माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१४ सप्टेंबर, २०१०

आणि गणपती मोदक बनवतो !

अहो उठा!
अहो,म्हटलं उठावं महाराजांनी!
आज एका माणसाचा वाढदिवस आहे ना, मग उठा बघू.

अरे वा,म्हणजे लक्षात आहे तर तुझ्या?

का नसणार? सगळं जग...विशेषेकरून भारतवासी..त्यातही विशेष करून महाराष्टीय लोक हा तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे करतात...आणि इतकं सगळं माहीत असूनही मी बरी विसरेन. त्यातून हल्ली सगळ्या दिनदर्शिकांमधूनही ठळकपणे तुमच्या वाढदिवसाच्या दिनांकावर लाल रंग असतो...म्हणजेच सुट्टी असते सगळ्या लोकांना. का तर म्हणे वाढदिवस कसा झोकात व्हायला हवा ना!

आज माझा वाढदिवस? पण मग माघात झाला तो काय?

सगळ्याच महापुरुषांच्या जयंतीबाबत वाद असतात...म्हणून मग ज्याला जे सोयिस्कर वाटेल तो ते साजरे करतो. आपल्याला काय,दोनदोनदा भेटवस्तू मिळतात हे काय कमी आहे.

अच्छा, म्हणजे त्या बेंबट्या जोश्यासारखेच झाले माझे म्हणायचे?

कोण हो तो बेंबट्या?

अगं तो गं..कडमड्याचा बेंबट्या जोशी...त्याच्या आईवडिलांचाही ह्यावरून वाद...एक म्हणे की आषाढी एकादशीला तर दुसरा म्हणे की कार्तिकी एकादशीला...तसेच काहीसे.

ते काहीही असो...पण दोन्ही एकादश्याच होत्या ना मग झाले तर! अय्या, आठवलं! तुमचाही जन्म चतुर्थीचाच की हो..अगदी दोन्ही वेळी.

ए पुन्हा बोल ना अय्या !

इश्श्य! काहीतरीच काय बाई?

घ्या! अय्या म्हणायला सांगितलं तर इश्श्य म्हणून मोकळी झालीस. पण काहीही म्हण हं ह्या महाराष्ट्र देशीच्या बायका लाजतात मात्र सुंदर आणि दिसतातही.....

हं!पुरे,पुरे!जास्त पुढे जाऊ नका! उठा आता लवकर!कितीतरी कामं उरकायचेत! त्यात ते मोदकही बनवायचेत!किती कष्टदायक प्रकार आहे बाई! कशा त्या बायका बनवत असतील कुणास ठाऊक!
अगं मग घे की शिकून, तुला काय कठीण आहे ते?

म्हणे कठीण नाही.कठीण नाही? बोला, तुम्ही बनवताय का?

अगं,मी कुठून बनवणार आणि कसे बनवणार?

कुठून म्हणजे काय? स्वयंपाकघरात जाऊन...इथे आपल्याच घरात!

पण मी कधीच बनवलेले नाहीत.

मी आहे ना! तुम्हाला बनवण्याची सगळी रीत समजावून सांगते.

अगं,पण हे बायकांचं काम आहे ना? पुरुष कुठे करतात असली कामं? आणि मी आजवर कुठे काय केलंय?

काही तरी बोलू नका. घरात सोडले तर इतरत्र कुठेही सार्वजनिक ठिकाणी खायला जा...आचारी,महाराज वगैरे काही नावं द्या..तिथे जेवण बनवणारे सगळे पुरुषच असतात ना!

अहो हे तर सोडाच...आत्ताच मी वाचलं...

काय वाचलंस? कुठे वाचलंस? (स्वगत) कशाला वाचलंस?


दाखवते थांबा. अगदी सचित्र दाखवते.

(स्वगत) मेलो ठार! ही म्हणजे अगदी त्या म्हैस कथेतल्या मास्तरासारखी आहे....धोतरावर ऑर्डरली थुंकला म्हणून दाखवणारा..एक्झिबिट नंबर वन !

काय बोललात?

नाही, काही नाही! तू काय दाखवते आहेस ते दाखव असे म्हणत होतो.

हं तर हे पाहा आता....मुळच्या महाराष्ट्र देशीच्या पण आता इटलीत कामानिमित्त गेलेल्या विद्याधराने पाहा कसे सुबक मोदक बनवलेत. नाही तर तुम्ही?

अरे वा! हा पण विद्याधर का? (स्वगत)माझा कितवा अवतार हा? पण आता माझ्यावरच संकट आणलंय ह्यानं. चला, विघ्नहर्ता,उठा आता. पाहा आता, हे स्वत:वरचं संकट तरी दूर करता येतंय की नाही?

पाहा,पाहा ह्या मर्त्य लोकातल्या विद्याधराला जर इतके सुबक मोदक बनवता येत असतील तर तुम्हाला ते अशक्य कसे असेल. शेवटी तुम्ही पडलात ६४ कलांचे अधिपती....काय कळलं का गणेश महाराज...आपलं विद्याधर!

कौतुकास्पदच आहे गं ह्या मुलाचं काम. पण उगाच मला भरीला पाडू नकोस हं. मला आता तयार होऊन जायचंय भक्तांच्या भेटीला.

तुमचं बाई बरं आहे, जो तो तुम्हाला बोलावतो,मग तुमच्या आईलाही बोलावतो. पण मेलं आम्हाला कधीच कुणी बोलावत नाही.

नाही कसं? अगं दसर्‍याला तुझा मान असतोच ना!

ते खरंय रे ! पण तुझ्यासारखं आमचं खास कौतुक नाही ना!

आता ह्या वेळेला मी खाली जाईन ना तेव्हा समस्तांना तशी बुद्धी देईन. आता झालं समाधान? मी करू माझ्या जाण्याची तयारी?

ए असं रे काय विद्याधरा,हेरंबा,अमेया.....नाही नाही चुकले. गणूऽऽ!

ही तुझी गणूऽऽ हाक मला नेहमीच मोहात टाकत असते. बरं चल बनवूया आपण मोदक.

अं हं ! आपण नाही...तू एकटाच बनवणार आहेस. मी हवं तर त्या दूरदर्शनवरल्या ठक्यांसारखी प्रग्रासमोर माना वेळावत उभी राहीन तुझ्या बाजूला...चल चल चल! आता उशीर नको...नाहीतर तिथे भक्त रागावतील.

तू म्हणजे ना....

६ टिप्पण्या:

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका , एकदम झकास.

गणपती बाप्पा मोरया ...

THE PROPHET म्हणाले...

काका,
लय भारी!
"अय्या" तर प्रचंड प्रचंड भारी! :D

tanvi म्हणाले...

काका मस्त पोस्ट ....

विद्याधरा तू तर महानच रे बाबा!! :)

प्रमोद देव म्हणाले...

सचिन,विद्याधर आणि तन्वी तुम्हा तिघांचे मन:पूर्वक आभार.

Yogesh म्हणाले...

काका...मस्त झाली आहे पोस्ट...

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद योगेश्वरा!