माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ एप्रिल, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'!३

पहिला डाव हरलो तरी माझ्या स्वभावगुणधर्मामुळे त्याचे विशेष असे काही वाटले नाही. क्षणभर निराश झालो(नाही कसा?);पण लगेच दुसर्‍या दिवशीच्या डावाचा विचार सुरू केला.

बुद्धिबळ ह्या खेळात पण काही तांत्रिक गोष्टी माहीत असणे जरूरीचे असते. तज्ञांच्या मते त्यात डावाचा आरंभ(ओपनिंग गेम),खेळाचा मधला भाग(मिडल गेम) आणि शेवट(एंड गेम) असे खास भाग असतात आणि त्या त्या प्रसंगी खेळी करण्याच्याही पद्धती खासच असतात. खेळातील ह्या तांत्रिक गोष्टी माहीत करून घेतल्याशिवाय कुणालाही चांगला खेळ करता येत नाही.आता असली कोणतीच तंत्र माहीत नसलेले आम्ही दोघे तिथे आमच्यापेक्षा तयारीच्या खेळाडूंशी सामना द्यायला उतरलो होतो म्हणजे एक प्रकारे हाराकिरि करण्याचाच प्रकार होता. हे म्हणजे कसे होते माहीत आहे का? तर अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेऊन लढणार्‍या एखाद्या योद्ध्याशी हातात एखादी काठी घेऊन लढण्यासारखे होते; पण आम्हाला असल्या गोष्टींची फिकीर नव्हती. कारण आम्ही तिथे जिंकणे शक्य नसले तरी विविध खेळाडूंचा आणि त्यांच्या खेळण्याच्या पद्धतींचा अभ्यास करता येईल ह्या मर्यादित हेतूने गेलो होतो. तेव्हा अशा हरण्याची पर्वा कुणाला?

माझा दुसरा डाव मी अगदी सहजपणाने हरलो. अगदी माझ्या पांढर्‍या सोंगट्या असूनही! प्रतिस्पर्धी इतका तयारीचा होता की त्याने मला माझा खेळ खेळूच दिला नाही. त्याच्या चालीच अशा होत्या की तो मला खेळवत गेला आणि शेवटी अतिशय मानहानी कारक पद्धतीने त्याने माझ्या राजाला एकाकी खिंडीत गाठले. माझा वजीर,दोन हत्ती,एकेक घोडा आणि उंट,सहा प्यादी एवढे सगळे असूनही ते राजाच्या मदतीला येऊच शकले नाहीत. अशा तर्‍हेने दोन डावात हार झाल्य़ानंतर पुढे काय वाढून ठेवलेय ह्याची साधारण कल्पना आलेलीच होती. तिथे माझ्या भावाने दुसरा डाव बरोबरीत सोडवला होता. त्याचे आता १.५ आणि माझे ० गुण झाले होते.

तिसर्‍या फेरीत मात्र मी असा काही खेळ केला की समोरचा भांबावूनच गेला(बहुधा तो माझ्यापेक्षाही कच्चा असावा!). पहिल्या काही खेळीतच मी त्याचा वजीर मारला आणि त्याने हताशपणे पराभव मान्य केला. त्याच्या जागी मी असतो तर अजून खेळायचा प्रयत्न केला असता;पण त्याने हातपायच गाळले होते. अशा तर्‍हेने ह्या स्पर्धेतला माझा पहिला विजय नोंदवला गेला. ह्या विजयाचा परिणाम म्हणा की अजून काही म्हणा मी पुढचे दोन डावही प्रतिस्पर्ध्यांची चिवट लढत मोडून काढत जिंकले आणि पाच डावात लागोपाठ तीन विजय मिळवत तीन गुणांची कमाई करून स्पर्धेत एकदम खळबळ उडवून दिली.तिथे माझ्या भावाने एक हार,दोन जीत आणि दोन बरोबरी करून एकूण पाच डावात ३गुणांची कमाई केली. आता आम्ही दोघेही समान गुणसंख्येवर आलो होतो.

ह्या स्पर्धेतल्या खेळाडूंचा मला आता जरा कुठे अंदाज यायला लागला होता. साधारणपणे माझा खेळ हा हाराकिरीचा(दे धडक बेधडक) म्हणता येईल अशा पद्धतीचा होता . शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळणार्‍या तिथल्या खेळाडूंना माझ्या ह्या(अपारंपारिक) सुरुवातीच्या खेळी बुचकळ्यांत टाकत. कारण त्या पुस्तकातील आदर्श खेळीप्रमाणे नसत.(आठवा! धोनी अथवा सेहवागचे फटके! धावा होण्याशी मतलब!)खरे तर मलाही नेमके माहीत नव्हते की मी त्या खेळी का करत असे? म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या खेळीचा अंदाज घेऊन अथवा त्यामागचे कारण लक्षात घेऊन खेळ खेळायचा असतो ना! खरे तर हेच सूत्र आहे बुद्धिबळाचे;पण मी माझ्या स्वत:च्याच मनसुब्यात रमलेला असे आणि त्यामुळे माझ्या खेळी ह्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळींना पूरक अथवा मारक अशा ठरत नसत. अशामुळे समोरच्याला माझ्या खेळीचा अंदाजच लागत नसे आणि मी मात्र त्याच्या ह्या परिस्थितीचा फायदा घेत घेत माझे घोडे,वजीर आणि हत्ती असे नाचवत असे की त्याच्या सैन्याची अवस्था अगदी खिळखिळी होऊन जाई. ह्यातून तो जर बचावला तर मात्र माझी खैर नसायची. कारण त्याची अशी दैना करण्यासाठी मी माझे महत्त्वाचे मोहरे बळी दिलेले असत('गँबीट' की काय म्हणतात ना? तसे!) आणि स्वत:च्या राजाचे संरक्षण करण्यासाठी कुणीच शिल्लक नसे. राजाला किल्ल्यात(कॅसलिंग)सुरक्षित ठेवणे वगैरे माहित असूनही कधी करत नसायचो.

म्हणजे खर्‍या अर्थाने आरंभ,मध्य आणि शेवट ह्या खेळातील तीन तंत्रांची माहिती नसताना मी माझ्या पद्धतीने जिंकलेले ते तीन लागोपाठचे डाव बघून मी तिथल्या तज्ञ मंडळींच्या कुतूहलाचा विषय ठरलो. त्याकाळी राष्ट्रीय 'अ' स्पर्धेत खेळणारे अतिशय सुप्रसिद्ध आणि बुजुर्ग खेळाडू होते ते म्हणजे सर्वश्री.रामचंद्र सप्रे,मोहन बाबूर आणि मॅन्युअल एरॉन. ह्यापैकी श्री.मोहन बाबूर ह्यांच्या संपर्कात मी माझ्या ह्या धमाक्यामुळे आलो. मी मालाडला राहायचो आणि बाबूर कांदिवलीला राहत. आमची स्पर्धा बघायला आणि त्यावर देखरेख ठेवायला ते नियमित येत असत. ज्यांचे नाव आजपर्यंत वर्तमानपत्रात वाचत होतो त्या श्री. बाबूरना ह्या आधी प्रत्यक्ष कधीच पाहिलेले नसल्यामुळे आधी ओळखले नव्हते. पण त्या तीन डावांनंतर अचानक त्यांच्याशी ओळख झाली आणि मग आम्ही घरी जाताना एकत्रच जाऊ लागलो. त्यांच्याकडून चार युक्तीच्या गोष्टीही शिकायला मिळाल्या.
अजून चार फेर्‍या बाकी होत्या! आता त्यात ह्या युक्त्यांचा किती फायदा करून घ्यायचा हे आमच्या 'बुद्धीच्या बळावर' अवलंबून होते.

क्रमश:

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

tumchya leKhanmuLe buddhibaLatle baarkave haLoo haLoo kaLaayala lagale aahet:-)