माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

५ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १०

इमारतीचे काम जोरात सुरू झाले. कामगारांचा राबता वाढला. तसे आमचे तिथले खेळणे कमी होऊ लागले. बघता बघता इमारतीचा पाया तयार झाला आणि काही कारणाने पुढचे काम थांबले. थांबले कसले ठप्पच झाले. तसाही पावसाळा तोंडावर आलेला होताच. त्यामुळे काम थंडावणार होतेच; पण ते अजिबात बंदच पडले ते का हे काही कळले नाही.आम्हा मुलांना ह्या गोष्टीचा खरे तर फायदाच झाला. त्या तयार कोब्यावर(पाया) आमचे पकडापकडीचे खेळ रंगू लागले. ह्या ठिकाणी खेळताना एका गोष्टीची मात्र आम्हाला काळजी घ्यावी लागत होती, ती म्हणजे तिथे असलेली उघडी विहीर.सिंध्याने ही जाणीवपूर्वक बुजवलेली नव्हती. कारण त्या विहिरीचे पाणी त्याला बांधकामासाठी हवे तसे वापरता येत होते आणि इमारतीच्या बांधकामातच ती सामावली गेलेली होती. तिच्या वरूनच इमारतीचा जिना वर चढणार होता. तेव्हा इमारत पूर्ण झाल्यावर त्यावर तो झाकण बसवणार होता. तशी ती विहीर फार मोठी नव्हती पण सदोदित भरलेली मात्र असायची. वाडीतली धीट मुले त्यात पोहत देखिल. अर्थात त्यात मी नव्हतोच. मला पहिल्यापासूनच पाण्याची भिती वाटायची आणि मी त्यापासून नेहमीच चार हात दूर असायचो. आमच्या घरात नळ येण्याआधी मात्र आम्ही ह्याच विहिरीचे पाणी वापरत असू. तेव्हा विहिरीतून पाणी उपसणे,बादल्या भरून आणून घरातले पाण्याचे पिंप भरणे ही कामे आम्ही तिघेही भाऊ नित्यनेमाने करत असू. पण पोहण्या वगैरेचे मात्र कधी नाव नाही काढले.

तसे आम्ही जवळपास दिवसाचा बहुतेक वेळ (शाळा,अभ्यास,जेवणा-खाण्याचा वगळून) खेळण्यातच घालवत असू. दिवसभर खेळून झाले की मग जेवण होण्याआधी रात्री चांदण्यात त्या कोब्यावर बसून आमच्यात शिळोप्याच्या गप्पा सुरू होत. त्यातले विषय मात्र सतत बदलत असत. कधी सिनेमा तर कधी नवीन आलेली गाणी. कधी मारामार्‍यांविषयी तर कधी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या.कधी कुणी गोष्ट सांगे तर कधी कुणाला आलेला एखादा भन्नाट अनुभव. असे अनेक विषय चघळता चघळता गाडी एका विषयावर हटकून येत असे आणि तो विषय म्हणजे भूत आणि भुतांविषयीचे अनुभव.अगदी खरं सांगायचे तर आमच्यापैकी कुणीही भूत पाहिलेले नव्हते किंवा कुणाला तसला काही अनुभवही नव्हता. पण एकाने काही सांगितले की आपणही काही कमी नाही हे दाखवण्यासाठी दुसरा अहम-अहमिकेने काही तरी रचून सांगायचा आणि मग ह्या अशाच गजाली रंगत जायच्या. काही मोठी मुले (दादा आणि त्याच्यासारखी काही)सोडली तर आम्ही चिल्लर-पिल्लर अत्यंत घाबरटच होतो. मी तर अंधारालाही घाबरायचो. आमच्या चाळीसमोरच तर ही इमारत तयार होत होती. ह्या दोन्हीत जेमतेम तीस-एक फुटाचेच अंतर होते. कोब्यावर बसल्यावर समोर आमच्या चाळीतील सगळ्या खोल्या , त्यातली माणसे दिसत असत. त्या खोल्यांमधल्या प्रकाशाची तिरीपही आम्ही जिथे बसायचो तिथपर्यंत आलेली असायची. पण अशा भुताच्या गोष्टी सुरू झाल्यावर त्या ऐकताना कितीही भिती वाटली आणि तिथून निघून जावेसे वाटले तरी माझी एकट्याने घरी जाण्याची हिंमत होत नसे. कारण? आमच्या चाळीच्या आणि ह्या होणार्‍या नव्या इमारतीच्या वाटेत(म्हणजे आमच्याच अंगणात) दोन मोठी झाडे होती. त्यातले एक झाड होते बकुळीचे आणि दुसरे चिंचेचे.चिंचेच्या झाडावर भुते असतात असे कुणी तरी केव्हा तरी बोललेले ऐकले होते आणि तेव्हापासून अंधार झाल्यावर एकट्याने त्या झाडाजवळ जायची माझी कधीच हिंमत व्हायची नाही. खरे सांगायचे तर हे चिंचेचे झाड आमच्याच 'नत्र आणि युरिया'वर पोसलेले होते. रोज रात्री झोपायच्या आधी आम्ही आमचा जलभार ह्याच्याच मुळाशी हलका करायचो तरीही त्या झाडाची मनातली भिती मात्र कधी कमी नाही झाली. रात्री चंद्राच्या प्रकाशात त्या झाडाच्या फांद्यांच्या असंख्य हलणार्‍या सावल्या पाहिल्या की पोटात भितीने ढवळून येत असे. ह्या दोन्ही झाडांच्या सहवासातच रात्रीची शतपावली मी वडिलांच्या सह करत असे तेव्हा मात्र ही भिती जाणवत नसे. पण एकट्याने तिथे जाणे सोडाच पण अगदी घराच्या ओट्यावर बसून त्या चिंचेच्या झाडाकडे पाहणेही मला भितीदायक वाटायचे.

शतपावली करताना वडील आमच्याकडून पाढे म्हणवून घेत. मग स्तोत्रांची उजळणी होई. हे सगळे झाल्यावर मग आम्ही भाऊंना(माझे वडील) त्यांच्या लष्करी जीवनातल्या अनुभवांबद्दल(माझे वडील दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात होते आणि त्यांना ब्रह्मदेशात पाठवलेले होते)विचारायचो. त्यांचे ते अनुभव ऐकतांना माझ्यात अगदी वीरश्री संचारायची.सैनिकांची कवायत घेताना कशा आज्ञा देतात त्या वडील अगदी साभिनय दाखवायचे आणि आमच्याकडून त्याप्रमाणे करून घ्यायचे.
त्यांचा आवाज इतका दणदणीत होता की तेव्हा आजूबाजूचे लोकही(अगदी सुरुवातीला)आपापल्या घरातही दचकत असत. घरातून बाहेर येत... काय झालं म्हणून बघायला. पण मग नंतर त्यांनाही त्याची सवय झाली. त्यांच्या आवाजात त्या सगळ्या आज्ञा ऐकताना खूप मजा यायची आणि हे सगळे पाहायला आणि अनुभवायला आमच्या वाडीतील यच्चयावत वानरसेना हजर असायची. अशा वेळी माझी टीचभर छातीही गर्वाने फुगलेली असायची. हा सगळा कार्यक्रम आटोपून झोपायला जाण्याची वेळ झाली की मग आमचे 'नित्यकर्म' उरकायला एकट्याने त्या चिंचेच्या झाडाखाली जाताना माझा आधीचा आवेश पार गळपटलेला असायचा.मी आपला सगळा धीर एकवटून कसाबसा तिथे जाऊन ते उरकून तसाच सुसाट घरी येत असे. घरात शिरल्यावर मात्र पुन्हा जीवात जीव यायचा.

त्या दिवशी दुपारचे जेवण आटोपून मी बाहेर ओट्यावर येऊन पुस्तक वाचत बसलो होतो. अंगणात काही जण खेळत होते. एव्हढ्यात हसल्याच्या आईचा आवाज आला. ती हसल्याला शोधत होती. खेळणार्‍या त्या मुलांना विचारत होती की त्यांच्यापैकी कुणी हसल्याला पाहिलेय काय. बहुतेकांनी नाही असेच उत्तर दिले. मग ती आपली वाडीभर शोधत फिरली पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. आमच्या वाडीत शिरण्याचे दोन मार्ग होते. एक मालकांच्या घरासमोरून येणारा(हमरस्ता) आणि एक आमच्या चाळीच्या संडासाजवळून दुसर्‍या वाडीत जाणारा रस्ता... तोही पुढे फिरून हमरस्त्याकडेच येत असे. त्यामुळे आम्ही मुले पकडापकडी खेळताना ह्या दोन्ही रस्त्यांचा वापर करत असू. हे सगळे माहीत असल्यामुळे त्याच्या आईने आजूबाजूलाही शोध घेतला पण हसल्याचा कुठेच पत्ता नव्हता.

मग तिने चिमण्याला पाठवले त्याला शोधायला. तोही शोधून दमला. हा हा म्हणता ही बातमी वाडीभर पसरली. मग सगळेच जण त्याला शोधायला लागले. शोधता शोधता असे लक्षात आले की त्याचे कपडे आणि विहिरीतून पाणी काढायचा दोरी बांधलेला डबा विहिरीपाशी आहे. मग काय विचारता? एकाहून एक शंका-कुशंका डोक्यात यायला लागल्या. त्याची आई रडायला लागली. आपला मुलगा विहिरीत पडला असावा अशी तिला दाट शंका येत होती. वस्तुनिष्ठ पुरावा पाहिल्यानंतर बर्‍याच जणांचे तसेच मत बनले. जसजसा वेळ जायला लागला तसतसे वातावरण गंभीर व्हायला लागले. वाडीतली वडीलधारी पुरुष माणसे कामानिमित्त बाहेर गेलेली होती. अशा अवस्थेत काय करायचे ? कुणालाच काही कळेना. मग मालकांच्या गड्याला, श्वना ला (ह्याचे खरे नाव यशवंत होतेपण आम्ही मुले त्याचा श्वनाच म्हणत असू.) बोलावले. तो आला. त्याच्या बरोबर अजून काही वाडीतली गडी मंडळी आली. त्यांनी सगळ्यांनी धडाधड विहिरीत उड्या मारल्या. अगदी तळापर्यंत शोध घेतला पण काहीच सुगावा लागेना. सगळी मंडळी हताश झाली. एव्हाना संध्याकाळचे चार वाजायला आले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून श्वनाने पुन्हा एकदा पाण्यात बुडी मारली. साधारण एक मिनिटाने तो बाहेर आला आणि मग खरा उलगडा झाला.... हसला विहिरीतच पडलेला आहे आणि तो विहिरीच्या तळाला असलेल्या एका कपारीत अडकलाय!!!
आता मात्र समस्त महिला वर्गाचा आणि आम्हा चिल्ल्या-पिल्ल्यांचा संयम सुटला आणि हळूहळू स्फुंदता-स्फुंदता त्याचे मोठ्या आक्रोशात रुपांतर झाले. हसल्याच्या आईचा तर शोक पाहवेनासा झाला होता. तिला सावरायला पुढे सरसावलेल्या बायकांनाही ती आवरेनाशी झाली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून विहिरीकडे धाव घ्यायचा सतत प्रयत्न करत होती. कसे बसे तिला धरून घरी नेले. इथे मग ही बातमी सैरावैरा सगळ्या भागात पसरली. कुणीतरी पोलिसांना ती कळवली. मग त्यांनी बंब वाल्यांना कळवली आणि अर्ध्या एक तासातच बंब जोरजोरात घंटा वाजवत आमच्या वाडीत दाखल झाले. आधी त्यांनी वरूनच गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ तो प्रयत्न अपेशी ठरला. मग शेवटी त्यांच्यातलाच एक पट्टीचा पोहोणारा खाली उतरला आणि मोठ्या मेहनतीने त्याने तो गळ हसल्याच्या कपड्यात अडकवून त्याचे कलेवर विहिरीबाहेर आणण्यात यश मिळवले.

विहिरीबाहेर आणलेल्या त्याच्या त्या टम्म फुगलेल्या कलेवराकडे पाहून पुन्हा मोठा कालवा झाला. त्याच्या शरीरातले पाणी काढून टाकण्यात आले पण आता खूप उशीर झालेला होता. हसला आता कायमचाच आमच्यातून निघून गेला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो विहिरीवर अंघोळीला गेला होता आणि तेव्हाच तो बहुधा पाय घसरून पडला असावा. दुर्दैवाने कुणाच्याही वेळीच लक्षात न आल्याने तो प्राणाला मुकला होता.

भुतांच्या गोष्टी ऐकून घाबरणारा मी, मला आता नव्याने घाबरण्यासाठी कारण मिळाले. त्यानंतर कैक महिने मी त्या विहिरीच्या आसपास रात्री तर सोडाच दिवसाही कधी फिरकलो नाही.वाडीतली लोकं आणि त्यांचे ऐकून आमच्यातलीच काही मुले "हसला काल रात्री तिथे विहिरीवर बसून अंघोळ करत होता" असले काहीबाही सांगू लागली आणि हे ऐकून आपली तर बुवा टरकली. तेव्हापासून , रात्री जेवायला बोलावल्याशिवाय घरात न परतणारा मी सूर्यास्ता आधीच घरी जाऊन हातपाय धुऊन चुपचाप अभ्यास करत बसायला लागलो.

1 टिप्पणी:

संदीप चित्रे म्हणाले...

devkaka,
Very nice article .. as always enjoyed your writing :)