माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

११ सप्टेंबर, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १५

माझ्या लहानपणी मी कितीतरी प्रकारचे खेळ खेळलोय.मैदानी खेळात कुस्ती,हुतूतू,लंगडी,खो-खो,आट्या-पाट्या,डब्बा ऐसपैस,पकडापकडी,लगोरी,आबादुबी,तारघुसणी(हा खेळ फक्त पावसाळ्यातच खेळू शकतो),विटी-दांडू,भोवरेबाजी,बिल्ले,गोट्या वगैरे असे खास भारतीय खेळ तर क्रिकेट,व्हॉलीबॉल,फूटबॉल,बॅडमिंटन,टेबल-टेनिस वगैरे विदेशी खेळही भरपूर खेळलोय.त्याच प्रमाणे बैठे खेळ आठवायचे म्हटले तर प्रामुख्याने बुद्धीबळ,कॅरम,पत्ते,सापशिडी,ल्युडो,व्यापार-डाव,कवड्या,सागरगोटे,काचापाणी वगैरे अनंत खेळ आठवतील. ह्यापैकी बैठ्या खेळातल्या पत्त्यांच्या खेळाबद्दलच बोलायचे झाले तरी त्याचे कैक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी आता चटकन आठवताहेत ते म्हणजे तीन-पत्ती,रमी, सात-आठ,पाच-तीन-दोन,मुंगूस,भिक्कार-सावकार,एकपानी झब्बू,गड्डा झब्बू,गुलामचोर,बदामसत्ती,मेंडीकोट,नॉट ऍट होम,लॅडीस,गेम ऑफ पेशन्स(हा एकट्याने खेळायचा प्रकार आहे)वगैरे वगैरे. ह्यातले तीन-पत्ती आणि रमी हे सामान्यत: जुगार समजले जातात कारण हे खेळ खेळताना काही तरी पणाला लावावे लागते.एकेकाळी मी तीन-पत्तीमध्ये अतिशय निष्णात होतो.पण एक प्रसंग असा घडला की मी तो खेळ त्यानंतर कधीच खेळलो नाही(एकवेळचा अपवाद सोडून).आज त्याबद्दल ऐका.

आमच्या वाडीत मराठी,गुजराथी अशी संमिश्र वस्ती होती. ह्यातले गुजराथी लोक त्यांच्या काही विशिष्ठ सणांना सहकुटुंब जुगार खेळतात हे आधी ऐकले होते पण त्यानंतर प्रत्यक्ष पाहिले देखिल. त्या जुगारात बरंच काही जिंकता येते हे पाहून मलाही त्यात रस निर्माण झाला. पण आमच्या आईची करडी नजर चूकवून हे असले उद्योग करणे कधीच शक्य नसायचे. पण ही गुजराथ्यांची मुले एरवीही हा जुगार सर्रासपणे खेळायची. त्यात पैसे न लावता गोट्या,बिल्ले(शीतपेयांच्या बाटल्यांची पत्र्याची बुचे),सिगारेटची पाकिटे,काजू वगैरे गोष्टी पणाला लावत. हे त्यांचे खेळ आम्ही चूपचाप बसून पाहायचो पण खेळायची हिंमत नसायची. त्याचे एक कारण आईची जरब आणि दुसरे म्हणजे ही सर्व मुले त्यात पटाईत होती आणि आम्हाला त्यातले जुजबी ज्ञानच होते तेही पाहून पाहून झालेले त्यामुळे सर्वस्व हरण्याची शक्यता होती.

ह्या सर्व मुलांच्यात भानू नावाचा एक मुलगा खूपच पोचलेला होता. त्याचा गोट्या,बिल्ले वगैरे खेळातला नेम अचूक असायचा आणि त्यात तो नेहमीच जिंकायचा. तसेच ह्या तीन-पत्तीमध्येही तो चांगलाच सराईत होता. त्याचा हात धरेल असा कुणी दुसरा खेळाडू आमच्या वाडीत नव्हता.ह्या भानूच्या बाजूला बसून मी तीन-पत्तीचा खेळ नुसता बघत असे.गंमत अशी की भानू जात्याच हुशार असल्यामुळे ह्या खेळात जिंकत असे पण त्याचा असा समज असायचा की मी त्याच्या बाजूला बसतो म्हणून तो जिंकतो.कमाल आहे ना? हा खेळ खेळणार्‍यांच्यातली अंध:श्रद्धा तरी किती ते आठवले तरी आजही हसू येते.

समजा एखादा खेळाडू हरायला लागला तर मग त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलांना तो सांगणार की पाणी पिऊन या. ती दोन्ही मुले पाणी पिऊन येईपर्यंत खेळ तहकूब केला जाई. तसेच आपल्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलापैकी कुणी मागे हात टेकून बसला तरी त्याला तसे बसण्यापासून परावृत्त करणे.कारण काय तर नरटी लागते. कोपर मांडीवर टेकून आणि हनुवटी तळहातावर टेकून कुणी बसलेले त्या खेळाडूंना चालायचे नाही. ह्याचेही कारण ..नरटी लागते.
ज्याच्यावर पिशी असेल तो त्याच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलाला आपल्या पत्त्यांना हात लावायला सांगणार म्हणजे पानं चांगली येतात अशी धारणा असते.काय काय अंध:श्रद्धा होत्या तेव्हा. आता सगळंच आठवत नाही.

तर अशा ह्या भानूजवळ मी नेहमी प्रेक्षक म्हणून बसत असे आणि त्याचे खेळण्यातले कौशल्य जाणून घेत असे.भानू केवळ हुशारच नव्हता तर तो धुर्तदेखिल होता. हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले तर अगदी बोलबच्चन होता.स्वत:ला आलेली पाने कितीही रद्दड असली तरी समोरच्याला बोलून गार करायचा आणि डावामागून डाव जिंकायचा. एखादा खेळाडू जरा जास्त वेळ टिकला की त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जाणून घेऊन भानू तो डाव त्याला बहाल करायचा.मात्र एरवी सहजासहजी हार मानायचा नाही.पण लावायची देखिल एक भाषा होती. म्हणजे कसे? डाव सुरु होण्याआधी समजा की प्रत्येकाने दोन-दोन गोट्या मध्ये ठेवलेल्या आहेत. मग डाव सुरु झाला की कुणी म्हणेल...एक आलो...म्हणजे अजूनएक गोटी मध्ये ठेवायची. की दुसरा म्हणणार..दोन आलो.
हे ’आलो’ प्रकरण आणि गोट्यांची संख्या वाढत जायची की भानू हळूच आपली पानं बघितल्यासारखी करायचा आणि त्याच्या आधीच्याने जितक्या गोट्या आलो असे म्हटले असेल त्याच्यापेक्षा एकदम दूप्पट गोट्या आलो असे म्हणून जोरात हात आपटून त्या गोट्या मध्यभागी ठेवायचा. त्याचा तो आविर्भाव बघूनच बहुतेक लोक माघार घ्यायचे आणि त्याला डाव बहाल करायचे. ह्यात कैक वेळेला प्रतिस्पर्ध्यांकडे चांगली पाने असूनसुद्धा भानू जिंकायचा. हे सगळे मी नीट पाहात होतो आणि हळूहळू मलाही त्यात भाग घ्यावासा वाटू लागले.

एक दिवस हिंमत करून मीही त्या खेळात उतरलो पण एकदोन डाव जिंकलेले सोडले तर सरतेशेवटी खिशात असलेल्या सगळ्या गोट्या हरलो आणि चेहरा पाडून तिथेच इतरांचा खेळ पाहत बसलो.तसा मी सहजासहजी हार मानणारा नसल्यामुळे दुसर्‍या दिवशी थोड्या(१०) उसन्या गोट्या घेऊन पुन्हा त्या जुगारात सामील झालो आणि पुन्हा सपशेल आडवा पडलो. आज मी नुसताच हरलेलो नव्हतो तर अंगावर कर्जही झालेले होते. त्यामुळे आज अजूनही खट्टू झालो होतो. आता पुन्हा कुठून गोट्या पैदा कराव्यात ह्या विवंचनेत होतो कारण आमच्या कडे लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत नव्हती मग मी गोट्या तरी कुठून आणणार?

मी मग एक शक्कल शोधली. रोजच्याप्रमाणे भानू मला त्याच्या बाजूला बसायचा आग्रह करायला लागला तेव्हा मी त्याला सरळ सांगितले....प्रत्येक जिंकलेल्या डावामागे मला तू १ गोटी बक्षीस द्यायची. कबूल असेल तर सांग.
तो कबूल झाला आणि गंमत म्हणजे योगायोगाने त्यादिवशी तो सगळे डाव जिंकला. त्याच्या विरुद्ध खेळणारे सगळे प्रतिस्पर्धी कफल्लक होऊन निघून गेले.भानूने त्याचा गल्ला मोजला तर एकूण २०० गोट्या जमलेल्या होत्या त्याच्याकडे. त्यादिवशी भानूने मला कबूल केल्याप्रमाणे जिंकलेल्या १५ डावांच्या प्रत्येकी एक अशा १५ आणि अधिक ५ खास बक्षीस अशा २० गोट्या दिल्या. मी तर एकदम मालामाल होऊन गेलो.त्या गोट्या मिळताच मी कर्जाऊ घेतलेल्या १० गोट्या परत केल्या आणि सुटकेचा श्वास घेतला आणि मनात ठरवले की ह्यापुढे कधीच कर्ज काढायचे नाही.

त्यानंतर मग मी ह्या जुगारात भाग घेताना सावधपणे खेळायचा पवित्रा घेत काही दिवस ना नफा ना तोटा ह्या तत्वावर टिकून राहिलो.प्रेक्षक म्हणून बाहेर बसून इतरांचा अंदाज घेणे आणि त्यांचाच एक प्रतिस्पर्धी बनून त्यांच्या डावपेचांचा अंदाज घेणे हा अतिशय वेगळाच अनुभव होता. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढायला लागला आणि भानूच्या खालोखाल जास्त डाव जिंकण्यात माझा क्रमांक लागायला लागला. एकदोनदा तर मी भानूलादेखिल पूरून उरलो. पण भानू हा त्यातला किडा असल्यामुळे त्याने वेळीच माझा धोका ओळखला आणि मला एकदा बाजूला घेऊन मांडवली केली. ती अशी की...दोघांनी एकाच वेळी खेळात उतरायचे नाही. जेव्हा भानू खेळत असेल तेव्हा मी फक्त त्याच्या बाजूला बसून राहायचे आणि प्रत्येक जिंकलेल्या डावासाठी त्याने मला २ गोट्या द्यायच्या. भानूच्या आधी जर मी खेळात उतरलो असेन तर मग भानूने तिथे अजिबात थांबायचे नाही...वगैरे वगैरे.

त्याप्रमाणे काही दिवस सुरळीत गेले आणि माझ्या लक्षात आले की माझ्या समोर कुणाचीच डाळ शिजेना. प्रत्येकवेळी मीच जिंकायला लागलो. एक भानू सोडला तर मला कुणीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उरलेला नव्हता आणि तो तर माझ्याशी तह करून बसलेला होता. पण माझ्या मनात भानूलाही हरवायचे होते आणि आता मी त्या दृष्टीने तयार देखिल झालो होतो. दुसरे म्हणजे भानूच्या सगळ्या क्लुप्त्या मी इतके दिवस अगदी जवळून पाहात आलेलो होतो त्यामुळे साहजिकच मी त्याला भारी पडेन ह्याची मला पूर्ण खात्री झाली होती. पण त्याच्याशी लढत जुळवून कशी आणायची?

मी एकदा भानूला सहज म्हटले देखिल...आता ह्या चिल्लर पिल्लर लोकांशी खेळण्यात मला मजा नाही वाटत. एकदा तुझ्याशी खेळायचे आहे; तर कधी बसू या आपण?
तो फक्त हसला आणि त्याने खांदे उडवले. तो विषय तात्पुरता तिथेच संपला.

त्या दिवशी देखिल मी नेहमीसारखाच जिंकत होतो. खेळ अगदी रंगात आला होता आणि इतक्यात आईची हाक आली.नेहमीप्रमाणे मी चटकन ओ दिली नाही कारण आईच्या अचानक आलेल्या हाकेने मी भांबावलो होतो.आई निवांतपणे झोपलेली आहे हे पाहून मी निश्चिंत होत्साता हळूच खेळात भाग घेतला होता. दुसरे म्हणजे आज आम्ही जिथे बसलो होतो ती जागा अगदी माझ्या घरासमोरच होती त्यामुळे आज पकडला जाईन अशी भिती होतीच. आईने दोनतीन हाका मारल्या तरी मी ओ दिली नाही तेव्हा ती घरातून अंगणात आली आणि तिने पुन्हा दोनतीन हाका मारल्या. खरे तर मी आईपासून अगदी जवळच होतो पण तिला दिसू शकत नव्हतो कारण आम्ही सगळे एका दाट झुडूपात बसून हे सगळे उपद्व्याप करत होतो.
तेवढ्यात तिथेच खेळणार्‍या एका लहान मुलाला आईने विचारले की..प्रमोदला कुठे पाहिलेस काय?
त्यावर त्याने त्या झुडूपाकडे बोट दाखवले आणि मग काय विचारता...आमचा खेळ पाऽऽर संपला.

जुगार खेळताना आईने मला अगदी रंगेहात पकडले आणि मग असा काही चोप दिलाय की काही विचारू नका. वर त्या दिवशी रात्रीचे जेवणही नाही दिले. हे कमी म्हणून की काय मी जिंकलेल्या जवळ १००-१५० गोट्या बाहेर अंगणात फेकून दिल्या ज्या त्या सगळ्या मुलांनी आनंदाने लुटल्या आणि मला चिडवत चिडवत एकेक जण तिथून सटकला. त्या दिवशी आईने निर्वाणीचा इशारा दिला की ...पुन्हा जर असा जुगार खेळलास तर तू माझा मुलगा नाहीस असे समजेन.
हा झटका सगळ्यात जबरी होता.त्या दिवशी मी शपथ घेतली की.. असा जुगार मी पुन्हा कधीच खेळणार नाही म्हणून.. जी आजवर पाळलेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळचा अपवाद आहे.तोही एक योगायोग म्हणून घडला. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: