माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२० जुलै, २०१०

कांदे-पोहे

संजय, अरे ए संजय. कुठे आहेस?

ताई, मी इथे आहे,झाडांना पाणी घालतोय.

अरे,पाणी कसलं घालतो आहेस....चल,लवकर. आपल्याला आत्ताच्या आत्ता जायचंय.

कुठे? आणि इतक्या घाईत...अगदी लगीनघाई असल्यासारखी तू मागे लागलेस?

अरे बाबा, आता घाई करायलाच हवी...लग्न काय होणारच आहे....पण आधी मुलगी नको पाहायला?

कोणती मुलगी? कुणाची मुलगी आणि कुणासाठी पाहायचीय?

त्याच्या डोक्यात टपली मारत ताई म्हणाली....ह्या,ह्या आमच्या बावळट बंधूराजांसाठी. चल आता येतोस की बाबांना हाक मारू?...ओ बाबा, हा बघा....

ताई, ताई असं नको ना करूस. बाबांना कशाला हाक मारते आहेस? मी येतो ना....

हाहाहा...बाबा नाहीचेत मुळी घरात...ते केव्हाच गेलेत.

गेलेत? कुठे?

कुठे म्हणजे काय? वेंधळाच आहेस की तू.....चार दिवसांपूर्वीच नाही का ते समेळकाका म्हणत होते...त्यांच्या माहितीतली एक मुलगी आहे लग्नाची....तिलाच पाहायला जायचंय आपल्याला....बाबा, गेलेत समेळकाकांना आणायला....तेही असणार आहेत आपल्या बरोबर.


समेळकाकांना घेऊन बाबा आले आणि मग आपला कथानायक निघालाय मुलगी पाहायला...बरोबर ताई आणि तिचे यजमानही आहेत बरं का. आपल्या लाडक्या भाऊरायासाठी बायको कशी अगदी अनुरुप पाहिजे नाही का...तेव्हा तिची  पसंती सर्वात आधी...आणि घरात सगळ्यांनीही ते मान्य केलंय. 

हॅलो, मी समेळ बोलतोय. आम्ही आलोय आपल्या घराच्या आसपास. यायचं का त्यांना घेऊन.

समेळसाहेब, जरा अर्धा-एक तास कुठे तरी थांबू शकाल काय? काय आहे.....

काय झालं नानासाहेब? काही गंभीर अडचण?

अहो नाही हो, सुकन्याला पाहायला आत्ताही एक मुलगा येऊन बसलाय....त्याच्याच तजविजीत व्यस्त आहे सद्द्या. तेव्हा जरा तुमच्या बरोबरच्या मंडळींना कुठे तरी फिरवून आणा ना....त्यानिमित्ताने थोडेसे मुंबई दर्शनही होईल...हा हा हा....नानासाहेबांनी तेवढ्यात एक माफक विनोद करून घेतला.

बरं,बरं नानासाहेब. करतो तशी व्यवस्था.

समेळसाहेबांनी,चक्रधराला गाडी चौपाटी कडे घ्यायला सांगितली.मंडळी चौपाटी पाहून आणि त्याहूनही तिच्यापुढे पसरलेला अथांग सागर पाहून भारावून गेले.

समेळसाहेब....अहो, इथे कुठे आणलंत? आपल्याला मुलीच्या घरी जायचं होतं ना?

बाबासाहेब, काय आहे....समेळसाहेब चांचरले.

अहो, काय ते स्पष्ट सांगा...असे चांचरू नका.

बरं सांगतो.  अहो, त्या मुलीला पाहायला अजून एकजण येऊन बसलाय...तिकडे त्यांचा कांदे-पोह्यांचा कार्यक्रम उरकला की आपला सुरु होईल...असे नानासाहेब म्हणत होते....म्हणून थोडा वेळ आपण इथे आलोय.

असं आहे काय? बरं, हरकत नाही. बाकी एका अर्थाने तेही बरंच झालं...एरवी ही विशाल चौपाटी आणि हा अथांग सागर आमच्यासारख्या छोट्या गावात राहणार्‍यांना कधी हो पाहायला मिळणार होता.

बाबासाहेबांनी समजुतीने जरी घेतले तरी संजय भडकलाच....हे काय समेळकाका, आपल्याला वेळ देऊनही बाहेरच्या बाहेर असे ताटकळत  ठेवणे शोभते का तुमच्या त्या नानासाहेबांना?
मी आता त्या मुलीला पाहणारच नाही....माझा निश्चय पक्का झाला.

अरे भाऊ, असं रे काय? लगेच डोक्यात का राख घालून घेतो आहेस?

ते मला काही माहीत नाही. ते लोक स्वत:ला काय समजतात?

भाऊराया, अरे जरा सबूरीने घे रे.

हे काय? तुम्ही मलाच का सांगताय सगळे? खरे तर त्या मुबाला(मुलीच्या बापाला) तुम्ही चांगले झापायला हवंय...त्याऐवजी मलाच गप्प बसायला सांगताय? ते काही नाही...मला त्या मुलीला पाहण्याची अजिबात इच्छा नाहीये.

बाबासाहेबांनी फक्त संजयकडे एकदा करड्या नजरेने पाहिले आणि....

बरं. तुम्ही आता म्हणताय तर पाहीन म्हणतो.....बाबासाहेबांच्या नजरेतला आज्ञार्थी भाव ओळखून संजयने लगेच नांगीच टाकली.

संजयने मग हळूच ताईला इशारा करत बाजूला नेले...समुदाच्या पाण्यात पाय ओले करण्याच्या निमित्ताने ते त्या सगळ्यांपासून जरा दूर आले. लगेच संजयने ताईला निक्षून सांगितले....बाबांच्या आज्ञेमुळे मी माझा निर्णय जरी बदललेला असला तरी ह्या मुलीला मी अजिबात पसंत करणार नाही...मग ती तुला आवडो अथवा भले ती कितीही सुंदर असो...माझा निर्णय पक्का आहे....ही मुलगी मला नापसंत आहे.

बरं बाबा..तुला जे करायचंय ते कर. पण आता हे बाबांसमोर बोलू नकोस बरं का.
चल, आता बाबा बोलावताहेत.


नानासाहेबांचा संदेश मिळताच गाडी तिकडे वळवण्याचा आदेश चक्रधराला देत समेळ साहेबांनी एक सुटकेचा नि:श्वास सोडला. थोड्याच वेळात ते सगळेजण तिथे पोहोचले. स्वागताला खुद्द नानासाहेब ह्जर होते. झाल्या प्रकाराबद्दल बाबासाहेबांकडे दिलगिरी प्रदर्शित करत नानासाहेब त्या सगळ्यांना आत घरात घेऊन आले.
सुरुवातीचे ओळखीचे सोपस्कार पार पडल्यानंतर मग मंडळी थोडीशी सैलावली. मोठ्या माणसांच्या हवा-पाण्याच्या आणि राजकारणाच्या गप्पा सुरु झाल्या...ज्या कारणासाठी इथे ते सगळे जमलेत ते सगळं विसरून.

इथे संजय मात्र वैतागलेलाच होता. अजूनही त्याचा राग धुमसत होता. आपल्या ताईला तो सारखा सांगत होता...ए ताई, बाबांना सांग ना....आपण आता निघूया म्हणून. बस्स झाले हे सौजन्याचे नाटक.

अरे,वेडा आहेस काय तू? अजून मुलीला कुठे पाहिलंय ? आणि कांदे-पोहे खायचे नाहीयेत का? ;)

ताईच्या त्या तसल्या मिस्किल बोलण्यामुळे एरवी जरी संजय लाजला असता तरी ह्यावेळी मात्र तो तिच्यावर चांगलाच उखडला होता....मी आधीच सांगितलंय ना तुला....मला ह्या मुलीला अजिबात पाहायचे नाहीये...मग कशाला उगाच हा देखावा?

हे सगळं बोलणं कुजबुजीच्या स्वरूपातच सुरु होतं....कारण बाबासाहेबांसमोर संजयची कोणतीच मात्रा चालू शकत नव्हती...पण ही कुजबुज पाहून नानासाहेबांना जाणवलं की मुलगा मुलीला पाहण्यासाठी फारच अधीर झालाय...तेव्हा आता जास्त उशीर नको म्हणून त्यांनी आत आवाज देत म्हटलं.....अहो, ऐकलंत का. मुलाकडची मंडळी खोळंबलेत....जरा मुलीला पाठवा पाहू.

नानासाहेबांच्या त्या आज्ञेमुळे माजघरातली लगबग एकदम वाढली. स्वयंपाक घरातून कपबशांचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. इथे संजय अजूनच अधीर झालेला....कधी एकदा ह्यातून सुटका होतेय ह्याची वाट पाहात निमूटपणे बसण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीच नव्हतं....तरीही उगाच काही तरी चाळा म्हणून कधी कपाळावरचा घाम पूस ...तर कधी चश्म्याच्या काचा साफ कर अशा अस्वथतेच्या निदर्शक हालचाली त्याच्याकडून होत होत्या.

आणि जिची आतुरतेने सगळेजण वाट पाहात होते ती....मुलगी...घरातल्या इतर वडिलधार्‍या स्त्रियांबरोबर हातात  कांदे-पोह्याच्या बशा असलेले तबक घेऊन आली तेव्हा ... ताईने तिला पाहताच वहिनी पसंत करून टाकली. सगळ्यांच्या नजरा जरी मुलीकडे असल्या तरी संजयने आपली नजर मात्र जमिनीवरच  स्थिरावलेली होती...मुलीला पाहायचं नाही....हा त्याचा ठाम नि:श्चय अजूनही कायम होता. ताईने त्याला कोपराने ढोसले तरीही त्याने तिची दखल घेतली नाही.

मुलगा लाजतोय...असाच अर्थ इतरेजनांनी काढला आणि ते सगळे गालातल्या गालात हसू लागले. मुलीच्या आईने मुलीला इशारा केला....दे,ती कांपोची बशी त्यांला दे....आणि आज्ञाधारकपणाने मुलीने ती बशी मुलासमोर धरत म्हटलं....घ्या ना!!!

तो किणकिणाट ऐकून नकळत संजयची नजर वर गेली...क्षणभर चार डोळ्यांची दृष्टभेट झाली आणि....पुढे काय झाले ते दोघांनाही कळलंच नाही....काही तरी इथून तिथे गेले आणी तिथून इथे आले....असा भास दोघांनाही एकाच वेळी झाला....

संजयच्या ऊरात एक बारीकशी कळ  ऊठली....अरेच्चा...हीच ती...रोज स्वप्नात येते...तीच ही....आणि हिला मी न पाहताच जाणार होतो? छे, छे, छे. भलतंच...किती मोठी चूक मी करणार होतो....बरं झालं....बाबांनी दमात घेतलं ते...बरं झालं ताईने समजावलं ते.....नाहीतर उगाच चांगली सोन्यासारखी संधी.......हा हा हा...अरे खरंच की ’सोन्या’ सारखीच आहे... संधी नव्हे हो....माझी.....
मनातल्या मनात विचार करतांनाही संजय लाजलेला आणि ते त्याच्या चेहर्‍यावर उमटलेलं ताईने हळूच पाहिलं....तिलाही कळलं.....विकेट पडली म्हणून.  :D

हिच्याशी एकांतात बोलायला मिळेल? हिला देखिल आपण पसंत पडू? काहीही असो, पण हिच्याशी बोलण्याची संधी आज साधायलाच हवी....आता नाही तर कधीच नाही....तेव्हा ही संधी सोडायची नाही....

संजयने हळूच ताईला....आणि ताईने हळूच बाबांना....संजयची इच्छा आपोआप नानासाहेबांपुढे पोचली.

बरं का मुलांनो....तुम्हाला आपापसात काही बोलायचं असेल तर आतल्या खोलीत बसा तुम्ही....नानासाहेबांनी इशारा केला. संजय उतावळेपणाने खुर्चीतून उठतांना धडपडला...ताईने हळूच त्याला चिमटा काढत....इतकं काही उतावीळ व्हायला नकोय हं....असं म्हटल्याने तो अधिकच बावरला....पण मुलीच्या भावाने त्याला हाताचा आधार देत  आतल्या खोलीकडे अंगुलीनिर्देश केला.

आतल्या खोलीत संजय आणि सुकन्या समोरासमोर बसलेले...संजयने धीर करून काही विचारण्यासाठी तोंड उघडले आणि तेव्हढ्यात मुलीचा भाऊ....तोच तो आधार देणारा आणि मुलीचा काका....असे दोघेही येऊन त्या दोघांच्यात बसले...संजयचे शब्द घशातल्या घशातच अडकले.  ;)

तुम्ही काय करता?...मुलीच्या भावाचा प्रश्न

मी, अमूक अमूक क्षेत्रात काम करतो.....

अरे वा...मी ही त्याच क्षेत्रातला....

मग काय? संभाषणाचा ताबा मुलीच्या भावानेच घेतला आणी संजय फक्त...हो...नाही...अशी उत्तरं द्यायला लागला...मधून मधून त्याचं लक्ष सुकन्येकडे जात होतं...तीही डोळ्यांच्या कोपर्‍यातून सांडणारं हसू लपवत संजयची तारांबळ पाहात होती आणि मनोमन म्हणत होती....सापडला गं सापडला....हाच तो....असाच भोळा सांब मला हवा होता.



घरी परत येतांना गाडीत बाबा मोठ्यानेच म्हणाले.....काय मग ताई, त्यांना नकार कळवायचा ना?
बाबा.....

ताई पुढे काही बोलण्याच्या आतच संजयने....ही शेवटची संधी...आत्ता नाही तर केव्हाच नाहीच्या अभिनिवेशात  ओरडून सांगितले........बाबा, मुलगी मला पसंत आहे...कळवा त्यांना.

सगळ्याच्या हास्यकल्लोळात आता संजयही सामील झाला.


ही एक सत्यकथा आहे...प्रत्यक्ष नायक-नायि्केच्या तोंडून ऐकलेली....मात्र ह्यातीत व्यक्तिरेखांची नावे,स्थलकाल वगैरे गोष्टी जाणीवपूर्वक बदललेल्या आहेत.

१७ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

व्वा, बुवा कालच घडलेला प्रसंग असावा असे वाटले. सगळे बारकावे अजून ही तुमच्या डोक्यात आहेत?

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

संजयचे कांदेपोहे आवडले बर का!

आनंद पत्रे म्हणाले...

आम्हाला कळलं संजय कोण ते .. पण ऐकलेलं वाचायला पुन्हा बेश्ट मजा आली...

THEPROPHET म्हणाले...

काका...
आवडली कथा एकदम..नायक ओळखीतलाच असल्याने जाम मजा आली वाचायला...;)

प्रमोद देव म्हणाले...

रानडेसाहेब,सचिन,आनंद आणि विद्याधर...सर्वांचे मन:पूर्वक आभार.

माझी दुनिया म्हणाले...

कांदे पोह्यांची ही कथा प्रत्यक्ष नायकाच्या ब्लॉगवर वाचली होतीच (अर्थात इथे ती जास्त नाट्यमयरित्या वाचता आली). पण नायिकेच्या मनातल्या भावांची कथा वाचता आली असती तर जास्त मजा आली असती. तिचे भाव अजूनही अव्यकतच आहेत.

प्रमोद देव म्हणाले...

त्येची येगळीच ष्टुरी हुईल....त्येच्यासाठी आधी नायिकेची...प्रतिमा आणि प्रतिभा ह्या सदरात मुलाखत घ्यावी लागेल. ;)

धन्यवाद श्रेया.

मुक्त कलंदर म्हणाले...

आताच आपल्या कथानायकाला भेटून आलो..

Maithili म्हणाले...

Chaan aahe...!!! :)
Btw, Sorry for the Aagaupana pan....konachi katha aahe hi..???

Maithili म्हणाले...

Sagalyanchya comments vachun utsukata vadhali majhi... :P

हेरंब म्हणाले...

काका, 'संजय उवाच' एकदम 'यो' झालीये..

मैथिली, थोडा 'गेस' मारल्यावर कळेल. ;)

Yogesh म्हणाले...

काका...एकदम मस्त लिहल आहे...अप्रतिम..

Meenal Gadre. म्हणाले...

व्वा. मस्त आहेत ‘कांदे पोहे‘

प्रमोद देव म्हणाले...

भारत,मैथिली.हेरंब.योगेश आणि मीनल...तुम्हा सर्वांना धन्यवाद.
आणि मैथिली...तू देवनागरीत लिहायला कधी शिकणार आहेस?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

देव साहेब, प्रसंग भारीच आहे. तो पर्यंत फिरवून आणा हा तर कहर झाला. :)


बाय द वे,ते पोरगं कोण हो ?

Unknown म्हणाले...

Chhan ! katha uttam lihil aahe. Aavadali.
http://savadhan.wordpress.com
Ny-USA
23-07-10

प्रमोद देव म्हणाले...

बिरुटेसाहेब आणि सावधानसाहेब आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

बिरुटेसाहेब ते आमचं शीक्रेट हाय...आसं समद्यांसमोर नाय सांग्णार.