माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग६

त्या दिवशी रात्रपाळी होती. माझ्या बरोबर फक्त चिंटू होता. खरे तर माझे आणि त्याचे संबंध फक्त 'काय कसं काय?' असे विचारण्यापुरतेच होते पण एकत्र काम करताना थोडे एकमेकांना सांभाळून घेणे असा भाग असल्यामुळे कधी कधी जरा जास्त संभाषण देखिल होत असे.
साधारण रात्रीचे साडे दहा वाजले होते. कामाचा पहिला भर ओसरला होता. आम्ही आपापले जेवण केले. पुन्हा काम सुरू करायच्या अगोदर जरा पाय मोकळे करून यावे असे चिंटूने सुचवले. मला खरे तर जायचे नव्हते पण एव्हढ्या क्षुल्लक गोष्टीत आपले घोडे पुढे दामटवण्यात देखिल काही हशील नव्हते म्हणून त्याच्याबरोबर निघालो.

चर्चगेट स्टेशनजवळच ऑफिस असल्यामुळे आम्ही साधारणपणे समुद्राकडेच फिरायला जात असू. तिथल्या कट्ट्यावर बसून गार हवा खायची,इकडच्या तिकडच्या गप्पा मारून साधारण १५-२० मिनिटांनी निघायचे ह्या आमच्या नियमित सवयी प्रमाणे आम्ही पुन्हा ऑफिसच्या दिशेने निघालो.
रात्री चौपाटी ते नरीमन पॉईंटचा तो इलाखा ज्यांनी बघितला असेल त्यांना 'राणीच्या गळ्यातला हार'(क्वीन्स नेकलेस) हा काय आणि किती प्रेक्षणीय प्रकार आहे हे माहीत असेल. आम्हाला तसे त्याचे नावीन्य नव्हते कारण आम्ही अधनं मधनं हे दृश्य पाहतंच होतो. तर असाच लखलखाट त्या सर्व भागात नेहमीच असतो आणि रात्र किती झालेय हे देखिल कळत नाही. रस्त्यावरील रहदारी आणि पादचार्‍यांची वर्दळ मात्र निश्चितच खूपच विरळ झालेली असते.

तर आम्ही काही पावले चालून आलो. टॉक ऑफ द टाऊन रेस्टॉरंट मागे टाकले आणि ब्रेबर्न स्टेडियम पाशी आलो तेव्हा एक भयानक दृश्य दिसले आणि मी तर स्तब्धच झालो. चिंटूच्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या आणि जोरात आरडा-ओरडा करत तो त्या दिशेला धावून गेला.
एका लहान मुलाला तीनचार जण लाथा-बुक्क्यांनी बुकलत होते आणि तो अतिशय दीनपणे भेसूर आवाजात रडत होता. ही सगळी मंडळी तिथेच पदपथावर राहून दिवसा बूटपॉलीश किंवा हमाली करून आणि रात्री जुगार,दारू,वेश्याव्यवसाय आणि गुंडगिरी करून आपला चरितार्थ चालवणारी होती. मारणारी आणि मार खाणारा असे सगळे तिथे एकत्रच राहणारे होते त्यामुळे त्यांच्या भानगडीत न पडणे शहाणपणाचे असे माझे मत होते; पण चिंटूची प्रतिक्रिया ही एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी होती. तो त्या चौघांवर तुटून पडला. त्याच्या जोरदार ठोशांनी त्याने त्या चौघांना आडवे केले आणि त्या मुलाची तो विचारपूस करू लागला.

एक क्षणभर ती सर्व मंडळी थक्क झाली पण पुढच्याच क्षणी त्या चौघांनी चिंटूला घेरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला सुरू केला. चिंटू देखिल कसलेला मुष्टीयोद्धा असल्यामुळे त्यांचे वार चुकवत लढत होता. काय करावे मला काहीच सुचत नव्हते. शारीरिक दृष्ट्या माझ्यात आणि त्या लहान मुलात फारसा फरक नव्हता आणि म्हणूनच मी चिंटूला मारामारीत मदत करू शकत नव्हतो. मग काय बरे करावे? असा विचार चालू असताना मला एकदम लक्षात आले की आमच्या ऑफिसच्या आसपास काही हत्यारी पोलीस सकाळपासून कामगिरीवर आहेत. त्यांना जाऊन सांगावे म्हणजे मग ही मारामारी थांबेल आणि त्या गुंडांना ते ताब्यात घेतील.

मी तसाच सुसाट पळत पळत त्या पोलिसांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना ही बातमी दिली. हो ना करता करता(हे पोलीस खास बंदोबस्तावरचे होते त्यामुळे ते आपली जागा सोडायला तयार नव्हते) ते माझ्या बरोबर आले. पोलीस येताहेत हे कळल्याबरोबर सगळे गुंड चारी वाटांनी पळाले. मी चिंटू जवळ पोचलो तेव्हा माझ्या लक्षात आले की तो रक्तबंबाळ झालाय आणि त्याने पोटावर हात दाबून धरलाय. रक्त बघून माझे पाय लटपटायला लागले आणि डोळ्यासमोर अंधेरी यायला लागली. मी मागच्या मागे सरकलो. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच त्या पोलिसांनी वायरलेस आणि रुग्णवाहिका मागवली आणि थोड्याच वेळात त्याला इस्पितळात घेऊन गेले.

ते दृश्य माझ्याच्याने बघवत नव्हते म्हणून मी हळूच तिथून सटकलो आणि ऑफिसात पोहोचलो. साहेबांच्या घरी दूरध्वनी करून झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि मग स्वतःच्या शेळपटपणावर कुढत गुढघ्यात मान घालून बसलो. विचारांचे प्रचंड काहूर माझा पाठलाग करत होते. मी अशा तर्‍हेने का वागलो? मी त्याला तिथे एकटाच सोडून का आलो? का नाही यथाशक्ति प्रतिकार केला? आतासुद्धा त्याच्या बरोबर इस्पितळात का गेलो नाही? प्रत्येक वेळी शेपटी का घालतोस? एक ना दोन. असंख्य प्रश्नांनी माझ्या मेंदूचा भुगा करून टाकला पण मी निरुत्तर होतो.

साहेबांनी परस्पर आझाद मैदान पोलिस स्टेशनला दूरध्वनी करून तिथल्या अधिकार्‍याला झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि गुंडांवर तातडीने कारवाई होईल आणि चिंटूच्या बाबतीत पोलीस केस वगैरे लफडी होणार नाहीत ह्याची जाणीव करून दिली. दुसर्‍या दिवशी त्या भागातील नेहमीच्या सराईत गुंडांची धरपकड झाली आणि त्यांना यथेच्छ पोलिसी पाहुणचार मिळाला. पोलीस केस झाली असती तर माझी आणि चिंटूची नोकरी गेली असती. ऑफिसच्या वेळेत वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बाहेर जाणे हाच पहिला गुन्हा आणि त्यात जर पोलिसी चक्रात अडकलात तर मग तो महागुन्हाच. पण साहेब दयाळू होते म्हणून बचावलो.

दुसर्‍या दिवशी सर्व मित्र मंडळींना कळले तसे ते सर्वजण इस्पितळात जाऊन आले. ह्या वेळी पण मी गेलोच नाही. चिंटूची तब्येत झपाट्याने सुधारत होती कारण गडी मनाने आणि शरीराने मजबूत होता. ह्या त्याच्या इस्पितळातील वास्तव्यात त्याची सेवा सुश्रुषा करायला त्याच्या ओळखीची एक ऍग्लोईंडियन तरुणी यायची. त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठी होती. ह्या सहवासाचे रुपांतर प्रेमात आणि पर्यायाने लग्नात झाले.

चिंटू पूर्ण बरा होऊन आला आणि पहिल्यांदा मला भेटला. मला म्हणाला,"देवा,तू त्या पोलिसांना आनले नसतेस तर माझा त्या दिवशीच मुडदा पडला असता. अरे त्या सर्वांकडे रामपुरी होते आणि ते त्याच्याने माझ्यावर हल्ला करायला तय्यार होते एव्हढ्यात पोलिस आले म्हणून वाचलो. तरी पण एकाने जाता जाता पोटावर वार केलाच पण नशिबाने वाचलो. थँक यू मॅन.थॅक यू व्हेरी मच! तू नसतास तर? आय कांट इमॅजिन!"
काय बोलावे ते मला कळेना! मी पोलिसांना बोलावले वगैरे खरे असले तरी मी मुळात त्याला एकट्याला सोडून का आलो ह्या माझ्याच प्रश्नाचे उत्तर त्यावेळी माझ्याकडे नव्हते आणि आजही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: