माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ ऑक्टोबर, २०११

महा’गीत’कार जगदीश खेबूडकर!

३० जानेवारी १९४८. ह्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली आणि महाराष्ट्रात सगळीकडे जाळपोळ सुरू झाली...एका विशिष्ट जातीच्या लोकांना वेचून काढून,त्यांना निर्वासित करून,त्यांच्यादेखत,त्यांच्या घरादाराची राखरांगोळी करण्यात येत होती...अशाच एका जगदीश नावाच्या विस्थापित तरुणाने डोळ्यासमोर आपलं धडधडा जळणारं घर बघितलं आणि त्याच्या मनाने टाहो फोडला... त्यातूनच एका गीताचा जन्म झाला. त्या गीताचे शब्द होते...मानवते तू विधवा झालीस!
ह्याच गीताने त्याच्यातला कवी जागा झाला. त्यानंतर त्याने बर्‍याच कविता लिहिल्या. त्या वेळच्या नामांकित अशा वृत्तपत्रांना,मासिकांना पाठवल्या; पण सगळीकडून त्या साभार परत येत होत्या...मग कंटाळून जाऊन जगदीशने आपली कवितांची वहीच फाडून टाकली. त्यावर त्याचा मोठा भाऊ रागावला आणि जगदीशला आपली चूक कळली. त्याने पुन्हा ती फाडलेली पाने जोडली आणि नव्या उमेदीने , भावाच्या सल्ल्यावरून भावगीते, भक्तिगीते आणि अभंग लिहायला सुरुवात केली आणि आकाशवाणीकडे पाठवून दिली. लवकरच जगदीशला आकाशवाणीकडून आमंत्रण आलं आणि त्यांच्या मान्यवर कवींमध्ये जगदीशची वर्णी लागली. ते वर्ष होतं १९५६-५७. जगदीशचं आकाशवाणीवर जे पहिलं गीत सादर झालं ते होतं....
खांद्यावरती शतजन्माच्या घेऊन पुण्याईला
काशीला श्रावण बाळ निघाला
काशीला श्रावण बाळ निघाला
माय आंधळी, पिता आंधळा
ग्रीष्म ओकतो अनन ज्वाळा
जल तृष्णेने माता-पित्यांचा व्याकूळ जीव झाला
श्रावण बाळ निघाला


आणि इथून जगदीशची गाडी भरधाव पळायला लागली...१९६० साली वसंत पवारांनी,’रंगल्या रात्री अशा’ ह्या चित्रपटासाठी जगदीशकडून तीन लावण्या लिहून घेतल्या...आणि मग जगदीशने कधीच मागे वळून पाहिले नाही.... त्यातली गाजलेली लावणी म्हणजे..
नाव गांव कशाला पुसता, मी आहे कोल्हापुरची
मला
हो म्हणतात,लवंगी मिरची....
ह्या लावणीला,१९६० सालचे रसरंग फाळके पारितोषिक मिळाले. ह्या लावणीचा हा रचयिता जगदीश म्हणजेच आपल्याला माहीत असलेले सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार श्रीयुत जगदीश खेबूडकर होय.


१९६० सालच्याच ’मोहित्यांची मंजुळा’ ह्या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले एकमेव गीत गाजले...
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला


१९६३ साली, भालजी पेंढारकर निर्मित ’साधी माणसं ह्या सिनेमात खेबूडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली....ते गाणं होतं...
ऐरणिच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे
आभाळागत माया तुजी आम्हांवरी र्‍हाउ दे

हे गाणंही तुफान गाजलं आणि चित्रपट-गीतलेखनात प्रस्थापित अशा ग.दि.माडगूळकर,पी.सावळाराम आणि शांता शेळके ह्यांच्या पंक्तीत जगदीश खेबूडकर जाऊन बसले.

चित्रपट सृष्टीत खेबूडकरांचा आता चांगलाच जम बसला होता पण खर्‍या अर्थाने ते घराघरात,जनमानसात पोचले ते १९७२सालच्या
देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता,उघड दार देवा
..............  ह्या भक्तिगीताने.

’आम्ही जातो आमुच्या गावा’ ह्या चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची सगळीच गाणी गाजली; पण ’देहाची तिजोरी’ने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोचले.
मला आठवतंय, हे गाणं जेव्हा जेव्हा रेडिओवर लागायचं तेव्हा तेव्हा आमच्या वाडीतल्या सगळ्या रेडिओंचे आवाज क्षणात वाढत असत...वातावरण नुसतं भारून जायचं. मला आठवतंय,शेजारच्या गुजराथी सुशीलामावशी माझ्या आईला म्हणायच्या, "ए विद्याचे आई,ते तुमचे भजन हाय ना, देहाची तिजोरी...ते मला लई आवडते. असा वाटते की आपण एकदम मंदिरात देवासमोर बसून भजन ऐकतेय."
ह्यापेक्षा जास्त बोलकी प्रतिक्रिया काय बरं असू शकेल.
ह्याच चित्रपटातले  ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,मला हे दत्तगुरू दिसले  हे गाणंही  देहाची तिजोरीच्या साथीने आकाशवाणीच्या, सकाळी ११ वाजताच्या, दर गुरुवारच्या कामगार सभेच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात हमखास हजेरी लावू लागलं...वर्षानुवर्षे ही गीतं मी ऐकत आलोय...पण त्यांचा गोडवा  कणभरही कमी झालेला नाहीये.
ह्याच चित्रपटातील १) मी आज फूल झाले, २) स्वप्नात रंगले मी, ३) हवास तू , हवास तू  ही गाणीही तेवढीच गाजली.

खेबूडकरांना सिनेमा सृष्टीत सगळेजण ’नाना’ म्हणत...आता ह्यापुढे मीही त्यांचा उल्लेख ’नाना’ असाच करेन.
नाना हे सिद्धहस्त कवी आणि गीतकार तर होतेच....पण त्यातही त्यांची गीतकाराची भूमिका ही जास्त अवघड होती. गीतकार म्हटलं की त्याला कोणतंही गीत लिहिण्याआधी त्या मागची कथा,प्रसंग,काळ, वेळ,पात्रपरिचय आणि अशा बर्‍याच गोष्टी जाणून घ्याव्या लागतात...त्याशिवाय ते गीत नेमकेपणानं बनत नाही. पण एकदा का ह्या सर्व गोष्टी डोक्यात नीट बसल्या की नानांच्या लेखणीतून ते गीत बघता बघता साकार होत असे. शब्द जणू त्यांच्यापुढे हात जोडून याचना करत..मला घ्या,मला घ्या..म्हणून.

कधी कधी संगीतकारांनी आधीच चाल तयार करून ठेवलेली असते आणि त्याबरहुकूम गीतकाराला  गीत लिहावं लागतं. अशा वेळी गीतकाराची काय पंचाईत होते हे आपण नानांच्याच शब्दात वाचूया..........
 चालीवर गाणं लिहिताना गीतकाराला मोठी तडजोड करावी लागते, असं सांगत नाना म्हणतात, पूर्वी आम्ही गाणी लिहायचो आणि संगीतकार त्याला चाल लावायचा. पुढे हे चित्र पालटलं. संगीतकार आधी चाल लावू लागला अन् त्या चालीवर गाणी लिहिली जाऊ लागली. म्हणजे आधी अंगडं-टोपडं शिवायचं आणि मग बाळाला जन्म द्यायचा, असा प्रकार सुरू झाला. चालीवर लिहिताना गीतकाराला गाणं नको तिथं तोडावं लागतं व नको तिथं जोडावं लागतं. एक तडजोड म्हणून नाना हे देखील करत पण मनापासून त्यांना हा प्रकार कधीच आवडला नाही.

व्ही शांताराम ह्यांच्या ’पिंजरा’ चित्रपटासाठी नानांनी तब्बल ११० गाणी लिहिली...त्यातली ११ गाणी निवडण्यात आली. ह्याच चित्रपटातील
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल

ह्या लावणी विषयी सांगताना नाना म्हणतात....त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून ४९ लावण्या लिहून घेतल्या...त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल...'. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. ‘व्वा! झक्कास, खेबुडकरजी, गाणं खास जमलं बरं का’ अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली.अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

आपल्या गीतांचे वैशिष्ट्य सांगताना नानांनी एके ठिकाणी म्हटलंय , ‘मी मागणी तसा पुरवठा करतो, मात्र गुणवत्तेशी कदापिही तडजोड करीत नाही. विशेष म्हणजे कोणतीही कविता अथवा गीत पूर्ण लिहून झाल्यावर त्यातील प्रत्येक शब्दाचं मी स्वत:च परीक्षण करीत असतो. दादा कोंडकेंसाठी ‘सोंगाड्या’पासून ‘तुमचं आमचं जमलं’पर्यंतची गाणी लिहिली. नंतर दादांनी मला गीत लिहिताना थोडं कमरेखाली उतरण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. जनतेला देताना चांगलंच द्यायचं, असं माझं ध्येय आहे. गीतकारापेक्षाही मला स्वत:ला कवी म्हणून घेणं अधिक आवडतं.

नानांच्या लेखणीचा आवाका आपण पाहिला तर थक्क व्हायला होतं. त्यांनी गाण्यातले सगळे प्रकार हाताळलेत... बालगीतं ते प्रेमगीतं, नांदी, पोवाडा, भक्तिगीतं, अंगाई गीतं, कीर्तन, देशभक्तिपर गीतं, गणगौळण,लावणी, गौरीगीतं, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीतं, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबार्‍याचं गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत सगळे प्रकार त्यांनी लीलया हाताळलेत. गीत लिहिताना शब्दांचे सोपेपण आवश्यक असतं व ते नानांनी अचूक साधल्याने ‘देहाची तिजोरी’ सारख्या भक्तिगीतांपासून  ‘मला इष्काची इंगळी डसली’ सारख्या शृंगार गीतांपर्यंत सर्व प्रकार ते सहजपणे हाताळू शकले. त्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं मात्र त्यांनी पान व विडा यांच्याशी संबंधित दोनशेहून अधिक गाणी लिहिली. तसेच अष्टविनायकाची एकदाही वारी न करता ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे खास गणेशभक्तांसाठी दिलेलं अप्रतिम गाणं म्हणजे नानांचा अजब महिमाच होय. आपल्या एकापेक्षा एक वरचढ गाण्यांनी त्यांनी मराठी रसिकांना अक्षरश: डोलायला लावलं आहे.

निर्माते-दिग्दर्शकांमध्ये भालजी,शांतारामबापूंपासून यशवंत भालकरांपर्यंत, संगीतकारांमध्ये वसंत पवार,सुधीर फडकेंपासून अजय अतुल, शशांक पोवारांपर्यंत, गायकांमध्ये सुधीर फडके,जयवंत कुलकर्णींपासून अजित कडकडे, अजय-अतुलपर्यंत, गायिकांमध्ये सुलोचना चव्हाण,,लता मंगेशकरांपासून ते वैशाली सामंतपर्यंतच्या गायिकेबरोबर नानांनी काम केलंय. म्हणजेच निर्माते,दिग्दर्शक, संगीतकार, गायक-गायिकांच्या जवळपास तीन पिढ्यांबरोबर नानांनी काम केलंय. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर नानांचा अस्सल गावरान ठसा उमटला. त्यांनी ३५० चित्रपटांसाठी २७०० गीते लिहिली तर ३५०० कविता लिहिल्या.

पहिल्या गीताला मिळालेल्या रसरंग फाळके पुरस्कारापासून सुरू झालेल्या मानसन्मानांच्या प्रवासात ६० हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचे ११ पुरस्कार, फाळके प्रतिष्ठान, गदिमा पुरस्कार, बालगंधर्व, शाहू पुरस्कार, कोल्हापूर भूषण, करवीर भूषण, दूरदर्शन जीवनगौरव, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी नानांना सन्मानित करण्यात आलं.

नानांची गाजलेली खूप गीतं आहेत.सगळीच इथे द्यायची म्हटलं तर पानंच्या पानं भरतील..म्हणून त्यातलीच चटकन आठवणारी काही गीतं देतोय.

* कसं काय पाटील बरं हाय का?
* सोळावं वरीस धोक्याचं गं
* दिसला गं बाई दिसला
* छबीदार छबी मी तोर्‍यात उभी
* मला लागली कुणाची उचकी
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली
* चंद्र आहे साक्षीला
* सत्य शिवाहूनी सुंदर हे
* आकाशी झेप घे रे पाखरा
* सावधान होई वेड्या
* एकतारी संगे एकरूप झालो,
* धागा जुळला, जीव भुलला,
* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
* कल्पनेचा कुंचला
*हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* विठू माउली तू माउली जगाची
* कधी तू हसावी, कधी तू रुसावी
* सत्यम शिवम सुंदरा
* कुण्या गावाचं आलं पाखरू,
* आज प्रीतीला पंख हे लाभले रे,
* सख्या रे घायाळ मी हरिणी,
* रुणझुणत्या पाखरा,
* तुझे रूप राणी कुणासारखे गं?
* मोरया..मोरया..

जन्म-१० मे १९३२  आणि मृत्यू-३ मे २०११....म्हणजे उणंपुरं ७९ वर्षांचं आयुष्य नानांना लाभलं...१९५६ सालापासून सिनेमाक्षेत्राशी जोडले गेलेले नाना त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याच्या सोबत राहिले....५५ वर्ष सतत गीतलेखन करणं आणि तेही तेवढ्याच ताकदीने हे केवळ नानाच करू जाणे.....नानांना माझे शतश: प्रणाम.

ज्या नानांनी असंख्य  कविता/गीतं लिहिली...त्याच नानांवर त्यांच्या कन्येने लिहिलेल्या एका कवितेने लेखाचा समारोप करतो.

जीवनगाणे
बहरुनी पुष्पात सार्‍या,गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात सार्‍या,छंद माझा वेगळा॥धृ॥
सुख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला॥१॥
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखी नसे
क्लेश मनीचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला॥२॥
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा॥३॥
- कविता खेबुडकर( अमृता पाड़ळीकर)

नानांबद्दल आणि त्यांच्या गीतलेखनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
http://72.78.249.107/esakal/SearchResult.aspx?q=%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B6+%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&b=


(सर्व मजकूर आणि छायाचित्र महाजालावरून साभार)
संकलक: प्रमोद देव

मायबोलीच्या  हितगुज  दिवाळी अंक २०११ मध्ये पूर्वप्रकाशित

२ टिप्पण्या:

prajkta म्हणाले...

ha lekh khupach mast zala aahe...manapasun aawdla. akdam mast.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद प्राजक्त!