माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२१ डिसेंबर, २००७

बालपणीचा काळ सुखाचा! २

माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. लहानपणी खूप बडबड्या होता. सतत गाणी म्हणायचा. गोष्टी सांगायचा. नकला करायचा. पण साधारण पाच सहा वर्षांचा असेपर्यंत खूप बोबडा होता. त्याच्याबद्दलची आई-वडिलांनी सांगितलेली ही एक आठवण.

माझ्या मामाकडे त्या काळात फोनो(चावीचा रेकॉर्ड प्लेयर आणि त्याला पुढे लावलेला भोंगा) होता. त्यावर रेकॉर्ड्स लावल्या की त्या आम्ही ऐकत असू. ह्यातून येणार्‍या आवाजाचा मालक (गायक-गायिका) ह्यात आतमध्ये कसे शिरतात? बरे शिरतात तर शिरतात पण शिरताना दिसत कसे नाहीत आणि इतक्या छोट्याश्या जागेत मावतात कसे? असले प्रश्न नेहमी मला सतावायचे. पण माझा भाऊ(त्याला मी दादा म्हणतो) मात्र त्या गाण्यांचे मोठ्या भक्तीने श्रवण करायचा आणि घरी आला की मग आमच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर बसून ती गाणी तो आपल्या बोबड्या बोलीत जोरजोरात ऐकवायचा. ऐकणार्‍यांना खूप गंमत वाटायची कारण बहुतेक सगळेच शब्द उलटे पालटे झालेले असत. नेमके गाणे काय तेही समजत नसे.
एखाद्याने हे गाणे तू कुठे ऐकलेस असे विचारले की लगेच तो सांगायचा, "मोघुमामातले तवा दाद्दा होता ना!" (मधुमामाकडे तवा (रेकॉर्ड) लागला होता ना!) गाणे काय तर .... अले नुत्ता हाताय हाताय , तय तय लादे तवंदी तायला तिताय तिताय मग बर्‍याच प्रयत्नांनी आईच्या लक्षात यायचे ते गाणे...... अरे नाखवा हाकार हाकार, चल चल राधे करवंदी खायला चिकार चिकार... असे काहीसे ते गाणे होते. ह्याच्या आधी आणि पुढे काय होते ते आता आठवत नाही. पण त्याची टकळी चालूच असायची.

माझ्या लहानपणी आमच्या आजूबाजूला भरपूर वनसंपदा होती. त्यामुळे खूप सारी फुलपाखरे, चतुर, मधमाशा वगैरे असे उडणारे कीटक दिसत तसे लाल मुंग्या,काळ्या मुंग्या,डोंगळे,मुंगळे वगैरे वगैरेंचीही रेलचेल होती. ह्या माझ्या दादाला डोंगळे खायची सवय लागली. कशी ती माहीत नाही; पण दिसला डोंगळा की तो उचलून लगेच तोंडात टाकायचा. चावण्याची भिती वगैरे काहीच नव्हती. ही सवय मोडण्यासाठी आईने जंग जंग पछाडले पण तिचा डोळा चुकवून तो आपला कार्यभाग साधून घेत असे.मात्र एकदा एक डोंगळा त्याच्या जिभेला असा काही करकचून चावला की त्या दिवसापासून त्याची ती सवय आपोआप सुटली.

माझ्या धाकट्या भावाचे पराक्रम तर काही विचित्र होते. हे किस्से तो तीन-चार वर्षांचा असतानाचे आहेत. माझ्या वडिलांना तपकिरीचे व्यसन होते. ती तपकीरही साधीसुधी अथवा सुगंधी तपकीर नसायची. त्या काळात ’मंगलोरी’ ह्या नावाने मिळणारी अती कडक(स्ट्रॉंग) अशी ती तपकीर असायची. तपकिरीची डबी सदैव त्यांच्याजवळ असायची. थोड्या थोड्या वेळाने त्यातली चिमूटभर तपकीर ते नाकात कोंबत. हे सगळे माझा धाकटा भाऊ नेहमी पाहत असे. एकदा वडील काही कामात असताना त्यांचे लक्ष चुकवून ह्या माझ्या भावाने तपकिरीची डबी पळवली आणि आडोशाला जाऊन ती डबी उघडून त्यातील सगळी तपकीर आपल्या नाकात ओतली.जे व्हायचे तेच झाले. फटाफट शिंका यायला लागल्या आणि तो घाबराघुबरा झाला. आई-वडील आपापली कामे सोडून धावत पळत त्याच्याकडे गेले आणि त्याची सुश्रुषा करायला लागले. त्याला ह्या शिंका अचानक कशा यायला लागल्या हे आधी कळलेच नाही पण बाजूलाच पडलेली तपकिरीची डबी पाहिली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्याचे वय अतिशय लहान असल्यामुळे त्याला ओरडून काहीच उपयोग नव्हता म्हणून आईने वडिलांनाच दोन शब्द सुनावले. पण त्या परिस्थितीत वडील शांत राहिले म्हणून पुढे बोलणे वाढले नाही.

ह्यानंतरचा पराक्रम तर काही और आहे. त्या काळात कोळसा आणि रॉकेल ह्यांचा वापर जळणासाठी करायचे. आमच्याकडे वीज नव्हती त्यामुळे चिमण्या-कंदील हे रॉकेलचे दिवे असत. तसेच रॉकेलचे स्टोव्ह असत. त्या सर्वांमध्ये रॉकेल भरण्याचे काम रोज चालत असे. हा माझा धाकटा भाऊ आईच्या अवतीभवतीच असायचा. डब्यातनं रॉकेल बाटलीत काढणे आणि बाटलीतनं ते स्टोव्ह,दिव्यांमध्ये भरणे ह्या गोष्टीचे रोज त्याचे निरीक्षण चाले. रॉकेलचा डबा,बाटली वगैरे सामान एरवी स्वयंपाकघरात एका कोपर्‍यात ठेवलेले असे. एक दिवस आई बाहेरच्या खोलीत कचरा काढत असताना हे महाशय स्वयंपाकघरात खेळत होते. खेळता खेळता त्याचे लक्ष त्या रॉकेलच्या बाटलीकडे गेले. ती अर्धी भरलेली होती. त्याने ती तशीच उचलली आणि तोंडाला लावली. त्यातले बरेच रॉकेल त्याच्या नाकातही गेले आणि जोराचा ठसका लागला. त्याचा तो विचित्र आवाज ऐकून आई धावत आली आणि तिने ते पाहिले मात्र. तिने कपाळाला हात मारून घेतला. पटापट त्याला तिथून उचलून बाहेर आणले. मिठाचे पाणी प्यायला लावून ओकून सगळे पोटातले रॉकेल बाहेर काढले तेव्हा कुठे तो नीट श्वास घेऊ लागला. आई मनातनं घाबरली होती पण प्रसंगावधान राखून तिने ते सगळे सोपस्कार केले म्हणून बरे नाहीतर फार गंभीर प्रसंग ओढवला असता.त्यानंतर आई त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली आणि झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. डॉक्टरांनी त्याला नीट तपासले आणि काही काळजीचे कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांनी माझ्या आईच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.त्यानंतर आई प्रत्येक गोष्टीत काटेकोर झाली. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी त्याच्या हाती लागू नये म्हणून वर फळीवर ठेवायला सुरुवात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: