माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ फेब्रुवारी, २०११

काळी बाहुली!

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.संध्याकाळचा, व्यायामशाळेतून मी परत येत होतो. तोच एक हाक माझ्या कानी आली.
देवसाऽऽब!
हाक ऐकून मी मागे पाहिले तर आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव प्रशांतभाई मला हाक मारत होते.
मी थांबलो. ते जवळ आले आणि सांगायला लागले...
आपको मालूम है , आज क्या हुवा?
नाही बुवा.का? काय झालं?
आज सुबह साडे छे बजे मुझे हिरेनभाईने फोन करके बोला... अपने बिल्डिंगमें तिसरे मालेपे किसीने एक पिनभरा काला पुतला और पिनयुक्त एक निंबू रखा हुआ है!इसके लिये वॉचमनही जिम्मेदार है. इसीलिये अभीके अभी वॉचमनको नोकरीसे निकाल दो.

अच्छा. मग? तुम्ही काय बोललात?

मैंने कहा...प्रशांतभाई सांगू लागले....आता पुढे मराठीतच सांगतो.
कुणीतरी तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या डॉक्टरच्या दरवाजाला ती काळी बाहुली आणि लिंबू लटकवलं होतं...डॉक्टरची बायको..तीही डॉक्टरच आहे...तिने ते दरवाज्यावरून काढून जिन्यातल्या जाळीजवळ ठेवलं.सकाळी हिरेनभाईंचा मुलगा क्लासला जातो,तो सहसा लिफ्ट न वापरता जिन्यानेच खाली उतरतो...त्याने हे पाहिले आणि आपल्या बाबांना फोन करून कळवलं...आणि लगेच हिरेनभाईंनी मला(प्रशांतभाईंना) हे सांगून वॉचमनला लगेच काढून टाका अशी मागणी केली. मी काहीच पुरावा नसतांना वॉचमनला कसे काढू शकतो? आता तुम्हीच सांगा..उगाच माझी झोपमोड मात्र झाली...आता हा प्रश्न काय सोसायटीचा आहे काय?तरीही मी हिरेनभाईंना सांगितलं की माझा ह्या असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये..हवं तर मी ते उचलून कचर्‍यात फेकून देतो.

प्रशांतभाई,तुम्ही कचर्‍यात फेकलीत ना ती बाहुली आणि लिंबू? मग झालं तर. प्रकरण मिटलं.

नाही हो. मी पुढे काहीच केलेलं नाहीये.ती जिथे आहे तिथेच आहे. आता हिरेनभाईंनी मागणी केलेय की लगेच सोसायटीच्या पदाधिकार्‍यांची सभा बोलवा आणि ह्यावर काही तरी तोडगा काढा...तुम्ही चेयरमन म्हणून तुमच्या निदर्शनास ही गोष्ट आणतोय.

मला दाखवा,कुठेय ती बाहुली? मीच उचलून फेकतो. माझाही अशा गोष्टींवर विश्वास नाहीये...पण असल्या क्षुल्लक गोष्टीसाठी कोणत्याही पुराव्याशिवाय वॉचमनला नोकरीवरून काढणे मला अजिबात पटत नाहीये....आपण आज रात्रीच सभा घेऊ.

त्यानंतर मी आणि प्रशांतभाई इमारतीत आलो. टाचण्या टोचलेली ती काळी बाहुली आणि टाचण्या टोचलेलं ते लिंबू मी पाहिलं. माझ्याकडे हातात असणार्‍या दोन्ही पिशव्यात सामान भरलेलं होतं म्हणून मी प्रशांतभाईंना म्हटलं की तुमच्याकडे आहे का एखादी रिकामी पिशवी? तर,ते नाही म्हणाले. मग ठरवलं सद्द्या असेच राहू दे...रात्री सभेला येतांना ह्याचा निकाल लावतो.

रात्री हिरेनभाईंच्या घरीच सभा सुरु झाली...ते तर अगदीच जोशात होते...आधी त्यांना मुक्तपणे बोलू दिलं...आणि मग मी पहिला प्रश्न टाकला...
हिरेनभाई,ती बाहुली तुमच्या दारात होती?

नाही..पण असं कुणी केलं की भिती वाटते.

तुम्ही एवढे शिकलेले,तरी ह्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवता? माझा तर अजिबात विश्वास नाही ह्यावर. एक काम करा,एक पिशवी द्या..मी आत्ताच्या आत्ता उचलून कचर्‍यात टाकतो तिला.

नको हो प्रमोदभाई, तुम्हाला काही तरी अपाय होईल.

हिरेनभाई,क्षणभर हे धरून चाला की ते सगळं खरं आहे.तर मग ती बाहुली ज्याच्या दारात सापडली त्याने घाबरायला हवं..तुम्ही का घाबरताय?

ते बरोबर आहे पण तरी भिती वाटतेच ना!आणि हे काम त्या वॉचमनचंच असणार...त्याचा बाप रोज सकाळी स्त्री-वशीकरणाचं पुस्तक वाचतो...माझ्या मुलाने पाहिलंय त्याला..कैक वेळा...म्हणजे त्याचंच काम असणार...तुम्ही लगेच त्याला काढून टाका.

हाहाहा! हिरेनभाई,तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठताय. मला सांगा, तुम्ही त्याला बाहुली-लिंबू ठेवतांना पाहिलंय?

नाही.

ती बा-लिं आधी डॉक्टरच्या दारात होते...आणि नंतर त्याच्या बायकोने ते उचलून बाजूला नेऊन ठेवले....हे तुम्हाला कुणी सांगितले?

डॉक्टरनेच सांगितले.

अच्छा. आता मी काय सांगतो ते ऐका आणि उत्तर द्या...ह्या इमारतीचा मालक..तोही डॉक्टरच म्हणजे ह्या डॉक्टरचा बाप मध्यंतरी वारला. त्यानंतर त्याचा हा मुलगा आणि त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण( सगळेच डॉक्टर आहेत आणि सगळे इथेच राहताहेत )ह्यांचे संबंध आपापसात कसे आहेत तेही आपण सगळे पाहतोय...एकमेकांशी यथातथाच संबंध आहेत त्यांचे...इथे तर इस्टेटीचा संबंध आहे..हेही तुम्हाला-आम्हाला माहीत आहे. मग अशा अवस्थेत त्यांच्यापैकीच कुणी हे कपट केले असावे...असे मी म्हटले तर?

प्रमोदभाई,तुम्ही बोलताय त्यात पण पॉईंट आहे...पण ते सगळे डॉक्टर्स आहेत..त्यांचा विश्वास असेल ह्यावर?

विश्वास असण्या-नसण्याशी ते डॉक्टर्स असण्याचा संबंध नाही....इस्टेटीच्या वादात माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो...मी फक्त शक्यता बोलून दाखवली...तसंच असेल असे नाही...आणि वॉचमननेच हे केले असेल हा तुमचा तर्क..त्याला असे फाटे फुटू शकतात...तेव्हा आपण सगळे ह्या असल्या क्षुल्लक गोष्टींवर आपला वेळ फुकट घालवू नये असे मला वाटतंय.तुम्ही मला लगेच एक पिशवी द्या..मी पुढचं काम करतो.

मग हो-ना करता करता त्यांनी एक प्लॅस्टिकची पिशवी दिली. मी काय करतोय हे पाहण्यासाठी माझ्या बरोबर त्यांच्यापैकी कुणीच आलं नाही..पण एक लहान मुलगा उत्सुकतेने आला...त्याच्या मागोमाग त्याला आवरायला त्याची आईही आली....ती मला म्हणाली....अंकल, अभी रात है! कुछ अपाय होगा तो!इसीलिये अभी कुछ मत करो. कल सुबह करो...तिच्या सदिच्छा लक्षात घेऊनच मी तिला शांत राहायला सांगितले....ती बाहुली आणि लिंबू त्या पिशवीत कोंबलं आणि पिशवीला गाठ मारून ती कचर्‍याच्या डब्यात टाकली.

मंडळी इथे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे...मी हे सगळं करेपर्यंत अगदी स्वस्थचित्त होतो....मात्र ते करून पुन्हा सभेच्या ठिकाणी आलो तेव्हा जाणवलं की हृदय चांगलंच धडधडत होतं....म्हणजे मी मनातल्या मनात घाबरलो होतो काय? नक्कीच नाही...मग हृदय का बरं धडधडलं? मला वाटतं की आपल्या शरीरात दोन मनं असतात..त्यातलं एक नक्कीच घाबरट असतं...तेच बहुदा कारण असावे..हृदयाची धडधड वाढवणारं...आपला विश्वास नसला तरी कैक वेळेला..उगाच कशाला आगीची/विषाची परीक्षा घ्या...खरंच काही तसं असलं तर...असे विचार आपल्या मनात येतातच...बहुदा इतरांच्या बोलण्याचा तात्कालिक परिणाम म्हणून का होईना...अशी भिती उत्पन्न होत असावी.

असो. तर पुढे फारसं सांगण्यासारखं काहीच नाही...पाचेक मिनिटात मी पुन्हा स्वस्थचित्त झालो. माझ्या त्या कृतीने(त्यांच्या दृष्टीने अचाट) मात्र त्यांच्या लेखी मी एकदम कुणीतरी शक्तिमान वगैरे झाल्याचे त्यांच्या नजरेतून आणि बोलण्यातून जाणवले.

खरं तर घटना अगदीच सामान्य आहे पण प्रत्येकाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो हेच ह्यातून दर्शवायचे आहे.

६ टिप्पण्या:

मुक्त कलंदर म्हणाले...

काका माझ्या आजीने खास शनीशिंगणापूरहून घरी दारावर लावण्यासाठी काळी बाहुली आणली होती आणि तिला हे पक्के माहित होते कि मी हे मानत नाही. पण तरीही तिने बाहुली लावण्याचा प्रयत्न केला आणि कि ती रागाने काढून तिच्या डोळ्यादेखत जाळली. कारण मुळात मला हे थोतांड कधी मान्य नव्हत आणि आणि मी पदोपदी असल्या गोष्टींचा विरोध केला आहे..

प्रमोद देव म्हणाले...

शाबास रे भारता!

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

हे हे हे, देका तुम्ही म्हणजे खूपच शूरवीरपणा दाखवलात. काळी बाहुले आणि पिना टोचलेलं लिंबू.......हा हा हा.......कित्येक लोकांची मनं नुसत्या अतर्क्य विचारांनीच कमकुवत होतात......या असल्या गोष्टींमुळे काहीही होत नसलं तरी. :-) माझा जरी परमेश्वरावर विश्वास असला तरी हे असल्या थोतांडांवर नक्कीच नाही.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

असल्या थोतांडांवर विश्वास ठेवून आपली प्रगती करू पहाणारे महाभागच म्हटले पाहिजेत. अशाच आशयाची एक पोस्ट मी http://www.mogaraafulalaa.com/2010/09/black-magic.htmlइथे लिहीली आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद अपर्णा आणि कांचन.

अनामित म्हणाले...

छातीत धडधडण्याचे कारण इतरांमधली असहकाराची भावना हे असू शकेल.