माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

११ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १२ बायमावशी! २

चित्रपट जरी अडीच तीन तासात संपत असला तरी बायमावशींचे हे चित्रपट आख्यान चांगले आठवडाभर चालायचं. कारण त्यात इतरही उपकथानकं यायची. जमलेल्या आया-बायांच्या प्रतिक्रिया, मध्ये कुठे गाणी आली की ती म्हणण्याचा किंवा माझ्याकडून म्हणवून घेण्याचा असे कैक अन्य पदर असत.

"तुम्हाला सांगते... अमुक तमुकचे आई!" हे असेच एक पालुपद ह्या कहाणी दरम्यान यायचे. ज्या बाईने मध्येच शंका व्यक्त केली असलीच तर किंवा काही प्रतिक्रिया दिली असली तर तिला उद्देशून हे वाक्य फेकले जाई.

मोलकरीण कथा पुढे सुरू....
"तुम्हाला सांगते विद्याचे आई, तो जो लंगोटी वाला मुलगा असतो ना तो आता मोठा होतो. कालिजात जायला लागतो. तिथे त्याचे शीमा(सीमा) बरोबर प्रेम जुळते."
"एका गाण्यात ते पोर मोठे होते? लगेच कालिजात जाऊन पिरेम बी करते?"..... ह्या एक बोलण्यात फटकळ आणि मिस्किल बाई.
"अग्गो बाई! काय सांगू आता हिला? अगो,तीन तासाचा शिनेमा, त्यात काय त्या मुलाचे अख्खे बालपण दाखवणार काय? साधा संडासला जाऊन आलाय असे दाखवायचे तर धा मिन्टे जातील फुकट. बघताय ना आपल्या इथली पोरं! कुणी सरळ आपलं टीपरं उचललं आणि गेलं संडासमध्ये असे होते काय? ते टीपरं मिरवत मिरवत जातंय काय. मध्येच टीपरं बाजूला ठेवून पोरांच्यात खेळायला लागतंय काय! वगैरे वगैरे..(तिरकसपणाने बोलण्यात बायमावशींचा कुणी हात धरू शकत नसे.)
हां! तर मी काय सांगत होते?"
कुणी तरी मग ती.. रमेश देव कालिजात.... असे सुचवते.
मग कथा पुढे सुरू होते.
इतक्यात एक बाई आठवण करून देते.... "बायमावशी अहो ते प्रेम नंतर करतात. लगेच नाही काय. आधी तो डॅन्स आहे ना कोळणीचा."
लगेच बायमावशी..." अग्गोऽऽऽ बाऽऽऽई! राहिलंऽऽऽच की! नाऽय,नाऽय,नाऽऽय! थांबा थांबा हांऽऽ.(इथे सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे)आत्ता आठवलं! ते आधी सांगितलेलं ते प्रेम आता नाही हांऽऽ. ते नंतरऽऽ. तो शीन नंतर! आधी काय आऽस्ते ना की त्यांच्या कालिजात एक नाटक आस्ते."
"अहो नाटक नाही हो गॅदरिंग असते!"... दुसरी बाई.
"ते गॅद्रिंग की फॅद्रिंग काय असेल ते! असो. पण शीमा काय मस्त दिसते हो त्या कोळणीच्या वेशात! तुम्हाला सांगते शेखरच्या आई, नुस्ते बघऽऽतच बसाऽऽऽवे आसे वाट्ते.तिचा तो अंबोडा, त्यातली ती वेऽऽणी आणि मोठ्ठं कुंऽकू. आणि नाचते म्हणजे काऽऽय हो! अऽगदी बिजलीसारखी! इथे एक गाणं हाय... कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर!
अवो नुस्ती नाचते नाऽय तर गाते पण काय सुरेऽऽख! एकदम गोऽड आवाज बघा!"
"अहो ती नाही गात! आशा भोसले गाते ते गाणे!"...तीच ती मघाची
"अग्गोऽऽऽ बाऽऽऽऽई! सांगतेऽऽऽस काऽऽय! मला मेलीला वाटले की शीमाच गाते! तरी म्हटलं नाच आणि गाणं एकदम जमते कसे हिला?"
बायमावशींचे हे 'अग्गो बाई' हे उच्चार दिवसातनं अनेक वेळा उच्चारले जात असतील. पण त्यातही वैविध्य जाणवायचे. म्हणजे त्यावेळी त्यांना एखाद्या गोष्टीचे किती प्रमाणात आश्चर्य वाटले असेल त्या प्रमाणात ते उच्चार लांबत जात.

अशीच धक्के खात खात कथा पुढे जात असे. मग रदे-शीमा चे प्रेमप्रकरण, त्यावेळचे "हसले आधी कुणी" हे गाणे, मग लग्न, भटजींचा मृत्यू वगैरे थांबे घेत घेत गाडी सुलोचना मोलकरीण बनून रदे-शीमा च्या घरी येते तिथपर्यंत आली की मग शीमाचे बाळंतपण वगैरे कथानक उलगडता उलगडता एका गाण्यावर येऊन थडकत असे.
"तुम्हाला सांगते.... इथे ना एक शीन हाय. त्या शीमाच्या बाळाला झोपवायला सुलोचना एक गाणं गाते..
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला
काऽय सांगू? इतक्या गोड आवाजात गाते ना सुलोचना..."
"अहो,सुलोचना नाही ती. आशा भोसलेच गाते हे पण गाणे!"
"अंशे! हे पण गाणे तीच बया गाते? मग दिसली कशी नाय ती शीनमध्ये?"
"अहो ती पडद्याच्या मागून गाते आणि सुलोचना नुसते तोंड हालवते."
"काऽऽऽय तरीच सांगू नकोस! तू काऽऽऽय बघायला गेली होतीसऽऽऽऽ तिला पडद्याच्या मागे? आणि मलाऽऽ सांग... ती, कोण ती, तुझी आशा की बिशा?(इथे बायमावशींचे उपरोधिक बोलणे आणि त्यातला कोकणी खवचटपणा अगदी पराकोटीचा असायचा)एका वेळी किती टाकीजात जाऊन गाणार हाय?" प्रश्न तसा बिनतोड होता.
बाय मावशींचा गैरसमज झाला होता की आशा भोसले प्रत्यक्षपणे पडद्याच्या मागे बसून गाते त्यामुळे त्यांचे हे बोलणे ऐकून काही बायका तोंडावर पदर घेऊन फिदी फिदी हसायला लागल्या. मग माझ्या आईने त्यांना त्यातली गोम समजवून सांगितली आणि ती त्यांना पटली असे दिसले तरी त्या बाईवरचा राग काही केल्या शांत होईना.
"मला शिकवतेय! आगं, मी काय आजच शिनेमा बगतेय काय?"
थोडा वेळ असाच शांततेत जातो आणि मग हळूच कुणी तरी म्हणतं.. "ओ बायमावशी! रागावू नका हो. सांगा ना पुढची गोष्ट. आणि ते गाणं पण म्हणा ना."
इथे बायमावशीही जरा सावरलेल्या असतात. मग लगेच, " नाही बाई. मला नाही जमणार ते गाणं. त्यापेक्षा पम्यालाच बोलवा. तो चांगलं म्हणतो."
झालं. पुन्हा मला फर्मान सुटतं आणि मी खेळ अर्धाच टाकून येतो. काय करणार? आईची आज्ञा शिरसावंद्य होतीच पण गाणं म्हणायचा मला कधीच कंटाळा नसायचा. मग मी सुरू केले "देव जरी मज कधी भेटला...."
"कोण देव? रमेश देव? तू ही देवच की!" तेवढ्यात बायमावशींना विनोद सुचला आणि माझ्या सकट सगळेच हसत सुटलो.
हास्याचा भर ओसरल्यावर पुन्हा गाण्याची फर्माइश झाली आणि मी ते गाणं म्हणू लागलो.
ह्या गाण्यातल्या एकेक शब्दात इतका अर्थ भरलाय आणि ते आशाताईंनी इतके सुंदर गायलेय की काही विचारू नका.मी गाणं शिकलेलो नव्हतो तरी ऐकून ऐकून हुबेहूब गाऊ शकत असे. 'न'कलाकार असल्यामुळे एक आशाताईंचा आवाज सोडला तर त्या गाण्यातल्या भावना मी श्रोत्यांपर्यंत पूरेपूर पोचवू शकलो हे जाणवले. कारण, गाणं संपले तरी बराच वेळ सगळे शांत बसून होते. जणू सगळे त्या 'शीन' मध्येच अजून गुंतलेले होते.

1 टिप्पणी:

मोरपीस म्हणाले...

आपले लेखन फ़ारच अप्रतिम आहे.