माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१५ एप्रिल, २००७

बालपणीचा काळ सुखाचा! १

माझ्या बालपणाची मला स्वत:ला आठवणारी पहिली पुसटशी आठवण म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा पहिला वाढदिवस! मी त्यावेळी साधारण ४ वर्षांचा होतो.त्या काळी आमच्या घरात विजेचे दिवे नव्हते. म्हणजे तशी वीज आधी होती(मला आठवतेय तेव्हापासून नव्हती); आमच्या घरात फक्त दोनच विजेचे गोळे(बल्ब) असत. इतरांकडे त्या व्यतिरिक्त पंखाही असे. एकदोघांकडे रेडिओही होता.विजेचे मीटर सगळ्यांसाठी एकच असे आणि सगळ्यांनी येणारे बील समान वाटे करून भरायचे असा अलिखित नियम होता.तरीही भांडणे होत. कमी वीज वापरूनही आम्हाला जास्त भुर्दंड पडत असे.म्हणून मग माझ्या वडिलांनी दरवेळेच्या भांडणांना कंटाळून स्वत:च आमच्या घरातील विजेच्या तारा कापून टाकल्या होत्या.(हे सगळे मला थोडा मोठा झाल्यावर आईकडूनच कळले.) त्यामुळे माझे अख्खे बालपण हे चिमणी आणि कंदिलाच्या प्रकाशातच गेले.

तर अशा आमच्या ह्या घरात ज्या गतकाळच्या निशाण्या होत्या त्या म्हणजे वीजगोळे धारक कमनीय दांड्या आणि अशाच त्या दोन दांड्यांना त्या दिवशी लटकवलेल्या होत्या दोन पेट्रोमॅक्सच्या बत्त्या! ते लखलखणारे दोन दिवे मला अजूनही प्रकर्षाने आठवताहेत.

त्या दिवशी आमच्याकडे बर्‍याच पाहुण्यांचा राबता होता. मी जात्याच अशक्त , किरकिरा आणि बुजरा असल्यामुळे एका कोपर्‍यात उभा होऊन ही गंमत पाहत उभा होतो. कुणाच्यात मिसळत नव्हतो. तसा माझा चेहरा बरा असावा(आई-वडील मला मोदकतोंड्या म्हणत!त्याचे काही एव्हढे विशेष नाही हो. प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुले गोंडसच दिसतात त्याला आपण तरी काय करणार?) त्यामुळे मामा-मावश्या वगैरेंना माझंही जरा कौतुक असायचे;पण मी मुलखाचा भित्रट असल्यामुळे कुणी माझ्या कडे नुसते बघितले की मी 'मायते'!(मारते... माझ्यासाठी सगळेच स्त्रीलिंगी होते) असे ओरडत रडायला सुरुवात करत असे. सगळेचजण मला मारतील अशी काहीशी सुप्त भिती माझ्या मनात दाटलेली असे. त्यामुळे कुणाकडून कौतुक करून घेण्याचे माझ्या नशिबात नसावे.

त्या दिवशी माझ्या भावाभोवती अक्षरश: खेळण्यांचा सडा पडला होता. तसेच चांदीची भांडी,रंगीबेरंगी कपडे,दुपटी आणि बरेच काही त्याच्यासाठी येणार्‍या नातेवाईंकांनी आणलेले होते. माझ्या वेळेस आमची परिस्थिती यथातथाच असल्यामुळे माझे बारसे किंवा वाढदिवस अशा तर्‍हेने साजरा होऊ शकला नव्हता(हे ही पुढे आईकडूनच कळले) त्यामुळे ह्यावेळी सर्व नातेवाईकांनी अतिशय सढळ हाताने भेटवस्तूंचा मारा केला होता. ह्या सर्वात माझे लक्ष वेधून घेतले होते ते एका लालभडक दुमजली लाकडी बसने. मला ती बस खूपच आवडली. तसेच एक लाकडी घोडाही होता. त्या घोड्यात बसता येत होते आणि मागेपुढे झुलतादेखील येत होते. कधी एकदा पाहुणे जातात आणि मी त्यांच्याशी(खेळण्यांशी) खेळतो असे होऊन गेले होते;पण रात्र झाली तरी काही पाहुण्यांची वर्दळ थांबत नव्हती.

सरतेशेवटी एकेक करत सगळेजण जेव्हा गेले तेव्हा मी चटकन उडी मारून त्या घोड्यात(हो! मध्ये बसायला गादी आणि टेकायला पाठ आणि दोन्ही बाजूला दोन रंगीबेरंगी तोंडे असलेला घोडा होता तो-- हल्लीच्या झुलत्या(रॉकींग चेअर) खुर्चीसारखा) ऐटीत बसलो आणि आणि घोडा चालवता चालवता कधी झोपलो ते कळलेच नाही.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

leKh aawaDalaa:-) Chaan varNan kelay tumchya baalpaNicha:-)