माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझ्या लग्नाची चित्तरकथा!भाग २

माझी बायको कशी असावी ह्याच्या जश्या माझ्या अपेक्षा होत्या तसेच भविष्यातल्या संसाराची चौकट देखील मी माझ्या मनात तयार केली होती. माझे स्वप्न स्वतंत्र संसाराचे होते आणि तसे करण्यासाठी स्वतंत्र जागा घेणे आले. ते माझ्या तुटपुंज्या पगारात जमणे कठीणच दिसत होते (मालकीतत्वावर जागा). ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन माझा निर्णय पक्का बनत गेला की लग्न करणे नाही आणि केलेच तर स्वत:ची स्वतंत्र जागा असल्याशिवाय नाही. माझा हा निर्णय मी आई-वडिलांना सांगितला तेव्हा त्यांनी माझी समजूत घालायचा प्रयत्न केला. म्हणाले, "तू आधी लग्न कर मग हळू-हळू जागेचं जमवता येईल."
मी म्हणालो, "नाही! माझा निर्णय पक्का आहे."
त्यांनी माझा नाद सोडला पण मधनं मधनं मुलींचे फोटो दाखवून प्रतिज्ञाभंग करायचा प्रयत्न मात्र चालू ठेवला. मी पण महाखट होतो, म्हणत असे लग्नच करायचे नाही तर फोटो तरी कशाला बघू?

माझ्यासाठी वधुसंशोधन सुरू केले तेव्हा मी नुकताच २८वर्षांचा झालो होतो. मध्ये ५-६ वर्षे अशीच गेली. मध्यंतरीच्या काळात मी व्यायामशाळेत जात होतो. वजन ५२ किलोवर गेले. माझे स्वरूपच पालटून गेले. माझ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. हे सगळे बघून आईला चिंता वाटायला लागली की ह्याचे बाहेर कुठे लफडे वगैरे तर नाही ना? तिला एका ज्योतिषाने सांगितले होते की हा तुमचा मुलगा प्रेमविवाह करेल. (हे मला माझ्या लग्नानंतरच आईने सांगितले) म्हणूनच माझ्यातल्या चांगल्या बदलाचे कौतुक वाटण्याऐवजी तिला काळजी वाटू लागली. वाटले की पोरगं बिघडलं.

ह्याच काळात माझ्या वहिनीच्या मैत्रिणीकडून माझ्यासाठी एका मुलीचा प्रस्ताव आला होता. वहिनीने तिला सांगितले की भावोजी लग्नच करणार नाही म्हणताहेत. त्या मैत्रिणीने वहिनीला फोटो दिला आणि म्हणाली, "निदान फोटो तरी दाखव त्यांना."
तिच्या आग्रहाखातर वहिनी फोटो घेऊन आईकडे आली आणि घडलेला वृत्तांत तिने आईला सांगितला.
"अग तो फोटो सुद्धा बघत नाही मग ह्या फोटोचा काय उपयोग? अगदी रंभा-उर्वशी असली तरी काय उपयोग? त्याने पाहिले तर पाहिजे ना?" आई उद्गारली.
पण तिने फोटो घेतला आणि माझ्याकडे येऊन मला म्हणाली, "अरे हा फोटो बघ जरा."
मी: "मला इंटरेस्ट नाही."
आई भडकली, म्हणाली, "कोणत्या मुहूर्तावर जन्म दिला तुला कळत नाही. एव्हढी साधी गोष्ट देखिल पोरटं मनासारखी करत नाही." असे म्हणून तो फोटो तिने माझ्या अंगावर भिरकावला आणि म्हणाली, "मर मेल्या, तुझ्या नशिबातच जर संसारसुख नसेल तर मी मेली काय करू तुझ्या पुढे डोके फोडून! भोग आपल्या कर्माची फळे!" असे म्हणून ती तिच्या कामाला निघून गेली.

पडलेला फोटो मी उचलला आणि न बघताच टेबलावर ठेवण्यासाठी उठलो. सहज म्हणून नजर गेली आणि चमकलो. मेंदूतली सगळी, अगदी सगळी डिपार्टमेंट्स भराभर फायली तपासायला लागली. आणि? आणि काय? साक्षात्कार झाला!!! अरे, हीच ती! आपल्या अनेक 'मानस पत्नीं'पैकी एक! मी फोटो नीट निरखून पाहत असताना काही तरी कामासाठी आई बाहेर आली आणि माझा तो अवतार बघून चकितच झाली. म्हणाली, "काय बघतोयस त्या फोटोत? आण इकडे. लोकांच्या मुलींचे फोटो आपण कशाला आपल्या घरात ठेवा. परत करते."
तिचे बोलणे पुरे व्हायच्या आंत मी म्हणालो, "आई आपण ही मुलगी बघूया. त्यांना तसे कळव."
आईचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसला नाही. तिने सुनेला(माझ्या वहिनीला) बोलावून सांगितले. "अगं हा बघ काय म्हणतोय!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: