माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ सप्टेंबर, २००९

दूरध्वनी!

सकाळी लवकर जाग आली. झटपट उठून आन्हिकं उरकली. प्रभातफेरीला जाऊन आलो. आल्यावर मस्तपैकी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत घेत वृत्तपत्र चाळलं. नंतर स्नान केले आणि कपडे चढवून बॅंकेची काम करायला बाहेर पडलो. बॅंकेत हीऽऽऽ गर्दी होती त्यामुळे घरी परतायला अंमळ उशीरच झाला. आल्या आल्या जेवण बनवले आणि मग स्वस्थपणे रवंथ करत पोटभर जेवलो. जेवण जरा जास्तच झाले त्यामुळे सुस्ती आली आणि हातावर पाणी पडताच केव्हा अंथरुणावर जाऊन आडवा झालो तेच कळलं नाही.

दूरध्वनीच्या कर्कश आवाजामुळे झोपमोड झाली.घड्याळात पाहिले तर दुपारचे दोन वाजले होते. म्हणजे मला आडवं पडून जेमतेम दहा मिनिटेच झाली होती. काय मस्त झोप लागली होती. मनातल्या मनात शिव्या मोजत धडपडत कसाबसा उठलो आणि दूध्व उचलला.
हॅलो,कोण बोलतंय....मी कंटाळलेल्या स्वरात बोललो.

अरे, मी जगूमामा बोलतोय. कसा आहेस?झोपमोड केली का रे तुझी?

नाही मामा. मी ठीक आहे ,तुम्ही कसे आहात? कुठून बोलताय?

अरे मी तुझ्या इमारतीच्या आसपासच आहे आत्ता.

अहो, मग या ना वर. निवांतपणे गप्पा मारूया.

नको रे, हेच बरं आहे. माझ्याबरोबर बरीच मंडळी आहेत.

मग त्यांनाही घेऊन या की.

अरे नको रे,ते सगळे घाईत आहेत. मी एकटाच निवांत आहे.तुझी हरकत नसेल तर आपण इथे असेच बोलत राहू.

हरकत नाही. बोला....

मग मी आणि जगूमामा बराच वेळ गप्पा मारत बसलो. जगूमामांनी बोलणं संपवलं आणि मी हुश्श केलं. आम्ही जवळजवळ दोन तास अखंडपणे बोलत होतो. आम्ही म्हणजे...प्रामुख्याने जगूमामाच बोलत होते. मी आपला...हो का! छान छान ! अरे वा! क्या बात है!....असंच काहीसं बोलत होतो.
बरेच दिवस जगूमामांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती पण आज ते इतकं भरभरून बोलले की मधल्या काळात काय काय झालं त्याचा सगळा पाढाच त्यांनी माझ्याजवळ वाचला होता.
जगूमामा नुकतेच काश्मीर ते कन्याकुमारी असा लांबवरचा प्रवास करून आले होते. भारतीय रेल्वेच्या अशा प्रकारच्या प्रवासासाठी असणार्‍या खास तिकिटाच्या साहाय्याने त्यांनी सलग महिनाभर प्रवास करून अख्खा भारत पिंजून काढलेला होता.


संध्याकाळी संगणकाशी चाळा करत बसलो होतो. इतक्यात दूध्व वाजला. मी तो लगेच उचलला आणि म्हटलं....हॅलो,कोण बोलतंय?

अरे मी विश्वास बोलतोय. सकाळपासून चार वेळा प्रयत्न करतोय पण तुझा दूध्व आपला नुसता वाजतोच आहे. कुठे गेला होतास?

अरे सकाळी मी बॅंकेत गेलो होतो पण पूर्ण दूपारभर तर घरीच होतो.

अरे दुपारी देखिल प्रयत्न केला पण तेव्हा तो व्यस्त असल्याचे दाखवत होता.

जाऊ दे रे. तू सांग कशाकरता आठवण काढलीस?

अरे हो. सांगतो. तुला जगूमामा माहिती आहेत ना? ते रोज बागेत भेटायचे आपल्याला...प्रभात फेरीच्या वेळी...

हो माहितीये. त्यांचं काय?

अरे ते आज गेले.

कुठे? काल-परवाच तर आले ना काश्मीर-कन्याकुमारी करून . मग आता लगेच पुन्हा कोणत्या दौर्‍यावर गेला म्हातारा?

अरे दौर्‍यावर नाही रे. त्यांनाच आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागच्या जागीच कोसळले ते. आज दुपारीच पोचवून आलो त्यांना. त्यासाठीच तुला फोन लावत होतो.

छट! काहीही फेकू नकोस. आज दुपारी चांगले दोन तास आम्ही दोघे बोलत होतो दूध्ववर.
ते सांगत होते,त्यांच्या बरोबर बरीच माणसे आहेत...ती घाईत आहेत पण मी अगदी निवांत आहे...वगैरे वगैरे...
ए बाबा, ऐकतो आहेस ना....हॅलो....हॅलो....हॅलो. विश्वास ...अरे ऐकतो आहेस ना?

पलीकडे काहीतरी धाडकन्‌ पडल्याचा आवाज आला........