माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ जून, २०११

चंशिकुम! ३

जेवण बाकी मस्तच होतं त्यामुळे आधीचा सगळा मनस्ताप दूर झाला.


सगळाच घोळ झाला होता. आम्हाला न्यायला कुणी ’अरूण’ नावाची व्यक्ती येणार होती असं आमच्या मुंबईच्या सहल आयोजकाने सांगितले होते...आणि त्याच्याऐवजी आला होता रमेश. हे कमी म्हणून की काय, ह्या रमेशला अरूण कोण तेच माहीत नव्हतं आणि आपण ज्यांना आणायला जातोय त्यातल्या गटप्रमुखाच्या नावाव्यतिरिक्त दुसरं काहीही माहीत नव्हतं. मुंबईतला आमचा आयोजक आणि इथला स्थानिक संयोजक ह्यांच्यामध्ये कुठेच काही ताळमेळ नसल्याचं जाणवलं होतं. मग आम्ही आमच्या मुंबईतल्या आयोजकाला धारेवर धरलं....त्याने मग झटपट सुत्र हलवली आणि एकदाचे शिक्कामोर्तब झाले की रमेश हा आमच्यासाठीच आलेला माणूस आहे...कारण आम्हाला जो भ्रमणध्वनी क्रमांक दिला गेला होता तो त्याच्याचकडे होता...त्याच्या गाडीवरही तोच लिहिला होता.

मग आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम त्याला समजावून सांगितला...आधी चंढीगढमधील रॉकगार्डन दर्शन आणि मग तिथून थेट शिमल्याला प्रयाण.

चंडीगढमधले आखीव-रेखीव रस्ते आणि नगररचना ही गोष्ट माझ्यासारख्या जुन्या मुंबईकराला पहिल्या दर्शनात आवडली. तिथे एक मात्र प्रकर्षाने जाणवलं की.....प्रशस्त रस्ते आहेत,रस्त्यांच्या नावाच्या पाट्या आहेत,चौकाचौकात रस्ता विभाजक अशी गोलाकार छोटेखानी उद्यानं,मैदानं आहेत...रस्त्यांवर दिसणारी आधुनिक वाहनं आहेत...आजूबाजूला एकसारख्या दिसणार्‍या एकमजली-दुमजली इमारती आहेत पण.....पण इथे माणसांचा अभाव आहे. रस्त्यावरून चालणारी माणसे नाहीत; मुंबईत कुठेही सहज दिसतील अशी दुकाने,विडी-काडी-चहाच्या टपर्‍या नाहीत...थोडक्यात रस्त्याच्या दूतर्फा मैलोन-मैल शुकशुकाट आहे.
ह्याचा अर्थ असा नव्हे की तिथे दुकानं वगैरे मी जे वर म्हटलंय ते नाहीये...आहेत, तीही आहेत..पण ठराविक जागी, ठराविक साच्यामधली...त्यामुळे असलीच तर माणसांची वर्दळ तेवढ्याच विभागापुरती..बाकी सगळे निर्मनुष्य. आम्ही गेलो होतो तेव्हा टळटळीत दुपार होती...त्यामुळेही शक्य आहे की लोक आपापल्या कार्यालयात,घरात असावेत आणि म्हणूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसला...जी काही कारणं असतील ती अगदी खरी मानली तरी मुंबईसारख्या सदैव माणसांच्या गर्दीत वाढलेल्या माझ्यासारख्याला मात्र हे शहर थोड्याच वेळात नावडू लागले...साचेबद्धपणा सुरूवातीला कितीही आकर्षक वाटला तरीही थोड्याच वेळात त्याचा कंटाळा येतो हे मी इथे प्रकर्षाने अनुभवले....एखाद्या शिष्ठ आणि सदैव शिस्तीत राहणार्‍या माणसाच्या घरात कसे अगदी सगळं जागच्या जागी आणि टापटीप असतं, पण कोणतीच वस्तू हाताळता येत नाही...तसं काहीसं मला वाटलं...हे शहर शिष्ठ वाटलं मला. मुंबई हे चोवीस तास जागणारं शहर आहे तर चंढीगढ हे सुस्तावलेलं शहर वाटलं मला. तसंही प्रत्येक शहराचं वैशिष्ठ्य  वेगळं असतंच म्हणा....ज्याला त्याला आपलं शहर,गाव आवडतं हेच खरं.

पण ह्या शहरात मला काय आवडलं असेल तर ते आहे रॉक गार्डन!
हे रॉकगार्डन प्रकरण खरंच खास आहे. ’टाकाऊतून टिकाऊ’ असे हे प्रकरण आहे. दगड-गोटे,दगड-धोंडे,तुटक्या-फुटक्या टाईल्स,फुटक्या बांगड्या,कपबश्या आणि अशाच कैक फेकून देण्यालायक गोष्टीतून हा प्रकल्प जन्माला आलाय. सगळ्यात आधी हे ज्याच्या डोक्यात आलं त्याला सलाम आणि ज्या कुण्या कलाकारांनी हे प्रत्यक्षात आणलं..त्यांना तर भरभरून सलाम. इथे उभारलेली शिल्प ही मनात येतील तशी उभारलेली नाहीत तर त्याच्यामागेही निश्चित अशी काही संकल्पना दिसून येते. डोक्यावर रणरणतं ऊन आणि संध्याकाळच्या आत शिमल्याला पोचायचं होतं...ह्या दोन कारणांमुळे म्हणावे तसे फार बारकाईने,रसिकतेने आम्ही ते पाहू नाही शकलो..पण जमेल तेवढी छायाचित्र घेण्याचा मी प्रयत्न केलाय..त्यातूनही आपल्याला बरंच काही समजू शकेल अशी अपेक्षा आहे. एक मात्र सांगेन की हे रॉ्गा केवळ प्रेक्षणीयच नाहीये तर ते अभ्यासण्याजोगे देखील आहे. ह्यावर एक माहितीपटही बनवता येईल इतके वैविध्य इथे आहे...तसेच आकारानेही बरेच मोठे आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचे असल्यास किमान तीन-चार तास तरी लागू शकतात.
दूधाची तहान ताकावर भागवता यावी म्हणून ही काही छाचि आपल्यासाठी सादर करतोय....

४ टिप्पण्या:

गुरुनाथ म्हणाले...

काका पोस्ट्स भारी आहेत तुमच्या, जुने दिवस आठवले गिर्यारोहण व भटकंती ती सुद्धा विद्यार्थ्यांना परवडेल अश्या भावात म्हणुन आम्ही ८वी-९वी पासुन ह्या इलाख्यात "युथ हॉस्टेल्स असोसियेशन ऑफ़ इंडीया" ह्या संस्थेच्या माध्यामातुन फ़िरत असु. ९वी ते ग्रॅज्युएशन चे फ़ायनल वर्ष, हा भाग आमचे उन्हाळी घर असायचा, चंडीगढ ते शिमला रस्त्यावर "किरतपुर साहिब" नावाचा एक जुना गुरुद्वारा आहे, तिथे आम्ही जेवत असु पुर्ण संगमरवरी अश्या ह्या गुरुद्वा~याच्या बाजुने सतलज नदीचा एक कालवा जातो (नदी वाटावी इतके मोठे त्याचे पात्र आहे) सगळे आठवले, धन्यवाद!!!!!!!

गुरुनाथ म्हणाले...

तसेच चंडीगढ हे भारतातले पहिले नियोजित शहर आहे (अन बहुदा शेवटचे सुद्धा!!!!) ली कार्बुसियर नावाच्या फ़्रेंच स्थापत्यविशारदाने ह्या शहराचा आराखडा बनवला होता.

मिश्र काफी म्हणाले...

"अ" "ऋण" ऐवजी, "र" मे "श" झाले हे जरा अतीच झाले नाही का?...

हे म्हणजे अगदी वेगवेगळ्या दोघांना दिसणारा "भगवा" रंग तोच असतो असे नाही असे सांगतात त्यासारखेच वाटले...

प्रमोद देव म्हणाले...

गुरुनाथ,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
तुही तुझ्या आठवणी लिही ना...वाचायला नक्की आवडेल.

मिश्र काफी आपल्यालाही धन्यवाद.
मात्र आपली सांकेतिक भाषा माझ्या डोक्यावरून गेली...जरा समजेल अशा सोप्या भाषेत सांगा ना राव/बाई!