माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ जानेवारी, २००७

समभाग आणि त्यासंबंधाने काही! भाग१

मराठी माणूस आणि भांडवल बाजार(शेअर बाजार) ह्याचे नाते हल्ली बरेच जवळिकीचे होत आहे हे बघून खूप बरे वाटते. भांडवल बाजार म्हणजे सट्टाबाजार असे सर्वसाधारण समीकरण आपल्या मनांत घट्ट बसलेले होते. त्या मनोवृत्तीत आता आशादायक बदल होत आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे. तरी देखील अजूनही काही लोकांच्या मनात काही मूलभूत प्रश्न असण्याची शक्यता आहे आणि म्हणून अशा लोकांसाठी काही प्राथमिक स्वरूपाची माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.(सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे, बघू किती जमते ते. विषया संबंधी काही चुका आढळल्यास तज्ञ व्यक्तीकडून त्यात सुधारणा अपेक्षित आहेत)
समभाग(शेअर) म्हणजे काय?
समभाग म्हणजे सरळ साधा जो अर्थ आपल्या सगळ्यांना माहीत आहे तोच इथे देखील अभिप्रेत आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा समान भाग. इथे शेअर म्हणजे सुद्धा समभागच होय पण तो कसला? तर एखाद्या व्यापारी कंपनीच्या (पब्लिक लिमिटेड)भांडवलाचा. कसा ? आपण उदा.बघू या..समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १कोटी रूपयांचे असेल तर भांडवलाची वाटणी छोट्या छोट्या भागात करायची. ह्यासाठी १कोटी रुपयांची समान वाटणी प्रत्येकी १०रुपये मूल्याच्या भागात केली तर अशा तर्‍हेने १०लाख समान भाग(सम भाग) होतील. इथे एका समभागाचे दर्शनी मूल्य(फेस व्हॅल्यू) १० रुपये इतके आहे. हे दर्शनी मूल्य १रु; २रु; ५रु; १०रु; ५०रु;आणि १००रु. ह्या स्वरूपात देखिल असू शकते. दर्शनी मूल्य किती असावे हे कंपनीच्या ध्येय धोरणावर ठरत असते त्यामुळे सगळ्याच कंपन्यांचे दर्शनी मूल्य एकच नसते.
भागधारक म्हणजे काय?
ज्या व्यक्तीकडे अशा तर्‍हेचे(वरील उदा.प्रमाणे) एखाद्या कंपनीचे समभाग असतील तर तो त्या कंपनीचा भागधारक ठरतो. म्हणजे त्याच्याकडे असणार्‍या समभागाच्या प्रमाणात त्याचा मालकी हक्क सिद्ध होतो. ह्याला सार्वजनिक मालकी म्हणतात. अशा ह्या भागधारकाला काही हक्क प्राप्त होतात. ते पुढील प्रमाणे......
मतदानाचा हक्कः कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत(ऍन्युअल जनरल मीटिंग) तसेच विशेष बैठकीत(एक्स्टॉ ऑर्डिनरी मीटिंग) मांडलेल्या ठरावांवर मतप्रदर्शन करण्याचा हक्क असतो.
लाभांश(डिव्हिडंड); कंपनीला फायदा झाला आणि कार्यकारी मंडळाने(बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) निर्णय घेतल्यास लाभांश(फायद्यातील अंश) घोषित होतो आणि वा.स.बै. त भागधारकानी संमती दिल्यास तो मिळण्याचा हक्क.
बक्षीस समभाग(बोनस शेअर्स) ; कंपनीला खूप मोठा फायदा झाल्यास आणि गंगाजळी(रिझर्व अँड सरप्लस) मोठ्या प्रमाणात असेल तर का.मं. बक्षीस समभागांची घोषणा करते आणि भागधारकांच्या विशेष बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर ते भागधारकांना त्यांच्याकडे असणार्‍या समभागाच्या प्रमाणात वाटले जातात. उदा. एकास एक म्हणजे भागधारकाकडे असणार्‍या एका समभागासाठी अजून एक समभाग त्याला मिळेल.
हक्क भाग(राईटस्) ; कंपनीला व्यापार वाढविण्यासाठी अधिक भांडवलाची जरूर निर्माण झाल्यास ते भागधारकांना(त्यांचा हक्क म्हणून) ठराविक एक किमतीला नवे समभाग विकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: