माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ मे, २०११

चंशिकुम! १

चंशिकुम!
काय म्हणता? हा काय प्रकार आहे?
सांगतो. अगदी सोप्पं आहे हो. हा काही प्रकार वगैरे नाहीये. ही आहेत चार ठिकाणांच्या नावांची आद्याक्षरे.
चं-चंडीगढ, शि-शिमला,कु-कुलु आणि म-मनाली.
नुकताच मी ह्या चार ठिकाणांचा एक धावता दौरा करून आलो...त्याबद्दल काही लिहीन म्हणतोय.
चार रात्री आणि पाच दिवसांचा असा हा छोटेखानी दौरा २६ मे २०११ ते ३० मे २०११ ह्या दरम्यानचा होता. आता आपण त्याबद्दल जमेल तसे सविस्तर जाणून घेऊया.

मंडळी,२६ तारखेला सकाळी पावणेसातला घरातून निघालो.रिक्षाने विमानतळावर पोचलो तेव्हा साडेसात वाजले होते.विमान उड्डाणाची वेळ होती सकाळी ९ वाजताची.आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होतो त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक असे दोन्हीही भाव मनात होतेच. म्हणजे तसा मी विमानात पहिल्यांदाच बसणार नव्हतो म्हणा...पण उडणार मात्र पहिल्यांदाच होतो. चक्रावलात ना? मी हे असं काय वेड्यासारखे बोलतोय म्हणून.सांगतो हो,जरा धीर धरा.
त्याचं काय आहे की सांताक्रुझला जुहूच्या लायन्स क्ल्बच्या बागेत एक सिमेंटचे विमान बनवलेले आहे. त्यात एकदा, लहानपणी...हो,माझ्याच...त्या विमानाच्या नव्हे...बसलो होतो. बराच वेळ वाट पाहिली पण ते विमान कधीच उडाले नाही. :(
म्हणून म्हटले की विमानात दुसर्‍यांदा बसलो पण उडणार पहिल्यांदाच होतो म्हणून. ;)

विमानतळावर पोचल्यावर सगळ्यात पहिले ते जे काही सोपस्कार असतात ना...सामानाची/आपली तपासणी,विमानात प्रवेशासाठीचा पास वगैरे वगैरे ते सगळे झाले. विमान उड्डाणाला अजूनही बराच अवकाश होता आणि करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून मग निवांत बसलो.....

कंटाळा आला होता बसून, म्हणून मग थेट चौकशी कक्षात गेलो...वैमानिक..म्हणजे चालक कोण आहे ते विचारलं ..त्याला भेटलो...त्याचा विमान चालकत्वाचा परवाना नीट तपासून पाहिला...चालक बिचारा घाबरलेला दिसला. मी विचारलं त्याला....का रे बाबा,का घाबरला आहेस?

तर तो म्हणाला...काय सांगू काका,हे माझे पहिले व्यावसायिक उड्डाण आहे त्यामुळे मनावर खूप दडपण आलंय. काय करावं ते अजिबात सुचत नाहीये.

मी त्याच्या पाठीवर थोपटत म्हटलं...त्यात काय घाबरायचं...बघ मी देखिल पहिल्यांदाच उडणार आहे. मी घाबरलोय का? जे काही इतरांचं होईल ते आपलं होईल. तेव्हा तू उगाच घाबरू नकोस.मी सांगतो तुला काय करायचं ते....

सांगा,सांगा काका,लवकर सांगा,मी काय करू ते.

अरे,खूप सोप्पं आहे रे. तू ना, आधी चाकात हवा व्यवस्थित भरलेय की नाही ते पाहा. नंतर पेट्रोल...हं आपलं ते इंधन रे...पुरेसं भरलंय की नाही ते तपास. झालंच तर, ब्रेक,क्लच देखिल नीट तपासून पाहा. मागचे,पुढचे दिवे नीट लागताहेत की नाही ते तपासून पाहा...सकाळचं उड्डाण आहे त्यामुळे तसा भरपूर प्रकाश आहे. तेव्हा पुढचे दिवे एकवेळ नाही चालले तरी हरकत नाही पण ते मागचे लाल दिवे मात्र नीट चालायला हवेत बरं का! नाही तरी अजून उड्डाणाला बराच वेळ आहे, तर तू आपला विमान घेऊन एक चक्कर मारून ये ना, म्हणजे तुझा आत्मविश्वास वाढेल.

आयला,काका, काय मस्त आयडियाची कल्पना दिलीत. माझ्या हे डोक्यातंच नाही आलं. चला मी लगेच जाऊन येतो.

अरे, अजून एक ...उगाच खिडकी बाहेर डोकं,हात वगैरे काढू नकोस बरं...आणि जरा कडंकडंनच जा...उगाच कुठे ठोकशील नाही तर!

हो काका, तुम्ही सांगितलंत ते बरं केलंत. नाहीतरी रहदारी असली की मला विमानंच काय पण साधी स्कुटरसुद्धा नीट नाही चालवता येत...मी समोरच्याला जाऊन धडकतोच.पण आता तुम्ही दिलेल्या सुचना मी नीट लक्षात ठेवतो म्हणजे मला अडचण येणार नाही...तुमच्यासारखा गुरु आधीच का भेटला नाही मला, हेच कळत नाही. आजवर इतकं व्यवस्थितपणे कुणीच मला सांगितलं नव्हतं.
विमान चालकाला इथे गहिवरून आलं होतं.

त्याचा उत्साह आणि आवि वाढवण्यासाठी मी म्हटलं...वत्सा,भिऊ नकोस.मी तुझ्या पाठीशी आहे.

आणि तो गेला देखील, एक चक्कर मारायला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: