला विचारलं तर तो सांगायला लागला, मला आईची आठवण येतेय! आणि मोठमोठ्याने आईला हाका मारायला लागला, मम्मी तू खंय असा? मम्मी तू खंय असा?

हा प्राणी गोंयकार होता आणि एरवी मराठीत बोलणारा हा कोंकणी बोलत होता(घरी कोंकणीच बोलतात). मी त्याला समजावून सांगतोय, अरे बाबा, आपण इथे राजस्थानात लखीचंदच्या लग्नाला आलोत,इथे तुझी आई कशी येणार?
पण एक नाही आणि दोन नाही. ह्याचे आपले रडगाणे सुरूच, मम्मी तू खंय असा?
ही रडारड ऐकून 'सुध्या'(२गोळ्या) जागा झाला. मला जरा बरे वाटले. चला एक माणूस तरी मदतीला आला. पण कसले काय आणि कसले काय! तो उठला तो हसायलाच लागला. हसत हसत काही तरी असंबध्द बोलत होता. मी त्याला गदगदा हालवले आणि म्हटले, अरे सुध्या, लेका हसतोस काय? हा पद्या बघ रडतोय आईची आठवण काढून. तू जरा त्याची समजूत घाल. सांग त्याला जरा वस्तुस्थिती समजावून सांग!
त्यावर तो पुन्हा हसायला लागला आणि पद्याकडे बघून जोरजोरात हसत हसतच ओरडू लागला, पद्याची आई नाही, पद्याची आई नाही!
ह्यामुळे पद्या अजून पिसाळला आणि रडू लागला आणि सुध्या टाळ्या वाजवत हसू लागला.

आता मला (एकही गोळी न घेता) गरगरायला लागले. कळेना ह्या लोकांबरोबर मी का आणि कसा आलो. वाटले हे झोपले होते तेच बरे होते . आता झोपलेत त्यांनी असेच झोपून राहावे म्हणून मी जोरजोरात अंगाईगीत गायला लागलो.

मुक्काम पोस्ट मद्रास! अंतिम भाग

सुटीच्या दिवशी मद्रास फिरणे चालू होते. अख्खा 'माउंट रोड' पायी फिरून पालथा घातला. तसेच 'मरीना बीच','अड्यार बीच' सारखे अजस्र आणि छोटेखानी बीचेस(चौपाट्या) बघून झाले. झालंच तर 'स्नेक पार्क(सर्पोद्यान)' पाहिले. एक माउंट रोड सोडला तर बाकी मद्रास हे मागासलेले वाटले. माउंट रोड हे समस्त मद्रासी लोकांचे अभिमानाचे ठिकाण होते. कुणीही मद्रासी भेटला आणि त्याला तुम्ही जर विचारले की मद्रास मध्ये प्रेक्षणीय काय आहे तर सर्वप्रथम माउंट रोड हेच उत्तर येईल. इतका त्यांना त्याचा अभिमान आहे. ह्या रस्त्यावर भरपूर चित्रपटगृहे,मोठमोठी दुकाने, खाजगी कंपन्यांच्या मुख्य शाखा आणि खानपान गृहे असे सगळे चंगळवादी वातावरण आहे.

मद्रास शहराची उपनगरे आहेत त्यांची काही नावे मला अजून आठवतात. इथे जी उपनगरी रेल्वे चालते त्यावरील ही स्थानके आहेत.'गिंडी'(इथे आमचे वास्तव्य होते), 'मीनम्बाकम'( छोटेखानी विमानतळ आहे,तांबरम(हे उपनगरी रेल्वेवरचे एक टोक) आणि 'पार्क स्ट्रीट'(हे दुसरे टोक). हे पार्क स्ट्रीट म्हणजे आपल्या चर्चगेटचा जुळा भाऊ. मोठमोठ्या ब्रिटिशकालीन इमारती,सरकारी कचेर्‍या ह्यांनी हा भाग दिवसा गजबजलेला असतो.'मांबलम'(आपल्या दादर सारखे मध्यवर्ती ठिकाण-सर्व घाऊक खरेदी-विक्री इथे होते). 'सैदापेट्टी', 'एग्मोर'(हे एक जंक्शन होते मीटर गेज रेल्वेचे... इथून बाहेर गावच्या ... विशेषत: अंतर्गत तमिळनाडू,केरळ वगैरेसाठी)गाड्या सुटतात.

मध्यंतरी आम्ही चिंटू साठी 'वेलंकणी'ला जाऊन आलो. वांद्र्याच्या मतमाऊली सारखे हिचे प्रस्थ आहे. सर्व धर्मीय भाविक इथे जाऊन नवस बोलतात. माझा एकूणच देवा-धर्मावर विश्वास नव्हता पण चिंटूच्या बरोबर गेलो(गाड्या बरोबर नळ्याला यात्रा). प्रशिक्षण संपायच्या सुमारास आम्हाला तीन दिवसांची सुट्टी मिळणार होती(हे आम्हाला खूप अगोदरच सांगितले होते) म्हणून आम्ही थोडे आजूबाजूला फिरून येण्याचे नक्की केले आणि एक महिना आधी रेल्वेचे आरक्षण केले. जाण्याचा दिवस उजाडला. आमची तयारी झाली आणि आम्ही गिंडीहून एग्मोरला जायला निघालो. आमची गाडी एग्मोरहून रात्री ८वाजता सुटणार होती म्हणून आम्ही साधारण ७ वाजता गिंडीहून निघालो ते साडेसातच्या सुमारास एग्मोरला पोहोचलो. एग्मोरच्या उपनगरी स्थानकातून आम्ही एग्मोरच्याच बाहेरगावी जाणार्‍या स्थानकात पोहोचलो तेंव्हा दर्शकावर(इंडिकेटर) आमची गाडी लावलेली दिसली. आम्ही त्याप्रमाणे तिथे गेलो तेंव्हा नुकतीच एक गाडी स्थानकातून बाहेर पडताना दिसली. त्याच फलाटावर आमची गाडी येणार म्हणून आम्ही तिथे उभे राहिलो. थोड्या वेळातच तिथे एक गाडी आली. खात्री करून घेण्यासाठी आम्ही तिथल्या तिकिट मास्तरला विचारले तेंव्हा तो जे बोलला ते ऐकून आम्ही दोघे चक्रावूनच गेलो. आमच्या नजरेसमोर जी गाडी स्थानकातून बाहेर पडली होती तिच आमची गाडी होती. पण हे कसे शक्य आहे? अजून जेमतेम पावणेआठ तर वाजत होते आणि तिकिटावर ८ची वेळ छापलेली दिसत होती. तारीखही आजचीच होती. मग घोळ झाला कुठे?

आम्हाला तिकिट आरक्षित करून एक महिना होऊन गेला होता. मध्यंतरीच्या काळात गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल केले होते आणि नेमकी आमच्या गाडीची वेळ अर्धा तास आधीची ठेवण्यात आली होती. आम्हाला ह्या गोष्टीचा पत्ताच नव्हता. आता पुढे काय? गुपचुप तिकिट रद्द केले(३०% पैसे कापले) आणि रखडत रखडत खोलीवर आलो. सगळ्या उत्साहावर पाणी पडले होते. आम्हाला परत आलेले बघून सर्व मित्रमंडळी जमली. आमचे पडलेले चेहरे बघून त्यांना काहीच कळेना आणि काही सांगण्याचा उत्साह आमच्यात नव्हताच. उद्या सकाळी सांगतो असे म्हणून आम्ही आमची सुटका करून घेतली आणि सरळ जाऊन अंथरुणावर अंग टाकले. दुसर्‍या दिवशी जेव्हा आमची फजिती त्यांना सांगितली तेंव्हा सगळे जोरजोरात हसायला लागले. आमच्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे आम्ही देखिल त्यांच्या हसण्यात सामील झालो. ते दोनतीन दिवस आमचे अत्यंत कंटाळवाणे गेले. प्रशिक्षण संपले होते आणि हि तीन दिवसांची सुट्टी संपल्यावर आम्हाला उपचार म्हणून एक दिवस हजेरी लावायची होती आणि मुंबईला परतायचे होते.

शेवटी तो मुंबईला जाण्याचा दिवस उजाडला. आज कोणतीच घाई नव्हती. आमची मुंबईची गाडी रात्रीची होती. ह्या वेळेला वेळापत्रक नीट पुन्हा एकदा बघून घेतले होते. स्वयंपाकाचे सर्व सामानसुमान रामालिंगमला देऊन टाकले. त्याने प्रत्येक वेळी आम्हाला अतिशय मोलाची मदत केली होती त्यामुळे ते सर्व सामान त्याला देताना आम्हा दोघांचे पूर्णपणे एकमत झाले. त्यादिवशी सकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि सोबत रामालिंगम आणि परसरामलाही आग्रहाने घेऊन गेलो. संध्याकाळ झाली. सामान तर आम्ही केंव्हाच बांधले होते आणि निघण्याची तयारी (मनाची तर केंव्हाच झाली होती) सुरू होती.

इतक्यात वसतिगृहाच्या तळमजल्यावर काही तरी रडारड ऐकू आली. आम्ही तिथे जाऊन बघितले तर एक तरुण मुलगी रडत रडत काही तरी बोलत होती. ती तमिळमध्ये बोलत होती म्हणून आम्हाला काहीच बोध होत नव्हता. मी रामालिंगमला विचारले तेंव्हा तो म्हणाला की तिला मुंबईला जायचंय आणि कोणी तरी मुंबैवाला तिला बरोबर नेणार आहे म्हणून ती इथे आली पण ते लोक तिला इथे दिसत नाहीत. इतका वेळ ती मद्रास सेंट्रल स्टेशनवर त्यांची वाट बघत उभी होती पण ते अजून का आले नाहीत म्हणून ती त्यांना बघायला इथे आलेली आहे. चिंटू ने रामालिंगममार्फत तिला विचारल्यावर जे कळले त्यावरून बोध झाला की हे सगळे त्या विदेश संचार निगमच्या दोघांपैकी कुणाचे तरी कृत्य असावे. पण हेही कळले की ते दोघे दुपारीच इथून पसार झालेत म्हणून. आता काय करायचे? ती मुलगी हटून बसली होती. तिला मुंबईला जाऊन फिल्म्स्टार बनायचे होते आणि तो जो कोणी होता तो तिला ह्याकामी मदत करणार होता. गेले महिनाभर ती त्याच्या बरोबर फिरत होती वगैरे अजून काही धक्कादायक गोष्टी आम्हाला रामलिंगममार्फत कळत होत्या. तिला जेव्हा रामालिंगमकडून कळले की आम्ही दोघे पण मुंबईला जाणार आहेत तेंव्हा ती आमची विनवणी करायला लागली. . हे प्रकरण मला झेपणारे नव्हते. मुलींपासून चार पावले दूर राहणेच बरे म्हणून मी लगेच मागे हटलो(शांतं पापम्. चिंटू ह्या बाबतीत हुशार होता म्हणून पुढे होऊन त्याने रामालिंगममार्फत तिला सांगितले की आम्ही मुंबईला पोचलो की प्रोड्युसरशी बोलून नक्की करू आणि मग तुला बोलावून घेऊ. तरी ती हटून बसली आमच्या बरोबर येण्यासाठी.

आता पुन्हा प्रश्न उभा राहिला पुढे करायचे काय? एव्हढ्यात एक वयस्कर माणूस गर्दीतून वाट काढत पुढे आला आणि त्या मुलीला फरफटत घेऊन गेला. त्याच्या तोंडाचा पट्टा अखंड चालला होता आणि मध्ये मध्ये तिला फटकेही मारत होता. रामालिंगमने सांगितल्यानुसार तो तिचा बाप होता आणि पोरगी सकाळपासून बेपत्ता होती म्हणून घाबरला होता. आता तिला बघून त्याचा संताप अनावर झाला होता म्हणून तिला शिव्याशाप देत मारत तिला घेऊन गेला. हुश्श्य!!! सुटलो बुवा ह्या धर्मसंकटातून! अशा अर्थाचा सुस्कारा आम्ही तिघांनी एकाच वेळी टाकला. आता आणखी काही नाटक व्हायच्या आत इथून निघालेले बरे म्हणून भराभर सामान घेतले आणि खोलीला बाहेरुन कडी घातली आणि आम्ही सुटलो तडक गिंडी स्थानकाच्या दिशेने. रामालिंगमही आमच्या बरोबर होता. गिंडीला उपनगरी गाडीत सामान टाकले आणि रामालिंगमचा निरोप घेतला. तिथून मद्रास सेंट्रलला आलो,गाडीत सामान चढवले. गाडी सुरू झाली आणि आम्ही काळोखातच मागे जाणार्‍या त्या मद्रासला टाटा केले.

आम्ही जेव्हा दादरला गाडीतून उतरलो तेव्हा आमचे स्वागत करायला चिंटूची म्हातारी(बायको) आणि आमचा ऑफिसातला मित्र दादा पाटील असे दोघेजण हजर होते. चिंटूला बघताच म्हातारी घळघळा रडायलाच लागली. त्याच्या गळ्यात पडून तिने मोकळेपणी रडून घेतले आणि मग त्याला उद्देशून म्हणाली, व्हॉट हॅपंड टू यू माय लव्ह? यू हॅव रिड्युस्ड अ लॉट! आणि पुन्हा गंगा- यमुना वाहायला लागल्या.
लगेच चिंटूने तिच्याकडे माझी खोटी खोटी तक्रार केली. धिस बगऽ कनव्हऽटेड मी टू टोटली व्हेज यू नो! अँड अल्सो टॉट मी योगा! आय हॅव रेड्युस्ड १०केजी यू नो!
झालं! पुन्हा गंगा यमुना! ह्या बायकाना रडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही काय(मनातल्या मनात)?
मी चिंटूला म्हणालो, चल,आता मी निघतो. तू खुशाल ह्या तुझ्या म्हातारीबरोबर 'तुझ्या गळा माझ्या गळा करत बस!’

मग मी त्या प्रेमळ दांपत्याचा निरोप घेऊन पाटील बरोबर उपनगरी रेल्वेकडे निघालो. पाटीलने मला विचारले, तुला एक विचारू का?
मी हो म्हणताच तो म्हणाला, तीन महिने ह्या माणसाबरोबर तू कसे काढलेस ह्याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. मला तर वाटले होते की बहुतेक तू मुंबईला परत येशील तेंव्हा तुझे हातपाय प्लॅस्टरमध्ये असतील म्हणून मी तुला न्यायला आलो होतो. पण तू तर एकदम व्यवस्थित दिसतोयस आणि उलट तोच सुकलाय. नक्की मामला काय आहे?
पाटील हा माझा जिवाभावाचा मित्र म्हणून त्याला मी थोडक्यात सगळे सांगितले आणि त्याचे शंकानिरसन केले. त्याच्या डोळ्यात कौतुक साठून राहिलेले मला दिसले. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि माझी पाठ थोपटली. मग आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि घराकडे प्रस्थान ठेवले.
इति अलम्!

समाप्त!

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ९

आमचे दिवस मजेत चालले होते. भर उन्हाळ्यात मद्रासमध्ये आणि मजेत हे जरा विचित्र वाटते ना? पण दिवसभर आम्ही कामात गढून गेल्यामुळे आम्हाला बाहेरच्या वातावरणाची विशेष फिकीर वाटली नाही. आणि प्रकें चा तो पट्टा सोडला तर मद्रासमध्ये ठिकठिकाणी फळांचे ताजे रस मिळत असत. १ रुपयात पूर्ण ग्लास(विश्वास बसत नाही ना?). त्यामुळे आम्ही, एक सकाळ सोडली तर एरवी जेव्हा इच्छा होईल तेव्हा फळांचा रसच पीत असू. ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे चिंटूचे वजन जवळजवळ ७ किलोने कमी झाले . योगासने,शाकाहार आणि रसप्राशन अशा त्रिसूत्रीमुळे तो जरा बारीक(तुलनात्मक) दिसायला लागला. त्याचा फायदा त्याला योगासनं करण्यात व्हायला लागला आणि त्याची त्यातील रुची वाढली.

अगोदर सांगितल्या प्रमाणे ह्या प्रकें मध्ये भारतातील निरनिराळ्या भागातून आणि निरनिराळ्या सरकारी खात्यातून(राज्य सरकार आणि केंद्र सरकार) प्रशिक्षणार्थी आले होते. एकमेकांची हळूहळू ओळख व्हायला लागली. मग कोण कुठले वगैरे चौकश्या झाल्या. आमच्या सारखेच मुंबईहून दोन जण विदेश संचार निगम मधून आले होते आणि ते दोघे चक्क मराठी होते. पण त्यांनी आमच्यात खास रस दाखवला नाही. नंतर त्याचे कारण कळले. मुंबई आणि मुंबईतील एकूणच सर्व गोष्टी म्हणजे सिनेमा जगत आणि त्यासंबंधीच्या दंतकथा, मुंबईतील मोकळे वातावरण(स्त्री-पुरुष संबंध)वगैरे गोष्टींचे मुंबईबाहेरील लोकांना जबरदस्त आकर्षण होते. अनायासे मुंबईची माणसे भेटली तेव्हा त्यांच्याकडून आपले कुतूहल शमवून घेण्यासाठी ह्या दोघांच्या भोवती नेहमीच इतरांचा गराडा पडलेला असे. त्यातून ते दोघे अगदी नीटनेटके राहत आणि शक्य तो इंग्लिशच बोलत. आम्ही सुध्दा त्यांना त्यांच्या ह्या गराड्यातून बाहेर काढायचा कधी प्रयत्न केला नाही.

आम्ही देखिल त्यांच्यासारखे मुंबईकर आहोत हे कळल्यामुळे काही जण आमच्या भोवती जमत. चित्रपटातील नटनट्यांबद्दल त्यांना प्रचंड कुतूहल होते. रामालिंगम आणि मंडळींचे प्रकरण अगोदर सांगितले आहेच. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे ह्या सर्वांचे प्रश्न होते आणि उत्तरं द्यायला चिंटूसारखा फेकसम्राट असल्यानंतर तर काय मैफल रंगली नाही असे होणे शक्यच नव्हते. त्या लोकांचे ते भाबडे प्रश्न ऐकून मी एकदा बोललो सुध्दा की तुम्हाला जसे वाटते तसे काही नसते. पण माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून ते चिंटूचे रसभरित प्रवचन मोठ्या भक्तिभावाने ऐकत. हळूहळू तो त्या सर्व लोकांच्यात लोकप्रिय झाला. आमचे ते दुसरे दोन मुंबईकर बघता बघता एकटे पडले. कारण त्यांच्या भोवतीची गर्दी आता चिंटूभोवती एकवटली. हे कमी म्हणून की काय आम्हाला शिकविणारे प्रशिक्षक, ते देखील त्याच्या भजनी लागले. चिंटूचा अगदी 'चिंटू महाराज' होऊन गेला.

हे सगळे बघून मी देखील ठरवले की आता आपला प्रामाणिकपणा बस्स झाला, म्हणून मी चिंटूची री ओढायला सुरुवात केली. मधून जरा उगीचच, अरे चिंटू ती धर्मेंद्रची फजिती सांग ना! अशी फर्माइश पण करत असे.
तुम्हाला सांगतो अहो मी आपलं काय तरी बोलायचं म्हणून बोलत असे पण चिंटू अजिबात बिचकत नसे. लगेच तो आजपर्यंत खाजगी असलेली (कधीही न घडलेली) गोष्ट, आपण (त्या सर्वांना कुठे बोलायचे नाही असे बजावून ) केवळ त्यांनाच सांगत आहोत असा आव आणून बिनधास्तपणे कुठेही न अडखळता सांगत असे. त्यामुळे लोकं एकदम खूश होत आणि मला पण जरा भाव देत(अगदीच काही गया गुजरा नाही, ह्यालाही बरीच माहिती दिसतेय,ह्या अर्थाने). खोलीवर आल्यावर चिंटू मला म्हणत असे, आयला,तू पण काय कमी नाहीस. एकदम गुगलीच टाकलास? खरे तर काय बोलावे मलाही माहीत नव्हते पण फेकत सुटलो. पण ,मला एक कळत नाही, हे लोक एव्हढे भोळे कसे? की आपली फिरकी घेताहेत स्वत:चा टाईमपास करण्यासाठी?
मी म्हटले, नाही. मला तरी तसे वाटत नाही. तुझे बोलणे ते एकाग्र चित्त करून ऐकत असतात. त्यांचे डोळे सांगतात की तू जे जे बोलतो आहेस ते त्यांच्यासाठी अद्भुत आहे!

ह्या सर्व लोकांच्या कुतूहलाचा अजून एक विषय म्हणजे मुंबईतील स्त्री-पुरुष संबंधातील मोकळेपण. मला काही जणांनी विचारले, तुला किती गर्लफ्रेंड्स आहेत ?
मी खरे खरे उत्तर दिले. मला एक पण गर्लफ्रेंड नाही आणि मी मुलींशी बोलत नाही आणि त्यांच्याकडे बघायची सुध्दा माझी हिंमत नाही!
त्यांना हे उत्तर खोटे वाटले. त्यांच्या मते मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला एक तरी गर्लफ्रेंड असतेच आणि हे सगळे लोक(स्त्री-पुरुष) नेहमी समुद्रकिनारी उघडपणे प्रेम करत बसतात. आणि हे सगळे म्हणे त्यांना त्यांच्या गाववाल्यांनी सांगितलंय जे कधीकाळी मुंबईला जाऊन आले होते. ह्यावर मी काय बोलणार, कप्पाळ! पण चिंटूने त्यांची निराशा केली नाही. त्याने सांगितले, दिवसातून तो तीन गर्लफ्रेंडना वेगवेगळ्या वेळी फिरायला नेतो. खाण्या-पिण्याचा खर्च त्या मुलीच करतात. तशा त्याच्या बर्‍याच गर्लफ्रेंड्स आहेत पण खास अशा तीनच आहेत आणि त्या फिल्मलाईन मधल्या आहेत वगैरे. ह्या गोष्टीने त्यांचे समाधान तर झालेच पण त्यांच्या लेखी तो आता एकदम सुपरस्टारच बनला आणि मी बीग झिरो.

खर्‍याची दुनिया नाही हेच खरे असे म्हणून(मनातल्या मनात) मी पण त्यांच्या त्या आनंदात सामील झालो.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ८

संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. साथीला रामालिंगम आणि परसराम होते. जेवण बनवण्यासाठी लागणारी सगळी सामग्री घेऊन आलो. त्यात डाळ-तांदूळ पासून ते पोळपाट लाटणे,स्टोव्ह, भांडीकुंडी वगैरे सर्व आलं. रॉकेलची व्यवस्था रामालिंगम करणार होता. अशी सर्व खरेदी करून आम्ही खोलीवर आलो. आमच्या पाठोपाठ दहा मिनिटांनी रामालिंगम एक ५लीटर चा कॅन भरून रॉकेल घेऊन आला.

घरी आईने आम्हा सर्व भावंडांना वरण-भात,खिचडी(मुगाच्या डाळीची) वगैरे गोष्टी करायला शिकवल्या होत्या. अधनं-मधनं ते सर्व केलेले देखिल होते. त्यामुळे एकप्रकारचा आत्मविश्वास होता. म्हणून मग मी चिंटूला म्हणालो की मी खिचडी करतो, तर त्याला खिचडी हा काय प्रकार आहे हे सगळे समजावून सांगायला लागले. त्या बिचार्‍या मांसाहारी प्राण्यावर काय हा प्रसंग गुदरला होता! पण कोणतीही खळखळ न करता त्याने संमती दिली आणि ह्यात मी काय करू म्हणून विचारले. मग मी अंदाजाने डाळ-तांदूळ मापून त्याला निवडायला दिले. मग टोमॅटो,कांदा,बटाटा चिरून घेतला. निवडलेले डाळ-तांदूळ धुऊन घेतले‌. तुपाच्या(त्यावेळी डालडा होता)फोडणीत टोमॅटो-कांदा-बटाटा टाकून चांगला परतला आणि मग धुतलेले डाळतांदूळ त्यात घालून सारखे केले. त्यात चवीपुरते तिखट-मीठ आणि थोडा गरम मसाला टाकून वर झाकण ठेवले. मध्ये एकवेळा अजून पाणी घातले आणि मग वीस मिनिटात खिचडी तयार झाली . काय घमघमाट सुटला होता म्हणून सांगू! ह्या खिचडीला मी नाव ठेवले 'शाही खिचडी.'

मग आम्ही दोघांनी खिचडी वाढून घेतली आणि त्यावर पुन्हा डालडा(पर्यायच नव्हता) घालून चिंटूला म्हटले, कर सुरुवात!
चिंटूने पहिलाच घास घेतला आणि म्हणाला, देवा,लेका काय टेस्टी आहे रे! आपण रोज रात्री आता खिचडीच खाणार. सकाळी चपाती-भाजी आणि रात्री तुझ्या हातची शाही खिचडी!
मी म्हणालो, अरे, रोज रोज खिचडी खाऊन कंटाळशील. कधी कधी आमटी-भात बनवूया, तेव्हढाच बदल!
ठीक आहे, तू म्हणशील तसे करू. पण सांगून ठेवतो उद्या सकाळपासून चपात्या बनवायचे काम माझे आणि तू भाजी बनवायची. कबूल? चिंटू उवाच!
मी म्हटले, कबूल!
आमचे हे प्रितीभोजन चालू असताना परसराम डोकावला. मग नको-नको म्हणत असताना त्यालाही थोडी खिचडी खायला लावली. तो तर पागलच झाला. त्याने लगेच माझ्याकडून रीत समजावून घेतली. मी त्याला म्हणालो, तुमको जब खिचडी खानेका मन होता है, हमारे पास आओ और जब हमको पराठा खानेका मन होगा तो हम तुम्हारे पास आयेंगे!(परसराम पराठे काय मस्त बनवायचा! परसरामदा जवाब नही!)
तो लगेच म्हणाला, अबे क्या मस्त आयडिया है! ऐसा करते है, मै इतवार को परांठे बनाउंगा और तुम ये तुम्हारी शाही खिचडी बनाओ. मिलकर खायेंगे‌. साथमे दही और पापड होगा और सलाद भी बनायेंगे!

आम्ही त्याची योजना मान्य केली आणि शाही खिचडीचा चट्टामट्टा केला. जेवण तर झाले. आता भांडी कुणी घासायची(मनातल्या मनात)हा प्रश्न निर्माण झाला. पण काही कळायच्या आत चिंटूने भांडी गोळा केली आणि गेलासुध्दा भांडी घासायला. जन्माचा आळशी म्हणून प्रसिध्द असलेल्या ह्या प्राण्याचे हे वेगळेच रूप मी पाहत होतो. तसे मुंबई सोडल्यापासूनच त्याच्यातला आमूलाग्र बदल मी पाहत आलो होतो. म्हणजे आपल्यात म्हण आहे ना की, 'संगतीला आणि पंगतीला एकत्र राहिल्याशिवाय खरा स्वभाव कळत नाही' अगदी तसेच ह्याच्या बाबतीत झाले होते. पूर्वीचे बरेच गैरसमज आता दूर होत होते आणि त्याचे खरे स्वरूप जे मी आता पाहत होतो ते माझ्यासमोर हळूहळू प्रकट होत होते.

दुसर्‍या दिवसापासून आमचा कार्यक्रम अगदी ठरल्याप्रमाणे सुरू झाला ‌सकाळी ५वाजता उठणे. प्रातर्विधी आटोपून योगासनं करणे,त्यानंतर चहापान, मग दोघांनी मिळून जेवण बनवणे(ह्यातच नास्ता पण होऊन जायचा आणि डबा पण तयार व्हायचा),मग अंघोळी करून,कपडे करून होइस्तोवर पावणे आठ वाजलेले असत. मग जाता जाता मध्येच उपाहारगृहात पुन्हा कॉफी पिऊन प्रकें कडे मार्गस्थ होणे. संध्याकाळी आल्यावर पुन्हा स्नान,कपडे धुणे(माझे बाहेरचे कपडे पण मीच धूत असे;चिंटू लाँड्रीत देत असे) मग जेवण बनवणे,जेवणे आणि गप्पा टप्पा करून झोपणे. अश्या तर्‍हेने दिवस हा हा म्हणता जात होते. प्रशिक्षण पण ऐन भरात आले होते आणि मुख्य म्हणजे आम्हालापण त्याची गोडी लागली होती. रविवारी आम्ही दोघे मद्रासभर भटकत दिवस सत्कारणी लावत असू. त्यादिवशी सर्व खाणे-पिणे बाहेरच असायचे.

अशाच एका रविवारचा प्रसंग आहे हा. आम्ही दोघे एका ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पदपथावरून खाली उतरलो आणि चार पावलं चाललो नाही तर आमच्या जवळ एक ऑटोरिक्षा, ब्रेकचा कर्कश्श आवाज करत येऊन थांबली. मला धक्का लागता लागता थोडक्यात वाचलो पण त्या अनपेक्षित आवाजाने भांबावून गेलो होतो. त्या रिक्षा चालकाला चिंटूने दोनतीन अर्वाच्य शिव्या दिल्या त्याबरोबर तो रिक्षाच्या बाहेर आला. त्याला बघितल्यावर माझी खात्रीच पटली की आज काय आपली धडगत नाही. अहो साक्षात घटोत्कच आमच्या समोर उभा होता. काळा रप्प, सहा फूट उंच आणि अंगाने चांगलाच आडवा,झुपकेदार मिशा,अशा त्याने चटकन माझा हात धरला आणि तमिळमध्ये काही तरी गुरगुरला. त्याच्या त्या मुसळासारख्या हातात माझा हात म्हणजे एखाद्या भल्या मोठ्या अजगराच्या तोंडात ससा असावा तसे काहीसे दिसत होते. पण त्याक्षणी मी असेल नसेल तेव्हढा जोर काढून त्याच्या हाताला हिसडा दिला आणि माझा हात सोडवून घेऊन तिथून जरा दूर पळालो. तो मोका साधून चिंटूने मुष्टीचे दोनतीन तडाखे त्याला दिले. पण त्या घटोत्कचावर त्याचा विशेष असा परिणाम जाणवला नाही. मात्र मनात कुठे तरी त्याला आश्चर्य वाटले असावे की हे मच्छर माझ्याशी दोन हात करण्याची हिंमत कसे काय करताहेत. दोन पावले पुढे होऊन त्याने चिंटूला पकडण्यासाठी हात पुढे केला.ती संधी साधून चिंटूने त्याच्या नाकावर एक जबरदस्त ठोसा लगावला. ह्यावेळी मात्र घटोत्कच गडबडला, जरा तोल जाऊन पडता पडता बचावला आणि त्वेषाने चिंटूवर त्याने हल्ला केला आणि त्याला आपल्या जबरदस्त मिठीत पकडून दाबू लागला. चिंटू सुटायची धडपड करत होता पण ते त्याच्या शक्तीबाहेरचे काम होते. मी तर केवळ बघ्या होतो. काय करावं,कुणाला मदतीला बोलवावं हा विचार करता करता मला एक युक्ती सुचली. मी त्या घटोत्कचाच्या मागे गेलो आणि त्याच्या कुशीत बोट खुपसले तेंव्हा तो एकदम उसळला. माझा प्रयत्न फळास येतो आहे हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी एकदम दोन्ही हातांनी त्याच्या कुशीत जोरदारपणे बोटे खुपसली त्यामुळे तो पुन्हा जोरात उसळला आणि त्याची चिंटूवरची पकड ढिली पडली. त्याचा फायदा घेत चिंटू त्याच्या मगरमिठीतून बाहेर पडला आणि त्याने एकामागून एक जबरदस्त ठोसे लगावायला सुरुवात केली. त्याच्या ह्या मार्‍याने नाही म्हटले तरी घटोत्कच थोडा ढिला पडला. त्या दोघांचे ते युध्द बघण्यासाठी बाजूला बरीच गर्दी जमली आणि साहजिकच वाहतूक खोळंबली.

हा काय प्रकार आहे म्हणून बघायला एक वाहतूक पोलीस शिट्टी वाजवत तिथे आला आणि त्या दोघांना दरडावून त्याने बाजूला केले आणि समोरच असलेल्या पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाला. आमची वरात पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिथल्या ड्यूटी ऑफिसरच्या हातात आम्हाला सोपवून तो आपले कर्तव्य बजावण्यासाठी निघून गेला. ड्युटी ऑफिसरने प्रथम त्या रिक्षावाल्याचा जबाब घेतला. ते दोघे तमिळ मध्ये बोलत होते म्हणून आम्हाला काहीच कळले नाही. मग त्याने मोर्चा आमच्याकडे वळवला आणि तमिळमध्येच काही तरी बोलला. आम्हाला काहीच अर्थबोध न झाल्यामुळे आमचे चेहरे कोरेच होते. ते बघून जणू त्याचा अपमान झाला असे वाटून त्याने चिंटूची कॉलर पकडली. चिंटूने त्याचा हात झटकला आणि जोरात ओरडला, ऑफिसऽ! बिहेव युवऽसेल्फ! अदऽवाइज यू विल रिग्रेट!
ह्या अनपेक्षित घटनेने ऑफिसर एक पाऊल मागे हटला आणि तो पुढे काही बोलणार तोच चिंटूने आपले ओळखपत्र त्याच्या टेबलावर जोरात आपटले आणि म्हणाला, आय ऍम फ्रॉम ......... डिपाऽट्मेंट! वगैरे वगैरे वगैरे.

तो पोलिस अधिकारी हादरलाच. त्याने आयकार्ड नीट पाहिले आणि लगेच एका हवालदाराला बोलवून त्या घटोत्कचाला त्याच्या हवाली करत काही तरी तावातावाने सूचना केल्या आणि त्यांना तिथून घालवून दिले. मग अतिशय नम्र आवाजात 'सार, सार' करत त्याने आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आणि कॉफी मागवली. आयकार्डावर ज्या साहेबांची सही होती ते साहेब किती पोचलेले आहेत (म्हणजे हे साहेब किती प्रसिध्द आहेत आणि त्यांचा कसा दरारा आहे)आणि त्यांनी तुमच्या(म्हणजे आमच्या सारखे- दिसायला सामान्य,अव्यवस्थित राहणी असणारे वगैरे )सारखे तरुण कसे भरती केलेत हे ऐकून होतो पण आज प्रत्यक्ष पाहिले तेंव्हा खात्री पटली असे सांगत पुन्हा:पुन्हा आमची माफी मागितली.

बाजूच्या खोलीतून आरडा-ओरड ऐकू येऊ लागली तशी त्याने सांगितले की घटोत्कच शिक्षा भोगतोय आपल्या पापांची. वरती हे पण सांगितलं की चांगली चामडी लोळव असं सांगितलंय त्या हवालदाराला. काही जरूर लागली तर मला फोन करा असे सांगून स्वत:चे नाव,हुद्दा आणि फोन नंबर त्याने दिला आणि जाता एक विनंती केली की हा झालेला प्रसंग कृपा करून साहेबांना सांगू नका म्हणून.
त्या नंतर आम्हाला मोठ्या सन्मानाने त्याने निरोप दिला.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ७

त्यादिवशी खोलीवर येताना काही इतर प्रशिक्षणार्थींशी ओळख झाली त्यात आमच्या शेजारच्या खोलीत राहणारा पंजाब इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा 'परसराम' हा एक होता. त्याचा खोलीबंधू हा एक हरियाणवी 'प्यारेलाल' होता. हे दोघे मिळून खोलीतच जेवण बनवत असत. परसराम पोळ्या अगदी वर्तुळाकार लाटत असे. ते बघून मला त्याचे खूप कौतुक वाटले. आम्ही दोघांनी मात्र ह्या भानगडीत न पडता बाहेरच जेवणे पसंत केले.

संध्याकाळी रामालिंगमची भेट झाली तेंव्हा आम्ही त्याला त्या सकाळच्या मुलांचे 'मणीएन्ना' प्रकरण सांगितले आणि मला वाटलेला 'भले शाब्बास"असा अर्थ सांगितला. तो हसला आणि त्याने आम्हाला त्याचा अर्थ सांगितला.'मणी' म्हणजे 'वेळ'(वाजले ह्या अर्थाने) आणि 'एन्ना' म्हणजे 'किती’. किती वाजले म्हणजे मणीएन्ना हे समजले पण त्याचे उत्तर कसे द्यायचे? आम्ही साधारण सकाळी ८ च्या सुमारास प्रकें मध्ये जाण्यासाठी निघत असू म्हणून त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही त्यांना 'एट्टमणी' असे उत्तर द्या. ह्यातल्या 'एट्ट'चा अर्थ मी विचारला नाही आणि दुसर्‍या दिवशी गंमत झाली. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला आम्ही नास्ता करायला बाहेर पडलो तेंव्हा एका व्यक्तीने ’मणीएन्ना?’ असे विचारल्यावर मी ऐटीत ’एट्टमणी!’ असे उत्तर दिले आणि त्याने विचित्र नजरेने आमच्याकडे पाहिले. मला काही त्याच्या त्या पाहण्याचा अर्थ लागला नाही पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे एका शाळकरी मुलाने विचारले तेंव्हासुद्धा एट्टमणी असे उत्तर दिले. त्याने स्वतःच्या घड्याळात बघितले आणि तो हसत सुटला. (मला अगोदर हे कळत नव्हते की स्वतःच्या हाताला घड्याळ असताना हे लोक आम्हाला वेळ विचारतातच का? बरे विचारतात तर विचारतात आणि वर हसतात. अर्थ काय ह्याचा?) रस्त्यात भेटून वेळ विचारणार्‍या त्या सर्व मुलांना मी ओरडून ओरडून ’एट्टमणी,एट्टमणी!’ असेच सांगत होतो आणि ती मुले फिदीफिदी हसत असत. मी हैराण होतो पण विचारणार कुणाला?
पुढे मला रामालिंगमकडून कारण कळले आणि मी माझ्या मूर्खपणावर मनसोक्त हसलो. त्याने मला मग १ ते १० आकडे शिकवले ते काहीसे असे होते...'ओन्न(१),रंड(२),मूनं(३),नालं(४),अंज्ज(५),आरं(६),येळ्ळं(७),एट्ट(८),ओंपत्त(९), आणि पत्त(१०). मी त्याला तसे म्हणून दाखवले तर स्वारी एकदम खूश!

त्यादिवशी देखिल जेवणाच्या सुट्टीत मी केळीच खाऊन वेळ मारून नेली. केळी जरा जास्तच पिकलेली होती पण दुसरा पर्याय नसल्यामुळे मी ती तशीच खाल्ली आणि कालच्यापेक्षा दोन जास्तच खाल्ली. त्यामुळे पोट व्यवस्थित भरले आणि वर्गात नीट लक्ष लागले. अजून फक्त थिअरीच चालू होती आणि दुसर्‍या दिवसापासून प्रात्यक्षिकं सुरू होणार होती. संध्याकाळी आम्ही तिथून परस्पर बाहेर फिरायला गेलो आणि परतताना एका बर्‍याशा उपाहारगृहात जेवूनच परतलो. थोडावेळ रामालिंगमशी गप्पा झाल्या आणि मग आम्ही झोपायला खोलीत परतलो. रात्री मला अचानक जाग आली तेंव्हा जाणवले की पोटात प्रचंड खळबळ माजलेय. मी उठून दरवाजा उघडला आणि संडासला जाऊन आलो. जरा बरे वाटले. पुन्हा अंथरुणावर पडलो‍. झोप लागते आहे असे वाटते न वाटते तोच पुन्हा पोटात गडबड सुरू झाली. पुन्हा उठलो,जाऊन आलो. अंथरुणाला पाठ टेकली न टेकली पुन्हा गडबड. पुन्हा गेलो,पुन्हा गेलो. असे रात्रभर जातच होतो.

चिंटू शांत झोपला होता. मी त्याला जागे केले नाही. पहाटे पहाटे त्याला जाग आली आणि त्याने बघितले तर त्याला मी अंथरुणावर दिसलो नाही. तो उठून बसला आणि त्याच्या लक्षात आले की दरवाजा सताड उघडा आहे. तो बाहेर आला तेंव्हा त्याने मला संडासाकडून परतताना पाहिले. मी कसाबसा पाय ओढत चालत होतो. तो झटकन पुढे आला. मला आधार दिला आणि पलंगापर्यंत आणून सोडले. त्याने मला विचारले, हा काय प्रकार आहे?
मी झाला प्रकार त्याला सांगितला आणि पुन्हा 'गमन' कर्ता झालो. ह्यावेळी त्याने मला नेऊन आणले. ही माझी १८वी खेप होती आणि अजूनही जीवाला शांती नव्हती. शरीरात बळ नव्हते पुन्हा पुन्हा जाण्यासाठी, पण पर्याय नव्हता. संडास खोलीपासून लांब होते ह्याचे प्रथमच वैषम्य वाटत होते. असेही वाटत होते की संडासातच पलंग ठेवावा. सकाळी आठ वाजेपर्यंत माझा स्कोअर २३ झाला होता. पण अस्वस्थता जात नव्हती. खालच्या मजल्यावरील डॉक्टर ८ वाजता येतात असे कळले होते म्हणून चिंटू खाली गेला तेंव्हा सुदैवाने डॉ.आले होते. त्यांना त्याने झालेली कहाणी सांगितली आणि वर येण्याची विनंती केली. पण ती त्यांनी फेटाळली आणि मलाच तिथे आणण्यास सांगितले.

मी तर पार गळून (गळून जाणे म्हणजे काय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो) गेलो होतो. चिंटूने मला उचलले आणि खाली नेले. हे दृश्य बघायला सगळी गर्दी जमली होती. डॉ. नी मला कंबरेच्या खाली एक मोठे इंजेक्शन दिले आणि काही गोळ्या दिल्या‌‌. शिवाय दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने 'इलेक्ट्रॉल' घ्यायला सांगितले. त्यादिवशी माझ्याबरोबर चिंटू देखिल खोलीवरच राहिला. ठरलेल्या वेळी औषधे देत होता. मी त्याला मोठ्या मुश्किलीने, जेवून येण्यास राजी केले. येताना त्याने माझ्यासाठी मोसंबीचा रस आणला. रस प्यायल्यावर मला जरा हुशारी वाटली. इंजेक्शन आणि इतर औषधांच्या परिणामांमुळे माझे गळून जाणे पूर्णपणे थांबले होते आणि संध्याकाळपर्यत थोडे बरे वाटायला लागले होते. भूक लागायला लागली होती पण काय खायचे हा प्रश्नच होता. पण हा प्रश्न त्यादिवशी परसरामने सोडवला. त्याने मऊमऊ खिचडी बनवून आणली आणि मला खायला लावली.

खिचडी ह्यांपूर्वी आयुष्यामध्ये असंख्यवेळा खाल्ली असेल पण त्यादिवशीची खिचडी काही औरच लागली‍. जवळजवळ २४तासांनी मी अन्नग्रहण करत होतो त्यामुळे मोठ्या आवडीने मी ती खिचडी खाल्ली आणि मोठ्ठी ढेकर दिली तेंव्हा समोर बसलेल्या परसराम आणि चिंटू च्या डोळ्यात मला समाधानाची तृप्ती दिसली. त्यानंतरच त्या दोघांनी जेवून घेतले. माझ्या मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केलेली. कोण लागतात हे माझे? काय ह्यांचा माझा संबंध? का माझ्यासाठी एव्हढे सगळे केले? मी असे काही केले असते काय इतर कुणासाठी? उत्तर नव्हते! फक्त प्रश्न! त्यातच झोप केंव्हा लागली कळलेच नाही.

सकाळी जाग आली तेंव्हा उठायचा प्रयत्न केला पण जाणवले की अजून अंगात शक्ती नाही म्हणून पडूनच राहिलो. तंबी चहा-कॉफी देऊन गेला. कॉफीपान करता करता चिंटूने त्याने घेतलेला निर्णय मला सांगितला. त्यानुसार आज संध्याकाळपासूनच आम्ही देखिल खोलीवरच जेवण बनवायचे होते. त्यासाठी लागणारी सर्व सामग्री संध्याकाळी बाजारातून आणायचे असे ठरले. आजच्या सकाळच्या जेवणाची जबाबदारी पुन्हा एकदा परसरामने उचलली. त्याने आमच्यासाठी स्वतःबरोबर अजून एक पोळीभाजीचा डबा घेतला होता. त्या दोघांच्या मदतीने मी हळूहळू तयारी केली आणि प्रकें कडे प्रयाण केले.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ६

दुसर्‍या दिवशी लवकर उठून प्रातर्विधी आटोपून योगासनं करायला सुरुवात केली. चिंटू अजून झोपलेलाच होता. माझा अर्धा व्यायाम संपला तोपर्यंत त्याला जाग आली आणि डोळे उघडून जेव्हा त्याने पाहिले तेंव्हा तो ताडकन उठला. मला म्हणाला, मला का नाही जागं केलंस?
भराभर जाऊन प्रातर्विधी आटोपून तो आला आणि म्हणाला,चल आता मला शिकव!

मी प्रथम त्याला हात-पाय मोकळे करायला सांगितले. ते झाल्यावर त्याला जमीनीवर बसून मांडी घालायला सांगितले. पण पठ्ठ्याला मांडी घालणेच जमेना(आजपर्यंत टेबल-खुर्ची शिवाय पान हालले नव्हते). हे बघून त्याला एकदम नैराश्यच आले. आता माझे कसे होणार वगैरे प्रश्न त्याच्या डोक्यात उभे राहिले. मी त्याला धीर दिला. म्हटलं, अरे आयुष्यात आज पहिल्यांदा तू मांडी घालायचा प्रयत्न करतो आहेस म्हणून तुला ते जमत नाही. तुझे मांड्यांचे स्नायू आणि सांधे कडक झालेले आहेत. तू काळजी करू नकोस. मी तुला सांगतो तसे तू कर हळूहळू साधारण पंधरा दिवसात तुझ्यात चांगली सुधारणा होईल! मग मी त्याला दोन्ही पाय लांब करून बसायला सांगितले ते त्याला जमले. मग हळूहळू एक पाय गुढग्यात वाकवून शरीराजवळ आणायला सांगितला. त्याचा पाय जेमतेम दुसर्‍या पायाच्या गुढघ्या पर्यंतच येत होता. परत मी त्याला धीर देत म्हटले, दोन गोष्टी लक्षात ठेव घाई आणि जोर-जबरदस्ती अजिबात करायची नाही.सगळं काही ठीक होईल!
आठवडाभरातच त्याच्यात चांगली सुधारणा झाली . त्याला बर्‍यापैकी मांडी घालता यायला लागली. त्यामुळे त्याचा उत्साह वाढला आणि पंधरा दिवसांनी तर तो सुखासनात ५मिनिटं बसू लागला. मी त्याला सांगितले, तू अशीच मेहेनत घेतलीस तर आपण परत जाईपर्यंत तू निश्चितपणे काही सोपी आसने सहजपणे करू शकशील!

आज आमचा प्रशिक्षणाचा (ज्यासाठी इथे आलो होतो) पहिला दिवस होता. साडेआठ वाजता हजर व्हायचे होते. व्यायाम होईपर्यंत चहावाला पोरगा हजर झाला होता. आज येताना त्याने माझ्यासाठी कॉफी देखिल आणली होती. मी त्याला त्याचे नाव विचारले...मला येत असलेल्या तीनही भाषेत.. मराठी,हिंदी आणि इंग्लिश. (कधी कधी आपण किती बिनडोकपणे वागतो त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण) पण त्याला अर्थबोध झाला नाही. मग मी त्याला खुणेने माझे नाव सांगितले. म्हणजे स्वतःकडे बोट दाखवून ’देवा' असे दोन तीनदा म्हटले आणि त्याच्याकडे बोट दाखवून हात त्याच्यापुढे नाचवले. मात्रा बरोबर लागू पडली.
तंबी! असे तो म्हणाला.
मी पडताळून पाहण्यासाठी म्हटले, तंबी!
लगेच त्याने माझ्याकडे पाहिले. मला मजा वाटली म्हणून मी तंबी,तंबी,तंबी! असे तीनवेळा म्हटले तर तंबी एकदम खूश.
तो पण लगेच देवा,देवा,देवा! असे तीनवेळा बोलून हसायला लागला.
तेव्हढ्यात रामालिंगमही आला. मी त्याला सांगितले की ह्याला उद्यापासून सात वाजता आमच्यासाठी चहाकॉफी आणायला सांग. रामालिंगमने तमिळमध्ये त्याला तसे सांगितले. तंबीने मान डोलवली पैसे घेतले आणि जाताना देवा,देवा,देवा चा घोष करत आणि हसत हसतच गेला.

बॉस,व्हाट इस थिस देवा? व्हाट तंबी वास सेइंग्ग? रामालिंगमने पृच्छा केली.
मग मी झालेली सगळी कहाणी त्याला सांगितली त्यावर तो एकदम खूश होऊन म्हणाला, बॉस,यू आर वेरी वेरी इंटॅलिजन्टा! इन तमिला नेमं मिन्सं 'पेरं'! यू आस्कं हिम 'पेरंदा'? ही विल टेल्ल हिस नेमं!
चला अजून एका तमिळ शब्दाची भर पडली, 'पेरंदा' म्हणजे, (तुझे)'नाव काय'?

सर्व तयारी करून बाहेर पडायला आम्हाला पावणेआठ वाजले. त्यानंतर नास्ता वगैरे करेपर्यंत सव्वाआठ वाजले. प्रशिक्षण केंद्र इथून १५-२० मिनिटे अंतरावर होते. आमच्या बरोबरीने इतरही काही लोक (प्रशिक्षणार्थी) देशातल्या निरनिराळ्या भागातून आलेले होते. असे सर्व मिळून साधारण२०-२५ जणांचा आमचा काफिला 'प्रकें'च्या दिशेने मार्गस्थ झाला. रस्त्यात मध्ये मध्ये काही शाळकरी मुले दिसत होती. ती आमच्या ह्या काफिल्याकडे बघून काही तरी ’मणीएन्ना,मणीएन्ना’ असे ओरडायची. कुणालाच काही बोध होत नव्हता आणि ती मुलेदेखील आम्ही त्यांच्यापासून लांब जाईपर्यंत जोरजोरात ओरडत राहायची,हसत राहायची(मला आपलं असे वाटत होते की ती सर्वं मुलं आम्हाला 'भले शाब्बास' असे काही तरी म्हणत असावीत). आम्ही सुध्दा हात हालवून त्यांना प्रतिसाद दिला तसे त्या मुलांना खूप आनंद झालेला दिसला. हसताना त्यांचे मोत्यासारखे शुभ्र दात चमकत होते आणि त्यांच्या काळ्या-सावळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच मोहक वाटत होते. त्या तापलेल्या उन्हातसुध्दा आम्हाला क्षणभर गार गार वाटले.

आम्ही 'प्रकें'वर पोहोचलो. तिथे काही औपचारिक प्रक्रिया आटोपल्यावर आम्हाला एका वर्गात नेऊन बसवले. तिथे असलेले प्रशिक्षक,कर्मचारी ह्यांनी सर्वप्रथम आम्हा सर्वांना आपली स्वतःची ओळख करून दिली. नंतर मग क्रमाक्रमाने आमची ओळख करून घेतली. इथे आलेली इतर मंडळी ही पंजाब,हरियाणा,बंगाल,आसाम,ओरिसा,आंध्र,महाराष्ट्र,गुजरात,केरळ,कर्नाटक वगैरे अशा निरनिराळ्या प्रांतातून आणि निरनिराळ्या सरकारी खात्यातून आली होती. जणू एक छोटासा भारतच तिथे अवतरला होता. काही प्राथमिक गोष्टींची माहिती करून घेईपर्यंत (सगळं कसं हसत-खेळत आणि रमत-गमत चालले होते) जेवणाची सुट्टी झाली.

हे 'प्रकें' शहरापासून एका बाजूला असल्यामुळे इथे बाहेर जेवणा-खाण्याची सोय नव्हती म्हणून एक जण इथे येणार्‍या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जेवण पुरवण्याचे काम करतो असे समजले. सगळ्यांनाच भूक कडकडून लागली होती म्हणून जेवणाची थाळी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. मी जरा मागेच उभा राहिलो. थाळी घेऊन एकेक जण येत होता. माझे लक्ष त्या थाळ्यांकडे गेले तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ढीगभर भात,त्यावर ओतलेले सांबार किंवा तत्सम काही तरी,भाजी,पापड,लोणचे आणि एका कटोर्‍यात आमटीसारख्या पदार्थात तरंगत असलेला पांढरा गोल गोळा. मला कळेना हा काय प्रकार आहे. इतक्यात चिंटू त्याची थाळी घेऊन आला. मी तसाच उभा आहे हे पाहून त्याने विचारले, तुझी थाळी कुठे आहे?
मी म्हटलं, आणतो, पण ते पांढरं पांढरं काय आहे?
अंडा-करी! चिंटू उवाच!
मी म्हटलं, मग मला नाही जेवायचे. तू जेव. मी बघतो बाहेर, कुठे काय मिळते का ते!
अरे असे काय करतोस? इथे काही सुध्दा मिळत नाही असे सगळेजण म्हणतात आणि तू इथे जेवला नाहीस तर उपाशीच राहायला लागेल. माझे ऐक,तू भाजी-भात तरी खाऊन घे! चिंटू उवाच!
नाही रे बाबा,मला नाही जमणार. तू जेव,तोपर्यंत मी बाहेर फेरी मारून येतो. काहीतरी नक्की मिळेल. तू काळजी करू नकोस! असे म्हणून मी जाण्यासाठी वळलो तर त्याने मला अडवले आणि म्हणाला,तू जर जेवणार नसशील तर मी पण जेवणार नाही!

मी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला जेवायला राजी केले. मी 'प्रकें' च्या बाहेर आलो आणि चारी बाजूंना बघितलं तर खरेच,तिथे सगळे उजाड होते. दूरदूर पर्यंत वस्तीचा मागमूस नव्हता. तसाच निराश होऊन परत येत होतो तर लक्ष गेले तिथे एकटीच एक वृध्दा केळी घेऊन बसली होती. मला हायसे वाटले. मी तिच्याकडची चार केळी घेतली आणि माझ्या हातावर पैसे ठेवून हात तिच्यापुढे धरला. तिने त्यातली पावली घेतली. मी तिथेच उभे राहून केळी खाल्ली आणि प्रकेंमध्ये परतलो. तोपर्यंत सगळ्यांची जेवणे झाली होती. मला पाहताच चिंटूने विचारले, काही मिळाले की नाही? नसेल तर चल,अजून जेवण शिल्लक आहे!
मी म्हणालो, केळी खाल्ली.माझे पोट भरले!
त्याचा विश्वास बसला नाही. मला म्हणाला, चल कुठे खाल्लीस दाखव!

मी त्याला लांबूनच ती म्हातारी केळेवाली दाखवली. तिच्या टोपलीत अजूनही काही केळी बाकी होती त्यामुळे माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला.