१३ जुलै २०११. मुंबईत तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉंबस्फोट घडवून आणले. त्यात जितकी जीवित व वित्तहानी झाली त्यापेक्षाही लोकांमध्ये एकप्रकारचे जे नैराश्य आलंय ते मला तरी जास्त त्रासदायक वाटतंय. अब्जावधी लोकसंख्येच्या ह्या देशात एकही असा नेता असू नये की जो अशावेळी सगळ्या लोकांना धीर देऊन पुन्हा असे काही घडू नये म्हणून योग्य ते उपाय योजू शकेल? अपराध्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना आणि त्यांच्या संघटनांना जरब बसेल अशी शिक्षा तातडीने करू शकेल? देशात लोकशाही पद्धतीने निवडून दिलेलं सरकार आहे,सक्षम अशी सैन्यदलं आहेत,उत्तम आणि प्रशिक्षित गुप्तवार्तादलं , पोलीसदलं आहेत,न्यायसंस्था आहेत..पण ह्यापैकी कुणीच ही जबाबदारी उचलायला तयार नाहीये...सगळेजण आपापली जबाबदारी झटकून...लोकांनी शांत राहावे(आणि किड्यामुंग्यांसारखे मरत राहावे)...असली आवाहनं करत आहेत....झालंय तरी काय ह्या देशाला?
ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज,राणा प्रताप इत्यादि वीरांनी आपल्या पराक्रमाने बलाढ्य शत्रूला खडे चारले...त्याच आपल्या भारत देशाला शेजारचे काही क्षुल्लक देश,अतिरेकी वेठीस धरू शकतात आणि आपण बलाढ्य असूनही त्यांची मस्ती जिरवू शकत नाही...हे खरंच अतर्क्य आहे....सद्यस्थितीत हे खरं जरी असलं तरी मुळीच मानवणारं नाहीये...म्हणूनच आता नुसता विचार नव्हे तर कृती करायची वेळ आली आहे...आता नक्कीच ह्यावर तातडीचा तोडगा काढायलाच हवाय....काय बरं करता येईल तातडीने?
मला काही उपाय सुचताहेत...सर्वात पहिला आणि झटपट उपाय म्हणजे...अफजल गुरु आणि कसाब, ह्या,आपल्या न्यायसंस्थेने दोषी ठरवलेल्या आणि फाशीची सजा फर्मावलेल्या दहशतवाद्यांना तातडीने... कमाल एका आठवड्यात..फाशी दिलीच पाहिजे...अशा तर्हेने तातडीने फाशी देण्याने काही गोष्टी साधल्या जातील...
१) सीमेपल्याडच्या राष्ट्रांना,त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना आणि आपल्याच देशातील घरभेद्यांना योग्य तो संदेश जाईल...तो असा...अशा तर्हेने पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांची मुळीच गय केली जाणार नाही. त्यांचा झटपट निकाल लावला जाईल.
२) जनतेमध्ये, सरकार आणि राज्यकर्त्यांप्रति विश्वास निर्माण होईल.
३) आपले पोलिस खाते..ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेचा प्रचंड ताण आहे, त्यांना,त्यांनी केलेल्या परिश्रमाचे, तपासकार्याचे..ज्यात गुंतागुंतीचे पुरावे गोळा करणं, खटला उभा करणं इत्यादि बाबतचे समाधान मिळेल...... अंतिम फळ त्यांना अशा तर्हेने चाखता येईल...आणि ह्यामुळे त्यांच्या मनोधैर्यात अजून वाढ होईल. त्यामुळे आपल्या कामाप्रति त्यांची आस्था अजून वाढेल...एरवी होतंय काय तर...इतके सगळे करूनही,न्यायसंस्थेने न्याय करूनही हे दहशतवादी आपल्या समोर वर्षानुवर्षे जीवंत राहून सरकारी पाहूणचार झोडताहेत... तर मग इतका सगळा अट्टहास कराच कशाला? असा विचार येऊन पोलिसांमध्येही सुस्ती, नैराश्य येऊ शकतं...
आता काही दुसरे उपाय...आपल्या न्यायप्रक्रियेत काही आमुलाग्र बदल करावे लागतील...लोकसभा आणि राज्यसभेत त्यासंबंधीचे प्रस्ताव पारित करून घेऊन त्याचे लगेच कायद्यात रुपांतरण करणे...हे शक्य वाटत नसेल तर त्यासाठी वेळप्रसंगी वटहुकुमाचाही वापर केला तरी चालेल...पण हे बदलही कमाल महिन्याभराच्या अवधीत व्हायला हवेत....अर्थात हे सगळे भविष्यातल्यासाठी(भविष्यात असे गुन्हे घडलेच तर)आहे....पण हेही बदल कमाल महिन्याभरात व्हायला हवेत.
हे बदल कोणते असावे?
१) देशद्रोहाच्या खटल्यासंदर्भात खास कोर्ट स्थापन व्हावे.
२)परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही खटले दाखल करून घेतले जावेत.
ह्यातले खटले कमाल एक आठवड्यात उभे राहिलेच पाहिजेत.
३)गुन्हेगाराला वकील दिला जाणार नाही. त्याचे निरपराधित्व त्यानेच सिद्ध करायला हवे.
३) कमाल १५ दिवसात निकाल लागून त्याची अंमलबजावणी कमाल आठवडाभरात व्हायलाच हवी.
४) ह्या शिक्षेविरुद्ध कोणतेही अपील करण्याची तजवीज असू नये.
५) देशद्रोहाला अजिबात दया दाखवली जाता कामा नये. देहदंडाची-फाशीची शिक्षाच सुनावली जावी.
मंडळी, आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या दहशतवाद्यांना जेरीस आणायचे असेल तर तातडीने हे अत्यंत कडक असे उपाय अंमलात आणायलाच हवेत.
आता असे गुन्हे शक्य तो घडूच नयेत म्हणून काही दीर्घकालीन उपाय...अंतर्गत सुरक्षेसाठी.. ज्यात राज्य आणि केंद्रिय पोलीसदलं आणि गुप्तवार्तादलं ह्यांच्यात समन्वय साधला जाण्यासाठी ह्या सर्व दलातील निवडक व कर्तृत्ववान अधिकार्यांची...गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून वेळोवेळी देशातील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन वेळोवेळी योग्य ती कारवाई तातडीने केली पाहिजे.
लोकप्रबोधनाचा कार्यक्रम राबवणे...आता जनतेचाही ह्या कार्यात सहभाग असलाच पाहिजे नाही का? सरकार , पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरच सगळा ताण का बरे?
ह्यासाठी स्थानिक मोहल्ला समित्या स्थापन करून ,त्या त्या विभागात काही अनुचित घटना घडत असतील,घडण्याची शंका असेल तर नेमकं काय करावं ह्याबाबत पोलिसांकडून नागरिकांचं प्रबोधन केलं जावं..जेणेकरून पोलिसांवरचा ताण काही प्रमाणात तरी कमी होईल.
युद्ध...युद्ध हा शेवटचा पर्याय आहे...भावनेच्या आहारी जाऊन अथवा तडकाफडकी त्याबाबत निर्णय घेणे कधीही उचित होणार नाही...म्हणूनच वर सांगितलेले उपाय आपण अत्यंत तातडीने केले तर आपल्याच देशात येऊन आपल्या लोकांना मारण्याचे दु:साहस करायला सहसा कुणीही परकीय धजावणार नाही....
अरे हो! पण हे करणार कोण? सद्द्याच्या राज्यकर्त्यांमध्ये,समस्त राजकीय पक्षांमध्ये इतकी हिंमत,एकी आहे काय? त्यांना खरोखर ह्या देशातील आम जनतेची किंमत आहे काय? त्यांच्यात हिंमत नसेल तर जनमताचा रेटा त्यांना तसे करायला भाग पाडेल काय? आणि तसे होण्यासाठी हे जनमत संघटित होईल काय? त्यासाठी कोण पुढाकार घेणार? आहे का कुणी माय का लाल?
छे बुवा! विचार करूनच दमलो...
पुन्हा पहिले पाढे पंचावन!
मुंबईच्या स्पिरिटला...म्हणजे भूताला हो...आपला सलाम!
इतकंच हो...इतकंच म्हणणार आपले नेते ...फारतर एकदोन लोकांना बळीचे बकरे बनवले जाईल...आणि...आणि...
छ्या! पुन्हा हरदासाची गाडी आली मूळपदावर!
आता पुढे काय?????????????
६ टिप्पण्या:
कसलं आलयं मुंबईचं स्पिरीट ? हातवरचं पोटं ...काय करतील बिचारे...असंही मरायचंच....नाहीतर उपासमारीने मरायचंच....नाहीच आलं मरण तर निदान उपासमार तरी टळेल.
बाकी लेखात जे काही लिहिलंय ते दिवास्वप्नंच बरं का....अहो थोर लोक सांगून गेलेत....बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है....त्याचं काय मनावर घ्यायचं एवढं....मागील पानावरून पुढे चालू !!!
अगदी खरंय श्रेया! हातावर पोट असणार्यांना मरणही थांबवू शकत नाही...त्यांना हातपाय हलवल्याशिवाय कोण खायला घालणार? कदाचित ह्या हालापेक्षा मरण बरं म्हणूनच मुंबईकर ’सरपे कफन बांधके’ जातात बिचारे कामाला...दुसरा पर्यायच काय आहे त्यांना?
बाकी मोठ्या लोकांसाठी आम जनतेने मेलंच पाहिजे...त्यामुळेच आमजनतेचं मरण हे त्यांच्यासाठी अत्यंत क्षुद्र अशी घटना असते...ते नालायक मिडियावाले उगाच त्यांचं लक्ष तिथे वेधून कारण नसतांना त्यांच्या सुखात व्यत्यय आणत असतात.
दिवास्वप्नं पाहण्या व्यतिरिक्त आपण करू तरी काय शकतो म्हणा? ;)
:(
परत सगळं कागदोपत्रीच व्हायची शक्यता जास्त!!
अशक्य आहे सगळं!
होय आनंद,दूर्दैवाने हे खरंय! आपल्या लोकांना फक्त कागदी घोडेच नाचवता येतात. :(
प्रत्यक्षात काहीच घडण्याची शक्यता नाहीये.
खरंतर अशा घटना घडल्यानंतर बोलण्या-लिहण्यासारखं भरपूर असतं पण हे सर्व घडण्यामागे सिस्टिममधल्या प्रत्येक घटकाचा स्पर्श या स्फ़ोटाला असतो,.......अन तेच बदलणं महत्वाचं आहे
अमित खरं आहे तुझं म्हणणं...
पण सगळ्यात आधी आणि तातडीने...लोकांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात..मी त्याबद्दल लिहिलंय....बाकी कायमस्वरूपी उपाय तर, असे काही होऊ नये म्हणून योजायचे असतातच..दूर्दैवाने आपलं सरकार अजूनही जागं होत नाहीये आणि आपण प्रजाजनही त्यांना जागे करू शकलेलो/शकत नाही...म्हणून तर प्रत्येक हल्ल्यानंतर असे कळवळून सांगावेसे वाटते.
टिप्पणी पोस्ट करा