माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ ऑगस्ट, २०१०

योग,भोग की अजून काही?

काल एका नातेवाईकांकडे सत्यनारायणाच्या पुजेला गेलो होतो. माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही पण नाती राखण्यासाठी,माणसं राखण्यासाठी आपल्याला बर्‍याचदा आपल्याच मनाविरूद्ध काही करावं लागतं त्यातलाच हा एक प्रकार.तिथला पूजा सांगणारा उपाध्याय म्हणजे आपल्या सरळ भाषेत बोलायचं झालं तर भटजी हा एक वयाची तिशी ओलांडलेला तरूण होता. अंगापिंडाने मजबूत,दिसायलाही बर्‍यापैकी,दोन्ही हातांच्या काही बोटात कसल्या कसल्या आंगठ्या,कानात वरच्या बाजूला भिकबाळी,पाळीजवळ डूल अशा अवतारातल्या त्या तरूणाकडे पाहिल्यावर लक्षात आलं की त्याचा भिक्षुकीचा धंदा अगदी व्यवस्थित सुरु आहे.तसा ओळखीतलाच निघाला. त्याचे वडील एकेकाळी आमच्या लहानपणी आमच्या घरी काही धार्मिक कार्यात भटजीगिरी केलेले होते. हल्ली मात्र ते पूर्णपणे नास्तिक झालेत असेही त्याच्याकडून ऐकले. आता काय म्हणावे ह्याला?बर्‍याचदा असे होते की लोक जन्मभर नास्तिक असतात..पण काही कारणाने अचानक आस्तिक बनतात...अशा लोकांची संख्या आपल्याला भरपूर मिळेल.पण हे वरचे उदाहरण त्यामानाने विरळाच. असो...आपल्याला काय त्याचे? आले असतील त्यांना काही विपरीत अनुभव ज्यामुळे त्यांचा विश्वास तुटला असावा.

बघा, हे असं होतंय. मला सांगायचं काही वेगळंच आहे आणि भलतंच काही सांगत राहिलो. हं तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ या.
तर तो तरूण भटजी. आजवर कैक मंगल कार्य,धार्मिक कार्य त्याच्याकडून घडली/घडवली गेली असतील. साम्पत्तिक स्थितीही पूर्वीच्या तथाकथित दरिद्री ब्राह्मणांच्या तुलनेत नक्कीच श्रीमंत वाटावी इतपत. रूप आहेच पण...पण अजून तरी विवाह योग नाही. इतरांचे विवाह लावत असतांना ह्याच्या मनात काय बरं भावना असतील?अमूक ग्रहाची शांती, तमूक व्रतवैकल्य करा म्हणजे मनोकामना पूर्ण होईल असे दुसर्‍यांना सल्ले देणारा आणि त्यामुळे त्या लोकांचे काही प्रमाणात समाधान करणारा हा तरूण स्वत:च स्वत:साठी काय बरं उपाय करत असेल?

माझ्या माहितीत अजून एक गुजराथी भटजी होते...होते म्हणजे आता ते हयात नाहीत.पण एकेकाळी त्यांचा व्यवसाय खूपच तेजीत होता. सर्वप्रकारच्या मंगलकार्य,धार्मिक का्र्यांमध्ये ह्यांना तुफान मागणी होती. झालंच तर पत्रिका बनवणे, मुहूर्त काढून देणे, शांती वगैरे करणे इत्यादि गोष्टीत अगदी हातखंडा असणार्‍या ह्या भटजींना श्वास घ्यायलाही फुरसत नसायची.ह्या भटजींनी किती जणांचे विवाह जुळवले आणि लावले ह्याचीही गणती नसेल.
ह्यांना दोन मुली आणि दोन मुलगे होते....भटजींच्या हयातीतच मोठी मुलगी आणि मुलगा उपवर झाले होते पण भटजी काही त्यांच्यापैकी कुणाचेही लग्न जमवू शकले नाहीत. तसे पाहिले तर मुलगा-मुलगी दोघेही दिसायला नीटनीटके होते. भटजी जाईस्तो..मुलीच्या वयाची तिशी उलटली होती पण तिचे लग्न झालेच नाही...आणि तिच्यापेक्षा एखाद वर्षाने लहान असणार्‍या मुलाचेही लग्न झाले नाही. पुढे मोठ्या मुलाने आपल्या वडीलांची गादी चालवायला प्रारंभ केला..व्यवसाय अगदी उत्तम सुरु राहिला...पण बहिणीच्या अथवा स्वत:च्या लग्नाबाबत तो काहीच करू शकला नाही. पाहता पाहता धाकटी दोन्ही भावंडंही उपवर झाली तरी घरात कुणाच्याही विवाहाचे वारे वाहिले नाही.शेवटी मात्र एक चमत्कार झाला...मोठ्या मुलाने परजातीतल्या एका मुलीशी सूत जमवलं आणि परस्पर विवाह करून पौरोहित्याचा व्यवसायही सोडून दिला.
आता धाकटा चालवतोय ती गादी...अजूनही दोन बहिणी आणि तो स्वत: अविवाहित आहेत.मोठी बहीण पन्नाशी ओलांडलेली आणि ही दोन्ही भावंडही चाळीशी पार केलेली...हे सगळं पाहिल्यावर मनात विचार येतो की...हा काय प्रकार आहे? ह्याला योग म्हणावे की भोग म्हणावे? सगळं काही व्यवस्थित असतांना ह्या लोकांच्या जीवनात विवाह योग का नसावा? ज्यांच्या हातून इतरांचे विवाह संपन्न झाले,वेळप्रसंगी त्यांच्या सल्ल्याने लोकांच्या अडचणी दूर झाल्या...मग ह्यांचा काय दोष म्हणून हे असेच कोरडे राहिले?

अजून असंच एक कुटुंब पाहिलं. दोन बहिणी आणि दोन भाऊ. त्यातल्या मोठ्या बहिणीने प्रेमविवाह केला...पण बाकीचे तिघेही अजूनपर्यंत अविवाहित आहेत...आजच्या घटकेला मोठा भाऊ साठी पार केलेला आणि दुसरे दोघे भाऊ-बहीण साठीच्या उंबरठ्यावर आहेत. आजवरच्या आयुष्यात कैक लोकांच्या लग्नाला ह्यांनी हजेरी लावली असेल...त्यावेळी काय वाटत असेल त्यांना?

जगात असे किती तरी लोक आहेत ज्यांची एक नाही चांगली दोन दोन तीन तीन लग्न झालेली आहेत/होत आहेत. पण असे कैक लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात हा योगच नाहीये. कैक वेळेला आपण पाहातो...अगदी व्यंग असणार्‍या लोकांची...अंध,मूक-बधिर लोकांचीही लग्नं होतांना दिसतात पण ह्या धडधाकट, कामधंदा,व्यवसाय व्यवस्थित सांभाळणार्‍या काही लोकांची लग्न कधीच होत नाहीत?

मी दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ह्यात काही ठिकाणी वैयक्तिक,अनुवंशिक इत्यादी बाबी अशा असतीलही ज्या ह्या लग्न जुळण्याच्या आड येत असतील...तरीही समाजात आज एकूणच अशा अविवाहित लोकांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

काय म्हणावे ह्याला? योग,भोग की अजून काही?

७ टिप्पण्या:

tanvi म्हणाले...

देवकाका खरयं असा प्रश्न आहे खरा.... आमच्याकडेही सगळ्या धार्मिक विधींना जे भटजी येतात ते तिघेही भाऊ आहेत.. मोठा साधारण चाळीशीचा आणि बाकि त्यापाठोपाठ... पण तिघेही अविवाहित.... नेहेमी हाच प्रश्न येतो आपल्या मुलांच्या विडापेढ्याच्या कार्यक्रमापासून ते मुंज-लग्नापर्यंत येणाऱ्या या ’मामांच्या’ मनात नेमेके कोणते भाव येत असावेत...

>>>तरीही समाजात आज एकूणच अशा अविवाहित लोकांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

अगदी खरेय काका....

THEPROPHET म्हणाले...

काका,
खरंच कधीकधी बरेच प्रश्न अनुत्तरितच राहतात!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद तन्वी आणि विद्याधर.

Vikram म्हणाले...

खरा सांगयचा तर अत्यंत बिकट मनस्थिती असते कारण लग्न न झालमुळे समाजात अनेक ठिकाणी चित्र विचित्र अनुभव येतात आणि लोक वाटेल ते बोलतात, अनेकदा समाजात उपेक्षा देखील सहन करावी लागते. खास करून कोणाचा विवाह असेल अथवा कोण कडे काही कार्य असेल. जवळचे नातेवाईक कदाचित सामून घेतात , पण थोडे दूरचे किंवा काही नवीन नाते संबध असतील किंवा नवीन ओळखी असतील तर लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलतात आणि अनेकदा ते जाणवतात सुद्धा ! हा अनुभव मी स्वत: घेत आहे!! माझ्या माहिती मध्ये एक अविवाहित corporate HR counselor आहे त्यांना एकदा एका समोरच्या समोरच्या माणसाने सांगितले की तुमाला HR support group चालवायचा काही हक्क नाहीये कारण तुमचा लग्न झाला नाही आणि तुमी स्वत: विवाहाच अनुभव घेतलेला नाही , दुसर्याच् निरीक्षण करून कोणी yogya सल्ले देवू शकत नाही!

भानस म्हणाले...

देवकाका, खरेच असे विरोधाभास बरेचदा दिसून येतात. आणि त्यामागची कारणेही कळत नाहीत. पुढे पुढे तर ते निर्विकार होत असतील किंवा खचत असतील. सगळेच अनाकलनीय आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद विक्रम आणि भाग्यश्री.
आपण दोघे म्हणता ते पैलूही आहेत ह्या प्रकरणात.

Anand Kale म्हणाले...

माझा एक नेट मित्र
वय वर्ष ५५-५६... आईची सेवा करता यावी म्हणुन ब्रह्मचर्य पाळतोय..
माझ्या मैत्रीनिचे मामा.. वयाच्या ६० व्या वर्षी एका ४५ वर्षिय महिलेशी लग्न केले...
आहेत केसेस भरपुर...