शनिवार दिनांक ३जुलै २०१० रोजी सकाळी अचानक ठरले पुण्याला जायचे...मग काय झटपट तयारी केली आणि निघालो घराच्या बाहेर....बोरिवलीला मेट्रोलिंकच्या कार्यालयात पोचलो तेव्हा घड्याळात वाजले होते सव्वा नऊ. तिथे कळलं की आता साडेनऊची एक बस आहे...मग तिचेच तिकिट काढले आणि बसची वाट पाहायला लागलो...बस आली ९-४०ला... त्या बसमध्ये चढणारा मी सगळ्यात पहिला आणि एकमेव प्रवासी होतो...त्यामुळे ही बस कधी सुटेल ह्याबद्दल निश्चिती वाटत नव्हती...पण आश्चर्य म्हणजे बस जेमतेम पाच मिनिटातच निघाली देखिल.....मला एकट्याला घेऊन...मी पुण्याला माझ्या साडूंना भटक्यावरून मी येत असल्याचे कळवलं...तेही "जेवायला थांबतो,अवश्य या म्हणाले."
हीच ती मुंबई-पुणे प्रवासाला सहा तास लावणारी बस.(मेट्रोलिंकवाले हल्ली कोंडुसकरांच्याही गाड्या वापरतात.)
नंतर एकेकाळी मुंबईकर असलेले आणि हल्लीच पुणेकर झालेले आमचे परममित्र सुधीर कांदळकरांनाही मी येत असल्याचं सांगितलं. ते हळहळले....म्हणाले, "अरेच्चा, तुम्ही इथे येताय,आणि मी मुंबईला जायला निघतोय...एका मित्राच्या लग्नाला...म्हणजे आपली भेट नाही होणार. :( तेव्हा तुम्ही रविवारी पुण्यातच राहा...मी रविवारी दुपारपर्यंत परत येतो...आपण संध्याकाळी नक्की भेटूया."
मी म्हटलं....ते शक्य नाही...रविवार संध्याकाळपर्यंत मला मुंबईला पोहोचायला हवंय...म्हणजे ह्या वेळी आपली भेट शक्य नाहीये...जाऊ द्या, पुढच्या वेळी भेटू."
उड्डाण पूल ओलांडून बस पश्चिम द्रूतगती मार्गावर आली आणि मग वेगात धावू लागली...मनात म्हटलं चला आता बस नक्कीच वेळेवर पोचेल....मध्यंतरी वाटेवर इतर ठिकाणाहून चढणारे प्रवासी घेणार हे तर नक्कीच होते तेव्हा मुंबईबाहेर पडायला किमान साडेअकरा तरी वाजतील असा मी मनाशी अंदाज बांधला. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानापाशी काही जण चढले...पुढे एकेक थांब्यावर प्रवासी चढत गेले...मधेच पाऊस सुरु झाला...मी आपलं ते भोवतालचं ओलं विश्व पाहात विचारात गढून गेलो...वांद्र्यापर्यंत बस पोचली तोवर अर्ध्यापेक्षा जास्त बस भरली होती....म्हणजे अजून बरेच प्रवासी भरायचे होते....घड्याळात पाहिले तर इथे येईपर्यंतच अकरा वाजलेले होते....अजून मुंबईचा बराच भाग शिल्लक राहिलेला होता ....म्हणजे अजून निदान एक तास तरी जाणार होता.....पुढे धारावी,शीव,चेंबूर,मानखुर्द करून होईपर्यंत चक्क साडेबारा वाजलेले होते....अजूनही वाशीचा पूल ओलांडलेला नव्हता. मी भटक्यावरून पुन्हा एकदा साडूंशी संपर्क साधून त्यांना मला यायला उशीर होईल, तस्मात,तुम्ही जेवून घ्या, माझ्यासाठी थांबू नका असे सांगून टाकले....बस ठरलेल्या वेळेपेक्षा नक्कीच उशीरा पोचणार हे आता सूर्यप्रकाशाइतके सत्य होते. :(
पुढे वाशी,नेरूळ,कळंबोली वगैरे समस्त नवी मुंबई दर्शन करत एकदाची बस पूर्ण भरली....आणि मग बशीने गती घेतली...खालापूरला जेवणासाठी बस थांबली तेव्हा साधारण पावणे दोनचा सुमार झालेला....त्यानंतर हले-डुले करत समस्त प्रवासी मंडळी जेवण करून येईपर्यंत सव्वा दोन तिथेच वाजले.....तिथून एकदाची कशीबशी बस सुटली...मनात म्हटलं आता पुढे तरी गाडी न थांबता लवकरात लवकर पुण्यात दाखल होईल...पण तसं होण्याची काही चिन्हं दिसेना....कारण डायवर साहेब ....कोणतीही घाई नसल्यासारखी...जणू आपण वेळेच्या खूपच आधी पोहोचू असे समजून गाडी अगदी आरामात चालवत होते. त्यातच मधे एका ठिकाणी डिझेल भरण्यात पंधरा-वीस मिनिटे गेलीच. ;)
पुढे पुण्याच्या परिसरात बस पोचल्यावर मग एकेक प्रवासी आपापल्या गंतव्य स्थानानुसार उतरायला सुरुवात झाली....गाडी शेवटच्या थांब्यापर्यंत...हा होता आयडियल कॉलनीचा थांबा....ह्याच्या पुढे मोठ्या बशी जायला हल्ली मनाई आहे म्हणे.....दुपारचे चार वाजले होते....मला तिथूनच जवळ असलेल्या नळ स्टॉपला जायचं होतं....तिथून मग साधारण दहा मिनिटांनी एक छोटी गाडी घेऊन आम्हा काही प्रवाशांना त्यात बसवून ती गाडी निघाली...ह्या डायवर साहेबांना मी मला नळ स्टॉपला उतरायचंय...तो आल्यावर सांगा म्हटलं...त्यावर त्यांनीही मान डोलावली....मधेच ही गाडीदेखिल डिझेल भरायला थांबली...त्यात दहा-पंधरा मिनिटं गेली...मग पुन्हा डायवर सायेबांनी गाडी सुरु केली आणि पुण्याच्या त्या भरगच्च रहदारीतून प्रत्येक लाल दिव्यापाशी थांबत थांबत आमचा प्रवास सुरु झाला.....मी ह्या पूर्वी एकदा-दोनदा इथे येऊन गेलोय...तरीही मला तो परिसर नीटसा लक्षात नव्हता..पण तरीही काही तरी चुकल्या-चुकल्यासारखे वाटायला लागले होते म्हणून मी आमच्या डायवर साहेबांना पुन्हा नळ स्टॉपची आठवण दिली...तेव्हा ते शांतपणे उत्तरले....नळ स्टॉप मागे राहिला की....पण हरकत नाही....तुम्ही इथे उतरा आता ...इथून फारसा लांब नाही तो...मी आपला पडत्या फळाची आज्ञा घेऊन खाली उतरलो....एकही ओळखीची खूण दिसेना...पण तो रस्ता कर्वे मार्ग आहे...ह्याची खात्री करून माघारी फिरलो...चालतोय,चालतोय तरीही कुठेही ओळखीची खूण सापडेना...कुणाला विचारावं? म्हणून मग मी मग एका दुकानात गेलो...तिथे काही खाऊ घेतला आणि त्या दुकानदाराला सहजपणे विचारलं....अहो इथून तो नळ स्टॉप किती दूर आहे?
तो म्हणाला...अजून पाच-दहा मिनिटे चालत गेलात की येईल....
मी म्हटलं...अहो मी पुण्यात तसा नवखा आहे...आत्ताच अमूक एका बसने आलो...मग त्यांच्या छोट्या गाडीतूनच ते पुढे घेऊन आले....अमूक एका पुलापाशी थांबवून मला ...जास्त लांब नाही..जवळच आहे असे सांगितले....वगैरे वगैरे पाढा वाचला.
तेव्हा तो दुकानदार उत्तरला...अरेच्चा...तुम्ही तिथून चालत आलात? तो डेक्कन विभाग आहे...गरवारे पुलाजवळचा ....असा कसा तो ड्रायव्हर? असो, आता इथून खरंच जास्त लांब नाहीये...तुम्ही पोचलाच आहात जवळ जवळ...वगैरे बोलता झाला.
मंडळी, अशी मजल दरमजल करत पाच-दहा मिनिटातच मग मी माझ्या इच्छित स्थळी पोहोचलो...तेव्हा घड्याळात वाजले होते....संध्याकाळचे पाच....म्हणजे बोरिवली ते पुणे अशा प्रवासाला मला सात तास लागलेले होते.
ही झाली मुंबई-पुणे प्रवासाची कहाणी....
त्यानंतरचा काळ माझा अतिशय मजेत गेला..शनिवारची रात्र तिथेच काढून सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मग मी आमचे जालीय मित्र-मंडळी सर्वश्री रानडेसाहेब,कांदळकरसाहेब आणि जयंतराव कुलकर्णीसाहेब...ह्या तिघांशी संपर्क साधून एकत्ररित्या कुठे भेटायचे ते ठरवले....जयंतरावांनी डेक्कन विभागातल्या वाडेश्वर ह्या उपाहारगृहाजवळ सगळ्यांनी ११ वाजता भेटा असे सांगितले...कांदळकर साहेबांनी आपला मुंबई दौरा स्थगित करून मला भेटायचे ठरवले..त्यामुळे तेही यायला निघाले....मी निघायच्या आधी आमच्या बझवरचा तरूण मित्र योगेश मुंढेने माझ्याशी संपर्क साधला...त्यालाही तिथे बोलावून घेतले....रानडेसाहेब खराडीसारख्या दूरवरच्या भागातून खास मला घेऊन जायला आले...त्यांनी त्यांच्या स्कुटीवरून मला वाडेश्वरला नेले....तिथे आधीच सगळी मंडळी येऊन उभी होती....मग नमस्कार-चमत्कार करण्यात काही वेळ जातोय..तोच एक तरूणी कुणाला तरी हात करून बोलावते आहे असे दिसले....माझ्या बाजूलाच योगेश उभा होता...त्याचीच कुणी मैत्रीण असेल असे वाटल्यामुळे मी त्याचे लक्ष तिकडे वेधले....तो गोंधळलेला दिसला...ती त्याच्या परिचयाची नसल्याचे म्हणाला.....काका,ती तुम्हालाच हात करतेय असेही वर म्हणाला....माझ्या चटकन काही लक्षात येईना...इथे अशा ठिकाणी मला ओळखणारी कोण बरे असेल? इतक्यात माझी ट्यूब पेटली....अरेच्चा, ही प्राजू तर नव्हे? थोडासा पुढे गेलो...आणि मग खात्रीच झाली....ती तिथे रानडे साहेबांशी बोलत होती आणि त्यांच्या सांगण्यावरून आमच्या दिशेला हात करून आमचे लक्ष वेधत होती....अशा तर्हेने आमच्या गप्पांत अजून एकीची भर पडली...मग आम्ही आमचा मोर्चा उपाहारगृहाकडे वळवला....मी थोड्याच वेळात येते असे सांगून प्राजू गेली ....खाता खाता आमच्या गप्पा सुरु झाल्या....कांदळकरसाहेब आणि रानडेसाहेब ह्यांना ह्या आधी मी भेटलेलो होतो....पण जयंतराव आणि योगेश ह्यांना मी पहिल्यांदाच भेटत होतो...गप्पा सुरु असतांना खाणेही आले...आणि मग खाता खाता गप्पा सुरु राहिल्या...मग थोड्या वेळाने प्राजूही आमच्यात सामील झाली...तिने तिचे ड्रायव्हिंगचे काही अफलातून किस्से सांगून चांगलीच खसखस पिकवली....काय? ते किस्से सांगू म्हणता? नाही हं...ते आमचं शीक्रेट आहे...प्राजूच त्याबद्दल कधी तरी सवडीने लिहिल तिच्याच पद्धतीने...तोवर जरा कळ काढा. ;)
प्राजूच्या कॅमेर्यात मग आमच्या छब्या टिपल्या गेल्या.....हो,हो...अहो दाखवणार ना...पण प्राजूने त्या माझ्याकडे पाठवायला तर हव्या...तेव्हा तिने पाठवल्या की लगेच दाखवतो...काय? :)
आमच्या खाद्यंतीचे ह्यावेळचे प्रायोजक होते जयंतराव....त्यांनीच मग बिलाची वासलात लावली. :)
असो..हास्यविनोदात दोन अडीच तास कसे गेले ते कळले नाही...पण मला आता वेध लागले होते...मुंबईकडे प्रस्थान ठेवण्याचे...तेव्हा सगळ्यांचा निरोप घेऊन मी,कांदळकरसाहेब आणि योगेश असे तिघे एकत्र निघालो...मला मुंबईच्या बशीत बसवण्यासाठी...छे छे...पोचवण्यासाठी ;) ह्या दोघांची नेमणूक झालेली होती.
एका ठिकाणी चौकशी केल्यावर आम्ही ठरवले की स्वारगेटला गेलो तर अर्ध्या अर्ध्या तासाने बशी सुटतात...तेव्हा तिथेच जायचे...योगेशकडे स्कुटी होती, पण त्यावर आम्ही तिघे कसे जाणार? मग आम्ही कांदळकरांना तिथेच निरोप दिला आणि ते गमनकर्ते झाले.
स्वारगेटला योगेशच्या स्कुटीवरून पोचलो तेव्हा दुपारचे पावणे दोन वाजले होते...तिथून बोरिवलीसाठी सुटणारी शिवनेरी अडीच वाजताची होती...म्हणून तिची वाट पाहणे सुरु झाले...अडीच वाजून गेले तरी तिचा पत्ताच नव्हता...शेवटी पावणे तीन वाजता ती आली एकदाची. आम्ही लगबगीने तिच्या जवळ पोचलो आणि...
कंडक्टर साहेबांनी सांगितलं....सगळी आसनं आधीच आरक्षित आहेत...तेव्हा दुसरी गाडी बघा....तरीही गाडी निघेपर्यंत..सव्वातीन वाजेपर्यंत तिथेच आशाळभूतासारखा वाट पाहात होतो...एकाच आसनाचा तर प्रश्न होता...एखादी व्यक्ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येणार नाही किंवा आपले आरक्षण रद्द करेल म्हणून...पण नाही,शेवटी मला घेतल्याशिवायचे ती गेली. त्यानंतर मग आम्ही आमचा मोर्चा वळवला निम-आराम गाडयांकडे...पण त्याही भरलेल्या होत्या...मग एशियाडकडे.....तिथेही तीच अवस्था...मग आपल्या लाल डब्याकडे....अहो तिलाही दया नाही आली हो....मग काय करायचं आता? शेवटी एक लाल डबा पुण्याच्या बाहेरून आलेला दिसला..बराच रिकामा झाला...बोरिवलीलाच जाणार होता...कंडक्टरला विचारलं...तर म्हणाला ..बिनधास्त बसा...गाडी खालीच आहे.....हुश्श....चला एकदाची आसनाची तर सोय झाली....असे म्हणेपर्यंत डायवर साहेबही आले...आता गाडी सुटणार ह्याची खात्रीही झाली....पण कसले काय? पुन्हा कंडक्टर साहेब आले....म्हणाले...गाडी बिघडलेय...वरकशॉपला जातेय...समद्यांनी उतरून घ्या . :(
घशाला कोरड पडली होती...म्हणून मग काही तरी थंड प्यावे म्हणून एका स्टॉलवर गेलो...तिथे थंडगार अॅप्पी प्यायलं,प्रवासात लागेल म्हणून एक पाण्याची शीलबंद बाटलीही घेतली....ह्याचे प्रायोजकत्व योगेशने स्वीकारले....पुण्यात मला एकही पैसा खर्च करावा लागू नये अशीच जणू सगळ्या पुणेकरांनी शपथ घेतली असावी असे राहून राहून वाटायला लागले. :)
हे सगळं होईपर्यंत साडेतीन वाजलेले होते....एसटी स्टॅंडच्या बाहेर जाऊन खाजगी बशींची चौकशी करून आलो...पण सगळ्याच फुल्ल.....आणि एखाद्या बशीत जागा असण्याची शक्यता आहे नाही..हे पाहायचे असेल...तर कोथरूडला जा असेही वर सांगायला लागले..कारण गाड्या तिथूनच सुटतात....योगेश बिचारा प्रत्येक बोरिवली पाटी असलेली बस दिसली रे दिसली का जाऊन त्यातल्या डायवर-कंडक्टरांपैकी कुणाला तरी विचारायचा....काका, ह्या गाडीत एक सीट मिळेल काय? पण माझं नशीब त्यावेळी इतकं बलवत्तर होतं ;) की त्याला प्रत्येक ठिकाणी नकारच मिळत गेला. :(
शेवटचा उपाय म्हणून मग मी आमच्या साडूंशी संपर्क साधला....त्यांच्याशी झालेला संवाद...
पोचलात?
कुठे?
मुंबईला!
नाही हो, अजून इथेच आहे तुमच्या राज्यात, स्वारगेटला. सगळ्या गाड्या भरलेल्या आहेत...कुठेच प्रवेश मिळत नाहीये.
मग राहा आज इथेच.
नाही हो...ते शक्य नाही...त्यातून उद्या भारत बंद आहे..तेव्हा आजच जायला हवे.
बरं मग एक पंधरा मिनिटं थांबा...मी चौकशी करून सांगतो..
ठीक आहे, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही...मी थांबतो....
दहा मिनिटातच मग त्यांचा फोन आला...पाच वाजताच्या बसचे तिकीट आरक्षित केलंय...लगेच कोथरूडला अमूक अमूक ठिकाणी पोचा आणि तिकिट ताब्यात घ्या....
मग काय,योगेशने त्यांच्याकडून नेमकी जागा जाणून घेतली आणि पुण्यातले सगळे सिग्नल चुकवत गल्ली बोळातून गाडी पळवली... आणि जेमतेम दहा-बारा मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो...तिकिट ताब्यात घेतले आणि मगच हुश्श केले....संध्याकाळचे चार वाजून गेलेले...तरीही अजून पाऊण तासापेक्षा जास्त वेळ होता....
मग आम्ही थोडा वेळ घालवावा म्हणून गेलो दूर्गाची कोल्ड कॉफी प्यायला......माझ्यासाठी ह्या योगेशने त्याचे अमूल्य तास फुकट घालवले होते...अहो, कसे म्हणजे काय?
हल्लीच,नव्यानेच त्याचे लग्न झालंय...तिथे बायको आतुरतेने वाट पाहात असतांना हा माणूस माझ्यासारख्या एका नवपरिचित म्हातार्याच्या सरबराईत गुंतलेला होता....अगदी मनापासून....जणू काही मी त्याचा सख्खा काका असावा असे त्याचे एकूण वागणे होते...त्याच्या ह्या आदरातिथ्याची एक छोटीशी पोचपावती म्हणून मला त्याला ती कोल्ड कॉफी पाजावी असे वाटले होते...ती संधीही त्याने मला दिली नाही. :(
बस सुटेपर्यंत योगेश तिथून अजिबात हलला नाही...आजची सगळी दुपार त्याने त्याच्या स्कुटीवरून मला समग्र पुणे दर्शन घडवलं, मला त्याबद्दल त्याचे कौतुकही वाटत होते....पण त्याच वेळी स्वत:बद्दल मनात एक अपराधीपणाची भावनाही जागत होती...त्याच्या नवपरिणीत आयुष्यातले महत्वाचे क्षण मी नकळतपणे व्यापलेले होते. :(
असो. मी एकदाचा योगेशचा निरोप घेऊन बसमध्ये प्रवेश केला...त्यानंतरच तो तिथून निघून गेला. निघतांना मी त्याचे आभार मात्र जाणीवपूर्वक मानले नाहीत....त्याने जे काही केले ते निव्वळ प्रेमापोटी आणि निरपेक्ष भावनेने केलेले मला पदोपदी जाणवत होते , आभार मानण्यामुळे कदाचित त्याचे मन दुखावले गेले असते....त्याऐवजी मी त्याच्या ऋणातच राहणे पसंत केले आणि त्याचा निरोप घेतला.
येतांना मात्र बस त्यामानाने व्यवस्थित आली....मी रात्री दहाला घरी पोचलो.
अशा रितीने शनिवार सकाळी १० ते रविवार रात्री १० ह्या ३६ तासांच्या मुंबई-पुणे-मुंबई प्रवासात मला शारीरिक दगदग,कालहरण इत्यादि गोष्टींमुळे झालेला मन:स्ताप हा... पुण्यातला पाहूणचार, तिथे भेटलेले सगळे आप्त, मित्रमंडळी ह्या सगळ्यांच्या प्रेमाच्या वर्षावामुळे खूपच सूसह्य वाटला. ह्या वेळच्या पुण्याच्या वास्तव्यातले हे सोनेरी क्षण माझ्या मनात सदैव ताजेच राहतील हे निश्चित.
१६ टिप्पण्या:
मी तर आमंत्रण कित्ती मिस केल....:(
मजा केली काका .. यवगेशच खरंच कौतूक.
तितक्याच पैशात तुम्हाला जास्त वेळ प्रवास करू दिला याबद्दल तुम्ही महामंडळाचे आभारी असायला हवे ;-)
भारत,खरंच, तू,सचिन आणि सागरही असायला हवे होते.
आनंद, योगेशच्या कौतुकासाठी शब्दच नाहीत.
मंडळाने दोन तास उशीर केल्याबद्दल खरे तर परतीचे तिकिट फुकटात द्यायला हवे होते...माझ्यासारखा ’लोकप्रिय’ काका जो त्यांच्या बशीतून प्रवास करत होता. ;)
सही काकानु.. मस्तच मजा केलीत..
बाकी योमुं रॉक्स !!!
सहीच काका, पुण्याची 'यात्रा' झाली म्हणायची...
पण मस्तच एकदम..
आणि सहीये यवगेश...एकदम रॉकलासच तू!;)
झकासच!
काका, असू द्या ओ "पुणे तिथे काय उणे".
काका...किती गोडवे गायले आहेत!!! मी विशेष अस काय केलय हो??? हे आपले ॠणानुबंध आहेत....
तरी आपली खादाडी राहिली...पुढच्या वेळी मस्त खादाडी करू या!!!
ही भविष्याची नांदी आहे. प्रत्यक्ष भेटी व प्रवास दुर्मीळ होणार. कमी पैशात व त्रासात स्काईप सारखी संपर्क साधनेच वापरणे सोयिस्कर होणार. मग भेट वस्तु घरपोच देणार्यांचा धंदा फार महत्त्वाचा होईल. प्रमोदजींना कॉफी, पेढे, किंवा त्यांचे आवडते आयस्क्रीम मालाडमधल्याच दुकानदाराला फोन करून पोहचवण्यात "देव पावला" म्हणत आनंद मानावा लागेल. अशा मॉडर्न इंडीयात तुमचे सहर्ष स्वागत.
धन्यवाद हेरंब आणि विद्याधर.
मेट्रोलिंकच्या सर्वीसचा असाच अनुभव मला, देवेंन आणि आकाला आला होता..
बाकी मस्त धम्माल केलीत तुम्ही..
यवगेश मित्रा तुस्सी ग्रेट हो..
रानडेसाहेब, आपण म्हणता ते खरेच आहे पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही और असतो तो ह्या आभासी माध्यमांतून कसा मिळणार?
रानडेसाहेब आणि सुहास आपणा दोघांना धन्यवाद.
काका जबरस्त पुणेरी अनुभव ... पुढल्या वक्ताला मी बी येणार ...लैई धमाल करू
जरूर...रेश्मा तुलाही नक्कीच बोलवू पुढच्या वेळी...अजून मोठा कट्टा करू.
Metro Link is a joint venture of Prasanna and Konduskar.
BTW, I have found all the Konduskar buses have the total of their registration no. equal to 9. The first bus I have seen not having it.(The photo in your blog. Was it the same bus you travelled from Borivali to pune?)
All the buses operated by the bus operator in Kolhapur have their registration number total = 9. Funny.
होय रामभाऊ! हीच ती बस!ज्या बसने मी प्रवास केला.
मी क्वचितच तसा प्रवास करतो त्यामुळे मला तुम्ही म्हणताय त्या ९ आकड्याची गंमत माहीत नाही.
प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा