माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ जुलै, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या!२

माझे सहावीचे वर्ष माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय असे वर्ष आहे. ते १९६२ साल होते. त्याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले आणि अवघा भारत खडबडून जागा झाला. लोकसभेत पंतप्रधान नेहरू आणि संरक्षण मंत्री कृष्ण मेनन ह्यांच्यावर तुफान टीका झाली. त्यातच संरक्षण मंत्र्यांना राजीनामा देणे भाग पडले. महाराष्ट्राचे गौरवस्थान अशा यशवंतराव चव्हाणांची नवे संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक झाली.अशा ह्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीचा नाही म्हटले तरी आमच्या बालमनावर परिणाम होणे स्वाभाविक होते. आपल्या भारतमातेसाठी आपणही काही तरी करावे अशी प्रेरणा निर्माण झाली.पण आम्ही काय करू शकत होतो. विद्यार्थी असल्यामुळे अभ्यास हे प्रथम कर्तव्य ठरत होते आणि देशसेवा? ती कशी करायची? आम्हाला ती करावीशी वाटली तरी कशी करणार? असे प्रश्न मनात उभे ठाकलेले असताना एक आशेचा किरण दिसला.

देशावर आक्रमण झाल्यामुळे जसे लोक अस्वस्थ झाले होते. बदला घेण्याच्या ईर्ष्येने पेटले होते तसेच काही कविमंडळींनाही समरगिते स्फुरू लागली. आपले वसंत बापट हे त्यात आघाडीवर होते. त्यांची ही समरगिते गाणारे शाहीर अमरशेख,शाहीर लीलाधर हेगडे ह्यांच्यासारख्यांच्या पहाडी आवाजाने लोकांचे रक्त सळसळू लागले. मनामनात देशप्रेम जागृत होऊ लागले. अमरशेख!हे नाव घेतले की त्यांचा पहाडी आणि तितकाच खर्जातला ढाल्या आवाज हे जबरदस्त मिश्रण आठवते. ह्या शाहिराच्या आवाजाची जादूच अशी होती की त्याने माझ्या बालमनावर देखिल खोल संस्कार केले. त्या काळात मी त्यांच्या आवाजाची नक्कल करून ती समरगिते गात असे. त्यातले
खबरदार खबरदार खबरदार , लाल चिन्यांनो खबरदार
खबरदार जर याल पुढे,राई राई करू तुकडे॥ ... हे गीत अजूनही आठवतेय.
शाहीर लीलाधरांच्या आवाजातले ...उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू,बलिदान करू,ध्वज उंच उंच चढवू॥........... अशासारखी गीते अजूनही स्मरणात आहेत.

आमच्या शाळेत त्यावेळी नव्यानेच आलेले एक शारीरिक शिक्षण शिकवणारे मास्तर हे संघाच्या मुशीत तयार झालेले,सळसळत्या रक्ताचे नवतरूण होते. त्यांच्यावर आम्हाला ही समरगिते शिकवण्याची कामगिरी सोपवली गेली. माझा आवाज हे माझे भांडवल होते आणि त्या भांडवलावर ह्या मास्तरांनी मला प्रमुख गायकाची भूमिका दिली. ते आम्हा काही निवडक विद्यार्थ्यांना एखादे गाणे शिकवत आणि ते नीट बसल्यावर मग मैदानावर शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जमवून प्रथम माझ्याकडून गाऊन घेत आणि मग माझ्या पाठोपाठ इतरांना म्हणायला लावत. हे करण्यासाठी ते मला एका टेबलावर उभे करत;पण बर्‍याच जणांनी तक्रार केली की, "सर तो खूप बुटका आहे. आम्हा मागच्या मुलांना नीट दिसत नाही." म्हणून मग त्या टेबलावर एक खुर्ची ठेवून त्यावर उभे करत आणि मग मी ते समरगीत इतरांना शिकवीत असे. माझ्या देहाच्या तुलनेत माझा आवाज दणदणीत असल्यामुळे ध्वनिक्षेपकाशिवाय शेवटच्या रांगेतील विद्यार्थ्यालाही सहज ऐकू जात असे.

हिंदी आणि मराठी सिनेजगतातले नामांकित संगीतकार श्री. वसंत देसाई ह्यांच्या संगीतसंयोजनाखाली आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या राज्यपाल श्रीमती विजयालक्ष्मी पंडित ह्यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवतीर्थावर(आचार्य अत्रे ह्यांनी शिवाजी पार्क ला योजलेले हे नाव आहे) लाखभर शालेय विद्यार्थ्यांकडून ही समरगिते गाऊन घेतली जाणार होती. आमच्या शाळेच्या गटाचा मी प्रमुख गायक होतो(त्यामुळे जरा टेसातच होतो) आणि माझ्या बरोबरीने अजून पाच जण होते.मुंबईतल्या यच्चयावत शाळेतील गाणार्‍या मुलांचा जमलेला तिथला मेळा पाहून तर आम्ही सगळे हबकूनच गेलो. इतका प्रचंड जनसमुदाय मी तरी पहिल्यांदाच पाहत होतो आणि इथे आल्यावर कळले की ही समरगिते सगळ्यांनी एकाच वेळी एकाच आवाजात गायची होती. हे लक्षात आल्यावर माझा गटप्रमुख असल्याचा ताप लगेच उतरला. एक सुर-एक ताल असेच त्या कार्यक्रमाचे नाव होते असे अंधुकसे आठवतेय.

आम्ही तिथे तीन भाषेतली गीते गाणार होतो ती गीते अशी होती!
मराठी:
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू(गुजराथी मुले शरू म्हणत होती)
जिंकू किंवा मरू! जिंकू किंवा मरू(गुमु 'केव्हा मरू' म्हणत होती)

गुजराथी:
तय्यार थई जजो,नात भात जात तारी कोई पण हजो!

हिंदी:
ऐ नवजवान (३ वेळा)
ऐ नवजवान वीरताकी है कसोटी आज
तुम शेर हो दिलेर हो रखो वतनकी लाज

पोलिसांच्या शिट्ट्या जोरजोरात वाजल्या तसे कळले की राज्यपाल महोदया येताहेत. उघड्या जीप मधून आलेल्या त्या लालबुंद, तेजस्वी आणि सोनेरी केसांच्या व्यक्तीला पाहून मला तर साक्षात राजकन्येचाच भास झाला.पांढरी शुभ्र रेशमी साडी,बिन बाह्यांचं पोलकं,गळ्यात मोत्याची माळ घातलेल्या त्या रुपसुंदरीला पोलिसांच्या बँडकडून मानवंदना दिली गेल्यावर त्या सभामंचावर स्थानापन्न झाल्या. तिथे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई आपल्या बाजिंद्यांसह तयारीतच होते. वसंत देसाईंचे रूपही(मर्दानी सौंदर्याचा नमुना) लाजबाब होते. पांढरी शुभ्र विजार,त्यावर तितकाच पांढरा शुभ्र (पुष्ट दंड दाखवणारा) तोकड्या हातांचा टी- शर्ट ,एका हाताच्या मनगटाला बांधलेला मोगऱ्याचा भरगच्च गजरा आणि केसांची सगळी चांदी झालेली. त्या दोघा रुपसंपन्न व्यक्तींकडे मी 'आ' वासून बघत राहिलो.

तेव्हढ्यात बिगुल वाजले आणि वसंतरावांचा हात वर गेला आणि त्यांच्या त्या इशार्‍याबरोबरच वाद्यवृंद वाजू लागला. सगळा आसमंत त्या रण वाद्यांनी भारलेला असतानाच लक्ष लक्ष कंठातून 'जिंकू किंवा मरू'चे स्वर निनादू लागले. अंगावर रोमांच उभे राहिले, अंगातून वीज सळसळल्याचा भास झाला आणि अशाच भारलेल्या वातावरणात तो समरगीतांचा कार्यक्रम चालू राहिला.चालतच राहिला!

क्रमशः:

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

नुसतं वाचूनंच माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले, तर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवताना कसे वाटले असेल? सुंदर आठवणी कथन केल्या आहेत:-) असं कुणीतरी सांगितल्याशिवाय माझ्यासारख्यांना तो काळ तरी कसा समजला असता? धन्यवाद!