माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ जानेवारी, २०१२

'साठी’च्या निमित्ताने....

मंडळी कालच म्हणजे २८ जानेवारी २०१२ रोजी माझी ’साठी’ झाली...खरंतर ह्यात माझं स्वत:चं असं काय कर्तृत्व आहे? जन्माला आलेला प्राणी मरत नाही तोवर त्याचे वय वाढतच असतं...त्या न्यायाने मी अजून जिवंत आहे. :D
कालच्या दिवसात माझ्यावर आपल्यासारख्या सुहृदांनी, मित्रमंडळींनी आणि आप्तस्वकीयांनी शुभेच्छांचा जो तुफान वर्षाव केलाय त्याच्या बळावर मी बहुदा ’शंभरी’ देखील साजरी करेन असं उगीच आपलं वाटायला लागलंय....अरेच्चा! कोण तिथे चुकचुकलं? कुणीतरी म्हटल्याचं ऐकू आलं...आयला म्हणजे आमच्या कानपुरात पूर्ण हरताळ केल्याशिवाय काय हा म्हा.....

असो...असे म्हणणारेही आमचे सच्चे मित्रच आहेत...त्यांना आमच्या प्रतिभेची असली/नसली तरी प्रतिमेची नक्कीच काळजी वाटते...काहीही म्हणा, पण त्यांच्यामुळेच सतत सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न होत असतात....आता त्या सुधारणा खरंच होतात की नाही ते आपणच जाणता...आपल्याशिवाय कोण आहेत इथे जाणकार! :)

ह्या साठ वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं? बरंच काही! दोन्हीची यादी खूप मोठी होईल...पण खरोखरंच हिशोब मांडायचा ठरवला तर....तर क गपेक्षा  वरचढ ठरतोय...सदिच्छांची कमाई...कशी कुणास ठाऊक पण प्रचंड आहे. आयुष्यात सुखदु:खाचे असे अगदी टोकाचे अनुभव आले...पण तेव्हाही हितचिंतकांची संख्या विरोधकांपेक्षा नेहमीच खूप जास्त दिसून आली...ह्याबाबतीत मी खरंच सुदैवी आहे...मला वेळोवेळी चांगले मित्र मिळाले...ह्या मित्रांचंही एक वैशिष्ठ्य ठळकपणाने दिसून येतं....

मी तसा विचारांचा पक्का माणूस आहे...म्हणजे असं की एकदा मी ठरवलं की मग त्याबाबतीत तडजोडीला कधीच वाव नसतो...अर्थात तो माझ्याकडूनच...अशा अवस्थेत समोरचा माणूसही तसाच भेटला तर?  तर काय, वादावादी, मारामारी, भांडण...काहीही घडू शकतं....आता तुम्ही सांगा अशा माणसाला मित्रांपेक्षा खरं तर शत्रूच जास्त असायला हवेत की नाही? पण नाही ना! माझे सखेसोबती, मित्रमंडळी वगैरे ही मंडळी स्वत: एरवी आपल्या मतांबाबत कितीही पक्की असली तरी माझ्याशी जुळवून घेतांना त्यांनी त्यांचा स्वत:चा अहंही कैकवेळा बाजूला ठेवलाय...मला नेहमी ह्याच गोष्टीचे आश्चर्य वाटत आलंय...मी इतरांशी जुळवून घेण्यासाठी कधीही माझ्या तत्वांना मुरड घालायला तयार नसतो...पण ही सगळी मंडळी माझ्या त्या दुर्गुणाकडे सहजपणाने काणाडोळा करून माझ्या मनाप्रमाणे करतात...त्यांच्या मनाविरूद्धही अगदी सहजपणाने ते केवळ माझ्यासाठी वागू शकतात...मला खरंच हा प्रकार म्हणजे कोडं वाटत आलाय....कळायला लागल्यापासून ते आत्तापर्यंत हाच अनुभव मी घेत आलोय...कुणी ह्याला माझी पूर्वपुण्याई देखील म्हणेल...पण मी अजूनही त्यामागचं नेमकं कारण समजू शकलेलो नाहीये....

शब्द हे शस्त्र आहे...हे मी कैकवेळा अनुभवलंय...ह्या शस्त्राने मी कैकजणांना जखमीही केलंय...कधीतरी मलाही घायाळ व्हावं लागलंय...पण तरीही जमाखर्च मांडायचा झाला तर...माझ्याबद्दल आपुलकी, सदिच्छा बाळगणारेच अवती-भवती जास्त दिसतात!

माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या म्हणाव्यात अशा लग्न, संसार ह्या गोष्टी उशीरानेच घडलेत...अगदी त्या आपल्या आयुष्यात बहुदा नसाव्यात असे वाटण्यापर्यंत टोकाच्या...पण त्या उशीरा घडल्या तरी लौकिकार्थाने त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या...संसार फार काळ नाही टिकला..पण जितका काळ झाला तो काही अपवाद वगळता सुखावहच झाला!

तुम्हाला एक गंमत सांगतो...प्रत्येक लहान मुलाची जन्मपत्रिका बनवण्याची आपल्यात पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे...आता त्यात किती तथ्य आहे/नाही हे सोडून द्या...हं तर काय सांगत होतो... माझीही जन्मपत्रिका बनवून घेतलेली होती..आमच्या आई-वडिलांनी...त्या पत्रिकेत भविष्यही लिहिलेलं होतं...काय? सांगतो.....

माझं लग्न वयाच्या पंचविशीत होईल आणि मला एक मुलगा असेल.... वास्तवात माझं लग्न झालं वयाच्या पस्तिशीत आणि मला एक मुलगी आहे... ह्यात अजूनही लिहिलं होतं...की मला राजयोग आहे. :D
आता हल्लीच्या युगात राजे-महाराजे राहिलेत कुठे....तर मी राजा होणार? अगदी नाटकातला राजाही नाही झालो....

हे सांगायचं कारण....राजयोग! अहो, ह्या बाबतीत त्या ज्योतिषाचं चुकलं असं आधी जरी मला वाटलं होतं...तरी आता मात्र मला असं वाटतंय...खरंच राजयोग आहे माझ्या नशीबात! एरवी, इतके हितचिंतक, आप्तस्वकीय आणि सुहृद कुठून मिळते? आयुष्यात समर प्रसंग आले, दु:खद प्रसंग आले, संकटं आली...पण एखादा अपवाद वगळता प्रत्येकवेळी त्यात कुणी ना कुणी ज्ञात-अज्ञात व्यक्ती मदतीला धावून आली...त्यामुळे प्रसंगांची तीव्रताही कमी झाली!

हाच! अगदी हाच तो राजयोग असावा!  :)
आपल्यासारख्या सामान्य माणसाला अजून काय हवं असतं हो?

सांगण्यासारखं खूप आहे पण त्याचं सगळ्याचं सार हेच आहे....

जीवनाच्या प्रवासातील......वाटेवर काटे वेचित चाललो.... पण तुम्हा सर्वांमुळे ते.... वाटले जसा फुला-फुलात चाललो.....इतके सुसह्य झालं!

माझ्याबद्दल आपुलकी बाळगणार्‍या सर्वांना हे लेखन अर्पण करतोय!

>

१२ टिप्पण्या:

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

मस्त लिहिलं आहे !तरी पण एक आपुलकीचा सल्ला - शब्दांची धार आता शक्य तितकी पूर्ण बोथट करून टाकावी .

mannab म्हणाले...

आपल्या या "साठी"च्या निमित्ताने आपले हार्दिक अभिनंदन. आता या शुभ समयी एखादे सुमधुर गाणे कसे ऐकवले नाही ?
मंगेश नाबर.

प्रमोद देव म्हणाले...

देशपांडेसाहेब, नक्कीच, आपल्या आपुलकीच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन.
मंना,गाणं नक्कीच येईल...काल दिवसभर व्यस्त होतो...तुम्हासारख्या मित्रमंडळींशी गप्पा मारण्यात..त्यामुळे संधी मिळाली नाही...आता येणारा प्रत्येक दिवस आपलाच आहे. :)

Tveedee म्हणाले...

नमस्कार ! अभिनंदन !
लेख आवडला. जे आवडतं ते करताय .. आणि ते करता येतंय.. ह्यातच खरा जगण्याचा आनंद आहे.. अनेक शुभेच्छा !

जयश्री म्हणाले...

देवकाका. खरंच "राजयोग"च म्हणावा लागेल !!तुम्ही राजयोगी आहात काका :)

तुम्ही जी माणसं जोडली आहेत ना....... ती नेहेमीसाठी तुमची आहेत एव्हढं नक्की.

मला अजूनही आपली ओळख कशी झाली ते आठवतंय. तेव्हापासून जो आपलेपणा तुमच्याबद्दल वाटायला लागला तो वाढतोच आहे. आता तर माझ्या नातेवाईकाना पण देवकाका तितकेच ओळखीचे वाटतात. माझ्या प्रत्येक आनंदात तुम्ही माझ्या इतकेच आनंदी झालात, माझ्या दु:खात दु:खी झालात. असेच ऋणानुबंध अनेकांशी जुळले आहेत तुमचे.

आज तुमच्या साठीच्या निमित्ताने तुम्हाला निरोगी आणि तृप्त आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !! तुमचा उत्साह, चिरतारुण्य असंच अबाधित राहो :)

ulhasbhide म्हणाले...

अगदी खरं !!
एकसष्टीच्या शुभेच्छा.

ulhasbhide म्हणाले...

हाच! अगदी हाच तो राजयोग असावा! >>>
अगदी खरं !!
एकसष्टीच्या शुभेच्छा.

mynac म्हणाले...

साठीचा अत्यानंद.
आपल्याला एकसष्टीच्या हार्दिक शुभेच्छा...

Yogesh म्हणाले...

काका...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :) :)

प्रमोद देव म्हणाले...

वीडी,जयश्री,उल्हासराव आणि योगेश..तुम्हा सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.
होय वीडी...हवं ते करता येणं ह्यापेक्षा जास्त तो आनंद कशात असणार?

होय जयश्री...कसे कुणास ठाऊक पण ऋणानुबंध जुळलेत खरे! :)

प्रमोद लक्ष्मण तांबे म्हणाले...

उशिराने का होईना,पण माझ्याहि तुम्हाला एकसष्टीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!!
तुमचे लिखाण मला फारच भावते.ओघवती भाषा अन जिव्हाळा वाटतो तुमच्या लिखाणात

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद तांबेसाहेब!