माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२२ ऑगस्ट, २००९

गोल असे ही दुनिया आणिक...

मित्रांनो गाणी ऐकताना त्यात जुनं नवीन असं काही नसतं असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे. जुनी काय आणि नवीन काय..ही गाणी बनतात, ती ज्या रागांमध्ये, ते सगळे राग तर जुनेच आहेत मग गाण्यात नवीन जुने असे आपण का म्हणतो बरं? मला असं वाटतं की त्याचंही एक बहुदा कारण असावे ते म्हणजे गोडवा....जुन्या काळात गाण्यातला गोडवा जपला जायचा जो आज वाद्यमेळामध्ये पार हरवला गेलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे पूर्वी वाद्यमेळा नव्हता काय? होता ना..नव्हता असं कसं म्हणता येईल? पण त्याचा उपयोग बराच मर्यादित प्रमाणात होत होता आणि त्याच वेळी गाण्याचे शब्द,त्यातल्या भावना ह्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जायचं...ज्यामुळे आजही ती जुनी अवीट गोडीची गाणी ऐकली की मन चटकन भूतकाळात जातं.

आता असं मी म्हटल्यावर तुम्हीही जुनी आणि अवीट गोडीची गाणी आठवायला लागला असाल आणि त्याच बरोबर त्या गाण्यांबद्दलच्या तुमच्या आठवणीही मनात रुंजी घालायला लागला असाल. ह्या अशा गाण्यांबरोबरच काही जुने गायक-गायिका,त्यांचे आवाज,त्यांच्या गाण्याच्या लकबी वगैरे गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या असतील..खरं ना?

आज अशाच एका मला आठवलेल्या जुन्या गाण्याबद्दलची आठवण मी सांगणार आहे. ते गाणं गायलं होतं सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गोविंद पोवळे ह्यांनी. संगीतही त्यांचेच होते. ते गाणं असं आहे....

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते दुनिया रुपयाभवती
रुपयाभवती दुनिया फिरते....

पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा मी बहुदा पाचवी सहावीत होतो. नुकतंच तेव्हा भुगोलात वाचलं होतं की.... पृथ्वी सुर्याभवती फिरते....आणि इथे ह्या गाण्यात चक्क उलट लिहिलंय....हट,हट,हट. हे असं नाहीच आहे. काय वेडा आहे का हा कवी? असं काय बोलतोय ते? फार फार वर्षांपूर्वी लोक असं समजत होते हे खरं आहे पण ते लोक अडाणी होते; पण आता सिद्ध झालंय की पृथ्वी सुर्याभवती फिरतेय मग लोक अशी गाणी लिहितातच का आणि वर ती हे गायक लोक गातातच का? हे कमी म्हणून की काय ...पाडगांवकरांनी लिहिलंय...शुक्रतारा मंद वारा...... छे,छे,छे. ...वार्‍याला यमक जुळायला हवं म्हणून शुक्राला तारा बनवलं. छ्या. मजा नाही. अशाने कसं होणार आपलं.

हं, तर काय सांगत होतो मित्रांनो, अशा प्राथमिक विचारांनी मी ते गाणं त्या वेळी पूर्णपणे ऐकलंच नाही.पण आकाशवाणीवरून ते गाणं पुन:पुन्हा लागायचं आणि नाही म्हटलं तरी कानावरून जायचं. हळूहळू मला ते आवडायला लागलं,कारण....
कारण ते पहिलं विधान....सूर्य फिरे हा पृथ्वीभवती... सोडलं तर बाकी गाणं मस्तच होतं. त्याची चालही साधी-सोपी होती आणि गोविंद पोवळेंचा आवाजही अतिशय मधुर होता. ज्यामुळे गाणं आवडावं असे सगळे गुण त्या गाण्यात होते.
मग काय ते गाणं केवळ माझं आवडतं गाणंच राहिलं नाही तर जिथे जिथे मला गाणं म्हणण्याचा आग्रह होत असे तिथे तिथे मी ते गात गेलो आणि लोकांनाही ते आवडत गेलं.ते पूर्ण गीत नाही पण जे आता आठवतंय तसं देतोय.

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते रुपयाभवती दुनिया
रुपयाभवती दुनिया फिरते

मजूर राबती,हुजूर हासती घामावरती दाम वेचिती
तिकिटावरती अश्व धावती,पोटासाठी करिती विक्रय
अबला अपुली काया,रुपयाभवती दूनिया फिरते

नाण्यावरती नाचे मैना,अभिमानाच्या झुकती माना
झोपडीत या बाळ भुकेले,दूध तयाला पाजायास्तव
नाही कवडी माया, रुपयाभवती दूनिया फिरते

अजून एक कडवं असावं...पण आता ते अजिबात आठवत नाहीये.

ह्या गीतातले शब्द किती सार्थ आहेत हे काय सांगायला हवं..आजही ते पदोपदी अनुभवाला येतात.

ता.क. मित्रहो हा लेख लिहायला घेतला आणि लक्षात आलं की हे गीत पूर्णपणे आठवत नाहीये आणि जे आठवतंय त्यातही काही शब्दांबद्दल शंका आहेत. मग काय विचारलं काही जुन्या-जाणत्या लोकांना. पण दूर्दैवाने त्यापैकी हे गीत कुणीच ऐकलेलं नव्हतं. योगायोगाने मिपावरची सिद्धहस्त कवयित्री क्रान्ति साडेकरशी बोललो. तिलाही नेमकेपणाने सांगता येईना पण तिच्याकडे गोविंद पोवळेंचा दूध्व होता. तो तिने मला दिला आणि...आणि काय मंडळी..मी दस्तुरखुद्द पोवळेसाहेबांशी बोललो आणि गाण्यातले शब्द तपासून घेतले. माझ्या दृष्टीने हा अलभ्य लाभ आहे. इतकी वर्ष ज्या व्यक्तीची गाणी मी मोठ्या भावभक्तीने ऐकली त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला मिळाला...अजून काय हवे?

९ ऑगस्ट, २००९

दिल्लीवर स्वारी-१

माझ्या एका शाळकरी मित्राच्या भावाच्या लग्नाला राजस्थानला आणि पुढे केलेल्या दिल्ली दौर्‍यासंबंधीची कहाणी ऐका.

८ ऑगस्ट, २००९

रामप्रहर !

सकाळी सकाळी दिसणारी काही नेहमीची आणि काही बदलणारी दृष्यं.
सकाळी साधारण ६च्या सुमारास घरातून निघतो तेव्हा रस्ता...हमरस्ता असूनही तसा शांत शांत असतो. काही तुरळक रिक्षावाले(मुंबईत ऑटो रिक्षाला ’रिक्षा’ म्हणतात)रस्त्याच्या कडेला आपल्या रिक्षा लावून त्यात अंगाचं मुटकुळं करून झोपलेले असतात. तर काही टॅक्सीवाले टॅक्सीचे मागचे दोन्ही दरवाजे उघडे टाकून चांगले पसरून झोपलेले असतात. रस्त्यावरून एखाद दुसरी बस,रिक्षा किंवा खाजगी मोटार धावत असते. नाही म्हणायला अधून मधून दूधाच्या गाड्या,टॅंकर्स वगैरेंची लगबग दिसून येते. नाक्या नाक्यावर असणार्‍या चहाच्या टपर्‍यांपैकी मोजक्याच सुरु झालेल्या असतात.
घरोघरी दूधाचा रतीब घालणारे दूधवाले(हे बहुतेक करून राजस्थानी मारवाडी असतात. दोन्ही कानात सुंकल्या/रिंगा किंवा फिरकीची छोटी बटणं घातलेली असतात.)सायकलीवरून इथे-तिथे जाताना दिसतात. मधेच एखाद्या ठिकाणी परस्पर विरुद्ध दिशेने जाणारे दोघे दूधवाले थांबून एकमेकांची विचारपूस करतात/तंबाखूची देवघेव करतात.
सायकलींच्या मागे वृत्तपत्रांचे गठ्ठे लादून जाणारी मुलं देखिल अशा वेळी जागोजागी दिसतात.

एका छोट्याश्या दुकानापुढे आठवड्यातील तीन-चार दिवस(एक दिवसाआड) सुमारे ५०-६० लोकांची रांग लागलेली दिसते. आधी कल्पना नव्हती की ही रांग कशासाठी असते....मग कळले की तिथे काविळ उतरवली जाते म्हणून. गेली जवळ जवळ ४-५ वर्षे मी हे अव्याहतपणे चाललेले पाहत आहे. ह्याचा अर्थ मुंबई सारख्या शहरात..जिथे पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून पुरवले जाते....तिथेही बारामाही काविळीचे रोगी आढळावेत ह्यापेक्षा नामुष्की ती कोणती. अशा तर्‍हेने कावीळ खरंच उतरवता येते की नाही?....ह्याबद्दल मला जरी शंका असली तरी तिथली गर्दी मात्र कधीच आटत नाही.

प्रभातफेरीला निघालेली बरीच मंडळी हलके हलके दिसायला लागतात. रोज भेटणार्‍यांत एक असं जोडपं आहे की त्यातला नवरा जवळपास सहा-सव्वासहा फूट उंच आहे आणि बायको मात्र जेमतेम पाच फूट असावी. दोघेही शेलाट्या बांध्याची आहेत. दूरून पाहिले तर कुणी महाविद्यालयीन युवक-युवतीची जोडगोळी येतेय असे दिसते. मात्र जवळ आल्यावर चेहर्‍यावरून कळतं की दोघेही चांगलेच वृद्ध आहेत..अगदी माझ्यापेक्षाही. पण दोघांची चाल मात्र माझ्यापेक्षा खूपच जलद आहे.ह्या प्रभात फेरीला निघालेल्यात सर्व प्रकारची लोकं दिसतात. जाडजूड,महाकाय आकाराच्या व्यक्तींपासून ते अगदी वृद्धपणाने जेरीस आलेल्या आणि कमरेत वाकलेल्या लोकांची हजेरी देखिल लक्षणीय असते.

अजून एक हमखास दिसणारी व्यक्ति म्हणजे एक जाडजूड गुजराथी आजीबाई. त्यांना फार दूरवर नसलेल्या एका देवळात जायचं असतं पण पायी जाण्याऐवजी त्या रिक्षानेच जाणे पसंत करतात. आधी त्या रिक्षावाल्याशी बोलतात,भाव करतात...कारण त्यांना जिथे जायचे असते त्यासाठी कमीत कमी असलेले रिक्षाचे ९ रुपये भाडेही त्यांना जास्त वाटत असते. पाच रुपयात जो रिक्षावाला न्यायला तयार असेल त्याच्याच रिक्षात त्या बसतात. तसा कुणी गडी तयार होईपर्यंत त्या आजीबाई रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक रिक्षावाल्याशी हुज्जत घालायला तयार असतात.

अजून एक हमखास दिसणारा नमुना....हा माणूस टूथब्रशने दात घासत घासत रस्त्याने जात असतो. सगळ्या मुखरसाने तोंड माखलेले असते आणि हनुवटीवरून तो गळत असतो तरी त्याचे दात घासणे जोरजोरात सुरूच असते. तो खूप लांबवरून येत असावा. कारण मला तो नेहमी वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतो. राहतो कुठे आणि नेमका जातो कुठे..ते बाकी माहित नाही.

एक बंगाली बाबू. पन्नाशीचा असावा. गेली जवळपास दहा वर्षे पाहतोय त्याला. तो रोज जॉगिंग करतो. रोज किमान पाचसहा किमी तरी तो धावत असावा पण पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच्या आणि आताच्या त्याच्या अवस्थेत काहीही फरक दिसत नाहीये. उन्हाळा-पावसाळा आणि थंडी असली तरी हा बाबू नित्यनेमाने रस्त्यावरून धावताना दिसणारच दिसणार. पहिले काही दिवस त्याच्या बरोबरीने धावणारे काही उत्साही लोक आता मात्र चुकूनही दिसत नाहीत.

अशीच गंमत जंमत पाहात रमत गमत मी व्यायामशाळेत जातो. साधारण तासभर व्यायाम करून परत यायला निघतो. आता रस्ते वाहनांनी,माणसांनी,शाळकरी,महाविद्यालयीन मुलांमुलींनी तुडूंब भरलेले असतात.शाळांच्या गणवेशाचे ते रंगीबेरंगी प्रकार,त्यातली ती छोटी-मोठी मुलं-मुली म्हणजे जणू रंगीबेरंगी फुलपाखरं वाटत असतात. कुणी आईबरोबर, कुणी बाबांबरोबर, मोठ्या भावा/बहिणी बरोबर हात धरून पाठीवरची दप्तरं, हातातली पाण्याची बाटली, छत्री वगैरे आयुधं घेऊन लगबगीने चालत असतात. आता रस्त्यावर अधून मधून फेरीवालेही बसलेले दिसायला लागतात. केळीवाले,भाजीवाले,चहावाले एकेक एकेक आपापल्या ठरलेल्या जागी स्थानापन्न व्हायला लागतात. काही भिकारीही आपापल्या ठरलेल्या जागांवर बसून बोहनी कधी होते ह्याची वाट पाहात असतात.

आपली धोपटी घेऊन काही न्हावी गिर्‍हाईक शोधण्यासाठी बाहेर निघालेले दिसतात. तर काही भटजीलोक सुस्नात होऊन आणि गंध-टिळे लावून पुजे-अर्चेच्या कामगिरीवर निघालेले असतात. जैन धर्मीय पुरूष तलम रेशमी वस्त्र परिधान करून हातात एक स्टीलची छोटी पेटी घेऊन आणि स्त्रिया डोक्यावर पदर आणि हातात बटवा घेऊन अनवाणी पायाने मंदिरांकडे कूच करत असतात.

हे सगळं पाहात आणि अनुभवत मी घरी परततो. घरात शिरल्यावर मात्र सगळं शांत शांत असतं. बाहेरच्या जगाची चाहूलही इथून लागत नाही. तो गजबजाट,ती लगबग मला आवडतेच आणि ही शांतताही मला आवडते.

७ ऑगस्ट, २००९

भीमटोला !

भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.

त्याचं काय झालं की परवा सकाळी मी व्यायामशाळेतून परत घरी येत होतो. रस्त्याच्या कडेकडेने चालत होतो आणि तेही उजव्या बाजूने.म्हणजे कसं, येणारी वाहने आपल्या नजरेसमोर दिसत असतात. अपघात होण्याचा कमीत कमी धोका.
हं, तर काय सांगत होतो की रस्त्याच्या कडेकडेने चालत येत होतो. एवढ्यात एक सायकलस्वार दूधवाला मला जवळ जवळ घासूनच पुढे गेला. मी त्याला आवाज दिला(तो आवाज नव्हे हो...हाक मारली म्हणा) आणि थांबवले. थोडंसं त्याचं बौद्धिक घेतलं. घंटीचा उपयोग का करत नाहीस असंही विचारलं; पण तो उलट माझ्यावरच गुरकावला. अंगापिंडाने मजबूत तर होताच आणि त्यात तरूणही होता. त्यामुळे माझे उपदेशपर बोलणे त्याला काही फारसे रुचले नाही.
आपको लगा तो नही ना?..असे उद्धटपणे बोलून त्याने पुन्हा सायकलवर टांग टाकली आणि सायकल दामटली. पण काही पावले पुढे जात नाही तोच त्याने एका शाळकरी मुलाला सायकल जवळ जवळ ठोकलीच आणि तो मुलगा,सायकलवाला असे दोघेही खाली पडले.

जाणारे येणारे लगेच जमले. त्या दोघांना उचलले. सुदैवाने त्या मुलाला काहीच लागले नव्हते पण तो चांगलाच घाबरलेला दिसला. त्याच्या मित्रमंडळींनी त्याला आधार देत शाळेकडे कूच केले. दूधवाल्याचे सगळे दूध सांडून गेले. सायकलचे हॅंडल वाकडे झाले. लोक त्याला चांगलेच फैलावर घेत होते आणि तो चूपचापपणे सगळे ऐकून घेत होता.

मीही तिथे पोचलो आणि त्याला सुनावले... देखो,मेरी बात मानते तो ऐसा नही होता था. जरा संभालकर चलाया करो.
बस्स. इतका वेळ निमूटपणे लोकांचे ऐकून घेणारा तो दूधवाला माझ्यावर खवळला आणि चवताळून माझ्या अंगावर आला आणि म्हणाला....
ये,सब आपकी वजहसे हुवा. ना आप मुझे रोकते,ना ही ऐसा कुछ होता.

मी म्हणालो....अरे भाई, इसमे मेरा क्या कसूर है? पहले तो तेरी सायकिलका धक्का लगते लगते मैं बच गया और अभी इस छोटे बच्चेको सीधा ठोक दिया. मैंने समझाया था न की सायकिल संभालकर चलाया करो और घंटीका भी इस्तेमाल करो. इसमे मैंने क्या गलत बताया?

हे ऐकताच त्या दूधवाल्याने मागचा पुढचा कोणताच विचार न करताच मला एक ठोसा लगावला आणि मला आडवा पाडला.
तसा आजवरचा माझा जीवनक्रम हा मार खाण्याचाच आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे अशा वेळी नको तेव्हा माझी सद्‌सद्‌विवेकबुद्धी अतिशय जागृत होत असते. त्याने मला मारले,मग मी त्याला मारले. मग पुन्हा त्याची पाळी मग माझी. नेमके काय साधतो आपण ह्यातून.....वगैरे वगैरे. असलेच विचार मी करत असतो. त्यामुळे स्वत:हून कधीच हल्ला करायचा नाही आणि केवळ स्वसंरक्षणापुरतीच आपली शक्ति वापरायची..असाच विचार आणि आचार माझा असतो.
त्यामुळे त्या दूधवाल्याच्या ठोशाचं इतकं काही वाटलं नाही; पण राग एका गोष्टीचा आला की...चूक त्याचीच आणि त्यासाठी शिक्षा मात्र मला होत होती.

इतर लोकांनी त्या दूधवाल्याला कसेबसे आवरले. मी धूळ झटकत उभा राहिलो आणि म्हणालो....उलटा चोर कोतवालको डाटे! गुन्हा तुने किया और उपरसे मुझेही मार रहा है?

माझे ते बोलणे ऐकून तो अजून पेटला आणि आणखी त्वेषाने माझ्या अंगावर आला. आता मी सावध होतो. त्याचे दोन सणसणीत फटके कसेबसे चुकवले. मनात म्हटलं, आता काहीतरी करायला हवंय. चूप बसलो तर हा आपला मुडदाच पाडायचा. इतक्यात त्याने तिसर्‍यांदा माझ्यावर हल्ला केला. मी तोही चुकवला आणि त्याच्या श्रीमुखात काडकन्‌ बजावली.
काय होतंय हे कळायच्या आत हे सगळं घडलं आणि तो आडदांड तरूण धाडकन जमिनीवर पडला. हे पाहताच बघ्यांनी टाळ्या वाजवल्या.

तो दूधवाला जमिनीवर अगदी निपचित पडून राहिला. ते पाहून माझे मात्र धाबे दणाणले.
माझं स्वगत सुरु झालं पुन्हा... काय हे? माझ्याकडून नकळत हे काय झाले? तरी नेहमी स्वत:ला बजावत असतो की असे काही नाही करायचं मग आज कसा काय संयम सुटला? हा आता मेला-बिला तर नाही ना?.

इतक्यात लोकांनी कुठून तरी पाणी आणलं,त्याच्या तोंडावर मारलं आणि हुश्शऽऽऽऽऽऽऽ
तो भानावर आला. माझ्याकडे पाहात आणि हात जोडत मला म्हणाला....अंकलजी,माफ किजिये. गलती मेरीही थी और मैं खामखा आपके उपर गुस्सा उतारा. अच्छा हुवा, जो की आपने मुझे चाटा मारा, मेरी अकल ठिकाने आई.
आयंदासे ऐसी गलती दुबारा फिर ना होगी.

मी त्याला माफ केलं आणि आपला रस्ता सुधारला.

मंडळी,माझ्या लहानपणी देखिल मी नेहमीच मार खायचो.कधीच कुणाला मारायचो नाही. कारण क्षमा करण्यातच मोठेपणा असतो असं माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं. पण असाच एक प्रसंग तेव्हा घडला होता. त्या प्रसंगी खूप मार खाल्ल्यावर मी माझा हात उचलला होता आणि एका फटक्यातच प्रतिस्पर्ध्याला गार केलं होतं. कितीतरी वेळ तो बेशुद्धावस्थेत होता. त्यावेळी त्या मुलाचा अपराध विसरून सगळेचजण मला सुनावत होते. माझ्या आईने तर मला सक्त ताकीदच दिली होती की तू कुणाच्या वाटेला जाऊ नकोस आणि कुणी जरी तुझ्या वाटेला गेलं तरी फक्त स्वत:चा बचाव कर. आक्रमण करू नकोस. तुझ्या हातात भलताच जोर आहे. तुझा टोला म्हणजे भीमटोला आहे रे बाबा. अशाने तू कुणाला तरी जीवे मारशील आणि अपेशाचा धनी होशील. तेव्हा सावध राहा. वादविवाद,भांडणं आणि मारामार्‍यांपासून चार हात दूर राहा.
तेव्हापासून कान पकडले होते. आजतागायत ते पाळत आलो होतो पण परवा संयम सुटला आणि भीमटोला वर्मी बसला. थोडक्यात वाचलो तेव्हा आता पुन्हा काळजी घ्यायला हवी.