माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ९

इमारतीच्या कामासाठी सामान येऊन पडायला लागले. सिमेंट,रेती,सळया,दगड,खडी वगैरेचे ढीग उभे राहिले.आम्हा मुलांना त्यातल्या रेतीत खेळायला मजा यायची.त्यात आम्ही कधी किल्ले बनवायचो, कधी त्याच रेतीत घसरगुंडी आणि उड्या मारण्याचा खेळ खेळायचो. पण सर्वात मजा यायची ती कुस्त्या खेळायला.तासंतास आम्ही तिथे एकमेकांशी कुस्त्या खेळायचो.त्याच सुमारास मुंबईतल्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर 'फ्री-स्टाइल'(हल्ली डब्ल्युडब्ल्युएफ आहे ना तसेच) कुस्त्या चालायच्या. त्यात किंगकॉंग-दारासिंग ही मुख्य जोडी होती. ह्यांच्यातले सामने तुफान रंगायचे.त्या शिवाय रंधावा(दारासिंगचा धाकटा भाऊ),मायटी चॅंग...हा जिलेटीन चॉप मास्टर,टायगर जोगिंदर आणि असे किती तरी देश-विदेशातले मल्ल येऊन एकमेकांना आव्हानं देऊन कुस्त्या खेळत असत. वृत्तपत्रात त्यासंबंधीच्या मोठमोठ्या जाहिराती येत. त्यात कुणी दारासिंगला आव्हान दिलेले असे. मग त्याखाली दारासिंगचे ते सुप्रसिद्ध वाक्य लिहिले असे...."पहले रंधावा से लडो,उससे हराओगे तो ही मुझसे लडो!"
हे वाक्य वाचले की आम्ही मुलेही जाम खूश होत असू.मग आपापसात आमचे ज्यावर एकमत होत असे ते वाक्य म्हणजे, "दारासिंग म्हणजे वाटले काय तुम्हाला महाराजा? असा कुठल्या तरी फालतू चिरकुटाशी थोडीच लढणार? पहिल्यांदा आपली लायकी तर त्या चिरकुटाला सिद्ध करू द्या,चिल्लर पिल्लरना हरवू द्या,मग रंधावाला हरवू द्या आणि मग या दारासिंग समोर.आमच्या दृष्टीने दारासिंग म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.

ह्या कुस्त्या खरे तर लुटूपुटीच्या असत.पण हे कळण्याचे आमचे ते वय नव्हते. दुस्र्‍या दिवशी वृत्तपत्रात येणार्‍या कुस्त्यांच्या वर्णनावर आणि निकालावर आम्ही अक्षरश: तुटून पडत असू. ज्याच्या हातात पहिल्यांदा वृत्तपत्र यायचे तोही मग जरा भाव खाऊन घ्यायचा. मग इतरांच्यावर मेहरबानी करतोय असे दाखवत त्या बातमीचे मोठ्याने वाचन करून त्यांची दुधाची तहान ताकावर भागवायची, असले प्रकार चालत. त्यात दारासिंगने कोणत्या डावावर कुस्ती मारली हे देखिल आम्हाला पुढे पुढे पाठ झाले. 'इंडियन डेथ लॉक' हा दारासिंगचा रामबाण डाव होता तर 'किंग कोब्रा' हा रंधावाचा रामबाण डाव होता. नेमके हे काय प्रकरण होते हे आम्हाला माहीत नव्हते पण वृत्तपत्रातल्या वर्णनावरून आमचे आम्हीच काही ठरवले होते ... जसे की प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून त्याच्या नरड्यावर पाय रोवून उभे राहणे म्हणजे 'इंडियन डेथ लॉक' आणि आपले दोन्ही हात एका बाजूला घेऊन प्रतिस्पर्ध्याची मानगुट त्या हाताच्या कात्रीत पकडायची म्हणजे 'किंग कोब्रा'.. हे चूक की बरोबर? कुणाला ठाऊक? आणि त्याने फरक तो काय पडणार होता आमच्या सारख्यांना. आम्ही हे सगळे डावपेच आमच्या रेतीतल्या कुस्तीत वापरायचो. एकमेकांवर वार-प्रतिवार करायचो.

आम्हा तिघा भावात माझा मोठा भाऊ.... दादा हा माझ्यासारखाच चणीने छोटासाच होता पण त्याच्यात विलक्षण ताकद होती. त्याच्यापेक्षाही वयाने आणि आकाराने मोठ्या मुलांना तो भारी पडायचा. म्हणून तो आमच्यातला दारासिंग होता. तो कधीच हरायचा नाही. म्हणजे निदान आमच्या वाडीत तरी त्याला कुणी हरवणारे नव्हते. त्यामुळे मी आपोआप रंधवा झालो..... अहो हसताय काय? खरंच सांगतो. तसा मी लेचापेचा होतो; माझ्यात शक्ती कमी होती पण युक्ती मात्र भरपूर होती.मग आमच्या कुस्त्या सुरू व्हायच्या. माझ्या बरोबरीच्या(ताकतीने) मुलांना मी सहज हरवत असे पण थोडी वजनाने भारी असलेली मुले मला पार चेचून टाकत. मग शेवटी दादाला उतरावे लागे मैदानात.
दादा उतरला की मग आम्ही सगळे जोरजोरात टाळ्या,शिट्ट्या वाजवायचो. खूप आरडाओरडा करायचो. हे सगळे वातावरण निर्मितीसाठी असायचे. एकदा का कुस्ती सुरू झाली की मग आमची पांगापांग व्हायची. कारण दादा आणि त्याचा प्रतिस्पर्धी(जो कोणी असेल तो) हे म्हणजे दोन मदोन्मत्त रेडेच झुंज खेळताहेत अशा तर्‍हेने कधी एकमेकांना टकरा मारत किंवा रेटारेटी करत इथेतिथे फिरत असत. त्यामुळे ते मैदान सोडून कैक वेळेला बाहेर यायचे आणि मग आम्हा प्रेक्षकांची नुसती धावपळ व्हायची. हो! अहो, चूकून त्या दोघा रेड्यांची टक्कर आम्हाला लागली तर मग आमची काही खैर नव्हती.
कुस्त्या कितीही अटीतटीच्या झाल्या तरी शेवटी विजय दादाचाच व्हायचा. कारण दादा शक्तिमान होता तसाच चपळ आणि युक्तिवानही होता. त्यामुळे आपल्यापेक्षा भारी प्रतिस्पर्ध्याला तो नेहमी हुलकावण्या देत दमवत असे आणि मग अचानक असा काही वेगात पटात घुसायचा की त्या हादर्‍याने प्रतिस्पर्धी नामोहरम व्हायचा.

आमच्या वाडीत त्या काळी इतकी मुले होती की ह्या कुस्त्या संपायचे नाव नसे. आम्हा तिघा भावांसारखेच अजूनही काही दोघे-तिघे भाऊ भाऊ ह्यात उतरत असत. ह्यात एक गुजराथी जोडी होती. धाकटा हसमुख(हसला...म्हणायचे सगळे त्याला) आणि मोठा चिमण(चिमण्या म्हणायचो ह्याला). ह्यातला हसला हा दिसायला अतिशय देखणा,गोरा पान असा होता.पण भयंकर व्रात्य. सारखा खोड्या काढायचा. माझे आणि त्याचे तर नेहमीच वाजायचे. मग मी भडकून त्याला चोपायचो पण तोही इतका निर्लज्ज होता की कितीही मारा.. त्याची मस्ती कमी व्हायची नाही. मात्र कधी कधी तो चिमण्याकडे माझी तक्रार करायचा. मग चिमण्या मला एकटा गाठून मारायचा. तो माझ्या पेक्षा मोठाही होता आणि शक्तिमानही होता.
मग चिमण्याची तक्रार घेऊन मी दादाकडे जायचो की मग दादा त्वेषाने चिमण्याला आव्हान द्यायचा. हे आव्हानही मोठे नाटकी असे. तानाजी धारातीर्थी पडल्यावर शेलारमामा उदयभानाला लढाईचे आमंत्रण देतो. त्याच्या तोंडी जे वाक्य आहे, "दुष्टा! उदयभाना! माझ्या तान्याला मारलेस? चल आता मी तुझी खांडोळी करतो!"(आम्हाला दुसरीला एक धडा होता. 'गड आला पण सिंह गेला.' त्या धड्यात हे वाक्य होते. हा धडा आम्हा तिघा भावांचा अक्षरश: तोंडपाठ होता आणि लढाई-लढाई खेळताना आम्ही त्यातल्या वाक्यांचा असा समर्पक वापरही करत असू.)
त्याच चालीवर दादा म्हणायचा , " दुष्टा चिमण्या! माझ्या भावाला मारलेस? चल आता तुझी खांडोळी करतो!"
मग त्यांची मारामारी सुरू व्हायची. दोघेही तुल्यबल होते.पण शेवटी दादा त्याला भारी पडायचा. मग दादा त्याला जमिनीवर पाडून त्याला दाबून ठेवायचा आणि मग मीही माझा हात साफ करून घ्यायचो. त्या अवस्थेतही चिमण्या मला धमक्या द्यायचा, "साल्या,बघतो तुला,एकटा भेट!" मी आपला "हाहाहाहाहाहा" असे राक्षसी हास्य करून त्याला चिडवत असे. त्यावेळी त्याचा होणारा चडफडाट बघण्यासारखा असायचा.

३ टिप्पण्या:

कोहम म्हणाले...

Randhava Saheb, khup hasayala ala ha part vachun....pudhacha lavakar yeude..

vivek म्हणाले...

प्रमोदजी,

लेख छान जमलाय. तुमच्या या लेखाने माझ्या बालपणीच्या दोन आठवणी जागा झाल्या.

मी परळला जिथे रहायचो तिथे आमच्या चाळीच्या समोर एक "फिरदोसी" नावाचे इराण्याचं हॉटेल होतं. आणि त्याच्याकडे तुम्ही वर्णन केलेल्या दारासिंग - रंधावा कुस्त्यांची तिकिटं विक्रीला ठेवलेली असायची. ती त्याकाळी परवडणारी नसायची. पण लक्षात राहिले आहेत ते दारासिंग - रंधावा चे "लार्जर दॅन लाईफ" आकाराचे कट-आऊटस. ते मोठ्या कुतुहलाने आम्ही जवळ जाऊन न्याहाळत बसायचो. रंधावा अजून एका प्रकाराबद्दल प्रसिद्ध होता तो म्हणजे ड्रॉप-किक. हवेत उडी मारुन प्रतिस्पर्ध्याला लाथ मारण्याचा प्रकार. या प्रकाराने पुढे हिंदी चित्रपटात भयंकर वात आणला होता.

दुसरी आठवण जागी झाली ती लहानपणी आम्ही चाळीत केलेल्या ऎतिहासिक नाटकांची. पुठ्ठ्यांच्या ढाली-तलवारी आम्ही बनवत असू व त्या चकाकण्यासाठी त्यावर सिगरेटच्या पाकिटातल्या चांद्या वापरत असू. (सौजन्य अर्थातच आमच्या काकाश्रींचे जे भरपूर धुम्रपान करुन आमच्या चांदीच्या मागणीला साजेसा पुरवठा करायचे). अशाच एका नाटकात मी काम केलं होतं. "आधी लगीन कोंडाण्याचं" हाच विषय होता. त्यात मी बहुतेक रायबा का कोणीतरी झालो होतो, नक्की आठवत नाही. पण त्यात मी एक संवाद असा म्हटला होता : कंसात तलवार उपसून अशी तलवार चालवेन की ...... वगैरे वगैरे. नंतर सर्वजण हसायला लागले (नाटकात काम करणारे सहकलाकार सुद्धा) तेंव्हा लक्षात आलं काहीतरी भानगड झाली. पुस्तकात संवाद असा छापलेला होता :
(तलवार उपसून) अशी तलवार चालवेन की ....
आणि म्हणताना मी तो त्यातल्या "कंसासकट" म्हणून ऎतिहासिक नाटकाचं विनोदी नाटकात परिवर्तन करण्याचा "इतिहास" घडवला होता. त्यानंतर इतरांनी मला नाटकात घेण्याचंच थांबवलं आणि भारत पुढील इतिहासांना मुकला :-)

विनायक पंडित म्हणाले...

अप्रतिम लेखांक आहे काकाराव! खूप आवडला. मजा आली. तुमच्या शैलीमुळे पार बाळपणातच पोचलो की राव! विशेषत: आजच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर हे वाचताना दारा-रंधावाचं ज्याम कौतुक वाटलं. किंगकॉंग-दारासिंग म्हणजे तेव्हा घोषवाक्यासारखंच म्हटलं जायचं आव्हान देताना! छान स्मृती जागृत केलीत काका! मनापासून धन्यवाद! पुलेशु! :)