माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ एप्रिल, २००७

मित्र!

नक्की आठवत नाही; पण मी बहुधा तिसरीत असतानाची ही गोष्ट आहे.
माझ्या बालवयात मी कमालीचा रड्या,हट्टी,दुराग्रही असा सकल अवगुणसंपन्न होतो. भुकेमुळे कासावीस होणे ही तर माझी सहजप्रवृत्ती होती. सकाळी ९च्या सुमारास वडील कार्यालयात गेले की मी आईकडे 'मला जेवायला वाढ' अशी भूणभूण करायला सुरुवात करायचो. वडीलांच्या डब्यासाठी पोळी-भाजी तयार असायचीच.तेव्हा आई मला 'आधी आंघोळ करुन घे आणि मग जेव' असे सांगायची;पण मी भूकेचा इतका हळवा होतो की 'आधी जेवण आणि मगच आंघोळ' असा हट्ट धरून बसत असे.

माझी आई जितकी प्रेमळ तितकीच कर्तव्य आणि शिस्तीला कडक होती. तिला हे असले नखरे अजिबात रुचत नसत. प्रथम गोडीगुलाबीने आणि नंतर रागावून ती मला आंघोळ करून घ्यायला सांगत असे;पण माझे फक्त 'भूक भूक' हेच पालूपद चालायचे. त्याने आई बधत नाही असे पाहिले की मी मग तारस्वरात रडायला सुरुवात करायचो(पुढील आयुष्यात बहुदा मला आवाज लावायला त्याचा उपयोग झाला असावा!) आणि तिच्यावर भावनिक कुरघोडी करायचा प्रयत्न करायचो. पण आई बधायच्या ऐवजी हातात लाटणे घ्यायची की मग मी पळून जाऊन बाहेरच्या ओट्यावर रडत बसायचो पण आई त्याला दाद देत नसे. तिची 'आधी आंघोळ कर' ची अट कायम असायची.

माझ्या ओट्यावर जाऊन रडण्याने माझा एक फायदा असा व्हायचा की आईच्या मारापासून मी सुरक्षित असायचो आणि द्सरे म्हणजे माझ्या आकांडतांडवामुळे शेजारच्या साळकाया-माळकाया मी का रडतोय हे बघायला यायच्या. मग आईच्यात आणि त्यांच्यात संवाद होत असे. त्यातून त्यांना माझ्या रडण्याचे कारण कळायचे. त्या माझी समजूत घालायचा प्रयत्न करत पण मी बधत नसे म्हणून मग त्या आईवर भावनिक दबाव आणत आणि शेवटी त्या सगळ्यांच्या त्या दबावामुळे आई मला 'घे मेल्या! खा!' असा खास आशीर्वाद देउन जेवायला वाढत असे. मग मी अधाशासारखा खाऊन घेत असे आणि मगच आंघोळ करत असे.

जवळपास रोजच (सुट्ट्यांचे दिवस सोडून! कारण वडील त्यादिवशी घरी असत) माझा हा कार्यक्रम यशस्वी होत असे. पण एक दिवस आई देखिल हट्टालाच पेटली. कुणाच्याही दबावाला बळी न पडता तिने मला ठणकावले 'आंघोळ कर आणि मगच जेव. नाहीतर आज उपाशी राहा'!
मी आकांडतांडवाचे खूप प्रकार करून पाहिले पण आई बधली नाही. बघता बघता माझी शाळेला जाण्याची वेळ आली. माझी इतर भावंडे शहाण्यासारखी आंघोळी, जेवण उरकून शाळेत जायला निघाली देखिल आणि मी अजूनही भिकार्‍यासारखा दारात बसून आशाळभूतपणे आईला दया येईल अशी आस लावून बसलो होतो. शेवटी आईने मला पुन्हा एकदा 'आंघोळ कर आणि चल लवकर जेवायला. शाळा बुडवायची नाही'! असे सांगितले. पण मीही हटवादीपणे तसाच बसून होतो. शाळेची वेळ झाली आणि आता काही जेवण मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यावर तशीच पुस्तक-वह्यांची पिशवी उचलली आणि रडत रडत शाळेत गेलो.

आयुष्यात पहिल्यांदाच उपाशीपोटी शाळेत गेलो असल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. बघता बघता मधली सुट्टी झाली. माझ्या वर्गमित्रांनी आपापले डबे उघडून खायला सुरुवात केली. मी मात्र माझ्या जागेवर भुकेल्यापोटी रडत बसलो. कुणाकडे मागणे (स्वत:च्या घरात सोडून ) स्वभावात नसल्यामुळे मी आपला मुसमुसत बसलो होतो. ते बघून माझा एक मित्र वसंत माझ्याकडे आला आणि माझ्या रडण्याचे कारण विचारू लगला. मी त्याला सकाळचा सगळा प्रकार सांगितल्यावर त्याने आपला डबा माझ्यापुढे धरला आणि मला खाण्याचा आग्रह करू लागला . एक क्षण मला त्या खाण्याचा मोह पडला पण त्यावर मात करून मी त्याला नकार दिला. त्याला खूप वाईट वाटले;पण मला दुसर्‍यांसमोर माझा पराभव मान्य करायचा नव्हता. मी तसाच बसून राहिलो. मधली सुट्टी संपली आणि पुन्हा शाळा सुरु झाली पण माझे लक्ष अभ्यासात लागलेच नाही.

शाळा सुटल्यावर मी घरी येत असताना वसंत पुन्हा माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन चालायला लागला.मला त्या स्पर्शातला स्नेह मनोमन जाणवला. आम्ही दोघे अबोल अवस्थेत घराजवळ आलो. माझ्या घराच्या जवळच ह्या माझ्या मित्राच्या वडीलांचे चहा-बिस्किटांचे छोटेसे उपहारगृह होते. तिथे पोचल्या पोचल्या त्याने मला बळे बळे आत नेले आणि आपल्या वडीलांना मी सकाळपासून उपाशी असल्याचे सांगितले. त्यांनाही हे ऐकून वाईट वाटले आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी मला तिथे बसवून स्वत:च्या देखरेखीखाली चहा-बिस्किटे खायला लावली. हे सर्व चालू असताना माझे लक्ष अचानक वसंतकडे गेले आणि त्याच्या चेहर्‍यावरचे ते तृप्ततेचे भाव बघितले आणि मी त्याच्याकडे बघून स्मितहास्य केले. माझ्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य फुललेले पाहून त्या पिता-पुत्रांना खूपच आनंद झाला होता. माझे खाणे संपल्यावर मग घरी जायला निघालो तेव्हा त्याच्या बाबांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि 'केव्हाही ये.आपलेच हाटेल हाय' असे सांगितले. मी मोठ्या तृप्त मनाने घराकडे निघालो.

घरी पोचलो तेव्हा आई सचिंत होऊन बाहेरच्या ओट्यावर माझी वाट पाहत बसली होती. मी दिसताच ती लगबगीने आली आणि मला घरात घेऊन गेली. तिच्या डोळ्यातले भाव बघून माझ्या लक्षात आले की तिही दिवसभर जेवलेली नाहीये. मग मी शहाण्यासारखी आंघोळ केली आणि तिच्या बरोबर दोन घास खाऊन घेतले.त्यानंतर आयुष्यात मी पुन्हा कधीही असा हट्ट केला नाही.

मित्रानो आजही वसंत माझा चांगला मित्र आहे. वसंत ही गोष्ट केव्हाच विसरून गेलाय पण त्याला जेव्हा जेव्हा मी भेटतो तेव्हा तेव्हा हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.माझा स्वत:चा स्वभाव चांगला नव्हता तरीही हे असे मित्र मला वेळोवेळी लाभले हे मी माझे महद्भाग्यच समजतो.

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

punha ekda tumachya memory la manapasoon Daad! sundar lihilyey athavaN! shyamchi aai picture athavla:-)

जयश्री म्हणाले...

प्रमोद, फ़ार सुरेख झालंय लेख. छान उतरतात अनुभव तुमच्या लेखणीतून..... सगळं समोर घडतंय असं वाटतं.
मल्हारी म्हणतोय तशीच मलाही श्यामची आई आठवली.
येऊ देत तुमचे अनुभव असेच :)

Jivanika म्हणाले...

खूप छान झालाय लेख काका!!! नशीबवान आहात तुम्ही

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद जिवनिका!

अनामित म्हणाले...

वाह..मस्तच प्रमोद सर...
एक जूनी आणि गोड आठवण..
�⚘⚘⚘

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद!