माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जून, २००९

मराठी गजल-गायनातला ध्रूवतारा!



विवेक काजरेकर,गजलनवाज भीमराव पांचाळे आणि मी

काही दिवसांपूर्वी माझे मित्र संगीतकार विवेक काजरेकर त्यांच्या नवनिर्मित संकेतस्थळाबद्दल मला माहिती देत होते. आपल्या संकेतस्थळावर काय नावीन्य असेल ह्याची माहिती देताना त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला होता; तो म्हणजे मराठीतील नामांकित गायक/गायिका, संगीतकार वगैरेंच्या मुलाखतींसाठी एक खास विभाग निर्माण करण्याचा. काजरेकरांनी मला त्यांच्या संस्थचा दुवा दिलाच होता त्याप्रमाणे मी त्यावर फेरफटका मारून आलो आणि मला हे संकेतस्थळ खूपच आवडले. तरीही त्यावेळी ते जनतेसाठी खुले केलेले नसल्यामुळे मी त्याबद्दल माझ्या मित्रमंडळींमध्येही काही चर्चा केली नाही.

काजरेकर आणि माझ्या बोलण्यात बरेचदा मी माझे दुसरे एक मित्र आणि माझे आवडते मराठी गजल गायक गजलनवाज भीमराव पांचाळेंबद्दल बोलत असे. हाच धागा पकडून मी भीमरावांची मुलाखत घ्यावी असा प्रस्ताव काजरेकरांनी माझ्यासमोर मांडला. ही केवळ गंमत असावी असे समजून मी त्याला होकारही दिला. पण काजरेकरांनी ते विधान गंभीरपणे केलेले होते आणि त्यामुळेच मध्यंतरी ते सुट्टीवर भारतात आल्यावर त्यांनी लगेच भीमरावांची भेट घेण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला. मग मीही आधी भीमरावांशी बोलून घेतले आणि त्यांच्यासमोर काजरेकरांचा प्रस्ताव मांडला आणि भीमरावांनी तो आनंदाने मान्य केला. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ ठरवण्यासाठी मी सुत्र काजरेकरांच्या हाती दिली आणि त्यांनी मे महिन्यातल्या एका शनिवारची संध्याकाळी पाचची वेळ निश्चित केली.

गंमती गंमतीतला हा खेळ असा अंगाशी येईल असे मुळीच वाटले नव्हते पण एकदा मुलाखतीची तारीख आणि वेळ पक्की ठरल्यावर मी देखिल मनापासून तयारीला लागलो. खरे सांगायचे तर मला बोलायला खूप आवडते आणि कुणाशीही नव्याने ओळख झाली की मी त्या व्यक्तीला त्याच्यासंबंधीची माहिती विचारण्यासाठी बरेच प्रश्न विचारत असतो. म्हणजे ती देखिल एक जीवंत मुलाखतच असते,त्यामुळे भीमरावांची मुलाखत घ्यायची ठरल्यावर मला निश्चितच आनंद झाला. माझ्या मनातले प्रश्न त्यांना विचारावे असे कैक वेळेला मला वाटले असूनही भीमरावांची गजल गायन,प्रचार आणि प्रसारातली व्यस्तता पाहून मी नेहमीच माझे तोंड बंद ठेवलेले होते; आणि आता तर मला हे सर्व करण्यासाठी अधिकृत परवानगी आणि भरपूर वेळ मिळालेला होता. तेव्हा ही संधी मी कशी बरं सोडेन?

तर आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीकडे वळूया.

१९७२ सालापासून आजतागायत अखंड ३७ वर्षे भीमराव मराठी गजल-गायनाची आणि गजल प्रसाराची ध्वजा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहून नेत आहेत.अशा भीमरावांना मी मराठी गजल गायनातला ध्रुवतारा असे मानतो.



भीमराव आणि मी

भीमराव,तुमच्याबद्दलची थोडी वैयक्तिक माहिती द्या...उदा. तुमचे बालपण,शालेय शिक्षण,महाविद्यालयीन शिक्षण तसेच संगीताचे शिक्षण वगैरे.

माझा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या एका अशा छोट्या खेड्यात झाला की जिथे शालेय शिक्षणाची सोय नव्हती.जिथे रेडिओ ऐकायला मिळत नव्हता आणि लोकगीतांव्यतिरिक्त मनोरंजनाचे कोणतेही साधन नव्हते. मी एका शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातला आहे. गावापासून शाळा तीन किलोमीटरवर होती आणि तिथे चालतच जावे लागायचे.त्यामुळे रोज ६किलोमीटरची पायपीट करावी लागायची. अशा बिकट परिस्थितीतच प्राथमिक शिक्षण झाले. संगीताची पार्श्वभूमी तशी घरातच होती. माझ्या आईचा आवाज अतिशय मधुर होता. तिच्याकडूनच मला आवाजाची देणगी मिळाली. माझे वडीलही अतिशय उत्तमपणे गायचे. हीच संगीताची शिदोरी घेऊन पुढचा प्रवास केला.

पुढे माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती त्यासाठी अमरावती गाठावी लागली. इथेच मी शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण गांधर्व महाविद्यालयात घेतले. इथे पंडीत भय्यासाहेब देशपांडे ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढचं गाण्याचे शिक्षण अकोल्याला पंडीत एकनाथबुवा कुलकर्णी ह्यांच्याकडे घेतले.

शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण अमरावतीत झाले. माझे एक हितचिंतक आणि माझ्या गाण्याचे चाहते श्री. किशोरदादा मोरे ह्यांनी माझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि मला अकोल्याला बोलावले.त्यांच्याकडे राहूनच मग मी माझे महाविद्यालयीन आणि सांगितिक शिक्षण पुरे केले.

सुरेश भट ह्यांची तुमची पहिली भेट कधी झाली?
सुरुवातीला मी सर्व पद्धतीची गाणी गायचो. त्यात शास्त्रीय,नाट्यगीत,ठुमरी,दादरा वगैरे सर्व प्रकार गायचो. तसंच उर्दू गजलाही गायचो. माझे मित्र आणि आजूबाजूचे वातावरणच असे होते की मी नववी-दहावी पर्यंत उर्दू लिहा-वाचायला शिकलो. पण एक प्रसंग असा घडला की त्यामुळे मी मराठी गजलकडे वळलो. ती गोष्ट सांगतो.अमरावतीला राजकमल चौकात सुरेश भट असे सायकल रिक्षात बसलेले असत. आजुबाजुला असंख्य रसिक त्यांचे गजल-गायन ऐकायला जमलेले असत. त्यात माझ्यासारखे विद्यार्थी,रिक्षावाले,टांगेवाले,डॉक्टर,वकील असे सर्व थरातील लोक असायचे. भटसाहेब आपल्या खड्या आवाजात गजला पेश करायचे. त्यातली एक गजल मला अजूनही आठवतेय.... तीच गजल मी माझ्या पहिल्या कार्यक्रमात पहिल्यांदा पेश केली.
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही.

भटसाहेबांची आणि तुमची प्रत्यक्ष मुलाखत कधी झाली ते आठवतंय का?

अमरावतीला मी त्यांना भेटायचो पण खरी भेट माझी अकोल्याला किशोरदादांकडे झाली.ते किशोरदांचे मित्रच होते. भटसाहेब आले की किशोरदा मला बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे, सुरेश आलाय(ते त्यांना एकेरी संबोधत) त्याला काहीतरी गाऊन दाखव. मग मीही म्हणून दाखवायचो तेव्हा भटसाहेब मला म्हणायचे...आवाज चांगला आहे बरं का तुझा. मेहनत कर,रियाज कर,गजलचा अर्थ,मर्म समजावून घे.
गजल कशी गायची ते गप्पा गप्पांमधून समजावून सांगत.

गजल गायकी कशी असावी?...बद्दल बोलताना भीमराव म्हणाले...
त्याकाळी मी पाकिस्तान रेडिओ ऐकायचो. त्यात एकदा मेहदी हसन ह्यांनी गायलेली एक गजल ऐकली आणि गजल गायन कसे असावे ह्याचा मला साक्षात्कार झाला.गजल लेखन हे जसे इतर गीतप्रकारांहून वेगळे असते तसेच गजल पेश करण्याची पद्धतही वेगळी असायला हवी आणि ती कशी हे मला मेहदी साहेबांच्या गजल गायनावरून समजले.
ती गजल अशी होती...

देख तो दिल के जहॉंसे उठता है
ये धुवॉंऽऽऽ कहॉंसे उठता है

तो ’धुवॉ’...धुर असा नजरेसमोर दिसला. अशा तर्‍हेने गजल कशी गायची ह्याचा साक्षात्कार झाला.
दोन ओळींचा शेर म्हणजे पूर्ण कविता असते असे भट साहेब म्हणत. म्हणजे त्या दोन ओळीत आशयाचा सागर असतो...गागरमे सागर. मग हा सागर बाहेर कसा आणायचा? ते मला ती गजल ऐकली आणि कळले.


सलग दीड तास ही मुलाखत सुरु होती. इथे फक्त ह्या मुलाखतीचा हा एक नमुना पेश केलाय.संपूर्ण मुलाखत लेखाच्या स्वरूपात सादर करणे फारच किचकट काम आहे. त्यातून अधून मधून भीमरावांनी पेश केलेली गान प्रात्यक्षिके ही निव्वळ ऐकण्या/पाहण्याची बाब आहे. म्हणून दृक्‌श्राव्य स्वरूपातली संपूर्ण मुलाखत ऐकायची/पाहायची असेल तर ती खालील दुव्यावर दहा भागात पाहता येईल. रसिकांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा ही विनंती.




ह्या मुलाखतीचे चित्रीकरण खुद्द विवेक काजरेकरांनी केलंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: