माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१२ ऑक्टोबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१३

सहावीत असतानाच जानेवारीत माझी मुंज झाली. दादरला ब्राह्मण सहाय्यक संघात सामुदायिक मुंजीचा कार्यक्रम होता. तिथेच माझीही मुंज लागली. माझे वडील वाह्यात खर्चाच्या विरुद्ध होते. एक संस्कार म्हणून मुंज करायचीच आहे तर ती अशी सार्वजनिक असली म्हणून कुठे बिघडते असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे आम्हा तिघा भावांच्या मुंजी ह्या अशाच सार्वजनिक पद्धतीनेच झालेल्या होत्या.

                                                      सगळ्यात बुटका....उजवीकडचा...तो मीच.

मुंजीत इतर बटुंबरोबरच माझाही गोटा केला गेला. डोक्यावर एक छोटासा घेरा आणि शेंडी सोडली तर अगदी तुळतुळीत गोटा करून माझे मऊरेशमी केस(ज्याचा मला खूप अभिमान होता) पार नाहीसे करून जणू माझा अहंकारच ठेचला होता.त्या तशा गोटा केलेल्या अवस्थेत शाळेत जायला लाज वाटत होती म्हणून डोक्यावर एक पी-कॅप घालून मी शाळेत गेलो.

माझ्या मुंजीची आणि त्यात केलेल्या चमन गोट्याची बातमी आधीच वर्गात पोचली होती. सगळे जण "ताजी-वाशी-आजी" करण्यासाठी टपलेलेच होते. मी ही "रामराम" म्हणून ते टाळण्यासाठी मोठ्या तयारीत गेलो.वर्गात शिरतानाच जोरात "रामराम" म्हणायचे म्हणजे कोणी मारणार नाही असे मनाशी ठरवतच शाळेत पोचलो; पण सगळेच "ओंफस" झाले. वर्गात शिरण्या अगोदरच एका दोघांनी मला पकडले, माझी टोपी काढली आणि सणसणीत "ताजी-वाशी-आजी "(टकलावर जोरात टपल्या आणि डोक्याच्या मागच्या भागावर सणसणीत चपराक) करून घेतले. त्यांच्या त्या माराने मी विद्ध झालेलो असतानाच आणखी काही जणांची कुमक माझ्यावर चालून आली आणि त्यांनी मला धरून वर्गात नेले. वर्गात नेतानाही मार पडतच होता. त्या दिवशी "रामराम" बोलता आलेच नाही पण "मरामरा"(मरेस्तोवर) मार मात्र खायला लागला. माझा चेहरा, गोटा सगळे लाल लाल होईपर्यंत मुलांनी मला यथेच्छपणे टपल्या मारून मारून रडकुंडीला आणले होते. शाळा भरल्याची आणि त्यानंतर प्रार्थनेसाठी घंटा वाजली तेव्हाच कुठे मला श्वास घेण्याची फुरसत मिळाली.त्या दिवशी त्यानंतरही अगदी दिवसभर,संधी मिळेल तशी प्रत्येकाने मला टपल्या मारण्याची संधी साधून घेतली. कुठून झाली गोटा करण्याची दूर्बुद्धी असे झाले; पण माझ्या हातात कुठे काय होते?

त्यानंतर चारेक दिवसांनी २६ जानेवारी ह्या प्रजासत्ताक दिनानिमित शाळेत झेंडावंदनाला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग!

झेंडावंदनासाठी आम्हा मुलांना २०-२० मुलांच्या रांगा करुन उभे केले होते. आज "एडी मिलाव" आणि "कदम खोल" वगैरे आज्ञा नेहमीच्या शारिरीक शिक्षणाच्या सरांऐवजी खुद्द आमचे मुख्याध्यापक देत होते. झेंडावंदनाच्या आधी झेंड्याला "वंदन" करण्याची रंगीत तालीम ते स्वतः जातीने घेत होते. हे करत असताना त्यांनी मध्येच एकदम "ए! तू! तू इकडे ये"! असे म्हटले. ते कुणाला उद्देशून बोलले हे काही कळलेच नाही. निदान मला तरी नसावे असे मला वाटले.

इतक्यात सर स्वतः रांगेत घुसले आणि चालत चालत नेमके माझ्यापाशी येऊन थांबले.माझ्या पाठीत एक रट्टा मारून म्हणाले "इतका वेळ काय हवेशी बोलत होतो काय? लक्ष कुठेय तुझे? आणि ही टोपी कशाला घातलेय? काढ ती"!मी आपले "सर,माझी मुंज झालेय...... (नुकतीच, म्हणून गोटा केलाय. सगळी मुलं टपल्या मारतात म्हणून मी टोपी घातलेय..... हे सगळे मनातल्या मनात)माझे बोलणे पूर्णपणे ऐकून न घेता त्यांनी ती टोपी जप्त केली. वर एक सणसणीत टपली हाणली आणि पुन्हा पुढचे आदेश द्यायला गेलेसुद्धा. त्यांची पाठ वळताच एक दोघांनीही आपले हात साफ करून घेतले. झाल्या प्रसंगाने माझा अपमान झाला असेच मला वाटले. झालेल्या अपमानाने आणि नाहक पडलेल्या माराने मी अक्षरशः रडवेला झालो होतो. कसेबसे एकदा झेंडावंदन उरकले आणि आम्ही वर्गात गेलो.

थोड्याच वेळात शिपाईदादा आले "बोलावलेय" असा मुख्याध्यापकांचा निरोप घेऊन. आता पुढे काय वाढून ठेवलेय ह्या भीतीने मी घाबरत घाबरत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. पण तसे काही विपरीत घडले नाही. त्यांनी माझ्याकडे हात पुढे करून माझी टोपी परत केली आणि सांगितले की झेंडावंदनाला पुन्हा टोपी घालू नकोस म्हणून! मला कळेना टोपी घातल्याने काय फरक पडतो ते; पण विचारण्याची हिंमत होत नव्हती. तरीही सगळे धैर्य एकवटून मी विचारलेच. "सर, रागावणार नसाल तर एक विचारु?"सरांनी एकवार माझ्याकडे रोखून बघितले आणि म्हणाले, "विचार! नाही रागावणार!"

"सर! मोठमोठे नेते आणि मंत्री झेंडावंदनाच्य वेळी टोप्या घालतातच ना! मग मी घातली तर तुम्ही का रागावलात?"सर किंचित हसले आणि माझेही दडपण दूर झाले. ते म्हणाले, "अरे गांधी टोपी हा आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग आहे. ती टोपी खादीची असते आणि खादीचा स्वराज्याच्या कल्पनेशी जुळलेला संबंध म्हणजे कधीच न तुटणारा धागा आहे. मंत्री जे खादीचे कपडे वापरतात तो त्यांचा गणवेश आहे आणि गांधीटोपी हा त्याचाच एक अविभाज्य भाग आहे; पण ही तू घातलेली टोपी आपली नव्हे. ती परदेशी आहे आणि ती तुझ्या गणवेशाचा भागही नाही. झेंडावंदनाच्या वेळेस गणवेशाखेरीज दुसरी कोणतीही गोष्ट अंगावर असता कामा नये असा संकेत आहे आणि म्हणूनच मी तुला ही टोपी काढायला लावली".

सरांच्या समोर मी मान डोलावली खरी पण मला तरी ते काही फारसे पटले नाही. हीच गोष्ट न मारता त्यांनी मला आधी सांगितली असती तर कदाचित पटलेही असते. असो, एकूण काय तर तुळतुळीत गोट्यामुळे मुलांकडून आणि टोपीमुळे सरांकडून मार खाणे हे बहुधा विधिलिखित असावे.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: