माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ११ ’बायमावशी!’१

आमच्या लहानपणी चाळीय(चाळपासून चाळीय) अथवा वाडीय(वाडीपासून वाडीय) वातावरण होते. अशा ह्या वातावरणात एखादे तरी सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असते. कुणी तरी काका, मामा, मावशी, आत्याबाई, आजी-आजोबा असे लोक प्रत्येक चाळीत नक्कीच सापडतील, नव्हे तशी व्यक्तिमत्त्व सापडायची. आमच्या वाडीत असेच एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते, ते 'बायमावशी ' ह्या नावाने ओळखले जाई. लहानथोर सगळेच त्यांना बायमावशी म्हणायचे. खरे तर त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या, पण माझ्या सारख्या लहान मुला-मुलींपासून ते अगदी काठी टेकत चालणारे आजी आजोबा देखिल त्यांना बायमावशी असेच म्हणत! आहे ना गंमत!

आमच्या वाडीच्या अगदी मध्यभागी एक गोलाकार चाळ होती. त्यातल्या एका बिर्‍हाडात बायमावशी आणि त्यांचे यजमान राहायचे. ह्या बायमावशींच्या यजमानांना सर्व वाडकर लोक काका म्हणत. आता ते ओघानेच आले म्हणा. बायको मावशी म्हणून नवरा काका. पण इथे अजून एक गंमत आहे. आम्ही लहान मुलं ह्या काकांचा उल्लेख आपापसात करताना अथवा त्यांच्याविषयी काही बोलायचे असेल तर 'बायमावशींचे काका ' असा करत असू. :-) असो.

बायमावशी-काका ह्या जोडप्याला मूल नव्हते त्यामुळे त्यांचे घर हे आम्हा समस्त वाडीतल्या मुलांसाठी हक्काचे विश्रांतिस्थान झालेले असायचे. काका नोकरीनिमित्त पहाटे पाचला घरातून जे बाहेर पडत ते संध्याकाळी सात-साडेसातला परतत. ह्या मधल्या काळात बायमावशींच्या घरावर जवळपास सर्व वाडीतल्या लहान मुलांचा आणि त्यांच्या आयांचा कब्जा असायचा. दोन खोल्यांच्या त्यांच्या घराची रचना अशी होती की त्यातून जवळपास सगळी वाडी दिसत असे. त्यांच्या घराचे दार आणि स्वयंपाक घराची खिडकी उत्तरेला होती. तिथून आमचे मोठे अंगण, आमची चाळ(ज्यात मी राहायचो) आणि त्याच्या शेवटाला संडास होते ते दिसायचे , तर एक मोठी खिडकी पूर्वेला होती जिच्यातून इतर घरं, मालकांची,बाग, बंगला आणि वाडीचे प्रवेशद्वार दिसत असे. म्हणजे वाडीतली एकूण एक हालचाल त्यांच्या त्या घरातून दिसत असे. अंगण, त्यात खेळणारी मुले, वाळत घातलेले कपडे, धान्य, पापड आणि वाडीतून आत-बाहेर करणारी माणसे, झाडं,पशू-पक्षी वगैरे सगळे हे असे एका नजरेत दिसत असे. त्यामुळे बायमावशींकडे सगळ्या वाडीची खबर असायची.

बायमावशी बोलायला,वागायला मिठ्ठास होत्या. तशा त्या मूळच्या गोव्याच्या. त्यामुळे बोलण्यात एक प्रकारचा हेऽऽल आणि गोडवा असायचा.
नवर्‍याला काहीही सांगायचे झाले की म्हणायच्या, "ऐकलाऽऽऽत!"
इतके म्हटले की पुरे असायचे. कारण काका तसे त्यांना घाबरून असत. काका बायमावशींसमोर कधीच बोलत नसत. त्या म्हणतील ती पूर्व असायची. त्यामुळे त्यांनी नुसते, "ऐकलाऽऽऽत" म्हटले की काका धडपडत त्यांच्याजवळ जाऊन अगदी आज्ञाधारक मुलासारखे उभे राहायचे. काका फारसे कधी बोलत नसत. क्वचित प्रसंगी बोलले तर लक्षात येत असे तो त्यांचा अतिशय धीरगंभीर आणि घुमणारा खर्जातला आवाज! बायमावशी घरात नसल्या तर (बाजारहाट वगैरे साठी बाहेर जात) ते आम्हा मुलांशी बोलण्याची आणि त्यातल्याच एखाद्याची थट्टा करण्याची संधी साधत असत. पण क्वचितच बोलण्याचा प्रसंग येत असल्यामुळे ते बोलताना खूप अडखळत असत. मग त्यांनी आमची थट्टा करण्याऐवजी आम्हीच त्यांच्या त्या अडखळत बोलण्याला हसत असू.
तसे काका हट्टी होते. त्यांना सिगारेट प्यायची सवय होती पण तीही त्यांना बायमावशींच्या समोर ओढण्याची हिंमत नसायची. मग त्या घरात नाही असे पाहून ते मला हळूच शुक-शुक करून बोलवायचे आणि सिगारेट आणायला पाठवायचे. येताना त्यातल्याच उरलेल्या पैशाच्या गोळ्या आणायची मला सूट असायची. खरे तर त्यांचे काम करावे म्हणून ही लालूच असायची, म्हणून आम्ही मुलेही बायमावशींची, घरातून बाहेर जाण्याची वाट पाहत असायचो.
बायमावशींच्या समोर दबकून वागण्याच्या ह्या काकांच्या स्वभावामुळे त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. काकांनी कमावून आणायचे आणि बायमावशींनी त्यात अगदी व्यवस्थित भागवायचे असा जणू अलिखित करारच त्या दोघांच्यात असावा. तशी काकांची नोकरी खास नव्हती आणि त्यांना पगारही जेमतेमच होता. पण बायमावशींच्या कुशल व्यवस्थापनामुळे त्यातही त्यांचे भागत असे. कधी कुणाकडे त्यांनी हात पसरलेले मी तरी पाहिले नाही.

बायमावशींच्या बोलण्यातले खास शब्द सांगायचे तर, " गो बाय माऽऽझे!, अग्गोऽऽ बाऽऽऽई, मेल्यांऽऽऽनो, सांगता काऽऽऽऽयऽऽ, अंऽऽशेऽऽ!" वगैरे वगैरे. हे शब्द प्रत्येक संभाषणात येणारच. ह्या शब्दांबरोबरच चेहर्‍यावरचे भावही अगदी पाहण्यासारखे असत. तशा त्या काही खास सुंदर म्हणाव्या अशा नव्हत्या पण कुरुपही नव्हत्या. पण चेहरा विलक्षण बोलका होता. जेमतेम पाच फुटापर्यंतची उंची, काळा-सावळा वर्ण, नाकी-डोळी नीटस, थोडेसे कुरळे केस, केसांचा छोटासा अंबाडा आणि त्यात कधी अबोली किंवा मोगर्‍याची वेणी तर कधी गुलाबाचे फूल तर कधी घसघशीत गजरा असा साधारण त्यांचा रुबाब असायचा.

दिवसभर आम्ही लहान मुलं त्यांच्या घरात आत-बाहेर करत असायचो. त्या मोकळ्या असायच्या तेव्हा मग आमच्याशी त्यांचा संवाद चालायचा. त्यात, आज घरी जेवायला काय होते पासून ते आज शाळेत काय शिकवले, झालंच तर, एकमेकांच्या चहाड्या सांगणे, अशा नानाविध गोष्टी आम्ही त्यांना सांगायचो आणि त्याही तितक्याच औत्सुक्याने त्या ऐकून आम्हाला प्रतिसाद देत. मग त्यांना आपली गोष्ट सांगण्यात आमच्यात अहमहमिका लागायची. पण त्याही, एकावेळी सगळ्यांचे ऐकून घेताना कधी रागावल्याचे, चिडल्याचे आम्हाला दिसले नाही. फारच कालवा झाला तर त्या सगळ्यांना शांत करत, हातावर काही तरी खाऊ देत आणि मग एकेकाला त्याची गोष्ट सांगायला सांगत. इथे आमची तोंडे खाण्यात गुंतलेली असल्यामुळे ज्याला विचारलेय तोच बोलायचा आणि त्यामुळे प्रत्येकाला बोलायची संधी मिळायची.

दुपारची जेवणं-खाणं आटोपली की मग त्यांच्या घरात बायकांचा दरबार भरायचा. आम्हा मुलांच्या आया ताटात तांदूळ,गहू किंवा जे काही निवडायचे असेल ते घेऊन तिथे हजर व्हायच्या आणि मग त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. कुणी भरतकाम, विणकाम किंवा काही शिवणकाम घेऊन येऊन बसायच्या. आता बायकांच्या गप्पांचे विषय काय हे सांगायची जरूर आहे काय? एकातून एक असे विषय बदलत चहाच्या वेळेपर्यंत ह्या गप्पा चालत. ह्या गप्पांव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम इथे अधून मधून चालायचा तो म्हणजे आपण पाहिलेल्या, नवीन चित्रपटाची कहाणी सांगणे. एकीने सांगायचे आणि इतरांनी त्यावर भाष्य करत करत ऐकायचे असा सगळा मामला असायचा. पण ह्या चित्रपट कहाणी कथनामध्ये बायमावशींचा कुणीच हात धरू शकत नसे. त्यांचे त्यावेळचे हावभाव,शब्दोच्चार आणि कहाणी सांगण्याची धाटणी ही एखाद्या तरबेज कीर्तनकाराइतकी आकर्षक होती.

बायमावशी कथा सांगायच्या त्याची ही एक छोटीशी झलक पाहा..... उदाहरण म्हणून आपण मोलकरीण चित्रपटाची कथा घेऊ या.

"हां! तर काय माहीतेय काऽऽय? ती आपली... कोण ती हो? हां! आठवलं बघा! सुलोचना! काय वो ती दिसते? खरंच! अगदी सोज्वळ बाई बघा! आणि तिचा तो नवरा! काऽऽऽय बरंऽऽऽऽ त्याचं नाऽऽऽऽऽव? जाऊ द्या. आता आठवत नाय! मग आठवलं की सांगते हां.
हां, तर, तो नवरा देवळातला भटजी असतो. कीर्तन तर इतके मस्त करतोऽऽऽऽ की काय सांगू? बाय माऽऽऽऽझे! अवो लोकं नुसती डोलतात त्याच्या कीर्तनात. तर पैला शीन देवळाचा हाय(बायमावशींची भाषा म्हणजे अर्धी कोकणी अर्धी मराठी. त्यामुळे हाय,नाय सारखे उच्चार भरपूर). तर ते भटजी रामायणातली कथा सांगताहेत हां. राम वनवासाला गेलाय आणि इथे दशरथ त्याची आठवण काढून काढून रडतोय. इथे बघा एक गाणं हाये... (बायमावशी गुणगुणून दाखवतात). हे श्रीरामा,हे श्रीरामा, एक आऽऽस मज एक विसाऽऽवा, एक वाऽऽर तरी राऽऽम दिसाऽऽऽवा... तुम्हाला सांगते विद्याचे आई(माझ्या आईला उद्देशून), अवो तो भटजीचा लहान मुल्गा, ढुंगणाला लंगोटी लावलेला(मोठा झाल्यावर हाच रमेश देव होतो हां ), हे गाणं म्हणत म्हणत येतो.
ओ विद्याचे आई! तुमच्या पम्याला(म्हणजे मला) बोलवा की. त्याला येते हे गाणे. त्या पोरासारखेच रंगून म्हणतो. ते गाणं किती हो करुण आहे नाही? किती आर्ततेने गायलंय त्या पोराने. तुम्हाला सांगते.... मी तर नुस्ती पदराने डोळे पुसत होते,नाकाने नुस्ते.. सूं सूं चालले होते."
इथे सगळ्या बायकां आपापले डोळे पदराला पुसत असतात. थोडा वेळ सूं सूं आणि नाकं शिंकरण्याचे आवाज येत असतात.
माझी आई उठून बाहेर येते आणि मला बोलावते. मी आपला खेळ सोडून नाईलाजाने तिथे जातो. मग बायमावशी आपली फर्माइश करतात.
"अरे पम्या ! (मला पम्या म्हणणार्‍या तीनच व्यक्ती... एक माझी आई,दुसरी माझी मोठी बहीण आणि तिसर्‍या ह्या बायमावशी..... बाकी माझी नावे अनंत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधी तरी) म्हण की ते रामाचे गाणे. "
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मग आई मला आठवण करून द्यायची आणि मग मी ते गाणे अगदी आरंभ संगीतापासून शेवटपर्यंत गात असे. मला स्वत:लाही हे गाणे खूप आवडायचे, त्यातली आर्तता हृदयात कालवाकालव करायची, त्यामुळेच कदाचित मी ते गाणे खूपच प्रभावीपणे गायचो. गाणे ऐकताना इथे सगळ्या बायकांचे पदर पुन्हा डोळ्याला लागलेले असायचे. माझ्या बरोबर खेळणारी मुलेही ओट्यावर येऊन माझं गाणं संपण्याची वाट पाहत थांबलेली असायची. गाणं संपताच मी पुन्हा खेळायला जायचो.

1 टिप्पणी:

vivek म्हणाले...

मालक,

लेख छान उतरलाय. विशेषत: मावशींच्या घराचं वर्णन अगदी चित्रमय झालंय. सर्व वाचकांना हात धरुन वाडीतून फिरवताय असं वाटलं. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. आता मुंबईला येईन तेंव्हा तुमच्या या व यापूर्वीच्या सर्व लेखांत तुम्ही लिहिलेले तुमच्या "गाण्याचे" अनुभव मी स्वत: घेणार आहे. (म्हणजे तुम्ही गाणार आणि मी ऎकणार) मग नाही म्हणू नका. :-)हां, आधीच सांगून ठेवतोय