माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
९ मे, २०१०
मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा
मुंबईत आज पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात, दादर पश्चिम येथील दासावा(दादर सार्वजनिक वाचनालय)च्या तिसर्या मजल्यावरील सभागृहात साजरा झाला.
ह्या मेळाव्याची पूर्वतयारी मुख्यत: कांचन कराई आणि तिच्या बरोबरीने महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी ह्यांनी अतिशय नेटकेपणाने केलेली होती.
मी तिथे साधारणत: पावणेपाचला पोचलो. सभागृहात बरीचशी ओळखीची आणि अनोळखी मंडळी जमलेली दिसली. स्वागतालाच सुहास झेले,सचिन उथळे-पाटील,आनंद पत्रे,सागर बाहेगव्हाणकर,भारत मुंबईकर, रोहन चौधरी इत्यादि तरूण मंडळी सुहास्य वदनाने तयारच होती. तिथेच मग प्रत्येकाला एक नोंदणी क्रमांक पट्टी (त्यावर संबंधिताचे नाव लिहून) दिली जात होती. माझा क्रमांक होता ००७...
मी ती क्रमांक/नाव असलेली पट्टी छातीवर चिकटवत असतानाच बंगळूरहून अपर्णा लळिंगकरचा ह्या मेळाव्याला शुभेच्छा देणारा भ्रमण ध्वनी आला. तिला मग मी कांचन, सुहास आणि महेंद्रजींशी देखिल बोलायला लावलं. ;) अशा तर्हेने दूरस्थ असूनही अपर्णाने संमेलनाला हजेरी लावली.
त्यानंतर मग एकेकजण भेटत गेले. अमेय धामणकर,श्रेया रत्नपारखी,आनंद काळे ,सोनाली केळकर (आर्यन,श्रीयुत केळकर) इत्यादि नेहमीची बझकर मंडळी भेटली. कोष्टीसाहेब...खास नाशिकहून आले होते..तेही भेटले. सगळेजण एकमेकांना प्रत्यक्ष प्रथमच भेटत होते...तरीही कुठेही संकोच,दुरावा जाणवला नाही. रोजच्या बझच्या गप्पांमुळे सगळी मंडळी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखी एकमेकांशी वागत होती.
इथे मला माझे काही जालावरचे जुने मित्र/मैत्रिणी भेटले...त्यात आनंदराव घारे, मिलिंद फणसे, शंतनू ओक, नरेंद्र प्रभू, हरेकृष्णजी, नीरजा पटवर्धन,सुधीर कांदळकर,जयबालाताई परूळेकर.अॅडी जोशी,आल्हाद महाबळ इत्यादि....त्यांच्याशीही मनमोकळ्या गप्पा झाल्या. स्टार माझाचे निवेदक प्रसन्न जोशॊही भेटले. मग आमच्या स्टार माझाच्या बक्षीस समारंभाच्या आठवणी निघाल्या.
त्यानंतर कार्यक्रम थोडा उशीरा म्हणजे साडेपाचला सुरु झाला. कांचनने अतिशय उस्फुर्तपणे प्रास्ताविक सादर केले. त्यात हा मेळावा घेण्यामागची मूळ संकल्पना, त्यानंतर त्यावर घडत गेलेला विचार विनिमय, पूर्वतयारी,एका अनामिक प्रायोजकाने उचललेला समारंभाच्या संपूर्ण खर्चाचा भार इत्यादि विविध अंगांवर तिने सविस्तर निवेदन केले. त्यानंतर महेंद्रजींनी उपस्थितांचे स्वागत केले ...आणि मग वैयक्तिक ओळखींचा कार्यक्रम सुरु झाला.
एकेक जण माईकसमोर येऊन आपली थोडक्यात ओळख करून देत होता/होती. ह्यामध्ये सर्वात लहान जालनिशीकार ’आर्यन’ पासून ते ७१ वर्षांचे आजोबा असे एकूण ७०-७५ जणानी हजेरी लावली. महाराष्ट्र शासनातील सनदी अधिकारी श्रीमती लीना मेहेंदळे ह्यांच्यासारख्या एका वेळी ३२ जालनिश्या लिहिणार्या विदूषीपासून ते एकुलती एक जालनिशी लिहिणार्या सर्व जुन्या नव्या लोकांनी आपापली ओळख,आपल्या जालनिशीचा विषय इत्यादींची माहिती करून दिली.
हा कार्यक्रम सुरु असतानाच खानपान सेवाही सुरु झाली होती. बटाटे वडा,कटलेट आणि कॉफी असा मस्त बेत जमून आला होता. सगळे पदार्थ अर्थातच चविष्ट होते...हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
ओळख-परेड झाल्यावर मग काही जणांची एकीकडे जालनिशी लिहिण्याच्या बाबतीतल्या वैयक्तिक समस्या, प्रताधिकार कायदा वगैरेसंबंधी चर्चा सुरु होती तर दुसरीकडे इतर सदस्यांची आपापसात चर्चा, गप्पा वगैरे सुरु होत्या.
कार्यक्रम संपत असतानाच अमेरिकेहून हेरंब ओकचा भ्रमणध्वनी आला. त्यानेही मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आणि अशा तर्हेने संमेलनात हजेरीही लावली. त्याच्या आणि अपर्णाच्या वाटणीचा खाऊ कुणी खाल्ला...माहीत नाही. ;)
शेवटी हजर असणार्यांची गटागटाने छायाचित्र काढण्यात आली....आणि मग ह्या मेळाव्याचे सूप वाजले.
ह्या मेळाव्यात मला सारिका खोत ही माझे लेखन आवर्जून वाचणारी वाचक भेटली. :)
मी घरी पावणे दहाला पोचलो. आजचा दिवस खूपच आनंदात गेला.
बाकी सविस्तर आणि सचित्र वृत्तांत इतरजण लिहितीलच....हा होता प्राथमिक वृत्तांत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३१ टिप्पण्या:
मस्तच देका. एकदम धावता वृत्तांत आणि कमी वेळात लिहेलात. मस्तच. त्याबध्दल अभिनंदन. आता इतरांचेही वृत्तांत वाचूच.
काय करणार...तुम्हा सर्वांची उत्सुकता किती ताणायची ना? :)
काका, एकदम मस्तच लिहिला आहात. धावता आढावा झक्कास..
हो आणि तो माझा आणि अपर्णाचा खाऊ कोणी खाल्ला टो प्रश्न आहेच !!
धन्यवाद हेरंब.
उद्या विचार रोहनला. ;)
काका, धावता आढावा झक्कास..
मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेलाव्याचे सुन्दर वर्णन केले आहे ... ! एकुणच कार्यक्रमाला उपस्थित राहून मजा आली ! धावता आढावा मस्तच आहे !
- निनाद गायकवाड
धन्यवाद सचिन आणि निनाद.
आता तुम्ही दोघांनीही जरूर लिहा...तुमच्या नजरेतून पाहू द्या तो सोहळा आम्हाला.
००७ बॉन्ड देव :)
खूप मस्त लिहलय देवा...
देवकाका, खूप खूप धन्यवाद. आढावा मस्तच. मेळाव्याला मनाने उपस्थित होतोच.:)
खरयं आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला हा मेळावा…पण आता भारतात आलो की गाठणार तुम्हाला नक्की…. :)
tanvi
सुहास,भाग्यश्री,तन्वी धन्यवाद!
भाग्यश्री, तुमच्यासारख्या असंख्य हितचिंतकांमुळेच मेळावा निर्विघ्न पार पडला.
तन्वी,जरूर ये भेटायला.
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.
मस्तच... मजा आली असणार.
खरंच मजा आली पंकज. पण तू कुठे हरवलास? येणार होतास ना?
देव साहेब, वृत्तांत एकदम मस्तच...!
अजून फोटो पाहिजे होते. गप्पा करतांना. वडे खातांना. वगैरे असे. पण वृत्तांत एकदम आपल्या स्वभावासारखा...स्वीट.
धन्यवाद बिरुटेसाहेब.
छायाचित्र मी दोनतीनच काढलेत.
आता इतरलोक त्यांच्या वृत्तांतात देतीलच...नाही दिली तर मग मी त्यांच्याकडून घेऊन इथे चढवीन.
तुमच्या क्रमांकाकडे लक्षच गेल नाही माझ..मस्त बॉंण्ड जेम्स बॉण्ड...वॄत्तांत छान मांडला आहे...मी सुदधा आपल्या परीने सादर केला आहे वॄत्तांत,जमल्यास भेट द्या...
जोरदार एकदम काका,
मस्तच झाला असणार कार्यक्रम. सुहासचे फोटोही पाहिले....खूप मिस केलं सगळं....
ज्यांच्याशी एवढ्या गप्पा मारतो त्यांना प्रत्यक्ष भेटायला खुपच धमाल आली.
सोनाली केळकर
देवेंद्र,विद्याधर आणि सोनाली धन्यवाद.
देवेंद्र, अरे मीही तो क्रमांक पाहून चक्रावलो. ;)
विद्याधर, आम्हालाही तुझ्यासारख्या आपल्या रोजच्या गप्पांतल्या मित्रांची गैरहजेरी विशेषत्वाने जाणवली
सोनाली तुम्हा तिघांना एकत्र भेटून खूप बरं वाटलं.
पिल्लूबद्दल काय सांगू...खूपच आवडलं. :)
छान! वृत्तांत वाचून मस्त वाटले. पुढच्या वेळी तरी हजर राहण्याचा योग येतो का पाहू!
येईल. जरूर येईल.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...सीताराम.
काका, माझी संधी पुन्हा हुकली. स्टार माझाच्या पुरस्कार वितरणाला ऑफिस कामामुळे येता आले नाही, आणि आता आजारी असल्याने मेळाव्याला येता आले नाही. असो. आता आम्हीच काही तरी करून तुम्हा लोकांना एक दिवस मुंबईबाहेर एकत्र करतो. मेळाव्यात काय झाले त्याचा वृतांत दिल्याबद्दल आभार.
या मेळाव्यास आल्यामुळे अनेक नवीन ओळखी झाल्या. आपल्याशी ही पहिल्यांदाच बोलणे झाले.
धन्यवाद
आपला
अमोल केळकर
प्रमोदजी
००७ - एकदम भारी नंबर मिळवलात की, तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेलसा! :)
वर्णन तर अप्रतिमच. आख्खा कार्यक्रम डोळ्यांसमोर उभा राहिला.
येऊ न शकल्याबद्दल हुरहुर वाटतीय आता.
-विवेक.
विजयसिंह, अमोल आणि विवेक आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
विजयसिंह, आपल्याला भेटण्याची मलाही उत्सुकता आहेच..बघू कधी योग येतोय भेटीचा.
अमोल, मलाही तुला भेटून आनंद झाला.
विवेक, काय सांगता? ००७ हा क्रमांक माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसा? अहो पण आजूबाजूला तर कुणी मदनिका नव्हत्या हो माझ्या. ;)
Hallo 007,
देवबाप्पा नमस्कार. तुमचा एकदम नेटका वृतांत वाचून क्षणभर मी ही तिथेच घुटमळतोय असेच वाटत होते. तसेही शरीराने इथे पण मनाने तिथे अशीच माझी अवस्था झालेली होती. मेळावा इतका सुंदर झालेला वाचून व काही प्रमाणात पाहून मनापासून आनंद झाला. असेच मेळावे वारंवार होवोत व ही चळवळ पुढे पुढेच जावॊ हीच इच्छा !
पेठेसाहेब धन्यवाद.
तुमची अनुपस्थिती नक्कीच जाणवली.
मस्त काका...खरंच मस्त...
सर्वांना भेटून खुप मजा आली.
महेश धन्यवाद.
आनंद मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला.
वा छान आहे वृत्त्तांत.
टिप्पणी पोस्ट करा