माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ जानेवारी, २०११

स्वरभास्कर मावळला!

स्वरभास्कर,भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आज देहरूपाने आपल्यातून निघून गेलेत. :(
त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली!

पंडितजींच्या गाण्याचा मी माझ्या लहानपणापासूनच निस्सीम चाहता आहे.त्यांच्या त्या भारदस्त आणि धीरगंभीर आवाजाने माझ्या मनावर इतकं काही गारूड केलं की मी नकळतपणे त्यांची नक्कल करू लागलो. गाणं शिकण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मी माझ्या तरूणपणात एकदा करून पाहिला होता....पण, त्या गानगुरुंचा आवाज मला काही प्रभावित करू शकला नाही आणि माझं गाणं शिकणं तिथेच थांबलं. त्यानंतर,शिकेन तर पंडितजींकडेच असं मनात ठरवलं होतं; पण ते होणारच नव्हतं आणि झालंही नाही...मग मी त्यांना आपले मानसगुरु मानलं आणि त्यांचं गाणं ऐकून माझ्या अत्यल्प कुवतीप्रमाणे त्यांचं अनुकरण करण्यातच धन्यता मानू लागलो.

भीमसेनांचा महिमा मी काय सांगणार? फक्त इतकंच म्हणेन की माझ्या कळत्या वयापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये ज्यांचं ज्यांचं गाणं मी ऐकलं त्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक-गायिकांमध्ये मला सर्वात जास्त भीमसेन आवडतात...माझ्या मते ते आधुनिक तानसेन होते.त्यांची जागा घेईल असा सद्द्या तरी कुणी नजरेसमोर दिसत नाही...

भीमसेन जरी आपल्यातून देहरूपाने गेले असले तरी त्यांच्या असंख्य आठवणी,ध्वनीफिती,ध्वनीचित्रफितींद्वारे ते अजूनही आपल्या सोबत आहेत आणि अनंत काळापर्यंत राहतील.

त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांच्यावर एक छोटी कविता करून माझ्या आवाजात ती गाऊन गान श्रद्धांजलीच्या स्वरूपात इथे सादर करत आहे.

धन्य धन्य भीमसेना।
गुंगलो परि तव गाना॥

तानसेना,तुझ्याविना।
आता,’सवाई’ सुना॥





त्याच चारोळीत किंचित बदल करून एका वेगळ्या चालीत ऐका.

धन्य धन्य भीमसेना।
रिझविलेस रसिक जना॥

तानसेना,तुझ्याविना।
आता,’सवाई’ सुना॥






४ टिप्पण्या:

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

खासच... धन्य धन्य भीमसेना...
भीमसेनाला भावपूर्ण श्रद्धांजली...

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

खरंय, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा एक महत्त्वाचा स्तंभ कोसळला.

तानसेना,तुझ्याविना।
आता,’सवाई’ सुना॥

अगदी खरंय.
पंडितजींना भावपूर्ण श्रद्धांजली

शंतनू देव म्हणाले...

स्वराधिराज - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Amit Bhagat म्हणाले...

शास्त्रीय संगीतातील चिरंतन प्रदीप्त तारा, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
" जश्या व्योमातूनी येती धारा
जसा मोर फुलवी पिसारा
तसे कंठातून येते गाणे
असा गंधर्व पुन्हा न होणे "
....