माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझे सांगीतिक आयुष्य!भाग २

वडिलांबरोबर शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जाण्यामुळे मला एका गोष्टीचा साक्षात्कार झाला तो म्हणजे सगळेच गायक काही त्या दर्जाचे गाणे पेश करू शकत नव्हते ज्यामुळे(ज्या गाण्यामुळे) सुगम संगीताकडून मी शास्त्रीय संगीताकडे आकर्षित झालो होतो. त्याकाळात आघाडीवर असलेल्या गायकात अमीरखां, बडे गुलाम अली खां,फैयाज खां,लताफत हुसेन खां तसेच पंडित द. वि. पलुस्कर,पं.रामकृष्ण्बुवा वझे,पं.भास्करबुवा बखले,पं.ओंकारनाथ ठाकुर,पं.विनायकबुवा पटवर्धन वगैरे सारख्या दिग्गजांचे गायन प्रत्यक्ष ऐकायचा योग कधीच आला नाही. ह्यापैकी अमीरखां आणि पं.पलूस्कर ह्यांना पहिल्यांदा ऐकले ते
"आज गावत मन मेरो झुमके" ह्या जुगल बंदी द्वारे.

माझ्या लहानपणी आमच्या कडे वीज नव्हती. त्यामुळे रेडिओ देखिल नव्हता. आम्ही ज्या वाडीत राहत होतो त्यात जवळ जवळ १०० बिर्‍हाडं होती. त्यापैकी मोजून ४ते५ जणांकडेच रेडिओ होते. बहुतेक जणांकडे विविध भारती हे एकच स्टेशन लावले जायचे. ह्या स्टेशनवर दिवसातून दोनदाच शास्त्रीय संगीतावरील गाणी सादर केली जायची. त्यापैकी एक सकाळची वेळ ही माझ्या शाळेची असल्यामुळे मला ह्यावेळी सादर होणारी गाणी ऐकणे शक्य नव्हते. पण संध्याकाळी मात्र 'एक कलाकार' निवडून त्याचीच गाणी सादर केली जात. ह्या कार्यक्रमातच माझी ओळख मोठमोठ्या दिग्गज खां साहेबांशी आणि पंडितांशी झाली. ह्यातच रेडिओवर एक दिवस माझी ओळख पंडित ओंकारनाथ ठाकुरांशी(गाण्यातून-प्रत्यक्ष नव्हे) झाली. ओंकारनाथांनी गायलेले आणि मी सर्वप्रथम ऐकलेले त्यांचे गाणे म्हणजे मिश्र भैरवी रागातील मीराबाईचे भजन 'जोगी मत जा'. खलास करून टाकले त्यांनी. अहो काय मर्दानी आवाज आहे आणि तेवढेच माधुर्य देखील. आर्तता तर एव्हढी ओतप्रोत भरलेय की जर का त्या 'जोगी'ने हे ऐकले असते तर तो खरोखरीच परत फिरला असता. मी त्या एकाच गाण्याने त्यांचा पंखा झालो. मनाशी ठरवून टाकले की गाणं शिकलोच तर ह्या माणसाकडे अन्यथा नाही. अगोदर उ.अब्दुल करीम खां आणि आता पं.ओंकारनाथ ठाकुर! आता तुम्ही विचार करा की हे दोन वेगवेगळ्या घराण्याचे दिग्गज गायक. त्यांच्या आवाजाची जातकुळी, त्यांची गाण्याची पद्धत हे सगळे भिन्न होते तरी त्या दोघांनी माझ्यावर जबरदस्त मोहिनी घातली होती. आणि विलक्षण योगायोगाचा भाग म्हणजे मी त्या दोघांकडून पहिल्यांदाच जे ऐकले होते ते होते 'भैरवी'चे सुर. ऐकीव माहितीवर मी हे सांगू शकतो की भैरवी ही मैफल समाप्तीच्यासाठी गायली जाते; पण माझ्या आयुष्यात तर ह्या भैरवीनेच गाण्याची सुरुवात झाली होती आणि ते देखिल दोन समर्थ गायकांच्या भैरवी गायनाने. माझे मलाच सन्मानित झाल्यासारखे वाटले.

हे असे गाणे ऐकत ऐकत माझे गानप्रेम वाढत होते पण प्रत्यक्ष मैफिलीत अशा महान गायकांचे गाणे ऐकण्याचा योग मात्र आला नाही. त्यावेळी होणार्‍या मैफिलींची संख्याच मुळी खूप कमी असायची. वरतून ह्या मैफिली मुंबईमध्ये रंगभवन अथवा तत्सम जागी रात्रीच्या असत. मालाडहून अशा ठिकाणी पोहोचणे कठीण आणि गेलोच तर परतीची शेवटची गाडी पकडणे त्याहून कठीण. त्यातून ह्या मैफिलींची तिकिटे देखिल आमच्या सारख्यांना परवडण्यासारखी नसत. त्यामुळे दुधाची तहान ताकावर म्हणून रेडिओवर जेव्हढे ऐकायला मिळत असे त्यावर समाधान मानणे क्रमप्राप्त होते. ही सगळी कसर आपण मोठे झाल्यावर अशा मैफिलींना हजेरी लावून करू असे मनाशी ठरवले आणि स्वत:ची समजूत घातली. कलेकलेने माझे गानप्रेम वाढत असताना रेडिओवरच मला अजून एक विलक्षण मधुर आणि तीनही सप्तकात सहज फिरणारा असा आवाज ऐकायला मिळाला. त्या आवाजाचे मालक दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द 'नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व' होते. ह्या गाण्यात आणि इतर ऐकलेल्या गाण्यात फरक जरूर होता; पण हे गाणे देखिल मला बांधून ठेवणारे होते; विस्मयचकित करणारे होते. ह्या गाण्याच्या प्रकाराने देखिल मी भारावून गेलो. नंतर जाणकारांकडून समजले की हे गाणे शास्त्रीय आणि सुगम संगीत ह्यांच्या मधले म्हणजे नाट्यसंगीत जे उपशास्त्रीय प्रकारात मोडते. बालगंधर्वांचे गाणे जसजसे ऐकत गेलो तसतसे कळायला लागले की हे गाणे देखिल तितक्याच ताकदीचे आहे आणि त्यासाठी देखिल शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक आहे. ह्या प्रकारचे गाणे मात्र मला भरभरून ऐकायला आणि गाणार्‍या कलाकाराला प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले. माझ्या दुर्दैवाने बालगंधर्वांचा तो सरताकाळ असल्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही पण आकाशवाणीवरून त्यांना मनसोक्त ऐकता आले.

ह्याच काळात अजून एका आवाजाने मला मोहिनी घातली. अतिशय मृदू मुलायम आवाज आणि तितकेच हळुवार गाणे. हे गाणे आधी ऐकलेल्या सर्व गाण्यांपेक्षा वेगळे होते. गाण्याची पद्धत अतिशय सोपी वाटत होती आणि मुख्य म्हणजे सुरांबरोबर शब्दांनाही तितकेच महत्त्व दिल्याचे जाणवत होते. अर्थात अशा तर्‍हेची गाणी मी ह्या अगोदर देखिल ऐकली होती पण का कुणास ठाऊक हा आवाजच असा होता की तो थेट हृदयाला भिडला होता. ह्या आवाजाने देखिल मला काबीज केले. आपण ओळखले असेलच तर सांगून टाकतो तो आवाज होता सुप्रसिद्ध संगीतकार आणि तेव्हढेच समर्थ गायक श्री. सुधीर फडके ह्यांचा आणि ते गाणे होते 'तोच चंद्रमा नभात'. फडकेसाहेब गात होते तो प्रकार म्हणजे 'भावगीत' हा सुगम संगीताचा प्रकार आहे हे कळल्यावर माझ्या लक्षात आले की दुनिया गोल आहे. मी सुगम संगीताकडून शास्त्रीय संगीताकडे आकर्षित झालो आणि ते संगीत ऐकता ऐकता पुन्हा सुगम संगीतापर्यंत येऊन पोहोचलो; पण ह्या दरम्यानच्या काळात एक मोठा साक्षात्कार झाला होता तो म्हणजे संगीतात भेदभाव करणे योग्य नाही. अस्सल आणि नक्कल ह्यातला फरक ओळखता आला पाहिजे. जे हृदयाला भिडते ते खरे संगीत, अस्सल संगीत; मग ते सुगम असो, उपशास्त्रीय असो अथवा शास्त्रीय असो. खर्‍या संगीत प्रेमीने हा भेदाभेद मानता उपयोगी नाही हेच खरे. त्यामुळे आज ह्या घटकेला मला सगळं अस्सल संगीत आवडतं हे सांगणे न लगे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: