कुफरीहून परत येतांना वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो...तिथे एक गोऽऽड पिल्लू भेटलं...त्याचे छायाचित्र आधीच्या लेखासोबत जोडलंय. पाहताक्षणीच आवडावं असं त्याचं रूप...खरं तर त्याचे आई-बाबाही देखणे आहेत..पण लहान मुलातला गोडवा मोठ्या माणसात दिसत नसतो...त्यामुळे छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही...त्याचे आई-बाबाही त्याला तयार करण्यात सहभागी झाले. बर्याच प्रयत्नानंतर दोनतीन छाचि काढण्यात यश मिळाले.
दुपारी चारच्या सुमारास आम्ही शिमल्याला हॉटेलवर परतलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळी सहाच्या सुमारास चहा-कॉफी पिऊन पुन्हा खाली उतरलो. आता आम्ही केवळ ’द मॉल’( काही लोक ह्याला माल रोड असेही म्हणतात) वर फिरणार होतो...जिथे फक्त रुग्णवाहिका,पोलिसांच्या गाड्या आणि अन्य अत्त्यावश्यक सेवा वाहनेच चालवली जातात...बाकी, रस्ता हा फक्त चालणार्यांसाठीच मोकळा ठेवलाय. त्यामुळे रमत-गमत, दुकानं न्याहाळत चालणार्यांची चांगलीच वर्दळ इथे असते.
खरं तर माझ्यासारख्या मुंबईत राहणार्या लोकांसाठी ह्या रस्त्याचं काही खास आकर्षण असण्याचा मतलब नाही...कारण मुंबईत जाल तिथे हवे ते मिळण्याची दुकानं आहेत...हं, एक मात्र खरं की असे रस्त्यात विनाव्यत्यय रमत-गमत चालणे मुंबईत कधीच शक्य नसतं...बंद,हरताळ वगैरेंचा अपवाद वगळता.
२-३ तास फिरून आलो. छान वाटलं. तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यातल्या बाईमाणसांनी...नेहमीचंच हो...खरेदी आटपून घेतली. :)
बायका कुठेही जावोत..खरेदी केल्याशिवाय राहात नाहीत...बहुतेक वेळा ही खरेदी वायफळच असते...घरात कपड्यांनी कपाटं ओसंडून वाहात असली तरी ह्यांची नव्या कपड्यांची खरेदी अव्याहतपणे सुरुच असते...यज्ञकुंडात समिधा टाकाव्या..तशी. ;)
उद्या सकाळी (२८ मे)कुलु-मनालीकडे प्रस्थान ठेवायचं होतं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून रात्री साधारण ११ च्या सुमारास झोपी गेलो.सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे रात्रीच काही गोष्टी उरकून घेतल्या....एक म्हणजे हॉटेलचे बील आधीच चुकते करून ठेवले(जे काही जास्तीचे घेतले होते त्याचे पैसे चुकते केले...कारण सकाळचे चहापाणी,न्याहारी आणि रात्रीचे जेवण आमच्या प्रवास करारात सामील होते). सकाळी लवकर निघायचं म्हणून तिथेच न्याहारी न करता ती बांधून देण्याची विनंती हॉटेल प्रशासनाला केली..ती त्यांनी मान्यही केली.
सकाळी लवकर ऊठून तयारी केली.चहा-कॉफी झाली. न्याहारी बांधून घेतली...तेच आपलं...पराठे आणि लोणचं.सकाळी ७ वाजता हॉटेल सोडलं. पण इतक्या सकाळी सरकारी लिफ्ट सुरु होत नसते...मग खाली कसे जाणार? त्यावरही तोडगा होताच...माल रोडच्या एका टोकाला हायकोर्ट आहे...तिथपर्यंत गाड्या येऊ शकतात...चालकाला गाडी तिथे घेऊन यायला सांगितलं आणि आम्ही हॉटेलच्या माणसाबरोबर निघालो तिथे जायला....पायी साधारण दहा-पंधरा मिनिटे चालून गेल्यावर एक जिना लागला..तो उतरलो आणि खालच्या रस्त्यावर आमची गाडी येऊन उभी होती त्यात सामान टाकलं आणि निघालो कुलु-मनालीच्या दिशेने...सुसाटपणे.
हवेत सुखद गारवा होताच,त्यात छानपैकी कोवळं ऊनही पडलेलं...आजूबाजूचा हिरवा आसमंत...त्यामुळे एकदम प्रसन्न वाटत होतं. आता आम्ही आधी जाणार होतो मंडीला...तिथे गाडीचालक बदलणार होता...आत्ताच्या गाडीचालकाला(रमेशला) तिथल्या सहकारी बॅंकेत नोकरीसाठी मुलाखतीला जायचं होतं,त्यामुळे मंडीपासून पुढ्च्या प्रवासासाठी त्याने दुसर्या चालकाची(विजय) सोय केलेली होती.मंडीपर्यंतचा प्रवास हा पुन्हा तसाच..वळणावळणांचा रस्ता, डोंगर उतारावरील घरं आणि रस्त्याच्या एका बाजूने आम्हाला सोबत करणारी बियास नदी...ही नदी आता चांगलीच रूंद झालेली दिसली,पाणीही बर्यापैकी दिसत होते...कुठे संथ तर कुठे खळाळते. चंढीगढ सोडल्यापासून हिमाचलमध्ये ज्या मार्गाने आम्ही वर चढून आलो...त्या मार्गावर आम्हाला भेटलेली ही नदी आमच्या संपूर्ण प्रवासात सोबत करत होती...माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता...एखाद्या नदीचा,इतक्या दीर्घकाळाच्या सहवासाचा...विशेष म्हणजे नदी कुठेही तुंबलेली,प्रदुषित दिसलीच नाही...जिथे पाहावं तिथे अतिशय पारदर्शक असं आपलं रूप घेऊन ती आमची सोबत करत होती....हिमालयातल्या रोहतांगमध्ये उगम पावणारी ही नदी आपल्या वाटेत येणारा सगळा हिमाचल प्रदेश सुजलाम सुफलाम करत करत नंतर पंजाबात उतरते...थोडक्यात आम्ही तिच्या उगमाकडे निघालो होतो...तिच्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने.
वाटेत एका ठिकाणी गाडी थांबवून न्याहारी करून घेतली. बरोबर बांधून आणलेले पराठे तर अतिशय चविष्ठ होतेच आणि तिथे मिळालेला चहाही छान होता..त्यामुळे पोट भरण्याबरोबरच मनाचं समाधानही झालं. तिथून पुन्हा निघालो...सुसाट.
वाटेत मंडी आलं...तिथे चालक बदलला आणि मग आम्ही निघालो कुलु-मनालीकडे. मंडीहून कुलुकडे जातांना दोन खास गोष्टी दिसल्या...एक म्हणजे बियास नदीवरचं एक छोटेखानी धरण आणि दुसरं म्हणजे ३ किलोमीटर लांबीचा बोगदा.
धरणाच्या ठिकाणी खास गाडी थांबवून एकदोन छायाचित्र काढून घेतली. धरणातून उचंबळून येणारं दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी... अगदी कोनात भरलेल्या आईस्क्रीमसारखं एक मोठा गोळा होऊन येत होतं...असलं अप्रतिम दृष्य आयुष्यात पहिल्यांदाच पाहात होतो...त्यातच आजूबाजूच्या हिरवाईने भरलेले रंग तर चित्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते.डोळ्यात,मनात आणि प्रग्रामध्ये ते दृष्य साठवतच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
त्यानंतरचा बोगदा...तसे तर बोगदा हे प्रकरण काही आपल्याला नवीन नाही..पण इतक्या वेळ मोकळ्या वातावरणात,स्वच्छ सूर्यप्रकाशात, खुल्या आकाशाखाली प्रवास करत असतांना अचानक असा एखादा लांबलचक बोगदा आला की कसं अगदी चित्रातला गडदपणा,काळोख वाढतो.आणि ते अधिक उठावदार होतं.
हिमाचलमधले राष्ट्रीय महामार्ग खूपच व्यवस्थित बांधलेले आणि राखलेले दिसून येत होते...बोगदाही अतिशय व्यवस्थित बांधलेला,उत्तम प्रकाशयोजना असलेला होता...त्या बोगद्यातूनही गाड्या सुसाटपणे पळत होत्या.
कुलुला पोचलो. तिथे जागोजागी खेळीमेळीचा जलप्रवास करण्याची सोय आहे...रिव्हर राफ्टिंग नावाच्या ह्या खेळासाठी एक गोलाकार अशी, हवा भरलेली रबरी होडी असते..त्यात प्रवाशांनी(खेळाडूंनी) बसून वल्ह्यांच्या साह्याने ती होडी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणापर्यंत वल्हवत न्यायची असते.एक विशिष्ठ अंतर(ठरवल्याप्रमाणे) गेल्यानंतर मग त्या नावेतल्या खेळाडूंना उतरवलं जातं आणि त्यांना आणि त्या नावेला घेऊन मोटारमधून पुन्हा त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या जागी आणून सोडलं जातं.
आम्ही कुलुला पोचलो तेव्हा हा खेळ खेळायचा हे ठरवूनच गाडीतून उतरलो...पण त्या खेळाचे अवाच्या सवा भाव ऐकूनच आम्ही माघार घेतली...कमीत कमी अंतरासाठी प्रतिमाणशी भाव होता ६०० रुपये...घासाघीस करूनही ५००च्या खाली कुणी उतरायला तयार नव्हतं...काय करावं? ह्याचा विचार सुरु असतांनाच अचानक जोराचा पाऊस सुरु झाला आणि आम्ही गाडीत जाऊन बसलो.. पाऊस कमी होण्याची दहा मिनिटे वाट पाहिली...तोवर अगदी सगळ्यांनी नाही तरी आम्ही दोघा-तिघांनी मनाची तयारी केली होती...नाव वल्हवण्याची...पण पाऊस अजूनच जोरात बरसायला लागला आणि आमच्या उत्साहावरही पाणी पडलं...आता तिथे उगाच वेळ घालवण्यात अर्थ नव्हता, कारण आमचा हा दौरा अगदीच धावता असल्यामुळे जे जमेल ते पाहावे,अनुभवावे इतकाच उद्देश मनात बाळगून आम्ही प्रवासाला निघालो होतो आणि अजून बरेच दूर आम्हाला जायचे होते त्यामुळे आम्ही मग सरळ पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली.
६ टिप्पण्या:
छान वर्णन आहे ..तुम्ही लेह लड़ख ला गेला आहात का ? अनूप घांगरेकर
तुम्ही कुल्लु ला जाताना पंडोह चे धरण नाही लागले काय? अतिशय सुंदर जलाशय आहे ह्या धरणामुळे तयार झालेलं ,अगदी न्युझीलंड मधे असतात तसं.... कोरीव ,डोंगरांच्या बेचक्यात नेमके बसवल्यासारखे आहे......जवळपास नंतर ४-६ कि.मी रस्त्याच्या एका बाजुला हे जलाशय दिसत राहते, हिरवट-आकाशी झाक असणारे आहे अन अगदी स्तब्ध शांत असते, वेगळा अनुभव आहे हे धरण पाहणे. बहुतेक बियास नदीवरच बांधलंय
सॉरी कुल्लु नाही मनाली ला जाताना, अन दुबार सॉरी स्लाईड्स न पाहता कमेटल्याबद्दल, हा बोगदा बांधकाम सुरु असताना आम्ही गेलो होतो तेव्हा पण मस्तच वाटत असे तिथे
सॉरी कुल्लु नाही मनाली ला जाताना, अन दुबार सॉरी स्लाईड्स न पाहता कमेटल्याबद्दल, हा बोगदा बांधकाम सुरु असताना आम्ही गेलो होतो तेव्हा पण मस्तच वाटत असे तिथे
देवकाका प्रवासवर्णन आवडलेच पण मुद्दाम सांगावेसे वाटते की ब्लॉग अतिशय सुंदर दिसतो आहे. Slideshow ची कल्पना सुद्धा उत्तम. तुमचे असेच वरचेवर प्रवास घडोत आणि आम्हाला प्रवासवर्णनाची मेजवानी मिळो.
शुभास्ते पंथानः सन्तु !!!
अनुप,अजून तरी लेह लडाखला गेलेलो नाहीये.
गुरुनाथ, पनडोह लागलं तर...पण लिहितांना राहून गेलं त्याबद्दल...आणि हो,तेही बियासवरच आहे...कारण हा पूर्ण प्रवासच बियासच्या काठाकाठाने होत आलाय.
हर्षा,जालनिशीचे नवे स्वरूप आवडल्याचे ऐकून खूप बरं वाटलं.
अनुप,गुरुनाथ आणि हर्षा..तुम्हा तिघांनाही प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा