माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ एप्रिल, २०१३

वसंतोत्सवाला शिशिराची गर्दी.

 दिनांक ७ एप्रिल २०१३ रोजी ’वसंतोत्सव’ नावाचा एक कार्यक्रम दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झाला त्यासंबंधीचा हा एक वृत्तांत...
साहित्य, नाटक-सिनेमा, कथा-कविता, गीत-संगीत वगैरे विषयात विशेष कामगिरी केलेल्या आणि नावात ’वसंत’ असलेल्या अशा कैक मान्यवरांच्या कलेचा परामर्ष घेणारा असा हा कार्यक्रम होता.....सूत्रसंचालन आणि संगीत संयोजन अनुक्रमे प्रसिद्ध नाटककार, लेखक श्री.सुरेश खरे  आणि  संगीतकार श्री. कमलेश भडकमकर ह्यांनी केले .

कविता-वाचन, कथा-वाचन, नाट्यप्रवेश-वाचन अणि गीतगायन अशा विविध स्वरूपात हा कार्यक्रम सादर करण्यात आला....

काव्यवाचनात, सर्वश्री वसंत बापट,  वसंत आबाजी डहाके, वसंत सावंत इत्यादि कवीच्या कविता सादर करण्यात आल्या...सादरकर्ते होते सुरेश खरे, इला भाटे  आणि रजनी वेलणकर....कुणाचेही काव्यवाचन फारसं प्रभाव पाडणारं वाटलं नाही.

कथावाचनात, वपु उर्फ वसंत पुरुषोत्तम काळे ह्यांची ’निगेटिव्ह’ ही कथा इला भाटे ह्यांनी अतिशय समर्थपणे वाचली.

वसंत कानेटकर ह्यांच्या ’प्रेमा तुझा रंग कसा’ ह्या नाटकातल्या एका प्रवेशाचे नाट्यवाचन सुरेश खरे, रजनी वेलणकर आणि शर्वरी पाटणकर ह्या तिघांनी अतिशय नेटकेपणे  केले..त्यात रजनी वेलणकरांनी छानच रंग भरले.

कवी वसंत बापट, वसंत निनावे, वसंत सबनीस, वसंत उर्फ राजा मंगळवेढेकर, डॉ.वसंत अवसरे ह्या टोपण नावाने काव्य लिहिणार्‍या शांता शेळके, तसेच संगीतकार सर्वश्री वसंत देसाई,  वसंतकुमार मोहिते, वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत आजगांवकर , वसंतराव देशपांडे इत्यादिंची काही गीतं मधुरा कुंभार आणि श्रीरंग भावे ह्या दोघांनी अतिशय सुरेलपणे सादर केली.

वसंत बापट...१)गगन सदन तेजोमय २) अजून त्या झुडुपांच्या मागे
वसंत निनावे... चुकचुकली पाल एक कालचक्र क्षण चुकले
वसंत सबनीस... ह्यांची एक गाजलेली लावणी सादर केली गेली..ज्याची मूळ चाल बदलून कमलेश भडकमकर ह्यांनी लावलेल्या चालीत ती गायली गेली...चाल खास नाही वाटली आणि त्यामुळे त्या लावणीचे शब्द लक्षातच नाही राहिले.
वसंत उर्फ राजा मंगळवेढेकर...असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
डॉ.वसंत अवसरे(शांता शेळके)+वसंत पवार...रूपास भाळलो मी
वसंत पवार...१)एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात २) सोळावं वरीस धोक्याचं
वसंत प्रभू...  १)मधु मागशी माझ्या सख्या परि २) मानसीचा चित्रकार तो....
वसंत देसाई... १) देव जरी मज कधी भेटला २) सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ३) हृदयि वसंत फुलतांना....
वसंत आजगावकर....आली कुठुनशी कानी टाळ मृदुंगाची धून
वसंतकुमार मोहिते....खुलविते मेंदी माझा रंग गोरापान गं...
वसंतराव देशपांडे......१)बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात २) घेई छंद मकरंद

ह्या कार्यक्रमाची सांगता  मंदारमाला नाटकातल्या  बसंत बहार रागातील ’बसंत की बहार आयी’ ह्या पदाने झाली.

स्त्री आवाजातली सगळी गाणी मधुरा कुंभार हिने अतिशय उत्तम तर्‍हेने पेश केली. तसेच पुरुष आवाजातील सगळी गाणी श्रीरंग भावे ह्यांने आपल्या सुमधुर आवाजात आणि अतिशय सराईतपणे पेश केली...घेई छंद मकरंद ह्या पदाला त्याला ’वन्स मोअर’ मिळाला....शेवटचे वसंतकी बहार आयी हे पदही त्याने मोठ्या ताकतीने पेश केले.

काही तुरळक गोष्टी वगळता कार्यक्रम अतिशय नेटका झाला आणि ह्या कार्यक्रमाला रसिकांनी इतका उदंड प्रतिसाद दिला की दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा तो हॉल कमी पडला...खुर्च्या कमी पडल्या म्हणून शेवटी जाजमं अंथरून त्यावर लोकांना बसावं लागलं....

मध्यंतरापूर्वी सर्व कलाकारांचा सन्मानपुष्प देऊन सत्कार करतांना हॉलच्या विश्वस्तांनी म्हटलं होतं की...दादर-माटुंग्याच्या इतिहासात हा पहिलाच कार्यक्रम असेल की जो तुडुंब ’हाऊसफुल्ल’ झाला.

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की....कार्यक्रमाचे नाव जरी ’वसंतोत्सव’ असे होते तरी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावणार्‍यात काही तुरळक अपवाद वगळता सगळे ज्येष्ठ नागरिकच होते....म्हणूनच मला म्हणावेसे वाटले की...वसंतोत्सवाला  शिशिराची हजेरी.३ टिप्पण्या:

उसतोत्सव... म्हणाले...

नांव "वसंतोत्सव" असल्याने आलेले बहुतेक "उसंतबीर" असावेत, "शिसंतउत्सव" असता तर शरदाचे चांदणे कदाचित लाभले असते असे म्हंटल्यास वावगे ठरू नये...

कार्यक्रम "वसंतऋतूत" ठेऊन त्याचे नांव "शरदोत्सव" ठेवले तरी काहितरी वेगळे आहे हे सर्वांना कळण्यास हातभार लागू शकतो...

mannab म्हणाले...

हा कार्यक्रम खूपच श्रवणीय झाला . मला या वेळी एक गीत आठवतेय . " हिरवे पिवळे तुरे उन्हाचे … " - रतिलाल भावसार यांनी तर ते गायिलेले नव्हते ? कृपया माझ्या माहितीत भर टाकावी . हे गाणे मला कुठे मिळू शकेल ?
मंगेश नाबर

प्रमोद देव म्हणाले...

मनाब, ते गाणे वसंत आजगांवकर ह्यांनी गायलेले आहे..खालील दुव्यावर ते आपल्याला वाचता आणि ऐकता येईल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Hirave_Piwale_Ture_Unhache