माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ जून, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!

आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.

शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. :)

मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्‍याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.

अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.

रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! ;) )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: