स्वरांच्या दुनियेतला देव! कवी, शब्द-प्रधान गायक आणि संगीतकार यशवंत देव. गेल्या ४०पेक्षा जास्त वर्षे ज्यांनी आपल्या विविध गीतांनी रसिकांना डोलायला लावले असे हे मराठी सुगम संगीतातले मातबर व्यक्तिमत्व.
कधी बहर-कधी शिशिर, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, अशी एकापेक्षा एक सुरेल गीते आपण सुधीर फडके उर्फ बाबुजींच्या मधाळ आवाजात ऐकलेली असतील...ह्या गीतांना स्वरबद्ध केलेले आहे यशवंत देवांनी. कवि मंगेश पाडगावकरांचे काव्य,यशवंत देवांचे संगीत आणि बाबुजींचा स्वर असा समसमा योग कैक गाण्यात सुरेलपणे जुळून आलाय. ही गाणी ऐकत ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. आज इतक्या वर्षांनंतरही ह्या गाण्यांची गोडी अवीट आहे.
यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रुपातच गाणं होतं. तेच त्यांचे पहिले गुरु. देवांचे वडील विविध वाद्यं वाजवण्यात पटाईत होते पण त्यातही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम. त्यांच्याचकडून देवांना तालाचे जे बाळकडू मिळाले त्यामुळे देवांचा जीवनातला ताल कधीच चुकला नाही. घरामध्ये मोठमोठ्या कलाकारांचा राबता असे. मैफिली तर जवळपास रोजच असत. अशाच संगीतमय वातावरणात देव वाढले त्यामुळे सूर-ताल-लय ह्या गोष्टी त्यांच्या रक्तात सहजपणे भिनल्या. सुगमसंगीताकडे देव वळले ते मात्र जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच.
गीतातल्या शब्दातूनच त्याची चाल सहजपणे उलगडत येते म्हणून शब्द अतिशय महत्वाचे असतात असे देवसाहेब म्हणतात. देवसाहेबांच्या चालींचे हेच मर्म आहे. गाण्याचे मर्म समजण्यासाठी आधी त्यातल्या शब्दांचा अर्थ नीटपणे समजून घेतला पाहिजे असेच ते नेहमी होतकरू संगीतकारांना मार्गदर्शन करताना सांगत असतात. केवळ कानाला गोड लागते म्हणून ती चाल चांगली असे ते मानत नाहीत. ह्याचे एक उदाहरण देवसाहेबांनी दिलंय ते म्हणजे..बहरला पारिजात दारी,फुले का पडती शेजारी...ह्या गाण्याचे. ह्याची चाल अतिशय उत्कृष्ट अशी आहे पण देवसाहेब म्हणतात की गाण्याचा अर्थ असा आहे , "ती स्त्री तक्रार करते आहे की पारिजात जरी माझ्या दारात लावलेला असला तरी फुले सवतीच्या दारात का पडताहेत? हा अर्थ त्या चालीत कुठे दिसतोय? म्हणजे, चाल म्हणून एरवी जरी श्रवणीय असली तरी गीतातल्या भावना श्रोत्यांपर्यंत पोचवायला ती असमर्थ आहे.
तेव्हा संगीतकार म्हणजे लग्नात आंतरपाट धरणार्या भटजीसारखा असतो हे पक्के लक्षात ठेवून संगीतकारांनी कवी आणि रसिकांच्या मध्ये लुडबुड करू नये असे ते बजावतात.
देवसाहेब जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवी देखिल आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. १)जीवनात ही घडी अशीच राहू दे २)श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे ३) अशी धरा असे गगन कधी दिसेल का? ४)कोटी कोटी रुपे तुझी कोटी सुर्य चंद्र तारे ५) तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी ६)प्रिया आज माझी नसे साथ द्याया ७)स्वर आले दुरुनी,जुळल्या सगळ्या त्या आठवणी ८)अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात,कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात ९) अशी ही दोन फुलांची कथा,एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी रचलेत तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत.
देवसाहेबांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलंय, तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी,घन:श्याम नयनी आला... अशासरख्या जवळपास ३०-४० नाटकांनाही संगीत दिलंय. कै. सचिन शंकर बॅले ग्रुपसाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेले आहे. गदिमांचे गीतरामायण जसे बाबुजींनी संगीतबद्ध केले तसेच गदिमांचे "कथा ही रामजानकीची" ही नृत्यनाटिका सचिनशंकर बॅले ग्रुपने सादर केली होती आणि त्याचेही संगीतकार देव साहेब होते.
देवसाहेबांच्या जडणघडणीत आकाशवाणीचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीला सतारवादक म्हणून रुजु झालेल्या देवांनी पेटी कधी जवळ केली हे त्यांनाच कळले नाही. आकाशवाणीवरील संगीतिका,भावसरगम सारखे भावगीतांचे कार्यक्रम,नभोनाट्यांचे पार्श्वसंगीत असे कैक प्रकार त्यांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शानाच्या क्षेत्रात हाताळलेले आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री. अरुण दाते ह्यांचे नामकरणही त्यांनी ह्याच कालावधीत केले. त्याची गंमत अशी...अरूण दाते ह्यांचे मूळ नाव अरविंद असे आहे पण ते त्या काळी ए.आर दाते ह्या नावाने गात असत आणि देवसाहेब जेव्हा दात्यांच्या घरी गेले होते तेव्हा घरातील सगळी मंडळी दात्यांना अरू,अरू असे म्हणत होती. हे ऐकून ए म्हणजे अरूण असे समजून देवांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा अरूण दाते अशी केली आणि तेव्हापासून अरविंद दाते संगीताच्या विश्वात अरूण दाते म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
अरूण दाते
कवि मंगेश पाडगावकर,संगीतकार यशवंत देव आणि गायक अरूण दाते ही त्रिमुर्ती त्यानंतर कैक गाण्यात आपल्याला एकत्र आढळते. त्यातली काही गाणी अशी आहेत.
१)६)भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
२)मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
३)अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
४)डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
५)दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
६) दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
७)धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास
८)भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
९)या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
१०)जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली
यशवंत देवांनी सुरुवातीच्या काळात संगीताच्या शिकवण्याही केलेत. त्यामधून कितीतरी गायक-गायिका तयार झालेले आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव आहे सुमन कल्याणपुर. देवसाहेबांनी संगीत दिलेली कैक गाणी सुमनताईंनी गाऊन अजरामर केलेत.त्यातली आठवणारी ही काही गाणी.
१)मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम !
२)रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा
३)श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे
देवसाहेब स्वत: जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करतात तेव्हा त्यांना त्यांच्या गाजलेल्या गाण्यांबरोबरच इतर संगीतकारांची गाजलेली गाणी गाण्याचाही आग्रह होत असतो.साधारणपणे कोणताही कलाकार ही मागणी मान्य करत नसतो.पण देवसाहेब श्रोत्यांची मागणी मात्र वेगळ्या पद्धतीने पुरी करतात. ती गाणी ज्या गायक-गायिकेनी गायलेली असतात तशीच हुबेहुब ती गायली तरच लोकांना आवडतील आणि अशी गाणी आपल्या गळ्यातून तशीच्या तशी येणार नाहीत हे लक्षात घेऊन देवसाहेब इथे एक गमतीदार प्रयोग करतात आणि लोकांनाही तो आवडतोय. ते ती गाणी न गाता त्या गाण्यांचे विडंबन त्याच चालीत सादर करतात. हा प्रकारही श्रोत्यांना आवडतो. तसेच अजून एक नवा प्रकार देवसाहेबांनी सुरु केलाय तो म्हणजे समस्वरी गाणी.गाजलेल्या मूळ हिंदी-मराठी गाण्यांच्या चालींना आणि मतितार्थाला अजिबात धक्का न लावता नवीन रचना ते त्या चालीत सादर करतात. इथे आधीच रचलेल्या लोकप्रिय चालींमध्ये नेमकेपणाने काव्य रचण्याचे त्यांचे कौशल्य दिसून येते. शास्त्रीय संगीतातही त्यांनी प्रयोग करून एक नवा देवांगिनी नावाचा राग जन्माला घातलाय. ह्या रागाचा वापर त्यांनी घन:श्याम नयनी आला ह्या नाटकातील गाण्यात केलाय.
देवसाहेबांबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. आता शरीर थकलेलं असले तरी अजूनही त्यांचे संगीतातले नवनवीन प्रयोग चालूच असतात. त्यांना ह्या कार्यात अधिकाधिक प्रयोग करता यावेत आणि आपल्याला नवनवीन रचना ऐकण्याचे भाग्य लाभावे म्हणून आपण त्यांना दीर्घायुरोग्य चिंतूया.
जीवेत शरद: शतम्!
सर्व माहिती,छायाचित्रे आणि दुवे महाजालावरून साभार.