माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ डिसेंबर, २००९

प्रभातफेरी...पुन्हा एकदा!

सकाळी सकाळी फिरायला जाणार्‍यांची संख्या हल्ली वाढलेली दिसतेय. आता ह्याला प्रकृती सांभाळण्याबाबत आलेली जागरुकता म्हणायची की मधुमेह-रक्तदाब ह्यांसारख्या रोग्यांची संख्या वाढल्यामुळे नाईलाजास्तव करावी लागणारी पायपीट समजायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात ह्या फिरणार्‍यांतही वेगवेगळे प्रकार आहेत.
कुणी नेहमीच्याच कपड्यात असतात,तर कुणी अगदी घरगुती कपड्यात, नुकतेच झोपेतून उठून आणि मुखमार्जन वगैरे न करता तसेच आलेले,डोळ्यातली चिपाडं काढत काढत.. बायका गाऊनमध्ये आणि पुरूष चड्डी-बनियनमध्ये. कुणी खास जामानिमा करूनही आलेले असतात. स्नान वगैरे करून, शुचिर्भूत होऊन,कडक इस्त्रीचे कपडे घालून, अत्तर किंवा सुगंधी फवारा अंगावर शिंपडून वगैरे आलेले असतात. काही लोक धावण्यासाठी खेळाडू वापरतात तसले रंगीबेरंगी ट्रॅकसूट घालून येतात.

आता हे फिरायला जाणारे लोक नेमके करतात तरी काय?तर त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण बागांमध्ये गवतावर अनवाणी फिरत असतात....बहुदा मधुमेही असावेत. काही जलद चालतात...उच्चरक्तदाबपीडीत असणार, काही हळूहळू , आपापसांत गप्पा मारत चालत असतात...गंमत म्हणून आलेले. काही जण अधून मधून धावतात/चालतात,तर काही जण अखंडपणे धावत असतात. काहीजण व्यायामशाळांमध्ये घाम गाळायला जात असतात तर काही जण बागेसारख्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर हातवारे करत असतात....हा ही व्यायामाचा एक प्रकार आहे. काही लोक सामुदायिक हास्यजत्रेत सामील होतात.

ह्या अशा ठिकाणी मला एक मजेशीर दृष्य दिसलं. तिघाचौघांचा एक गट बागेत फिरायला आला. येतांना एकाच्या हातात एक पिशवी दिसली. ती त्याने त्या बागेच्या झुडपात ठेवली. नंतर बागेला दोन चकरा मारून झाल्यावर त्यांनी ती पिशवी तिथून घेऊन उघडली,त्यातून एक मोठी साधारण एक लीटरची बाटली काढली,त्यातील काळसर-लाल द्रव्य प्रत्येकाने एकेक-दोन घोट पिऊन पुन्हा बाटली बंद करून पिशवीसकट तिथेच ठेऊन फेर्‍या मारायला गेले. पुन्हा दोन फेर्‍यांनंतर तेच दृष्य. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो....व्यायामाचा हा वेगळा प्रकार मला नवीनच होता. चक्क दारू पितात हे लोक,तेही इतक्या उघडपणे? मला त्या लोकांबद्दल एकदम घृणा वाटायला लागली. कसे एकेक लोक असतात ना? व्यायाम करायला येतात आणि दारू पितात...छे,छे. चांगलं नाही हे. असे का बरं करत असावेत हे लोक? दिसायला तर चांगल्या घरातले दिसताहेत.....माझ्या मनातलं कोडं काही सुटेना.

पण ह्या गोष्टीचा उलगडा लवकरच झाला. मी पूर्वी जिथे राहायचो तिथेच एक जैन मंदिर होते(आता तेही गेले). तिथे रोज भल्या पहाटे एका मोठ्या पातेल्यात एक औषधी काढा बनवून तो लोकांना पिण्यासाठी ठेवलेला असायचा. त्या चार लोकांपैकी एकाला मी एकदिवस त्या जैन मंदिरातून बाटलीसकट बाहेर पडतांना पाहिलं आणि लगेच ते कोडं सुटलं...ते चौघे जे प्यायचे तो काढा होता....साधारण काळसर लाल रंगाचा...आणि मी भलतेच समजलो होतो. चुकून का होईना मी त्यांच्यावर अन्याय केला होता म्हणून मी जाऊन त्यापैकी एकाला माझा गैरसमज कसा झाला होता ते सांगितले आणि ते चौघेही जोरजोरात हसायला लागले. मीही त्यांच्या हास्यात सामील झालो. त्यानंतर कधी माझी त्यांची भेट झाली की आम्ही त्या आठवणीने आजही हसतो. :)

सकाळची ही सगळी दृष्यं अतिशय आल्हाददायक असतं. सकाळी अजून एक हमखास दिसणारं दृष्य म्हणजे कुत्र्याला फिरायला आणणारी माणसं.....खरं तर हे लोक कुत्र्यांना फिरायला आणत असतात की कुत्रे त्यांना फिरवतात हा एक संशोधनाचा विषय आहे. गळ्यात पट्टा आणि साखळी घातलेला कुत्रा त्याला हवा तसा चालत असतो,वळत असतो. हे फिरणंही बहुतेकवेळा दिशाहीन असतं. कुत्रा वाटेत हुंगत हुंगत मध्येच कुठे तरी एखाद्या ठिकाणी तंगडी वर करून अभिषेक करत असतो तर कधी एखाद्या ठिकाणी मलविसर्जन करत असतो...अशा वेळी कुत्र्याचा मालक/मालकीण शांतपणे उभे असतात...एरवी कुत्रा त्यांना सतत ओढत असतो आणि कुत्र्याला आवरण्यातच मालक सगळी शक्ती एकवटत असतो. ह्यातल्या कुत्र्यांच्या जातीही वेगवेगळ्या असतात. लांडग्यासारखे दिसणारे अल्सेशियन, ऊंच ,दणकट आणि क्रूर चेहर्‍याचे डॉबरमन, लाडावलेली केसाळ पांढरीशुभ्र पामेरियन्स, आणि अशाच इतर अनेक जाती-प्रजाती आपापल्या मालकांना फिरवत असतात. परवाच एक बुलडॉग(नक्की बुलडॉग होता का?) पाहिला....जाणारे-येणारे सगळे लोक त्याच्याकडे आणि त्याच्या मालकाकडे आश्चर्याने पाहात होते. आमच्या त्या विभागात सहसा न दिसणारा तो अतिभव्य प्राणी आणि त्याचा अगदी सामान्य मालक...अशी ती विचित्र जोडी होती. अंदाजे साडेचार फूट उंच आणि तितकाच लांब असा तो कुत्रा भलताच रुबाबदार दिसत होता. रस्त्यावरची यच्चयावत कुत्री त्याला पाहून भुंकत होती....हे असे भुंकणे का आणि कशासाठी असते हे केवळ ते कुत्रेच जाणे. ती मानवंदना असते की....हा कोण उपटसुंभ आमच्या गल्लीत घुसखोरी करतोय..अशी भावना असते त्यामागे? असो. बाकी ते जनावर बाकी खरंच खूप उमदं होतं..आवडलं आपल्याला.

सकाळी अजून एक नेहमी दिसणारं दृष्य म्हणजे कचरा गोळा करणार्‍या मद्रासी बायका आणि त्यांच्यावर भुंकणारे गल्लीतले कुत्रे. ह्या बायका खरे तर नियमित येत असतात आणि त्यामुळे कुत्र्यांनाही त्या परिचित असतात..तरीही कुत्रे त्यांच्यावर भुंकतातच. एक मोठंच्या मोठं तागाचं पोतं घेऊन ह्या बायका जागोजागी फिरून कचरापेटी उचकटत असतात. त्यातून बरंच काही निवडून आपल्या पोत्यात भरत असतात. मधेच एकमेकींची चौकशी करण्यासाठी कुठेतरी एखाद्या मोकळ्या पडलेल्या हातगाडीवर बसून चहाचे घुटके घेत आपल्या गेंगाण्या आणि कर्कश्श आवाजात हितगुज करत असतात. ह्या अशाच एका मद्रासी कचरा गोळा करणार्‍या बाईच्या बाबतीत पाहिलेली आणि आश्चर्य वाटणारी एक गंमत आहे....ही बाई एका विशिष्ठ गल्लीत जेव्हा जाते तेव्हा तिथले कुत्रे तिच्यावर अजिबात भुंकत नाहीत तर ते तिच्या मागे मागे फिरतात. ती जाईल तिथे ते तिच्या मागे अगदी आज्ञाधारक मुलांप्रमाणे भटकत असतात. आपली हद्द संपली की मग ते मागे फिरतात...पण चुकुनही तिच्यावर भुंकत नाहीत किंवा तिच्यावर हल्लाही करत नाहीत. त्या बाईलाही त्या गोष्टीची सवय झाली असावी बहुदा...कारण तिलाही त्या कुत्र्यांची अजिबात भिती वाटत नाही...ती अगदी सहजतेने त्या भागात वावरत असते. तिने कधीच त्या कुत्र्यांना खायला घातलेले मी पाह्यलेले नाहीये..मग हे असे का घडत असेल?कुणास ठाऊक. सगळ्याच गोष्टींमागे काही कार्यकारणभाव असलाच पाहिजे असा तरी अट्टाहास का म्हणा.

सकाळी प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी कुत्र्यांची सभा भरलेली दिसते....बरेचदा सभेत हजर सभासद हे मौनीबाबाच असतात. बहुदा ते वाट पाहत असतात...सकाळच्या न्याहरीची. कुणी बिस्किटं खायला घालणारा नेहमीचा इसम दूरून येतांना दिसला की ह्यांचे डोळे लुकलुकायला लागतात आणि शेपट्या हलायला लागतात. तो जसजसा जवळ यायला लागतो तसतशी कुत्र्यांच्या नजरेतली अधीरता वाढतांना दिसते. तो जवळ आला की मग त्याच्या अंगावर उड्या मारून त्याने त्यांच्या दिशेने फेकलेली बिस्किटे तोंडात पकडण्याचा खेळ सुरु होतो. ह्यातले काही खरचं अव्वल क्षेत्ररक्षकासारखे बिस्किटांचा झेल अलगद टिपतात तर काही ढिसाळ क्षेत्ररक्षकांसारखे झेल सांडत असतात. एकूणच हा खेळ गमतीचा असतो.
हे बिस्किटं खायला घालणारे लोक असतात ना त्यातही काही अजून पोचलेले लोक असतात. ते मोटर सायकलवरून गल्लोगल्ली भटकतात. त्यांच्याकडे बिस्किटांबरोबर कधीकधी दुधाच्या पिशव्या आणि प्लॅस्टिकचे वाडगेही असतात. ह्या वाडग्यातून ते कुत्र्यांना दूध प्यायला देतात. एकूणच अशावेळी कुत्र्यांची चंगळ असते.

सकाळची अशीच चित्रविचित्र आणि मजेशीर दृष्य पाहात माझे मार्गक्रमण होत असतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: