माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२२ जून, २०११

ध्वनीमुद्रण!

बर्‍याच जणांना काही तरी दुसर्‍यांना सांगावेसे वाटते पण देवनागरीत लिहिता येत नाही किंवा लिहायचा कंटाळा असतो. अशा लोकांसाठी एक उपाय आहे तो म्हणजे..जे आपल्याला दुसर्‍याला सांगावेसे वाटते ते ध्वनीमुद्रित करून ऐकवावे...त्यासाठी कुणीही अगदी सहजपणाने आपल्या भ्रमणध्वनीवरील ध्वनीमुद्रक(रेकॉर्डर)वापरू शकतो...पण त्यावरील ध्वनीमुद्रणाचा दर्जा तेवढा खास नसतो..मग काय करायचं? त्यासाठी तेच ध्वनीमुद्रण संगणकावर करावे असे मी सांगेन...

आता तुम्ही म्हणाल ते कसे करावे बरं?
सांगतो.
आपल्या संगणकावर एक ध्वनीमुद्रक असतो..त्यात साधारण एक मिनिटाचे ध्वनीमुद्रण होते...पण ते होते .वॅव(.wav) ह्या प्रकारात...ज्यात फाईलचा आकार मोठा असतो...तो आकार कमी करण्यासाठी मग ही फाईल आपल्याला मप३(mp3) प्रकारात रुपांतरीत करावी लागते..ज्यासाठी वॅवचे मप३ मध्ये रुपांतर करता येणारी प्रणाली लागते...इतकं सगळं करूनही ध्वनीमुद्रण फक्त एकच मिनिटाचे होते आणि त्यात संपादनही करता येत नाही...मग अशा गोष्टीचा काय बरं उपयोग?

मंडळी असे निराश होऊ नका...मी सांगतो तुम्हाला...तुम्हाला हवा तेवढा वेळ बोलता येईल इतके ध्वनीमुद्रण करणारी प्रणाली..ज्यात हव्या तेवढ्या वेळा संपादन करता येते..झालंच तर अशा ध्वनीमुद्रणातून तयार होणार्‍या वॅव फाईलचे मप३ मध्ये सहजपणाने रुपांतर करता येईल अशी सोयही आहे ह्या प्रणालीत...आणि ही प्रणाली पूर्णपणे फुकटही आहे..तेव्हा लागा तयारीला.

ह्या प्रणालीचे नाव आहे ऑडेसिटी(Audacity).
http://audacity.sourceforge.net/download/windows ह्या दुव्यावरून आपण ती आपल्या संगणकावर उतरवून घेऊन वापरू शकता.
१)Windows 98/ME/2000/XP: Audacity 1.2.6 installer (.exe file, 2.1 MB) - The latest version of the free Audacity audio editor..ह्यातले Audacity 1.2.6 installer हे उतरवून घ्यायचंय.
२)आणि मप३ मध्ये रुपांतरण करण्यासाठी ज्या फाईलची गरज असते...ती लेम फाईल ... LAME MP3 encoder - Allows Audacity to export MP3 files.

वर दिलेल्या दोन्ही फाईली उतरवून घेऊन त्याची स्थापना आपण आपल्या संगणकावर केलीत की आपण हवे तेवढे ध्वनीमुद्रण करू शकता....लेम फाईल ही ऑडेसिटीच्या मूळ फोल्डरमध्येच ठेवावी म्हणजे ती त्या प्रणालीला आपोआप जोडली जाते.

ऑडेसिटी कसं वापरायचं? प्रश्न पडला असेल ना?
अहो त्याच्या हेल्प फाईलमध्ये सगळ आहे त्याबद्दल.
आणि इथेही आहे.....म्हणजे खालच्या दुव्यावर.
http://audacity.sourceforge.net/manual-1.2/index.html

खरं सांगायचं तर ध्वनीमुद्रणासाठी महाजालावर हव्या तेवढ्या फुकट स्वरूपातल्या प्रणाल्या आहेत...पण ऑडेसिटीइतकी सोपी आणि परिपूर्ण अशी दुसरी कोणतीही प्रणाली नाही आढळली.

११ टिप्पण्या:

Unique Poet ! म्हणाले...

धन्यवाद देवकाका !
उपयुक्त माहिती....! मी ध्वनीमुद्रणाचे तंत्र फार दिवसांपासून शोधत होतो....!

प्रमोद देव म्हणाले...

तर मग आपल्या जालवाणी अंकासाठी आत्तापासूनच तयारी सुरु कर रे समीर!

Unique Poet ! म्हणाले...

:) करतो..... साधारण कधी प्रकाशित होतो जालवाणी ?

प्रमोद देव म्हणाले...

१५ ऑगस्टला प्रकाशन.
साहित्य पाठवण्यासंबंधीची सुचना योग्य वेळी येईलच म्हणा!

Unique Poet ! म्हणाले...

ठीक आहे.....धन्यवाद ! :)

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

धन्यवाद. आता तुमच्यावर रेकॉर्डिंगचा माराच करतो बघा. मी एक रशियन माणीस आहे. श्री. डो. के. उठवलेस्की. विसरू नका.

प्रमोद देव म्हणाले...

श्री. डो.क.उठवलंस्की...तुमची गाठ आहे ह्या का.न.फोडलेस्कीशी...तेव्हा सांभाळून बरं! :D
येऊ द्यात तुमची ध्वमु. :)

विनायक पंडित म्हणाले...

धन्यवाद देवकाका! तुम्ही प्रत्यक्ष मला ही सगळी माहिती दिली होतीत! त्यामुळे माझं मला ध्वनिमुद्रण करणं खूपच सोयीचं पडलं! पुन्हा एकवार आभार! इथे ही माहिती दिलीत हे खूप चांगलं झालं!

प्रमोद देव म्हणाले...

विनायकराव, आता हीच दीक्षा तुम्ही तुमच्या इतर मित्रांनाही द्या आणि घ्या सामील करून आपल्या मित्रमंडळात...म्हणजे जालवाणीचा अंक एकदम जोरदार निघेल.

Harsha म्हणाले...

चला येउद्यात आता चान्शिकुम mp3 स्वरुपात!!

प्रमोद देव म्हणाले...

चंशिकुम आणि मप३ स्वरूपात?
हर्षा, अगं त्यातला बहुतेक भाग हा छायाचित्रातून व्यक्त होतोय त्यामुळे त्याच्या अनुषंगाने आलेले थोडेफार निवेदन हे तेवढे श्रवणीय ठरणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे
मप३ साठी माझ्याकडे अजून बरंच साहित्य आहे...त्यातलं काही मी आधीच ते ध्वनीमुद्रित करून ठेवलंय...बाकीचे हळूहळू करणारच आहे.