माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१२ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या! ७

आम्हाला शारीरिक शिक्षणाला आधीपासून एक देशपांडे नावाचे सर होते.त्यांच्या चेहर्‍यावर कधीही पाहिले तरी स्थितप्रज्ञाचे भाव असत.क्वचितच कधी तरी हसत.पण शिस्तीला अतिशय कडक होते.शाशि च्या तासाला मुलांना मैदानात कवायतीसाठी ८-१० रांगात उभे करून मग ते मोठ्या आवाजात आज्ञा देत असत.एडी मिलाव(हा उच्चार समजायला आणि त्यातल्या ’एडी’चा अर्थ समजायला आम्हाला त्याआधी बराच मार खावा लागला होता) आणि कदम-खोल! ह्या आज्ञा देताना त्यांचे बारीक लक्ष असे. एखादाही विद्यार्थी थोडासा ढिला दिसला रे दिसला की ते पटकन रांगेत घुसत आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या पोटरीवर एक सणसणीत फटका मारत. त्या फटक्याचा आवाज सर्व मैदानभर गाजे. पुन्हा, काहीच झाले नाही असा चेहरा करून ते पुढच्या कारवाईला सुरुवात करत. कवायतीचे हात आणि पायांचे प्रकार करताना ते शिटीचा वापर करत. त्या शिटीच्या तालावर कदम-ताल करताना खूप मजा येत असे. सगळे व्यवस्थित जमल्यास एखादी पुसटशी स्मितरेषा त्यांच्या चेहर्‍यावर उमटत असे.

सांघिक कवायतीच्या(मास ड्रिल)वेळी ढोल,ड्रम,झांजा,बिगुल,बासरी असा मोठा जामानिमा असे. ही वाद्ये वाजायला लागली की अंगात एक प्रकारचा जोष येत असे.त्या वेळी सरांचे हातवारेही प्रेक्षणीय असत.हा प्रकार जसा मुलांना आवडे तसा सरांचाही तो खास आवडीचा प्रकार होता.दर शुक्रवारी ह्यासाठी एक तासिका राखून ठेवलेली असे. मुले-मुली मैदानावर येताना कोण रांग मोडतंय ह्याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. खरे तर एकदा त्यांचा मार खाल्ल्यावर कुणाची काय बिशाद होती दुसर्‍यांदा तीच चूक करण्याची. तरीदेखील एखादा गाफील प्राणी त्यांच्या तावडीत सापडत असे.मग त्याला फटके तर पडतच वर मैदानात सगळ्यांसमोर(विशेष करून मुलींसमोर म्हणजे मानहानीच मानली जायची)उठाबशा काढण्याची शिक्षा भोगावी लागे.

पावसाळ्यात मैदान ओले असले की मग शाशिचा तास होत नसे.मग त्यावेळी वर्गातल्या वर्गातच काही बैठे खेळ खेळायला मिळत.कधी कधी त्या तासाला देशपांडे सरच आमच्या वर्गात येत.आले की ते खुर्चीवर बसत नसत. टेबलावरच बसत.कधी दोन पाय खाली सोडून तर कधी एक पाय दुसर्‍या पायावर ठेवून(साईबाबासन)बसत.आमच्या वर्गातल्या हुशार मुलांना ते कोडी घालायला प्रवृत्त करत. मग कधी विनायक,मोहिनीसारखे हुशार लोक आम्हाला कोडी घालत आणि आम्ही त्याची काही विक्षिप्त उत्तरे दिली की(कैक वेळा आम्ही मुद्दाम तसे करायचो) सगळ्यांबरोबर सरही हसत. त्यांचे ते हास्य खूपच केविलवाणे वाटे.हसण्याची सवय नसल्यावर हसावे लागल्यास हे असेच होते असे माझे तेव्हापासूनचे निरीक्षण आहे.(मी किती हुशार ना!!!!)

मग सर एक कोडे घालत. हे त्यांचे खास ठरलेले कोडे होते.कितीतरी वेळा त्यांनी ते घातले असेल.पण मुलेही अशी व्रात्य होती की मुद्दाम चुकीची उत्तरे देत. ’सर हासतात’ हे बघण्यातच मुलांना आनंद मिळत असे. कारण एरवी हा प्राणी अतिशय कडक आणि गंभीर असायचा. तर आता सरांचे ते सुप्रसिद्ध कोडे. हे त्यांनीच बनवलेले होते. कसे ते पाहा.

एक होता चौपाई.....(ह्यातला ’च’ हा चहातल्या च सारखा उच्चारायचा)
त्यावर बस(श)ला दुपाई...(सर 'स' चा उच्चार नेहमी 'श' असा करत.)
मासा(शा) दिस(श)ला
चटकन गिळून टाकला......(ह्यातला च देखिल चहातला बरंका)

तर ह्याचे साधे उत्तर होते ’म्हशीच्या पाठीवर बसलेला बगळा’! पण आम्ही मुद्दाम कावळा,चिमणी,पोपट,मैना,गरूड,घार ,कुत्रा, मांजर,घोडा,गाढव असे काहीही उत्तर देत असू आणि ह्या प्रत्येक उत्तराबरोबर सर गालातल्या गालात हसत. ते हसणे बघायला आम्हाला आवडायचे आणि ह्या चावटपणात सगळेजण समजून उमजून भाग घ्यायचे. मग कुणालाच उत्तर येत नाही असे समजून सर स्वत:च त्याचे उत्तर देत.ते उत्तर देण्याचीही त्यांची खास पद्धत होती.

आमचा वर्ग तळमजल्यावर होता. वर्गासमोरच छोटे मैदान(मैदान कसले अंगणच ते)आणि पुढे शाळेचे प्रवेशद्वार होते.प्रवेशद्वारातून आत शिरण्यासाठी जो रस्ता होता त्याच्या दुसर्‍या अंगाला एक लांबलचक मैदान होते.ह्या मैदानात एक सदैव भरलेली विहीर होती आणि ह्या विहिरीभोवतीचा थोडासा भाग सोडला तर बाकी सगळी दलदल माजलेली असे.पावसाळ्यात तिथे पाणी साठे आणि मग तिथे ढोपरभर गवत उगवे. अशा त्या दलदलीत काही म्हशी(खर्‍या म्हशी बरंका! वर्गातल्या नव्हे!)डुंबत असत.मनसोक्त डुंबायला पाणी होतेच आणि खायला गवतही होतेच. त्या पाण्यात मासेही असायचे आणि ते खायला बगळेही हजर असत. मग म्हशीच्या पाठीवर बसलेला(सहलीला निघालेला) बगळा(ह्यावरून पक्षांनाही कधी कधी उडण्याचा कंटाळा येतो.... इथे हे पुलंचे वाक्य आठवते) हे दृश्य तर रोजचेच होते. ह्या सर्व निरीक्षणातून सरांनी ते कोडे रचले होते आणि मग त्याचे उत्तर म्हणून आम्हाला तिथे घेऊन जात आणि ते प्रात्यक्षिक दाखवत. ते दाखवताना त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळीच खुशी जाणवायची.
मैदानावर कवायतीच्या वेळी करडी शिस्त पाळणारे ते हेच का? असा प्रश्न मला राहून राहून पडत असे.

पुढे हेच मैदान त्याच्या मूळ मालकाकडून शाळेला नाममात्र मोबदल्यात मिळाले आणि मग ती विहीर बुजवून आणि योग्य अशी मातीची भर घालून ते मैदान आमच्यासाठी खेळण्यालायक बनवण्यात आले.

क्रमश:

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

shaley jeevanatlya athavanincha lekhakokha chhan jamlay! mala hi pun:pratyayacha anand miLtoy:-)