माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ ऑगस्ट, २०१०

काय होणार आहे ह्या देशाचं?

महागाईने सगळे लोक त्रस्त झालेत; लोक प्रतिनिधींनीही आपल्या पोळीवर तूप ओतून घेतलंय...
अहो पण का?
का, म्हणजे काय? त्यांनाही महा घाई आहे ना...
तुम्हाला महा घाई म्हणायचंय की महागाई? एकदा काय ते नेमकं बोला.
सांगतो...त्याचं काय आहे की महागाई तर वाढलेलीच आहे...संघटीत कामगार,सरकारी नोकर इत्यादिंना महागाई भत्त्यात तुटपुंजी का होईना पण वाढ करून मिळतेय...बाकी जनतेचं काहीही होवो...पण ह्या महागाईचा बाऊ करून लोकप्रतिनिधींनाही आपले भत्ते वाढवून...वाढवून म्हणजे किती? ३०० पट!
काय सांगताय काय? इतके?
अहो, हो, चालायचंच मोठ्यांचं सगळंच मोठं असतं ना...मग त्यांची महागाईही  तेवढीच ’महा’ असणार ना!
हं! असं आहे तर...जाऊ द्या झालं...ज्याच्या हाती ससा तो पारधी..म्हणजे ज्याच्या हाती सत्ता तो.....
गरीब दिवसेंदिवस अजून गरीब होतोय..त्यामुळे लाचारी वाढतेय..मग त्या लाचारीतून निर्माण होतोय राग आणि रागातून निर्माण होतोय नक्षलवादासारखा अतिरेकी मार्ग....हे एक दुष्टचक्र आहे. आपलेच कैक भाऊबंध इतक्या हलाखीत जगत आहेत तरी कुणालाच त्याचे सोयर सुतक नाही. हे जे गोरगरिंबाचे आणि जनतेचे प्रतिनिधी असे स्वत:ला म्हणवून घेतात..त्यांना जर महागाईच्या झळा जाणवत असतील तर ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्याबद्दल का नाही हे बोलत..महागाईभत्ते वाढवून घेण्याऐवजी महागाई कमी व्हावी ह्यासाठी का नाही उपाययोजना करत?
हॅ हॅ हॅ ! कायच्या काय बोलता राव तुम्ही. हल्लीच्या जमान्यात कोन कुनाचा नसतो म्हाईत नाय काय तुमाला?
अहो म्हणून काय झालं? निवडणुकीच्या वेळी आपल्याकडेच येतात ना ते मतं मागायला?
राहू द्या, कळलं आता...उगाच जास्त पकवू नका.
बरं बाबा, नाही पकवत.

आता आपण दुसरं काही बोलू या का?
हो, पण काय बरं बोलायचं?
ते जेम्स लेन प्रकरण काय आहे हो...त्यावरून म्हणे आता दादोजी कोंडदेवांचा पुतळाही लाल महालातून हलवणार आहेत.
छे हो, अहो खरं काय आहे माहीत आहे काय? आपल्यातलीच काही छिद्रान्वेषी लोकं खाजगीत काही तरी कुजबुजली आणि ती कुजबुज ह्या जेम्स महाशयांनी  त्यांच्या पुस्तकात छापली...झालं त्यावरून आता रणं माजलेत.
पण काय हो, कुजबुज तरी काय आहे नेमकी?
खरं सांगू, मी काही वाचलेलं नाहीये....हो उगाच खोटं कशाला बोला....पण एकच सांगतो शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे...आणि कुणी एखादा उपटसुंभ त्यांच्याबद्दल कुणाच्या तरी सांगण्याने काही अपशब्द उच्चारत असेल तर त्यामुळे आमच्या मनातील महाराजांच्या प्रतिमेला तडा जाण्याइतपत ती प्रतिमा तकलादू नाहीये. हातात पेन आहे म्हणून कुणी काहीही लिहील...आम्ही त्यामुळे विचलीत होणार्‍यातले नाही. आमच्यातली काही इतिहास अभ्यासू आणि तज्ञ मंडळी अशा लोकांना काय ते उत्तर द्यायला आहेत समर्थ...त्यामुळे आम्ही त्याची फिकीर करत नाही.
अहो, पण आपल्यातलीच काही मंडळी ह्याचा वापर करून आता जातीपातींवर घसरलेत....त्यामुळे हे प्रकरण वेगळेच वळण घेत आहे...त्याचं काय करणार?
दूर्दैवाने हे खरं आहे...छत्रपतींचा वारसा सांगणारे काहीजण आपल्या क्षणिक राजकीय फायद्यासाठी हे सगळं घडवून आणत आहेत...आणि हीच खरी शोकांतिका आहे....असल्या घरभेद्यांशी लढण्यात महाराजांची अर्धी शक्ती खर्च झाली...आजही तेच सुरु आहे...आपल्या आपल्यात लढण्यातच आपली शक्ती खर्च होतेय..
अहो, मग ह्यावर उपाय काय?
तात्कालिक उपाय म्हणाल तर काहीही नाही...तुका म्हणे उगी राहावे,जे जे होईल ते ते पाहावे....अहो साक्षात प्रभू रामचंद्रालाही वनवास चुकला नाही आणि श्रीकृष्णाची तर जन्मत:च जन्मदात्या आईपासून ताटातूट झाली..तिथे तुम्ही आम्ही काय? जे व्हायचे आहे ते होणार, टळणार नाही..कदाचित ह्यातून अजून काहीतरी चांगले उपजेल असा विचार करायचा...इतकंच आपल्या हातात आहे.
अहो, पण जे होतंय ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला?
वाटतं ना! पण काही लोकांची चुकत चुकत शिकण्याची प्रवृत्ती असते....त्याला आपण काय करणार? जाऊ द्या त्यांना आपल्या लायनीप्रमाणे.

अजूनही बरेच बोलण्यासारखे विषय आहेत...पण आपण फक्त बोलूकाकाच आहोत...आपल्या बोलण्याने इकडची काडी तिकडे हलत नाही...त्यामुळे आत्ता इतकंच पुरे.
रामराम!
छ्या! तुम्ही च्यायला नेहमीच शेपूट घालता राव!
अहो, नाही हो, मोडेन पण वाकणार नाही हा आमचा बाणा आहे..आम्ही परकीयांविरुद्ध केव्हाही,कुठेही लढू शकतो..पण आपल्याच लोकांविरुद्ध.... नाही, नाही! आमचे हात नाही उठणार ..मग आमची गर्दन उडाली तरी बेहत्तर...
मग मरा. एक दिवस तुम्हाला हा देशही सोडावा लागेल.
काय तरीच काय बोलता राव. महाराजांचे भक्त आहोत आम्ही...इथल्या मातीतच मरू पण मायभूमीशी कधीच गद्दारी नाय करणार..समजलं काय? वैयक्तिक आमच्या जगण्याने आणि मरण्याने देशाचा काहीच फायदा नुकसान होणार नाहीये हे आम्हालाही माहीत आहे...पण आमची नाळ पुरलेय इथल्या मातीत..त्यामुळे सद्द्याचे अस्थिर राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहून  काळजी मात्र वाटते....काय होणार ह्या देशाचे?  :(
एकीचे बळ काय असते...हे आम्हाला कधी कळणार?
महाराज, पाहता आहात ना!

६ टिप्पण्या:

सागर म्हणाले...

महाराज माफ करा

Yogesh म्हणाले...

काय होणार???

उत्तम प्रश्न आहे....यावर विधीमंडळात आम्ही वादळी चर्चा घडवु...सत्ताधार्‍यांना या प्रश्नाच उत्तर द्यावच लागेल...तुम्ही म्हणत असाल तर हुशार लोकांची एक समिती नेमुन चांगला अहवालच तया करु की...
शेवटी जनतेच्या सेवेसाठीच आम्ही आहोत...फ़क्त आमच्या पगाराचा मुद्दा तेवढा खटकला...असो त्यावर आम्ही सरकार सोबत असल्यामुळे त्याबाबत आम्ही मुग गिळुन बसलो आहोत...

अन हो...तुम्ही कशाला एवढा त्रास करुन घेताय...ते काम तर आमच..तुम्ही कस निवांत जगायच....तुम्ही म्हणत असाल तर खास तुमच्या मनोरंजनासाठी वर्षातुन दोनदा आय.पी.एल. आयोजित करतो की...आमचे साहेब "जाणता राजा" आहे त्यांना जनतेची काळजी आहे.

पुन्हा भेटुच तोपर्यंत "रामकृष्ण हरी...पांडूरंग हरी"

आपला विश्वासु,
एक "खा"सदार

THEPROPHET म्हणाले...

शेवटचा परिच्छेद अगदी मनातला आहे!

प्रमोद देव म्हणाले...

सागर,योगेश आणि विद्याधर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

’खा’सदार साहेब, तुम्ही म्हन्ता त्येबी पटलं बर्का! ;)

अनामित म्हणाले...

अर्थशास्त्रानुसार सरकारसमोर महागाई अथवा टंचाई हे दोनच पर्याय आहेत. सरकारने यातील टंचाई हा पर्याय नाकारून महागाई हा पर्याय पत्करला यात चुकीचे काही झाले असे मला वाटत नाही.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद अनामित !
मला काही अर्थशास्त्रातले फारसे कळत नाही...इतकंच कळतं की लोकनियुक्त प्रतिनिधींनी आणि सरकारने कोणताही निर्णय घेतांना सर्वात आधी सामान्य माणसाचा सहानुभूतीने विचार करायला हवा.