माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२२ एप्रिल, २००७

माझ्या 'बुद्धीचे बळ'!१

माझ्या लहानपणी मी भरपूर खेळ खेळलोय.बैठे तसेच मैदानी अशा दोन्ही प्रकारचे खेळ खेळलो असलो तरी कोणत्याही एका खेळात प्रवीण झालो नाही. साधारणपणे ५०-५५% इतपतच त्यात प्रगती करू शकलो. जे काही अनेक खेळ मी खेळलो त्यापैकी एक म्हणजे 'बुद्धिबळ' हा होय.

ह्या बुद्धिबळाची आणि माझी ओळख साधारणपणे मी ५वी-६वीत असताना झाली. त्यावेळी माझा मोठा भाऊ आणि त्याचा एक मित्र आमच्या घराच्या ओटीवर पट मांडून बसत. त्यांना तो खेळ कितपत येत होता हे सांगणे कठीण आहे;पण तेव्हापासूनच त्या खेळातील हत्ती-घोडा-उंट वगैरेंशी माझी तोंडओळख झाली. हा खेळ सुरू करण्या आधी वातावरण निर्मितीसाठी ते दोघे जोरजोरात डबे,थाळ्या बडवत आणि युद्धाचे वातावरण निर्माण करत.म्हणूनही असेल कदाचित वाडीतील यच्चयावत बालगोपाल मंडळी ही लढाई बघायला येत असत आणि मग त्यात दोन तट पडत्‍ा. ज्या बाजूची सोंगटी बळी पडत असे त्याच्या विरुद्ध असणारा गट मग आरडाओरड करून आपला आनंद व्यक्त करत. अशा तऱ्हेने चालणाऱ्या ह्या खेळाचे आकर्षण मला केव्हा निर्माण झाले आणि मी प्रत्यक्ष त्यात केव्हा भाग घ्यायला लागलो हे समजेपर्यंत मी एक बऱ्यापैकी खेळाडू बनलो. शाळेतील बुद्धिबळाच्या स्पर्धेत भाग घेऊन एखादा डाव जिंकूही लागलो होतो. माझ्या बरोबरीनेच माझा लहान भाऊही हा खेळ शिकला आणि पुढे पुढे आम्ही तिघे भाऊ एकमेकांबरोबर खेळून आपली बुद्धिबळातली प्रगती साधू लागलो.

आम्ही तिघेही जरी हा खेळ खेळायला शिकलो होतो तरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या खेळाचे सामान्य नियम सोडले तर त्यातील खास असे नियम आणि खाचाखोचा आम्हाला माहीत नव्हत्या. त्याचे कारण म्हणजे आमच्या आजूबाजूला अशी कोणतीच व्यक्ती अस्तित्वात नव्हती की जी हा खेळ अगदी व्यवस्थितपणे जाणत होती. शाळेतल्या शिक्षकांचे ह्या विषयातले ज्ञानही जेमतेमच होते आणि त्यामुळे म्हणावा तसा हा खेळ बहरत नव्हता.

ह्या अशाच अवस्थेत मालाड ब्राह्मण सभेतर्फे आयोजित एका स्पर्धेत आम्ही तिघांनी भाग घेतला. स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आली. इथेही तसा नियमांच्या बाबतीत आनंदी आनंदच होता. जेमतेम १६ स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता.माझी पहिल्याच फेरीत गाठ पडली ती माझ्या मोठ्या भावाशीच आणि त्याने मला त्यात सपशेल हरवले. झाले! म्हणजे एक मोहरा कामी आला होता! माझ्या धाकट्या भावानेही त्याचा पहिला डाव जिंकला होताच.आता दोघेजण(तीन भावांपैकी) मैदानात उरले. दुसरी फेरीही त्या दोघांनीही सहज जिंकली. तिसऱ्या फेरीत माझ्या दोन्ही भावांची एकमेकांशी गाठ पडली आणि त्यात लहान भावाने बाजी मारली. म्हणजे आम्हा तिघांपैकी आता तो एकटाच मैदानात उरला होता.आता होणार होती ती अंतिम फेरी आणि त्यात कोण विजयी ठरतो ह्याची उत्सुकता होती.

अंतिम फेरीचा सामना बघायला बरीच मंडळी जमली होती. दोघेही खेळाडू तुल्यबळ वाटत होते त्यामुळे जो चूक करेल तो हरणार हे माहीत असल्यामुळे कुणीच जोखीम पत्करत नव्हते आणि त्यामुळे खेळ थोडा कंटाळवाणा व्हायला लागला. ह्या खेळाचे वैशिष्ट्य असे आहे की खेळ खेळणाऱ्या खेळाडूपेक्षा बाहेरून तो खेळ बघणाऱ्यालाच त्यातल्या त्रुटी चटकन कळतात. त्यामुळे मला सारखे वाटत होते की इथे अमुक एक चाल केली तर फायदा होईल;पण माझा भाऊ काही वेगळाच विचार करताना दिसत होता आणि त्यामुळे सामना लांबत चालला होता.इतक्यात प्रतिस्पर्ध्याने एक खेळी केली आणि मी मनोमन सुखावलो कारण ती खेळी म्हणजे त्याच्या भविष्यात होणाऱ्या पानिपताची नांदी होती आणि आता ही संधी जर घालवली तर पुढे डाव अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता दिसत होती. ती खेळी त्या खेळाडूने केली आणि लगेच त्याची चूक त्याच्याच लक्षात आलेय हे त्याच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट होत होते आणि म्हणून मी मोठ्या आशेने माझ्या भावाच्या अपेक्षित खेळीकडे बघत होतो. आता खेळाची सगळी सूत्रे त्याच्याचकडे आपोआप आली होती; पण तो विचारात गुरफटलेला दिसत होता आणि माझे हात तर सारखे शिवशिवत होते पुढची चाल करण्यासाठी. मी मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत होतो आणि त्याने मला सुचलेली खेळी करावी असेही वाटत होते;पण तो काहीच करत नव्हता आणि मी फारच अधीर होऊ लागलो तरी तो शांतच दिसत होता. शेवटी मी न राहवून टेबलाखालून माझ्या पायाने त्याचा पाय हळूच दाबला आणि .....
तत्क्षणी इतका वेळ मी अपेक्षित असलेली खेळी त्याने केली. जणू काही माझ्या त्या स्पर्शाने तो आश्वस्त झाला होता. त्यालाही तीच खेळी करायची होती; पण तो पुढच्या गुंतागुंतींचा विचार करत बसला होता आणि अशाने बऱ्याच वेळा आपण मूळ गोष्ट विसरून जातो असा माझा अनुभव होता.
माझ्या भावाची ती खेळी पाहताच वातावरणातला ताण एकदम हलका झाला आणि बघ्यांनी टाकलेला निःश्वास मोठ्याने ऐकू आला. समोरच्या खेळाडूने देखिल तत्क्षणी डाव सोडला आणि आपला पराभव मोठ्या मनाने मान्य केला.

क्रमश:

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

maaze aaNi buddhibaLaache jari kadhi soot jamale naahee, tari tumcha leKh matra mala awaDala:-)

Anuja म्हणाले...

काका,
आपल्याला कळवायला खर तर उशीर झाला पण मी बुद्धीबळ म्हटल्यावर पटकन पोस्ट वाचली कारण सांगलीचे.. कै. भाऊसाहेब पडसलगीकर बुद्धिबळाचे द्रोणाचार्य माझा चुलत सासरे आहेत. आम्ही सांगलीत एकत्र राहतो. आता अण्णा काका नाहीत पण बुद्धी बळाचे नाते मात्र पुढच्या पिढीत पण आहे. आमचे भाग्य थोर