माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१८ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! १...सुधीर फडके!




मराठी सुगम संगीताचा विषय निघाला की सर्वप्रथम जे नाव ओठावर येते ते म्हणजे सुधीर फडके ह्यांचे! गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द विलक्षण गाजली. संगीत जगतात ते बाबुजी ह्या टोपण नावाने ओळखले जातात. तेव्हा बाबूजींच्या संगीत प्रवासाचा थोडक्यात परिचय करून घेऊ या.

२५ जुलै १९१९ रोजी कोल्हापुरात जन्म झाला. सुधीर फडके ह्यांचे मूळ नाव रामचंद्र विनायक फडके. वयाच्या सातव्या वर्षापासून वामनराव पाध्ये ह्यांच्याकडून संगीत शिकायला सुरुवात केली. साधारण १९२९ मध्ये शालेय शिक्षण आणि पुढील संगीत शिक्षणासाठी बाबुजी मुंबईत आले. त्याच वेळी मुंबईतल्या सरस्वती संगीत विद्यालयातर्फे झालेल्या अभिजात संगीत स्पर्धेत बाबूजींनी पहिला क्रमांक पटकावला.

१९३४ मध्ये बाबुजी पुन्हा कोल्हापुरला गेले आणि तिथे त्यांनी श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गायन-शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. ह्या संगीत विद्यालयाचे प्रमुख होते श्री. न. ना. देशपांडे. ह्या विद्यालयातर्फे दरवर्षी एक मेळा आयोजित केला जायचा. त्यात सादर होणार्‍या गाण्यांचे संगीत दिग्दर्शन करण्याची जबाबदारी बाबूजींवर पडली. न. ना. देशपांड्यांनी बाबूजींचे रामचंद्र नाव बदलून सुधीर असे नामकरण केले. इथूनच पुढे ते संगीतकार आणि गायक सुधीर फडके म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाचा एक प्रचारक म्हणून बाबुजीं बर्‍याच ठिकाणी हिंडले.मधल्या काळात त्यांचे वडिल निवर्तले. त्यामुळे कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांना अर्थप्राप्ती करणे भाग पडले. ह्या काळात त्यांची झालेली जेवणा-खाणाची परवड, प्रकृतीची आबाळ, त्यातून उद्भवलेली क्षयरोगासारखी आजारपणं हा त्यांच्या जीवनातला अक्षरश: खडतर काळ होता. पुढे गावोगाव वणवण फिरत गायनाचे कार्यक्रम करत, मिळेल ती बिदागी स्वीकारून बाबूजींनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, कलकत्ता, दिल्ली, राजस्थान, पंजाब पर्यंत धडक मारली. ठिकठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करत असतानाच तिथल्या स्थानिक गायक-गायिकांचे गाणेही ते आवर्जून ऐकत. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गाण्यातही तो ढंग आणण्याचा ते प्रयत्न करत. ह्या अशा ठिकाणी फिरत असताना गया येथल्या एका मंदिरात बाबूजींनी सादर केलेल्या गायनाने प्रभावित होऊन तिथल्या मुख्य पुजार्‍याने देवीच्या गळ्यातला हार बाबूजींना घालून त्यांचे कौतुक केले आणि इथून मग बाबूजींनी कधीच मागे फिरून पाहिले नाही. त्यांचा संगीताच्या अश्वमेधाचा वारू चौखूर उधळला आणि त्याने अवघा भारत आपलासा केला.

त्यानंतर बाबूजींना प्रभात कंपनीकडून संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि बाबूजींनी तिचे सोने केले. १९४६ साली गोकुल ह्या चित्रपटाचे संगीत त्यांनी केले. त्यानंतर मग एका पाठोपाठ रुक्मिणी स्वयंवर, आगे बढो, सीता स्वयंवर, अपराधी इत्यादी चित्रपटांना सुमधुर संगीत देऊन प्रभातच्या गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर इत्यादी नामांकित संगीतकाराची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे चालवली.

बालगंधर्व आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातील आदर्श होते. ह्या दोघांच्या गाण्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून बाबूजींनी त्यांचे गुण एकलव्याच्या निष्ठेने आत्मसात केले.त्याचाच परिणाम म्हणून कोमल तरीही सुस्पष्ट शब्दोच्चार, सूर आणि तालावरील हुकमत आणि शब्दांना न्याय देणार्‍या चाली ही बाबूजींची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला त्यांच्या गाण्यात आणि संगीत दिग्दर्शनात दिसून येतात.

गीत-रामायण आणि गदिमा-बाबुजी हे एक अतूट असे समीकरण होऊन बसलेय. आधुनिक वाल्मिकी असे आपण ज्यांना म्हणतो त्या कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकरांनी गीतांतून रामायण कथन केले आणि बाबूजींनी त्या गीतांना उत्तमोत्तम चाली लावून श्रोत्यांसमोर ते साक्षात उभारले. नुसती ही कामगिरी जरी जमेस धरली तरी बाबूजींचे संगीत अजरामर आहे हे आपल्या लक्षात येईल.

बाबूजींनी चित्रपटसंगीत, भावगीत, भक्तिगीत, लावणी, लोकगीतं, भारूड असे कितीतरी गायनप्रकार एक गायक आणि संगीतकार म्हणून समर्थपणे हाताळलेले आहेत. वंदे मातरम्, हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, प्रपंच, मुंबईचा जावई, झाला महार पंढरीनाथ, चंद्र होता साक्षीला ह्या आणि अशा कैक चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत गाजलंय.
बाबुजींनी संगीत दिलेल्या मालती-माधव ह्या हिंदी चित्रपटातील लताबाईंनी गायलेली ही दोन गाणी ऐका. मन सौंप दिया अनजाने में आणि कोई बना आज अपना

ज्योतीकलश छलके ह्या लतादीदींनी गायलेल्या हिंदी गीताचे संगीतकार होते बाबुजी आणि त्यासाठी त्यांना सुरसिंगारचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अशाच तर्‍हेचे अनेक मानसन्मान त्यांना वेळोवेळी प्राप्त झाले होते त्यापैकी एक होता.. संगीत नाटक अकादमी पुरस्कार.

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, अशी पाखरे येती, अंतरीच्या गुढगर्भी, कधी बहर कधी शिशिर, दिसलीस तू फुलले ऋतू.... अशी कितीऽऽतरी भावगीते आपल्या सुमधुर आवाजाने बाबूजींनी अजरामर करून ठेवलेत.


बाबुजी जसे उत्तम संगीतकार होते तसेच ते एक उत्तम गायकही होते. बाबूजींनी इतर संगीतकारांचीही गाणी गायलेत. त्यात यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, राम फाटक, राम कदम ह्यांच्यासारख्या अनेक जुन्या-जाणत्या संगीतकारांपासून ते हल्लीच्या संगीतकारांपैकी त्यांचेच चिरंजीव श्रीधर फडके, अनिल-अरुण अशांचीही गाणी तितक्याच तन्मयतेने गायलेली आहेत.
बाबूजींचा एक विलक्षण गुण असा आहे की ते जेव्हा इतरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गातात तेव्हा त्या संगीतकाराला अपेक्षित असलेल्या अगदी बारीक सारीक जागादेखील आपल्या गळ्यांतून निघत नाहीत तोवर समाधान मानत नाहीत. त्यासाठी लागेल तितका वेळ देण्याची आणि मेहनत करण्याची त्यांची तयारी असते.

बाबुजी जसे थोर गायक आणि संगीतकार होते तसेच कट्टर हिंदुत्ववादी आणि देशभक्त होते. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सशस्त्र भाग घेतलेला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यावरचा चित्रपट बनवण्यासाठी बाबूजींनी गीतरामायणाच्या कार्यक्रमांचा धडाका लावून लोकवर्गणी जमवली आणि निष्ठेने स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पूर्ण केला. ह्या दरम्यान बाबुजी खूप आजारी पडले होते; पण त्यांनी प्रतिज्ञा केली होती की हा चित्रपट पूर्ण केल्याशिवाय मी मरण पत्करणार नाही आणि ती त्यांनी जिद्दीने खरी करून दाखवली. ह्या चित्रपटाच्या प्रकाशनानंतर काही दिवसातच म्हणजे २९जुलै २००२ रोजी त्यांचे देहावसान झाले.

आज बाबुजी जरी देहाने आपल्यात नसले तरी त्यांचे सूर आपल्या सोबत अखंड राहणार आहेत. त्यांनीच गायलेल्या एका गीताचा आधार घेऊन म्हणता येईल.....

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती ॥

(सर्व माहिती आणि छायाचित्र महाजालावरून साभार!)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: