माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ जून, २०११

चंशिकुम! १०

बर्फात खेळायला गेलो खरे...पण मी काही खेळलो नाही...त्याची दोन कारणं..एक तर गळ्यात प्रग्रा होता आणि आजुबाजूचे सृष्टीसौंदर्य,माणसांच्या हालचाली टिपण्यातच मी दंग होतो...हे एक कारण. दुसरं असं की बर्फात खेळायचा जामानिमा मी केव्हाच उतरवून गाडीत ठेवलेला होता...त्यामुळे साध्या कपड्यात बर्फात खेळण्यात ती मजा नव्हती...उगाच थंडी बाधायची आणि आजारपण उद्भवून सहलीचा मजा किरकिरा व्हायचा...माझ्या बरोबर असणार्‍यांनी मात्र तो मजा त्यांना हवा तसा लुटला.

बर्फातला मुख्य खेळ म्हणजे घसरगुंडी...लोक ते जाणतेपणाने आणि अजाणतेपणानेही खेळत होते....जाणतेपणाने म्हणजे...काही साधनांचा वापर करून...आणि अजाणतेपणाने म्हणजे...बर्फावरून चालतांना तसंही घसरायला होत होतंच...मीही एकदोनदा चांगलाच घसरलो...बरोबरच्या लोकांनी वेळीच आधार दिला म्हणून बरं...नाही तर माझा प्रग्राही बिघडला असता....त्यामुळे त्यानंतर मी बर्फाच्या बाहेरूनच इतरांच्या खेळाची मजा पाहात उभा होतो.

तास-दोन तास खेळल्यानंतर साहजिकच त्यातली गंमत कमी झाली,उत्साह मावळला आणि पोटात भूक जाणवू लागली...म्हणून मग आम्ही तिथून चालत चालत रस्त्यावर आलो आणि आमची गाडी शोधू लागलो...आता तिथे सगळ्याच गाड्या एका रंगाच्या,त्यातही एकाच मॉडेलच्याही भरपूर....इतक्या सगळ्या गाड्यांच्यात आपली गाडी शोधायची/ओळखायची म्हणजे प्रत्येक गाडीवरचा नंबर वाचत जायला हवा...आम्ही तेही करून पाहिले....पण गाडी काही सापडेना...खिशात हात घालून भ्रमणध्वनी काढावा म्हटलं....तर प्रत्येकाने तो गाडीतच ठेवून आल्याचं सांगितलं....मग आता गाडी कशी शोधणार? ती नेमकी कुठे पार्क केली हेच आम्हाला कुठे माहीत होतं? आम्ही तर मध्येच उतरलो होतो ना! :(


गाड्यांची ही भली थोरली रांग लागलेली होती....कैक किलोमीटर लांबवर ती पसरलेली दिसत होती...आम्ही परतीच्या दिशेन चालत होतो...आपली गाडी दिसेल ह्या आशेने...साधारण अर्धा-एक किलोमीटर चाललो...गाडीचा पत्ताच नव्हता...तेवढ्यात एक बाई दिसली...तिच्याकडे हातात तीन भ्रमणध्वनी दिसले...आमच्यापैकी एकाने जाऊन तिला विनंती केली....आम्हाला जरा आमच्या चालकाशी संपर्क साधायचाय, देता का तुमचा भ्रमणध्वनी?
ती बाई तर रडायलाच लागली....अहो, इथे रेंजच पकडत नाहीये...एकाही मोबाईलचा उपयोग नाहीये....मी गेले दोन तास शोधतेय....माझी गाडी कुठे हरवलेय कळतच नाहीये.आम्ही तिचे सांत्वन केले...म्हटलं,घाबरू नका,तुमच्या बरोबरची लोकंही तुम्हाला येतील शोधत. आम्हीही आमची गाडी शोधतोय.

त्या बाईसारखी आणि आमच्यासारखी अजूनही कैक लोकं आपापल्या गाड्या शोधत फिरत होती...आजूबाजूला इतक्या गाड्या असतांना नेमकी आपली गाडीच दिसू नये हा अनुभव अगदी वैताग आणणारा होता. इथे सूर्य तापलेला होता,त्यातच बर्फावरून परावर्तित होणारी त्याची किरणं अजून तापदायक वाटत होती आणि लोक आपापल्या साथीदारांना आणि गाड्यांना शोधत इतस्तत: भटकत होते...रोहतांगच्या त्या परिसरात कुणाचाही मोबाईल चालत नव्हता. खरं तर अशा ठिकाणी सरकारी पातळीवरून एखाद्या नियंत्रण कक्षाची स्थापना करणे गरजेचे होते...जिथे ध्वनीवर्धकाची योजना असायला हवी होती...ज्यावरून घोषणा करून संबंधितांचं लक्ष वेधता येईल...पण तशी काही सोय तिथे नव्हती....त्यामुळे सगळेच भरकटलेले दिसत होते.

आम्हा सहाजणांपैकी पाचजण आम्ही एकत्र होतो...आमच्या बरोबरच्या एक बाई आणि चालक गाडीबरोबर होते.जवळपास एक तास उलटला तरी गाडीचा पत्ता लागेना....आम्ही मात्र उगाच पुढे पुढे चालत होतो....बस्स! शेवटी मी निर्णय घेतला...आता पुढे जाणे नाही...इथेच थांबू.
पण मग प्रश्न निर्माण झाला...आम्हाला शोधायला कोण येणार?
मग दोन जणांना पुन्हा मागे पाठवलं...नदीच्या कोरड्या पात्रातही भरपूर गाड्या थांबवलेल्या दिसत होत्या....माझा अंदाज होता की आमची गाडी तिथेच असणार...कारण?
आमच्या बरोबरच्या ज्या बाई गाडीत राहिल्या होत्या त्या चालकाला गाडी खूप दूरवर नेऊन पार्क करायला निश्चितच देणार नव्हत्या ह्याची खात्री वाटत होती...त्यांचा नवरा,मुलांना सोडून फार लांब राहणं त्यांना शक्यच नव्हतं...तेव्हा गाडी तिथेच त्या नदीच्या कोरड्या पात्रातच असणार...साधारण त्याच्या आसपासच आम्ही उतरून गेलो होतो.

आमच्यापैकी दोघांना...माझी मुलगी आणि त्यांच्यापैकी एक मुलगा...अशा दोघांना मागे पाठवलं....हे असं करण्याचं कारण म्हणजे त्या मुलाला गाड्यांची इथ्यंभूत माहिती आहे आणि दूरवरून,मागून,पुढूनही तो गाडी कोणती आहे...म्हणजे कंपनी,मॉडेल इत्यादि ओळखू शकतो...अहो पण इथे एकाच कंपनीच्या मॉडेलच्या अनेक गाड्या आहेत...मग तो ओळखणार कसा आपली गाडी? आणि आत्तापर्यंत का नाही ओळखली?
प्रश्न बरोबर आहे...पण उत्तर असं आहे की...आत्तापर्यंत आम्ही केलेला गाडीचा शोध हा फारसे गंभीर होऊन केलेला नव्हता...आता मात्र संशोधक वृत्तीने आणि गंभीरपणाने तो शोध घ्यायचा होता...म्हणून ह्या दोघांना मागे पाठवलं. माझ्या मुलीकडे नुकताच घेतलेला अत्त्याधुनिक प्रग्रा होता...त्याचा उपयोग ह्यावेळी दुर्बीणीसारखा करायचा ठरले....त्याप्रमाणे ह्या दोघांचे पथक मागे रवाना झाले.
मग दुसरे दोन जणांचे पथक...आमचे सहलनेते आणि त्यांची मुलगी...हे दोघे पुढे निघाले...मी मात्र तिथेच एक उंचवटा पाहून बसून राहिलो. पुढे जाणार्‍यांना फार पुढे जाऊ नका...असं सांगून त्यांची रवानगी केली.

साधारण अर्ध्या तासाने पुढे गेलेले दोघेजण परत आले...गाडीचा कुठेच पत्ता नव्हता....ते जिथपर्यंत गेले होते...त्याच्याही पुढे किमान दोन किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग लागलेली होती...त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जास्त पुढे न जाता ते परतले होते....आता पुढे जायचंच तर सगळ्यांनी मिळूनच...हे ठरवून.

आमची मागे गेलेली दोनजणांची तुकडी अजूनही आलेली नव्हती...त्यांची वाट पाहणे सुरुच होते. आमच्यासारखे भरकटलेले लोकही इतस्तत: दिसत होते...त्यांचेही आपापसातले संभाषण निराशाजनक होते...गाडी कधी सापडणार? :(

इतक्यात काही विशिष्ट गणवेश घातलेले तरूण-तरूणींचे एक टोळके आले.....हातात फलक घेतलेले’पर्यावरण बचाओ’ मोहिमेचे ते सगळे शिलेदार होते. लोकांमध्ये जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता...प्लास्टिक पिशव्या,बाटल्या इतस्तत: टाकू नका,हिमालयाचा परिसर खराब करू नका...असा लोकांमध्ये प्रचार करत,वैयक्तिक संवाद साधत ही मंडळी माझ्यापर्यंत आली...त्यातली एक तरूणी मला उद्देशून म्हणाली...अंकल,आपका क्या कहना है?
मी म्हटलं, हे पाहा,तुम्ही जे काही करताय ते अतिशय स्तुत्त्य आहे,पण....
मी मराठीतच बोलत होतो...त्या लोकांना समजेल की नाही हे लक्षात आलं म्हणून मराठी/हिंदी असे संमिश्र बोलू लागलो....आणि काय आश्चर्य! त्यांच्यापैकी काहीजण चक्क मराठीच निघाले....त्यांचा एक गटप्रमुख तर कोल्हापुरचा ’कपडेकर’ आडनावाचा तरूण होता(नाव मात्र विसरलो त्याचे.)
मग काय मराठीतच गप्पा सुरु झाल्या.
मी त्यांना म्हटलं..हे पाहा,लोकांना तुम्ही जे काही आवाहन करताय ते त्यांना समजत नाहीये असे समजू नका...खरं तर इथे येणारे बहुसंख्य हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातूनच आलेले आहेत/असतात...पण अंगभूत असलेल्या/लागलेल्या वाईट सवयी इतक्या सहजासहजी सुटणार नाहीत. लोक कचरा टाकतात/करतात...त्यांना तुम्ही कचरा करू नका असे सांगितले तर काही मोजकेच लोक कदाचित तुमचे तेवढ्यापुरते ऐकतीलही...पण तुमच्या अपरोक्ष पुन्हा ते कचरा करतील...कारण...सवयी कधी सुटत नाहीत..त्या तशाच राहतात अशा अर्थी एक इंग्रजी म्हण आहे..हॅबिट ऑलवेज रिमेन्स!
हॅबिटचे स्पेलिंग आहे...एच(h) ए(a) बी(b) आय(i) ट(t)...habit
ह्यातलं पहिलं अक्षर काढलं तर राहतं.. ए बीट(a bit) रिमेन्स!
ह्यातलं दुसरं अक्षर काढलं तर राहतं...बीट(bit) रिमेन्स!
ह्यातलं तिसरं अक्षर काढलं तर राहतं...इट(it)रिमेन्स!...म्हणजेच ती(it)टिकते! अशी सहजासहजी जात नसते.
तेव्हा तुम्ही आवाहन जरूर करा,लोक लगेच सुधारतील अशी अपेक्षा मात्र करू नका आणि ती सुधारत नाहीत म्हणून खट्टूही होऊ नका...कारण जी गोष्ट तुम्हाला मनापासून पटलेय आणि जी तुम्ही अंगीकारलेय, ही गोष्ट जर बहुजनांच्या फायद्याची आहे अशी तुमची मनापासून धारणा असेल तर ती तुम्ही करत राहा...सुधारणा ह्या खूप हळूहळू होत असतात....सुधारकांच्या कैक पिढ्यांना त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं,तेव्हा कुठे इंचभर प्रगती होत असते.
लोकांनी टाकलेला कचरा उचलणारे,हातात झाडू घेऊन स्वत: साफसफाई करणारे सेवाभावाने प्रेरित झालेले लोकही मी पाहिलेत....पण म्हणून सर्वसामान्य लोक सुधारलेत असे नाही झाले...उलट लोक मुद्दाम तिथे,साफ केलेल्या जागी जाऊन पुन्हा कचरा टाकायला लागले...अशा वेळी स्वत: स्वच्छतेचं उदाहरण घालून देणारी मंडळी एक तर रागावतात किंवा मरू दे,हे लोक सुधारायचे नाहीत. आपण कशाला उगाच मरा....असे म्हणून त्यातून बाजूला हटतात....
आपल्याला लोकांच्या सवयी सुधारायच्या असतील तर त्याची अगदी प्राथमिक शालेय पातळीपासूनच सुरुवात करायला हवी आहे...एकदा एखाद्याच्या मनात चांगल्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण झाली की मग भविष्यात तो कधीच चुकीच्या गोष्टी करणार नाही....तेव्हा माझा तुम्हाला असा सल्ला आहे...की जोवर तुम्ही हे जे काही करताय(ते चांगलंच आहे...पण त्याला फारसे यश येणार नाहीये हे देखिल तेवढेच खरे आहे)ते तुम्हाला न रागावता,चिडता आणि निराश न होता करता येतंय तोवर जरूर करा...तुमच्या अशा मोहिमेमुळे किमान एक माणूस जरी सुधारला तरी खूप झाले असे समाधान माना...बाकी..आपण काही तरी समाज जागृतीचे काम करतोय ह्या समाधाना व्यतिरिक्त दुसरे काही फारसे साध्य होणार नाही हेही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्यात नैराश्य निर्माण होणार नाही.

तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी मी हे बोलत नाहीये...फक्त वस्तुस्थितीची कल्पना देतोय....कारण जेव्हा कुणीही आपल्या स्वत:च्या मनाने ठरवतो तेव्हाच ती सवय दीर्घकाळ टिकते,दुसर्‍यांच्या सांगण्याने नव्हे...एरवी तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या म्हणीसारखे होत असते...असला ताप फार काळ टिकत नाही.

माझं हे बौद्धिक ती मुलं शांतपणे ऐकून घेत होती...मी सांगितलेला..विशेष करून कचरा गोळा करण्याबद्दलचा त्यांचा अनुभवही तसाच होता...ह्याआधी हे लोक जेव्हा पिशव्यातून कचरा गोळा करत असत तेव्हा इतर लोक लगेच, तिथेच...साफ केलेल्या जागेवर कचरा आणून टाकत....ही वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात आलेली आणि म्हणूनच आता त्यांनी कचरा उचलणे बंद करून फक्त कचरा इथे तिथे टाकू नका...आपल्याबरोबर घेऊन जा आणि कचर्‍याच्या डब्यातच टाका असं सांगायला सुरुवात केलेली होती.... अजूनही बरंच काही सांगता आलं असतं...पण तेवढ्यात आमची गाडी आली...मागे गेलेल्या दोघांनी आपली कामगिरी अगदी चोख पार पाडली होती.

गाडीत बसता बसता त्या तरूणांचा निरोप घेतला. गाडी येईपर्यंतचा माझा वेळ मात्र मजेत गेला...त्या लोकांना कदाचित तो कंटाळवाणाही वाटला असेल. ;)

२४ जून, २०११

चंशिकुम! ९

पहाटे चार वाजता जायचं म्हणून तीन वाजताच उठून मुखमार्जनादि आन्हिकं आटोपून आम्ही सगळे तयार होतो पण गाडी चालकाचा पत्ताच नव्हता. त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न फोल ठरत होता...चार ते पाच असा एकतास गेला आणि शेवटी एकदाचा संपर्क झाला बुवा...महाराजांनी फोन उचलून आम्हाला कृतार्थ केले...आणि मग गाडीत बसून रोहतांगच्या दिशेने निघायला सकाळचे पावणे सहा वाजले.
आमच्या आधीच्या चालकाने आम्हाला प्रवासाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की इथे तुम्ही चालकाच्या सांगण्यानुसार आपला कार्यक्रम ठरवलात तरच तो उत्तमरित्या पार पडेल...कारण कोणत्या वेळी आणि कुठे रहदारी जास्त असते,ज्यामुळे उगाच प्रवासातला वेळ वाढत असतो...हे, चालक इथला स्थानिक असल्यामुळे त्यालाच बरोबर माहीत असतं. त्यामुळे तो सांगेल तसं वागा,तुम्हाला प्रवासात कोणतीच अडचण येणार नाही. आम्ही अगदी शहाण्या मुलासारखे त्याचे ऐकूनच ह्या आमच्या चालकाला आदल्या रात्री विचारून,त्याची संमती घेऊन पहाटे चारची वेळ ठरवली होती...पण त्याने तर मनालीतच आमचे दोन तास फुकट घालवले होते. असो,जे झालं ते झालं. आम्ही दोन-चार शब्द त्याला ऐकवले आणि त्यानेही प्रत्त्युत्तर न देता मुकाटपणे ऐकून घेऊन चक्राचा ताबा घेतला.

सकाळचं प्रसन्न वातावरण,थंडगार हवा,वळणावळणाचा रस्ता, रस्त्याच्या एका बाजूने वाहणारी नदी,तर दुसर्‍या बाजूला असणारा हिरवागार पर्वत...झोपेचे फुकट गेलेले दोन तास वसूल करायला मंडळींनी सुरुवात केली. मी मात्र चालकाजवळच्या आसनावर प्रग्रा सावरून बसून होतो...डोळ्यात काय आणि किती साठवू? प्रग्रात नेमकं काय कैद करू अशा द्विधा मन:स्थितीत सगळा आसमंत न्याहाळत होतो...अशा परिस्थितीत मला तरी झोप येत नाही बुवा...आपण अशी दृश्य रोज कुठे पाहात असतो?मग ही संधी सोडली तर आपणच आपल्यासारखे...कपाळकरंटे...

रस्ता अगदी साफ होता,वाटेत कुठेही विरुद्ध दिशेने येणारं वाहन दिसत नव्हतं. आमचा गाडीचालक अतिशय कुशलतेने गाडी चालवत होता...अधूनमधून भेटणार्‍या,आमच्याच सारखे रोहतांगच्या दिशेने जाणार्‍या बर्‍याच वाहनांच्या पुढे तो गाडी काढत होता.रस्ता असा नागमोडी होता की कधी नदी डाव्या हाताला तर कधी ती उजव्या हाताला...असे सारखे चित्र बदलत होते...मध्येच कधी छोटेखानी धबधबे दिसत होते आणि....आणि...अचानक समोरच्या बाजूला काहीतरी चमकायला लागलं...काय बरं होतं ते...अरेच्चा,ही तर हिमशिखरं दिसायला लागली होती...सूर्याची कोवळी किरणं त्यावर पडून ती हिमशिखरं जणू सुवर्णशिखरं भासत होती....मी लगेच प्रग्रा सावरला...काही छायाचित्रं घेतलीही...पण गाडी इतक्या वेगात पळत होती आणि रस्ता इतक्यावेळा वळत होता की ती हिमशिखरंही मध्येच गायब व्हायची....तशी ती अजून खूप दूर होती...आम्हाला तिथेच जायचं होतं...आणि त्यांनी आपली झलक दाखवून आमची उत्सुकता अजून वाढवून ठेवली होती.

चालकाने गाडी मध्येच एका गावात एका दुकानाजवळ थांबवली. इथून आम्हाला बर्फात खेळण्यासाठीचा सगळा जामानिमा घ्यायचा होता असं कळलं. पटापट सगळे खाली उतरून दुकानात गेलो. तिथे एक प्रसन्नवदना तरूण स्त्री उभी होती. तिच्याशी आमच्यातल्या महिलामंडळाने बातचीत करून आम्हा सहाजणांसाठी जामानिम्याची व्यवस्था केली..प्रत्येकी २०० रूपये असे त्याचे भाडेही ठरले. मग त्या स्त्रीने प्रत्येकाच्या उंचीचा,देहयष्टीचा अंदाज घेत एकेक पोशाख निवडून काढला,त्या त्या व्यक्तीला चढवला...अगदी आई लहान मुलाला आंगडं,टोपरं घालते त्याच मायेने ती माऊली आम्हाला सजवत होती. अंगात घालायच्या पोशाखात सगळ्यात आधी खुर्चीवर बसून पाय घालायचे, मग उभं राहून दोन्ही बाजूला हात पसरून लांब बाह्यात हात घालायचे आणि मग कमरेपासून वर गळ्यापर्यंत चेन खेचून अगदी गळाबंद व्हायचे. त्याच पोशाखाला जोडलेली टोपी असते...ती डोक्यावरून घ्यायची,तिचे बंद आवळून गळ्याशी बांधायचे....मग हातात घालायला हातमोजे आणि पायात घालायला गमबूट मिळाले....आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं आम्ही करत होतो...त्यामुळे एकमेकांच्या दिसणार्‍या ध्यानाकडे,अवताराकडे पाहून मस्तपैकी हसत होतो..एकमेकांची खेचत होतो...त्या माऊलीलाही आमची ही खेळीमेळी पाहून हसू फुटत होते. :)

चला,एकदाचे तयार तर झालो,म्हटलं आता सगळ्यांचं छायाचित्र काढूया.
नको,आत्ता नको,बर्फात गेल्यावर काढणारच आहोत ना,मग आता इथे वेळ नको घालवूया....असा एकूण विचार प्रकट झाल्यामुळे तसेच गाडीत बसलो आणि पुन्हा सुरु झाला प्रवास...रोहतांगच्या दिशेने.

मनाली ते रोहतांग पास हे अंतर तसं पाहायला गेलं तर फक्त ५१ किलोमीटरचं आहे असं नकाशा सांगतो....त्यामुळे ६०-७०च्या वेगाने गाडी हाणली तर ती तासाभरात पोहोचायला हवी असा सरळ साधा हिशोब आहे...पण तसं अजिबात झालं नाही...एक तर वळणावळणांचा आणि चढा रस्ता,त्यातच आता रहदारी कमालीची वाढलेली...सगळी रोहतांगच्या दिशेने जाणारी वाहनं एकामागोमाग एक अशी अक्षरश: रांगेत[रांगत म्हणलंत तरी चालेल.;)] चाललेली होती. अशी झुम्मड उडाल्यामुळे चांगले अडीच-तीन तास तरी लागले असावेत.(इथे घड्याळाकडे कुणाचं लक्ष होतं म्हणा?) तसेही शेवटचे काही किलोमीटर रस्ता बर्फाच्छादित असल्यामुळे प्रवाशांसाठी बंदच ठेवलेला होता...त्यामुळे आम्हाला जिथपर्यंत जायला परवानगी मिळाली तिथपर्यंत आम्ही पोचलो.वातावरणातला गारठा चांगलाच जाणवत होता...बर्फात खेळण्य़ासाठीचा सगळा जामानिमा घालून तयार होतो...तरीसुद्धा!
पांढर्‍या शुभ्र बर्फाच्या पार्श्वभुमीवर जिथे पाहावे तिथे पांढर्‍या गाड्याच गाड्या आणि प्रवाशांची वर्दळ दिसत होती. काही क्षुधाशांति गृह देखील तिथे असल्याचं लक्षात आलं....मग काय आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिथे मोर्चा वळवला. सकाळपासून पोटात चहा-कॉफीसुद्धा गेलेली नव्हती...मग गरमागरम पराठे आणि चहा-कॉफी अशी न्याहरी केली. न्याहरी करतांनाही मी अक्षरश: थरथरत होतो...आयुष्यात इतका गारठा पहिल्यांदाच अनुभवत होतो...तेही अंगावर इतके सगळे कपडे असतांना...

पोट भरलं तसा जीवात जीव आला.तिथून बाहेर पडलो...आजूबाजूला हिंडत-फिरत निघालो.बर्फाळ शिखरांची छायाचित्र घेण्याचा सपाटा लावला.सकाळचे साडेनऊ वाजले असावेत.आता सूर्य बराच प्रखर भासू लागला होता...बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे त्याचे प्रकाशकिरण डोळ्यांना जाचक वाटू लागले आणि त्याच वेळी जाणवलं की अंगातली थंडी आता कुठल्या कुठे दूर पळालेय...मग काय मी तो खास अंगावर चढवलेला जामानिमा काढून टाकला...त्याच्याबरोबरच अंगातला स्वेटरही काढून टाकला...आता अंगावर एक पॅंट आणि टी-शर्ट..नाही म्हणायला पायतले गमबूट फक्त ठेवले होते. बाकी अगदी मुंबईत राहतो तशा पोशाखात मी तयार झालो होतो...हुश्श! आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटायला लागलं....इतका वेळ माझ्यातला गुदमरलेला मी, पुन्हा एकदा अंगात संचारलो.

आजूबाजूला आमच्यासारख्याच उत्साही प्रवाशांनी आणि त्यांच्या गाड्यांनी रस्ते फुलले होते. खरं सांगायचं तर बर्फ फारसा नव्हता पण जो काही आजूबाजूला पसरला होता त्यात लोकांचे खेळणे-घसरणे सुरुच होते. आम्हीही मग त्यांच्यात सामील व्हायचं ठरवलं आणि म्हणून, चालकाला गाडी एका बाजूला घ्यायला सांगितली जिथे लांबवर बर्‍यापैकी बर्फ दिसत होता. त्याने गाडी पुन्हा उतारावर घेतली आणि पार्किंग शोधत शोधत हळूहळू आम्ही पुढे निघालो....पण मुद्दाम पार्किंगला अशी जागा कुठेच सापडेना...असली नसलेली जागा आधीच आलेल्या गाड्यांनी काबीज केली होती...मग आम्ही मध्येच उतरलो आणि चालकाला पुढे जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावण्यास सांगून लांबवर दिसणार्‍या बर्फात खेळायला निघालो.
इतक्या लांब, चढ-उतार करून जाण्याची तयारी नसल्यामुळे आमच्यापैकी एक बाईमाणूस गाडीतच बसून राहिली...गाडी जिथे पार्क होईल तिथेच थोडे-फार बर्फात खेळून घेण्याच्या इच्छेने...आम्ही सगळे त्या बर्फमय वातावरणामुळे भारलेलो होतो...त्यामुळे पुढचा-मागचा विचार न करताच निघालो...बर्फाळ प्रदेशाकडे.

२२ जून, २०११

ध्वनीमुद्रण!

बर्‍याच जणांना काही तरी दुसर्‍यांना सांगावेसे वाटते पण देवनागरीत लिहिता येत नाही किंवा लिहायचा कंटाळा असतो. अशा लोकांसाठी एक उपाय आहे तो म्हणजे..जे आपल्याला दुसर्‍याला सांगावेसे वाटते ते ध्वनीमुद्रित करून ऐकवावे...त्यासाठी कुणीही अगदी सहजपणाने आपल्या भ्रमणध्वनीवरील ध्वनीमुद्रक(रेकॉर्डर)वापरू शकतो...पण त्यावरील ध्वनीमुद्रणाचा दर्जा तेवढा खास नसतो..मग काय करायचं? त्यासाठी तेच ध्वनीमुद्रण संगणकावर करावे असे मी सांगेन...

आता तुम्ही म्हणाल ते कसे करावे बरं?
सांगतो.
आपल्या संगणकावर एक ध्वनीमुद्रक असतो..त्यात साधारण एक मिनिटाचे ध्वनीमुद्रण होते...पण ते होते .वॅव(.wav) ह्या प्रकारात...ज्यात फाईलचा आकार मोठा असतो...तो आकार कमी करण्यासाठी मग ही फाईल आपल्याला मप३(mp3) प्रकारात रुपांतरीत करावी लागते..ज्यासाठी वॅवचे मप३ मध्ये रुपांतर करता येणारी प्रणाली लागते...इतकं सगळं करूनही ध्वनीमुद्रण फक्त एकच मिनिटाचे होते आणि त्यात संपादनही करता येत नाही...मग अशा गोष्टीचा काय बरं उपयोग?

मंडळी असे निराश होऊ नका...मी सांगतो तुम्हाला...तुम्हाला हवा तेवढा वेळ बोलता येईल इतके ध्वनीमुद्रण करणारी प्रणाली..ज्यात हव्या तेवढ्या वेळा संपादन करता येते..झालंच तर अशा ध्वनीमुद्रणातून तयार होणार्‍या वॅव फाईलचे मप३ मध्ये सहजपणाने रुपांतर करता येईल अशी सोयही आहे ह्या प्रणालीत...आणि ही प्रणाली पूर्णपणे फुकटही आहे..तेव्हा लागा तयारीला.

ह्या प्रणालीचे नाव आहे ऑडेसिटी(Audacity).
http://audacity.sourceforge.net/download/windows ह्या दुव्यावरून आपण ती आपल्या संगणकावर उतरवून घेऊन वापरू शकता.
१)Windows 98/ME/2000/XP: Audacity 1.2.6 installer (.exe file, 2.1 MB) - The latest version of the free Audacity audio editor..ह्यातले Audacity 1.2.6 installer हे उतरवून घ्यायचंय.
२)आणि मप३ मध्ये रुपांतरण करण्यासाठी ज्या फाईलची गरज असते...ती लेम फाईल ... LAME MP3 encoder - Allows Audacity to export MP3 files.

वर दिलेल्या दोन्ही फाईली उतरवून घेऊन त्याची स्थापना आपण आपल्या संगणकावर केलीत की आपण हवे तेवढे ध्वनीमुद्रण करू शकता....लेम फाईल ही ऑडेसिटीच्या मूळ फोल्डरमध्येच ठेवावी म्हणजे ती त्या प्रणालीला आपोआप जोडली जाते.

ऑडेसिटी कसं वापरायचं? प्रश्न पडला असेल ना?
अहो त्याच्या हेल्प फाईलमध्ये सगळ आहे त्याबद्दल.
आणि इथेही आहे.....म्हणजे खालच्या दुव्यावर.
http://audacity.sourceforge.net/manual-1.2/index.html

खरं सांगायचं तर ध्वनीमुद्रणासाठी महाजालावर हव्या तेवढ्या फुकट स्वरूपातल्या प्रणाल्या आहेत...पण ऑडेसिटीइतकी सोपी आणि परिपूर्ण अशी दुसरी कोणतीही प्रणाली नाही आढळली.

१९ जून, २०११

चंशिकुम! ८

थोडा वेळ आराम करून,चहापाणी करून पुन्हा बाहेर पडलो.आता अंधार झालेला होता पण आम्हाला फक्त एकाच ठिकाणी जायचं होतं... ते म्हणजे वशिष्ठ ऋषींचं मंदिर पाहायला. आम्ही त्याच रस्त्यावर राहात होतो त्यामुळे ते तसे फारसे लांब नसावे असे वाटले होते; पण गाडीतून जाऊनही चांगली पंधरा मिनिटे लागली...आणि गाडीतून उतरून अजून पुढे चढ्या रस्त्याने चालत पंधरा-वीस मिनिटे लागली. रस्ता चढा होता आणि चांगलाच दमवणारा होता. बोलतांना जाणवत होतं की श्वास लागतोय..शिमल्यापासूनच मला हे जाणवले होते की एकदोन मजले चढलो तरी श्वास लागतोय...मनात आलं की आपण आता खर्‍या अर्थाने म्हातारे झालोय. ;)
पण जेव्हा कळलं की माझ्या बरोबर असणारी तरूण मंडळी(आमच्यात मीच सगळ्यात वयाने मोठा होतो)देखील धापा टाकताहेत,त्यांनाही इथे थकायला होतंय, तेव्हा म्हटलं...नाही,नाही. अजून दम बाकी आहे आपल्यात. ;) कारण एक होतं...चढतांना जरी धाप लागत होती...तरी चढून वर गेल्यावर मिनिटा-दोन मिनिटात श्वास पूर्वपदावर येत होता. ह्याचा अर्थ एकच होता...आम्हा शहरी लोकांना चढण चढण्याची...आपल्या भाषेत जिने चढण्याची फारशी सवय नसते आणि त्यामुळेच हा त्रास जाणवत होता. तसे तर मला सहा जिने चढण्याची कमी-जास्त सवय आहेच,कारण मी राहतोच सहाव्या मजल्यावर आणि अधेमधे आमची लिफ्ट बंदही असते...मग काय,चढणे-उतरणे ओघाने आलेच.असो.

वशिष्ठी मंदिराकडे जातांना दूतर्फा बरीच दुकानं आहेत. त्यात शाली,गरम कपडे,शोभेच्या वस्तु,खेळणी वगैरे बर्‍याच गोष्टींची विक्री होते. आम्ही मंदिराकडे चाललो असताना बरेच दुकानदार जाणार्‍या-येणार्‍या आमच्यासारख्या प्रवाशांना एकच प्रश्न विचारत होते,आमंत्रण देत होते....क्या चिंगु चाहिये? आईये जी चिंगू देखिये.

मला ते चिंगू... चिंगूस असे ऐकू येत होते. आम्ही कुठेच न थांबता मंदिराकडे निघालो होतो आणि ही मंडळी आम्हाला विचारत होती...काही घ्यायचंय का? आणि आम्ही नाही म्हणत पुढे चाललो होतो...त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे चिंगूस ऐकून...ही मंडळी आम्हाला तर चिंगूस(कंजूष) म्हणत नाहीत ना? असा एक प्रश्न माझ्या मनात आला...

पुढे जाता जाता एकाने अगदी वाट अडवून मला तो प्रश्न पुन्हा विचारला...आता एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा असे ठरवून मी त्याला म्हटलं...क्या है ये चिंगूस?
तो म्हणाला...आईये इधर दुकानमे आईये..दिखाता हूँ!
नही,हमे लेना नही है,खाली ये क्या है वह बताईये. यहाँपर सब लोक एकही सवाल करते है,इसीलिये उत्सुकता बढ चुकी है!...मी म्हणालो
अच्छा साब, बताता हुँ! वो क्या है ना की..चिंगु नामका एक प्राणी होता है...भेड-बकरी जैसा.जिसके शरीरपर बहुत ऊन होती है.....
मी त्याचं बोलणं मधेच कापत हसत हसत म्हटलं...अच्छा,वो प्राणीका नाम है क्या? हम तो समज रहे थे की आप सब लोक हमें चिंगूस...याने के कंजूष बोल रहे है...हमारे भाषामे कंजूषको चिंगूस बोलते है! हमने सोचा यहॉं सब लोक हमे बुला रहे है और कह रहे है की भाईसाब आईये,कुछ खरिदिये, और हम ऐसेही आगे जा रहे है,तो वो लोक हमे चिंगूस यानी के कंजूष कह रह रहे है!

तो दुकानदार आणि त्याच्या बरोबरचे साथीदारही खूप मोठ्याने हसायला लागले.
नही,साबजी,हम आपको ऐसे कैसे बोल सकते है? हम बेचनेके लिये यहाँपर बैठे है,कोई खरीदे ना खरीदे. वह तो उनकी मर्जी है,लेकिन हम किसीको कजूष कैसे बोल सकते है!
असो. आम्ही पुढे निघालो आणि मंदिराजवळ पोचलो. सगळ्यांच्या चपला-बूट साभाळायला मी बाहेरच थांबलो...बाकीचे लोक मंदिरात निघून गेले. मी हे पाहिलंय की इथली बहुतेक मंदिरं चांगली एकदोन मजली असतात...बहुदा मंदिराबरोबरच तिथे भक्तनिवासही असावेत. दूरवरून येणार्‍या भक्तांची उतरण्याची,राहण्याची सोय असावी म्हणून. हिमाचलमध्ये भरपूर मंदिरं आहेत...इतकी की हिमाचलचं दुसरं नाव आहे देवभूमि!

मंडळी देवळात चक्कर मारून आली..आम्ही पुन्हा खाली उतरायला लागलो....पुन्हा ती चिंगूवाली मंडळी पिच्छा पुरवायला लागली...मग सर्वानुमते ठरवलं...इतकं म्हणताहेत तर काय प्रकार आहे ते पाहूया..आम्ही आत गेलो....पाचसहाजण होते दुकानात...त्यापैकी एकाने आमचा ताबा घेतला...सगळ्यांना बसायला आसनं दिली आणि त्याने त्या चिंगुबद्दल सांगायला सुरुवात केली...
चिंगु नावाचा एक केसाळ बकरी/मेंढी सदृश प्राणी आहे...पूर्वी, ह्याच प्राण्याच्या कंठात आढळणार्‍या विशिष्ठ तंतूंपासून शाल बनायची...ती पश्मिना नावाने ओळखली जायची...पण त्यासाठी त्या प्राण्याची हत्त्या करावी लागत असे...मेनका गांधी मंत्री असतांना तिने ह्यावर बंदी घातली..जी आजपर्यंत टिकून आहे...त्यामुळे त्या पद्धतीने शाल बनणे बंद झाले...मग आता दुसरा पर्याय काय? तर..हा पर्याय जरा खूप लांबचा आहे...कसा तो आपण पाहूया...
त्याच प्राण्याच्या अंगावरच्या केसांपासून आधी रजई बनवायची... ही रजई दुपदरी असते...थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड...असे तिचे वैशिष्ठ्य आहे... ही रजई अंगावर न घेता पलंगपोस म्हणून वापरायची असते...थंडीत ती जशी आहे तशीच गादीवर अंथरायची असते म्हणजे ऊबदारपणा जाणवतो आणि उन्हाळ्यात तिच्यावर पाणी मारून(पाणी न मारताही थंड करणारी चिंगुही होती..अजून महाग होती) मग ती अंथरायची असते म्हणजे गारवा जाणवतो...जेणेकरून उकडत नाही आणि शांत झोप लागते.

ही रजई गिर्‍हाईकाला वापरायला द्यायची...त्यासाठी गिर्‍हाईकाने साधारण ६००० रुपये मोजायचे. दोन ते तीन वर्षे ही रजई वापरून त्याने ती परत करायची....परत करतांना त्याला दोन पर्याय असतात...१) साधारण ४५ ते ५०% पैसे परत मिळतात...किंवा २) थोडे अधिक पैसे भरून दुसरी चिंगु वापरण्यासाठी घेता येते.
रजई घेतांना गिर्‍हाईकाला रजई बरोबरच पाच गोष्टी फुकट दिल्या जातात...एक खास गरम चादर,दोन शाली..एक पुरुषांसाठी आणि एक स्त्रीसाठी,एक खास चादर ज्यावर निसर्गदृश्य रंगवलेलं असतं...जे तुम्ही घरात पडदा किंवा सजावटीसाठी भित्तीचित्र म्हणून वापरू शकता आणि एक जमिनीवर पसरण्याचा रंगीबेरंगी गालिचा....
तसं पाहायला गेलं तर सौदा काही वाईट नव्हता...पण आमच्यापैकी कुणीच काही घेतलं नाही....
हं,आता कुणालाही प्रश्न पडला असेल की...गिर्‍हाईकाने परत केलेल्या त्या चिंगुचं ही मंडळी काय करतात?
अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न...साधारण वर्ष-दोन वर्ष वापरलेल्या अशा त्या रजईवर काही प्रक्रिया करून नंतर तिच्यापासून अतिशय मुलायम अशा शाली तयार केल्या जातात..ज्या अंगठीतूनही पार होतात..ज्यांची किंमत भरमसाठ असते...आणि हाच त्या दुकानदारांचा/उत्पादकांचा फायदा असतो....रजया जुन्या झाल्याशिवाय त्यातून, त्यांना हवे तसे तलम शाली बनवण्यासाठीचे तंतू मिळत नाहीत...त्यामुळे त्यासाठी त्या आपल्यासारख्या गिर्‍हाईकांना सशुल्क वापरायला दिल्या जातात..त्या आपण घ्याव्यात म्हणून काही मोफत गोष्टींचं आमिषही दाखवलं जातं...एकूण मला तरी हा प्रकार गिर्‍हाईक आणि उत्पादक ह्या दोघांच्या फायद्याचा वाटतो...अर्थात प्रत्यक्ष अनुभव नाही घेतला.
हा सगळा व्यवहार जम्मू-काश्मीर सरकार पुरस्कृत आहे असेही कळले..खरे खोटे माहीत नाही....

रजया तिथे दुकानात पैसे देऊन अथवा क्रेडिट कार्ड इत्यादि वापरून विकत घेता येत होत्या तसेच त्या घरपोचही पाठवतात ...त्या घरी आल्यावरच आपण पैसे द्यायचे....वापरून झाल्यावर आपल्या जवळच्या प्रमुख शहरातील..जसे की मुंबई,पुणे वगैरे ठिकाणी जिथे जम्मू-काश्मीर सरकारच्या वतीने प्रदर्शनं भरवली जातात..तिथे ह्या वापरलेल्या रजया स्वीकारल्या जातात...पैसे परत हवे असतील तर त्यांच्या नियमात जे काही बसते ते ठराविक काळाने तुमच्या घरी धनादेशाद्वारे पोचवले जातात..अथवा अधिक किंमत भरून नवीन चिंगु पाठवली जाते.....

असो...प्रत्येकाच्या मनात त्या रंगीबेरंगी चिंगु,त्यासोबत फुकट मिळणार्‍या तशाच रंगीबेरंगी आणि आकर्षक भेटवस्तु इत्यादि भरूनही आम्ही काही त्या मोहाला बळी पडलो नाही. :)
आम्ही पुन्हा आमच्या विश्रांतीस्थानाकडे निघालो...दुसर्‍या दिवशी पहाटेच निघायचे होते ना आम्हाला...रोहतांग खोरे(पास) दर्शनासाठी.

हॉटेलात पोचलो...जेवणाची वेळ झालीच होती. माझ्या सुदैवाने ह्या हॉटेलात शाकाहारी जेवणच बनवले जाते असे कळले...अर्थात मांसाहारी जेवणाची कुणी आगाऊ मागणी नोंदवली तरच त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाते...असेही कळले...त्यामुळे मी नि:शंक मनाने जेवणाचा आनंद लुटू शकलो....
दुसर्‍या दिवशी गाडी-चालकाला पहाटे चार वाजता येण्यास सांगून आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो.

१० जून, २०११

चंशिकुम! ७

कुलूत वेळ घालवण्यात आमच्या दृष्टीने आता खास काही मतलबच नव्हता तेव्हा आम्ही सरळ मनालीच्या दिशेने निघायचं ठरवलं...पण रस्त्यात एक जवळच कोणत्या तरी देवीचे मंदिर होते ते पाहायला आमच्या बरोबरची मंडळी उतरून गेली...मी आपला चालकाबरोबर तिथेच बसून राहिलो. बराच वेळ झाला तरी कुणी येईचना. तेवढ्यात माझा भटक्या वाजू लागला...सगळी मंडळी मंदिरातच होती...तिथे प्रसाद भक्षणासाठी(तिकडच्या भाषेत भंडारा म्हणतात)बसले होते...मलाही बोलावत होते....सकाळी केलेल्या न्याहारीनंतर काहीच खाल्लेलं नव्हतं आणि आता दुपारचे दोन वाजून गेले होते...खरं तर रस्त्यात कुठे हॉटेल/ढाबा दिसेल तिथे गाडी थांबवायची असेही ठरलेले होते आणि अचानक ह्या मंडळींनी आपली योजना बदलून इथे मंदिरातच प्रसादाचं जेवण जेवायला सुरुवातही केलेली...हो,नाही, करता करता मलाही त्यांनी पटवलं आणि मग मीही तिथे जेवायला जाऊन बसलो....बराच वेळ माझ्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं...अगदी खरं सांगतो...ज्या देवळात मी देवाचं दर्शनही घेण्यासाठी गेलेलो नव्हतो तिथेच जाऊन प्रसादाचं जेवण जेवावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आणि ते योग्यही नव्हतं ...पण आपल्या बरोबरच्यांची मनं राखण्यासाठी केवळ नाईलाज म्हणून मी तिथे गेलो...त्यामुळे, मला कुणी जेवण वाढायला येत नव्हते ते एका दष्टीने बरेच झाले असे मी मनातल्या मनात समजत होतो...पण आमच्यापैकी एकाला ते सहन झाले नाही आणि त्याने त्या तिथल्या स्वयंसेवकांचे लक्ष माझ्याकडे वेधलं...झालं,माझ्यासाठीही ताट आणलं गेलं...रिकामंच होतं...बराच वेळ ते रिकामं ताट माझ्यासमोर होतं...मी हळूच इकडे तिकडे पाहून उठायचा निर्णय घेतला...पण हाय रे दैवा...माझी ती चाल ओळखून एक स्वयंसेवक चपळाईने माझ्या ताटात भात वाढून गेला..त्याच्या मागोमाग डाळ आणि ऊसळ वाढणारे स्वयंसेवकही चटाचट आले आणि मग मला जेवावंच लागलं...समोर भरलेलं ताट असतांना त्याला लाथाडून जाणे कसे शक्य होते...अन्न हे पूर्णब्रह्म...हे मनावर बिंबवलं गेलं होतं लहानपणापासून.
ज्या देवाला मी भेटायला गेलो नव्हतो...आमच्या भावकीतलाच असणार म्हणा तो...तरीही. ;) तो म्हणाला असेल...
इतक्या लांब येऊनही मला न भेटता जातोस...एकवेळ ते ठीक आहे रे...पण पानावर बसूनही जेवायलाही तयार नाहीस? इतका कसला आलाय माज? ते काही नाही, कसा जेवत नाहीस ते बघतोच मी...अरे वाढा रे त्याच्या पानात...म्हणत जणू काही त्याने मला जेवायला भागच पाडले होते. ;)
जेवण साधेच होते पण मला त्यांची पातळसर उसळ खूप आवडली...मिश्र कडधान्यांची होती...डाळ आंबट(खाटी) असल्यामुळे मला नाही आवडली....पण जे काही एकदा वाढलं ते संपवून मी चपळाईने उठलो...आणखी काही वाढायच्या आत...म्हटलं...हमने भी कच्ची गोलियॉं नही खेली है( की.. खाई है?)....हाहाहा...आपलं हिंदीही असं तसंच...पण समजलं असेल त्या आमच्या हिमाचलातल्या भावक्याला....आणि सरळ हात धुवायला निघालो...तिथल्या रिवाजाप्रमाणे आपलं आपण ताट-भांडं उचलून घेतलं(इतरांचं पाहून),तिथल्या धुण्याच्या जागी नेऊन ते धुतलं आणि बाजूच्या ओट्यावर ठेवलं...मला अशा ह्या स्वावलंबनाची सवय असल्यामुळे तसे गैरसोयीचे असे काहीच वाटले नाही...मी तर उलट असे म्हणेन...की रोज इथे किती श्रद्ध/अश्रद्ध(माझ्यासाखेच)लोक येऊन जेवून जात असतील कुणास ठाऊक...आणि इतक्या सगळ्यांची चोख व्यवस्था ठेवणे तर महाकर्मकठीण...त्यामुळे हे स्वावलंबन अशा ठिकाणी राबवणे मला तरी योग्यच वाटतं.
असो...एकूण काय...दाने दाने पे लिख्खा है खानेवालेका नाम...ह्या म्हणीप्रमाणे माझेही नाव तिथल्या खाण्यावर लिहिलेले होते. :)

त्यानंतर आम्ही निघालो मनालीच्या दिशेने...भात खाल्ला की मला सुस्ती येतेच...पुढच्या सीटवर बसून तर ती जास्तच यायला लागली होती...कारण बाहेर चक्क ऊन तळपत असल्यामुळे आता गाडीतले वातानुकुलनही जोरात होते...इथे ही हवा सारखी अशीच बदलते.. ह्यावर चालकानेही शिक्कामोर्तब केले...त्यामुळे भाताची सुस्ती अधिक थंडगार वातावरण...मी डुलक्या घ्यायला लागलो...इतरजण तर केव्हाच झोपले होते....खरं तर मला प्रवासात झोप येत असली तरी मी सहसा झोपत नाही...आपण झोपलो तर आजूबाजूच्या दृष्यांना मुकणार...रोज थोडेच अशा ठिकाणी येणार आहोत आपण?त्यामुळे जमेल तसा जागे राहण्याचा प्रयत्न करत, मध्ये डुलकी घेत,जागा झाल्यावर आजूबाजूला दिसणारा निसर्ग टिपण्यासाठी प्रग्राची कळ दाबत होतो...चालत्या गाडीतून....कधी समोरच्या काचेतून तर कधी बाजूच्या काचेतून दृष्य टिपणं सुरूच होतं.

साधारण पाच वाजण्याच्या सुमारास आम्ही मनालीला पोचलो...आता पुन्हा हॉटेल शोधायचे होते...म्हणजे आमचं आरक्षण झालेलं होतंच...पण ते नेमकं हॉटेल अशा नव्या(आमच्यासाठी नव्या) ठिकाणी शोधणं इतकं साधं नव्हतं. नैना रिसॉर्टस असे त्या हॉटेलचं नाव होतं...आता गंमत पाहा...आम्हाला ह्या नावा व्यतिरिक्त काहीच माहीत नव्हतं...चालकालाही काहीच माहीत नव्हतं...एकदोन ठिकाणी गाडी थांबवून विचारूनही घेतलं....पण कुणालाच काही माहीती नव्हती. मग काय पुन्हा स्थानिक संयोजकाशी(शिमल्यानंतर आम्हाला स्थानिक संयोजकाचा दूरध्वनी क्रमांक मिळालेला होता) बोलणं झालं...त्याने नाव बरोबर असल्याचं सांगितलं...मग गाडी पुढे जातच राहिली...रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या हॉटेलच्या पाट्या पाहात पाहात आम्ही नदीवरचा पूल पार करून दुसर्‍या बाजूला गेलो...तरी अजून हॉटेलचा पत्ता नव्हता....शेवटी पुन्हा एकदा स्थासंशी संपर्क...ह्यावेळी रस्त्याचे नाव,जवळची काही खूण असे विचारून घेतले....चला, आम्ही तसे योग्य मार्गावरच जात होतो....त्या विशिष्ट रस्त्यावर(रस्त्याचं नाव होतं..वशिष्ठ आश्रम रोड) पोचलो....ती खूणही सपडली पण...तिथे तशा नावाचे हॉटेलच नव्हते...त्याच्या जवळपास एक नैना लॉज होता...पुन्हा स्थासंशी संपर्क...त्याला जरा झापलंच..मग त्याने सांगितलं...की त्या हॉटेलचं आता नाव बदललंलय....आधीचं नैना रिसॉर्टस बदलून आता नैना रॉकलॅंड झालंय...आणि ते तिथेच वशिष्ठ रोडवर आहे...आता ह्या नव्या नावाचा शोध सुरु झाला आणि मग तिथल्या आजूबाजूच्या लोकांनीही...होय,अशा नावाचं हॉटेल इथेच आहे...असे,असे इथून वर चढून जा..म्हणून एक चढणीचा रस्ता दाखवला...हे राम! कुठे भलतीकडेच,आडरस्त्याला हे हॉटेल आहे?...आमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह. ह्या लोकांना काय दुसरी चांगली जागा सापडली नाही काय?
एकदोन वळणं घेत घेत गाडी वर चढून गेली...चढ चांगलाच जबरदस्त होता आणि अचानक गाडी थांबवावी लागली...तिथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु होते....आतापर्यंत चढून आलेला रस्ता तसा साधाच होता आणि मधेच हे डांबरीकरण?
बरीच इंजिनियर,कामगार मंडळी तिथे जमलेली होती,काम अगदी जोरात सुरु होतं....आम्हाला वर जायचं होतं पण रस्ता तर बंद के्लेला होता...पाच-दहा मिनिटे तो प्रकार पाहून चालकाने हॉर्न वाजवून इशारा केला...वर जाऊ द्या म्हणून...त्यावर त्यांच्यापैकी कुणीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही...सगळे आपले ढिम्म!आमच्या गाडीच्या पुढेच एक मालगाडी गेलेली होती....त्यातली खडी उतरवण्याचं आणि आणि तिथेच रस्त्यावर झारीने ओतलेल्या गरमागरम डांबरावर ती खडी पसरण्याचं काम शिस्तीत सुरु होतं....इतक्यात,वरून दोनतीन गाड्या आल्या...त्यांनाही तिथे थांबवून ठेवण्यात आलं...दहा-पंधरा मिनिटे ते खडी पसरण्याचे काम सुरु होते...मग ती मालगाडी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभी राहिली...वरच्या गाड्या आमच्या बाजूने खाली उतरल्या आणि मग आम्हाला वर जाण्यासाठी परवानगी मिळाली....गाडी वर गेली आणि वळणावर तिथेच एक खडीदाब्या(रोडरोलर) मागे-पुढे होत होता...हॉर्न वाजवून त्याला बाजू देण्यास सांगितले...त्यानेही दहा मिनिटे खाल्ली...शेवटी एकदाचे तिथून निसटलो आणि वर पोचलो....तरीही हॉटेलचा पत्ता नव्हता. :(

अजून दोन वळणं बाकी होती...त्यातलं एक वळण पार करून वर गेलो...गाडी तिथेच उभी केली कारण वरच्या रस्त्यावर एक गाडी उभी होती. गाडीच्या बाहेर पडून वरच्या दिशेला पाहिलं...तिथे काय आहे हे दिसत नव्हतं पण एखादं हॉटेल असणार ह्याची मात्र खात्री झाली.चालतच वर चढून गेलो..एका विवक्षित ठिकाणी पोचलो आणि मग डाव्या बाजूला हॉटेल दिसू लागलं...पण नाव काय असावं? ते काही दिसतंच नव्हतं....मग अजून थोडा चढ चढून आणि बर्‍याच उंच ऊंच पायर्‍या चढून वर पोचलो... हॉटेलच्या प्रांगणात प्रवेश केला...तिथला एक सेवक दिसला...त्याला हॉटेलचे नाव विचारले...हुश्श! तेच होते..आम्ही इतका वेळ शोधत होतो तेच.
मग मॅनेजरकडे जाऊन चौकशी केली...त्याला आमचे आरक्षण असल्याचे सांगितले...ओळख पटवून खात्री झाली...आमच्यासाठी तिथे दोन खोल्या राखून ठेवलेल्या...मग भराभर सुत्रं हलली...हॉटेलवाल्यांनीच खाली जाऊन आमचं सामान वर उचलून आणलं. पहिल्या मजल्यावरच्या दोन खोल्या आमच्यासाठी होत्या....तो पहिला मजलाही आपल्या इथला तिसरा मजला वाटावा इतके चढे अंतर हॉटेल मॅनेजरच्या खोलीपासूनचे होते....मनातल्या मनात आमच्या मुंबईच्या सहल आयोजकाला सगळेजण शिव्या देत होते...कुठे खबदाडात आम्हाला आणून टाकलं होतं त्याने..म्हणून.

हॉटेल सेवकाबरोबर आम्ही जिना चढून वर गेलो...त्याने खोल्या उघडून सामान आत नेऊन ठेवले आणि तो गेला. खोल्या मात्र अतिशय उत्तम सजवलेल्या आणि सुखसोयींनी युक्त होत्या...खोल्यांना जोडूनच बाहेर सज्जा होता...पडदे बाजूला सारून,दार उघडलं आणि सज्ज्यात पाऊल टाकलं मात्र...........

अहाहा! काय रमणीय दृष्य होतं ते. दूरवर साक्षात हिमशिखरं आम्हाला साद घालत होती...खाली बियास नदीचं वळणं वळणं घेत वाहणारं खळाळतं,आरस्पानी स्वरूप,हिरवाईने नटलेले पर्वत,त्यात दिसणारी रंगीबेरंगी घरं,छाया-प्रकाशाचा अनोखा खेळ... वेड लावणारे असे ते दृष्य आम्ही सगळेच किती तरी वेळ न्याहाळत बसलो...छायाचित्र तर वेगवळ्या पद्धतीने घेतली....

इतका वेळ त्या सहल आयोजकाला मनातल्या मनात शिव्या देणारे आम्ही आता त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करायला लागलो...वा, काय पण जागा शोधलेय!जणू काही स्वर्गात आलोय असं वाटतंय!

८ जून, २०११

चंशिकुम! ६

कुफरीहून परत येतांना वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो...तिथे एक गोऽऽड पिल्लू भेटलं...त्याचे छायाचित्र आधीच्या लेखासोबत जोडलंय. पाहताक्षणीच आवडावं असं त्याचं रूप...खरं तर त्याचे आई-बाबाही देखणे आहेत..पण लहान मुलातला गोडवा मोठ्या माणसात दिसत नसतो...त्यामुळे छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही...त्याचे आई-बाबाही त्याला तयार करण्यात सहभागी झाले. बर्‍याच प्रयत्नानंतर दोनतीन छाचि काढण्यात यश मिळाले.

दुपारी चारच्या सुमारास आम्ही शिमल्याला हॉटेलवर परतलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळी सहाच्या सुमारास चहा-कॉफी पिऊन पुन्हा खाली उतरलो. आता आम्ही केवळ ’द मॉल’( काही लोक ह्याला माल रोड असेही म्हणतात) वर फिरणार होतो...जिथे फक्त रुग्णवाहिका,पोलिसांच्या गाड्या आणि अन्य अत्त्यावश्यक सेवा वाहनेच चालवली जातात...बाकी, रस्ता हा फक्त चालणार्‍यांसाठीच मोकळा ठेवलाय. त्यामुळे रमत-गमत, दुकानं न्याहाळत चालणार्‍यांची चांगलीच वर्दळ इथे असते.

खरं तर माझ्यासारख्या मुंबईत राहणार्‍या लोकांसाठी ह्या रस्त्याचं काही खास आकर्षण असण्याचा मतलब नाही...कारण मुंबईत जाल तिथे हवे ते मिळण्याची दुकानं आहेत...हं, एक मात्र खरं की असे रस्त्यात विनाव्यत्यय रमत-गमत चालणे मुंबईत कधीच शक्य नसतं...बंद,हरताळ वगैरेंचा अपवाद वगळता.

२-३ तास फिरून आलो. छान वाटलं. तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यातल्या बाईमाणसांनी...नेहमीचंच हो...खरेदी आटपून घेतली. :)
बायका कुठेही जावोत..खरेदी केल्याशिवाय राहात नाहीत...बहुतेक वेळा ही खरेदी वायफळच असते...घरात कपड्यांनी कपाटं ओसंडून वाहात असली तरी ह्यांची नव्या कपड्यांची खरेदी अव्याहतपणे सुरुच असते...यज्ञकुंडात समिधा टाकाव्या..तशी. ;)

उद्या सकाळी (२८ मे)कुलु-मनालीकडे प्रस्थान ठेवायचं होतं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून रात्री साधारण ११ च्या सुमारास झोपी गेलो.सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे रात्रीच काही गोष्टी उरकून घेतल्या....एक म्हणजे हॉटेलचे बील आधीच चुकते करून ठेवले(जे काही जास्तीचे घेतले होते त्याचे पैसे चुकते केले...कारण सकाळचे चहापाणी,न्याहारी आणि रात्रीचे जेवण आमच्या प्रवास करारात सामील होते). सकाळी लवकर निघायचं म्हणून तिथेच न्याहारी न करता ती बांधून देण्याची विनंती हॉटेल प्रशासनाला केली..ती त्यांनी मान्यही केली.

सकाळी लवकर ऊठून तयारी केली.चहा-कॉफी झाली. न्याहारी बांधून घेतली...तेच आपलं...पराठे आणि लोणचं.सकाळी ७ वाजता हॉटेल सोडलं. पण इतक्या सकाळी सरकारी लिफ्ट सुरु होत नसते...मग खाली कसे जाणार? त्यावरही तोडगा होताच...माल रोडच्या एका टोकाला हायकोर्ट आहे...तिथपर्यंत गाड्या येऊ शकतात...चालकाला गाडी तिथे घेऊन यायला सांगितलं आणि आम्ही हॉटेलच्या माणसाबरोबर निघालो तिथे जायला....पायी साधारण दहा-पंधरा मिनिटे चालून गेल्यावर एक जिना लागला..तो उतरलो आणि खालच्या रस्त्यावर आमची गाडी येऊन उभी होती त्यात सामान टाकलं आणि निघालो कुलु-मनालीच्या दिशेने...सुसाटपणे.

हवेत सुखद गारवा होताच,त्यात छानपैकी कोवळं ऊनही पडलेलं...आजूबाजूचा हिरवा आसमंत...त्यामुळे एकदम प्रसन्न वाटत होतं. आता आम्ही आधी जाणार होतो मंडीला...तिथे गाडीचालक बदलणार होता...आत्ताच्या गाडीचालकाला(रमेशला) तिथल्या सहकारी बॅंकेत नोकरीसाठी मुलाखतीला जायचं होतं,त्यामुळे मंडीपासून पुढ्च्या प्रवासासाठी त्याने दुसर्‍या चालकाची(विजय) सोय केलेली होती.मंडीपर्यंतचा प्रवास हा पुन्हा तसाच..वळणावळणांचा रस्ता, डोंगर उतारावरील घरं आणि रस्त्याच्या एका बाजूने आम्हाला सोबत करणारी बियास नदी...ही नदी आता चांगलीच रूंद झालेली दिसली,पाणीही बर्‍यापैकी दिसत होते...कुठे संथ तर कुठे खळाळते. चंढीगढ सोडल्यापासून हिमाचलमध्ये ज्या मार्गाने आम्ही वर चढून आलो...त्या मार्गावर आम्हाला भेटलेली ही नदी आमच्या संपूर्ण प्रवासात सोबत करत होती...माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता...एखाद्या नदीचा,इतक्या दीर्घकाळाच्या सहवासाचा...विशेष म्हणजे नदी कुठेही तुंबलेली,प्रदुषित दिसलीच नाही...जिथे पाहावं तिथे अतिशय पारदर्शक असं आपलं रूप घेऊन ती आमची सोबत करत होती....हिमालयातल्या रोहतांगमध्ये उगम पावणारी ही नदी आपल्या वाटेत येणारा सगळा हिमाचल प्रदेश सुजलाम सुफलाम करत करत नंतर पंजाबात उतरते...थोडक्यात आम्ही तिच्या उगमाकडे निघालो होतो...तिच्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने.

वाटेत एका ठिकाणी गाडी थांबवून न्याहारी करून घेतली. बरोबर बांधून आणलेले पराठे तर अतिशय चविष्ठ होतेच आणि तिथे मिळालेला चहाही छान होता..त्यामुळे पोट भरण्याबरोबरच मनाचं समाधानही झालं. तिथून पुन्हा निघालो...सुसाट.
वाटेत मंडी आलं...तिथे चालक बदलला आणि मग आम्ही निघालो कुलु-मनालीकडे. मंडीहून कुलुकडे जातांना दोन खास गोष्टी दिसल्या...एक म्हणजे बियास नदीवरचं एक छोटेखानी धरण आणि दुसरं म्हणजे ३ किलोमीटर लांबीचा बोगदा.
धरणाच्या ठिकाणी खास गाडी थांबवून एकदोन छायाचित्र काढून घेतली. धरणातून उचंबळून येणारं दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी... अगदी कोनात भरलेल्या आईस्क्रीमसारखं एक मोठा गोळा होऊन येत होतं...असलं अप्रतिम दृष्य आयुष्यात पहिल्यांदाच पाहात होतो...त्यातच आजूबाजूच्या हिरवाईने भरलेले रंग तर चित्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते.डोळ्यात,मनात आणि प्रग्रामध्ये ते दृष्य साठवतच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

त्यानंतरचा बोगदा...तसे तर बोगदा हे प्रकरण काही आपल्याला नवीन नाही..पण इतक्या वेळ मोकळ्या वातावरणात,स्वच्छ सूर्यप्रकाशात, खुल्या आकाशाखाली प्रवास करत असतांना अचानक असा एखादा लांबलचक बोगदा आला की कसं अगदी चित्रातला गडदपणा,काळोख वाढतो.आणि ते अधिक उठावदार होतं.
हिमाचलमधले राष्ट्रीय महामार्ग खूपच व्यवस्थित बांधलेले आणि राखलेले दिसून येत होते...बोगदाही अतिशय व्यवस्थित बांधलेला,उत्तम प्रकाशयोजना असलेला होता...त्या बोगद्यातूनही गाड्या सुसाटपणे पळत होत्या.

कुलुला पोचलो. तिथे जागोजागी खेळीमेळीचा जलप्रवास करण्याची सोय आहे...रिव्हर राफ्टिंग नावाच्या ह्या खेळासाठी एक गोलाकार अशी, हवा भरलेली रबरी होडी असते..त्यात प्रवाशांनी(खेळाडूंनी) बसून वल्ह्यांच्या साह्याने ती होडी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत वल्हवत न्यायची असते.एक विशिष्ठ अंतर(ठरवल्याप्रमाणे) गेल्यानंतर मग त्या नावेतल्या खेळाडूंना उतरवलं जातं आणि त्यांना आणि त्या नावेला घेऊन मोटारमधून पुन्हा त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या जागी आणून सोडलं जातं.

आम्ही कुलुला पोचलो तेव्हा हा खेळ खेळायचा हे ठरवूनच गाडीतून उतरलो...पण त्या खेळाचे अवाच्या सवा भाव ऐकूनच आम्ही माघार घेतली...कमीत कमी अंतरासाठी प्रतिमाणशी भाव होता ६०० रुपये...घासाघीस करूनही ५००च्या खाली कुणी उतरायला तयार नव्हतं...काय करावं? ह्याचा विचार सुरु असतांनाच अचानक जोराचा पाऊस सुरु झाला आणि आम्ही गाडीत जाऊन बसलो.. पाऊस कमी होण्याची दहा मिनिटे वाट पाहिली...तोवर अगदी सगळ्यांनी नाही तरी आम्ही दोघा-तिघांनी मनाची तयारी केली होती...नाव वल्हवण्याची...पण पाऊस अजूनच जोरात बरसायला लागला आणि आमच्या उत्साहावरही पाणी पडलं...आता तिथे उगाच वेळ घालवण्यात अर्थ नव्हता, कारण आमचा हा दौरा अगदीच धावता असल्यामुळे जे जमेल ते पाहावे,अनुभवावे इतकाच उद्देश मनात बाळगून आम्ही प्रवासाला निघालो होतो आणि अजून बरेच दूर आम्हाला जायचे होते त्यामुळे आम्ही मग सरळ पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली.

४ जून, २०११

चंशिकुम! ५

शिमल्यात आम्ही एकूण दोन रात्री राहिलो...त्यापैकी आजची पहिली.(२६मे २०११)
खोल्या छान प्रशस्त आणि सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा होत्या.खिडकीतून शिमल्याची एक बाजू खूप छानपैकी दिसत होती. त्याची छाचि आधीच्या भागात जोडलेत. रात्री जेवणासाठी त्यांच्या जेवणघरात गेलो तेव्हा असं आढळलं की शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच रांगेत मांडलेले होते. मला अशा ठिकाणी जेवणे कठीणच होते... माझ्याबरोबर असलेलं कुटुंब मांसाहारी होते...त्यांची तर चंगळच झाली...माझी मुलगी जरी माझ्यासारखी शाकाहारी असली तरी तिला अशा मिश्र वातावरणात काहीच अडचण वाटत नव्हती. शेवटी मी तिथल्या त्या उग्र वासांनी हैराण होऊन निमूटपणे खोलीवर परतलो. माझ्या बरोबरच्यांनी माझी बरीच मनधरणी केली पण मला तिथे थांबणे अशक्यच होते. मी त्यांना सांगितलं...की त्यांनी खुशाल जेवणाचा आनंद लुटावा,माझी काळजी करू नये आणि स्वत:चा विरस देखील करून घेऊ नये.

अशा तर्‍हेने मी खोलीवर आलो. ह्या अशा अडचणींची खात्री होतीच म्हणून मी मुंबईहून येतांना माझ्याबरोबर भरपूर ठेपले बनवून आणले होते(मी बनवले नव्हते काही....बाहेरून बनवून घेतले होते. :) ) मग काय पोटभर ते ठेपले खाल्ले आणि वर पाणी प्यायलं...तुम्ही म्हणाल...नुसतेच ठेपले?त्याबरोबर लोणचं किंवा दही वगैरे काही नव्हतं?
होय,काहीच नव्हतं...माझे खाणे हे निव्वळ पोट भेरण्यासाठी असतें...त्यामुळे वेळप्रसंगी मी मला पचेल/रुचेल असे जे मिळतं त्यावर समाधान मानत असतो. असो.

खोलीत सगळ्या सोयी होत्या पण मुख्य म्हणजे पंखा किंवा एसी ह्या दोघांपैकी काहीच नव्हतं. एक मात्र आहे की ते नसूनही वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता.बहुदा इथलं रात्रीचं तापमान नेहमीच कमी असावं की ज्यामुळे पंखा वगैरेची गरजच लागत नसावी. रात्री पलंगावर पडल्यावर दिवसभराच्या प्रवासाचा विचार करता करता झोप केव्हा लागली तेच कळलं नाही...कन्येच्या हाकेने जेव्हा जाग आली तेव्हा तिच्याकडून कळलं की बाहेर धो धो पाऊस पडतोय.हवेतला गारठाही वाढलेला होताच. मी लगेच उठून खिडकीचे पडदे दूर करून पाहिले...सगळं आसमंत कुंद-फुंद झालं होतं....पाऊस इतका घनघोर पडत होता की दहा फुटांपलीकडचंही काही दिसत नव्हतं.पहाटेचे पावणे पाच वाजले होते आणि आश्चर्य म्हणजे इतके ढग असूनही उजेड बराच होता....पण सुर्योदय पाहाणे नक्कीच नशिबी नव्हतं.

खरं तर आज(२७मे २०११) आम्ही सकाळी आठ वाजता बाहेर निघणार होतो पण हा पाऊस आम्हाला जखडून ठेवणार हे तर नक्की झालं. थोडावेळ पावसाची गंमत पाहात मी खिडकीजवळ बसून होतो. नंतर मुखमार्जनादि आन्हिकं उरकून कॉफी मागवली. ती येईपर्यंत थोडा वेळ टीव्ही पाहात बसलो. कॉफी आल्यावर पुन्हा एकदा ठेपले बाहेर काढले आणि आता ते कॉफी बरोबर एकट्यानेच खाल्ले...छान वाटलं. :)
माझी आणि कन्येची तयारी होईपर्यंत सकाळचे ८ वाजले होते...पाऊस अजूनही जोशात होता. आज बहुदा खोलीतच अडकून पडावं लागणार अशी शक्यता वाटायला लागली. सव्वा आठ वाजता वरती न्याहारीला या असा सहकुटुंबीयांकडून आदेश आला.माझी न्याहारी तर केव्हाच झाली होती म्हणून मी म्हटलं...तुम्ही खाऊन घ्या.
पण सकाळची न्याहारी पूर्ण शाकाहारी आहे...तेव्हा तुम्हीही याच असे पुन्हा आग्रहाचे बोलावणे आले.बटाटा,फ्लॉवर इत्यादिचे पुरण भरलेले गरमागरम पराठे,चहा,कॉफी वगैरे असा न्याहरीचा थाट होता. माझं पोट भरलेलंच होतं पण त्यांचा आग्रह मोडवेना म्हणून त्यांच्या विनंतीचा मान राखण्यासाठी त्यांच्या बरोबर बसून पुन्हा एकदा कॉफी प्यायलो..खरं तर पराठे मला खूप आवडतात पण....माझा स्वत:चा स्वभाव आहे...तो चांगला की वाईट हे सापेक्ष आहे....पण एकदा पोट भरलं की मग समोर कितीही सुग्रास,आवडतं खाणं असलं तरी मी ते खात नसतो...पण हे जर समोरच्या माणसाला नाही पटलं तर उगाच तणाव निर्माण होत असतो. अर्थात माझ्या बरोबरच्या सहकुटुंबियांना माझा स्वभाव पूर्णपणे माहीत असल्यामुळे आणि त्याचा योग्य तो आदर ते करत असल्यामुळे आमच्यात अशा बाबतीत विसंवाद होत नाही. असो.

न्याहारी आटोपली तरी अजून पाऊस थांबण्याची चिन्हं दिसेना. पण तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की पाऊस थोड्याच वेळात नक्की थांबेल...शिमल्यातलं म्हणा की एकूणच हिमाचलमधलं वातावरण हे असंच आहे...कधी पाऊस,कधी ऊन....हवामान सतत बदलत असतं...कशाचीच शाश्वती देता येत नाही...तरीही गेले चार-पाच तास कोसळणारा पाऊस आता बंद होईल हे त्या लोकांचे अनुभवसिद्ध मत होते हे लवकरच खरे ठरले....पुढच्या दहा-पंधरा मिनिटात पाऊस खूपच कमी झाला...मी माझ्याबरोबर छत्री नेलेली होती....जय महाजाल...महाजालावरून शिमल्याला जाण्याआधी तिथल्या हवामानाची माहिती काढली होती...पुढच्या काही दिवसांच्या हवामान अंदाजात जोरदार पाऊस वगैरेची शक्यता वर्तवली गेली होती....असो.

त्या रिमझिमत्या पावसात बाहेर पडतांना आम्ही आधी चालक महाशयांना गाडी लिफ्टच्या जवळ असलेल्या ब्रिजवर घेऊन यायला सांगितली...पण आम्हाला असं कळलं की तो कुठे तरी रहदारीत अडकलाय आणि आमच्यापर्यंत पोचायला त्याला अजून किमान अर्धा तास तरी लागेल. आज सगळीकडे चिखल साठलेला असणार त्यामुळे आम्ही कुठेच बाहेर जाऊ नये असे त्याचे सांगणे होते....पण निदान गाडीत बसून तरी जमेल तेवढे शिमला दर्शन करू असे आम्ही त्याला म्हटले आणि त्याने ते ऐकले...तरीही गाडी येईपर्यंत सकाळचे दहा वाजले होते...आता पाऊस पूर्णपणे थांबलेला होता...छानपैकी ऊन पडले होते आणि अशा मस्त वातावरणात आम्ही निघालो कुफरीच्या दिशेने...शिमल्याच्या जवळच एक नयनरम्य असे स्थळ आहे...जमलंच तर ते पाहायला.

चंढीगढ सोडल्यापासून हिमाचलच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर सगळीकडे एकच चित्र दिसत होतं...डोंगराच्या कडेकडेने जाणारे वळणावळणाचे रस्ते,दूरवर पसरलेल्या डोंगरांच्या रांगा,...दोन्ही बाजूला गर्द वनराई...डोंगरांच्या कुशीत विसावलेली, उतारावरची कधी एकटी दुकटी तर कधी दाटीवाटीने वसलेली एकमेकांवर उभी दिसणारी घरं...आणि ह्या चित्रात अजून एक ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे अधूनमधून अचानकपणे डोकावणारी बियास नदी...कुठे अगदी ओढा वाटावा इतकी छोटी तर कुठे बर्‍यापैकी मोठी...झुळूझुळू वाहणारं पाणी,आजूबाजूला साग,देवदार आणि अशाच काहीशा उंचच ऊंच वृक्षांची दाट वनराई....मध्येच कुठे एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारणारी माकडं, निवांतपणे चरणारी गाई-गुरं...असं नुसतं भरगच्च आणि चित्रमय वाटावं असं सगळं वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.ह्यात भर म्हणून की काय कधी मधी रस्ता ओलांडणारा किंवा रस्ता भरून टाकणारा शेळ्या-मेंढ्यांचा कळपही दृष्टीस पडत असे...त्यातली ती गोजिरवाणी कोकरं,कळपाच्या पुढे आणि मागे असे चालणारे दोन शिकारी कुत्रे..एकाद दुसरा गुराखी...चित्रातले रंग अधिक गडद करायचे.

अशा तर्‍हेन मजेत प्रवास करत आम्ही कुफरीला पोचलो...अहो पण तिथे खास असं काहीच नव्हतं...पण भरपूर घोडे,घोडेवाले आणि आमच्यासारख्या प्रवाशांची आणि प्रवासी वाहनांची दाटीवाटी मात्र होती...जरा वेळाने लक्षात आलं की जे काही प्रेक्षणीय आहे तिथपर्यंत गाड्या जात नाहीत..एकतर पायी जा किंवा घोड्यावरून जा. पावसामुळे सगळीकडे चिखलच चिखल झालेला त्यामुळे चार पावलंही धडपणे टाकता येत नव्हती..मग काय? दुसरा पर्याय...घोड्यावर बसून जाणे...आता इतकं लांब आलोय तर मग मागे का हटा...घोडेवाल्यांचा भाव ठरलेला होता...म्हणजे तो सरकारी पत्रकाप्रमाणे २५० रुपये आणि ३८० रुपये असा होता....जवळच्या अंतरासाठी २५० रुपये..जाऊन-येऊन आणि लांबच्या अंतरासाठी ३८० रुपये जाऊन येऊन....पुढे असे कळले की जिथे जायचे तिथे लोक किमान दोनतीन तास तरी थांबतातच
...म्हणजेच खास काहीतरी प्रेक्षणीय असणारच...तेव्हा मग ठरवलं...बसायचं घोड्यावर.

माझ्या आयुष्यात मी दुसर्‍यांदा घोड्यावर बसणार होतो...मात्र पहिल्यांदाच घोड्यावरून प्रवास करणार होतो....
गंडलात ना...विमानाचं ते तसं पहिलं दुसरं आणि आता घोड्याचंही पहिलं दुसरं? काय प्रकार आहे हा?
सांगतो....
त्याचं काय आहे की १९७५ साली मी माझ्या एका मित्राच्या भावाच्या लग्नाला राजस्थानला गेलो होतो...तिथे त्या नवरदेवाच्या घो्ड्यावर(की घोडी...माहीत नाही) बसलो होतो...फक्त छायाचित्र काढून घेण्यासाठी...
पण आता प्रत्यक्ष घोड्याच्या पाठीवरून प्रवास करायचा होता तेव्हा मनाची तयारी करणे भागच होते....आम्हा सहाजणांपैकी माझ्यासहित पाचजण घोड्यावर यशस्वीरित्या स्वार होऊ शकले..मात्र आमच्या बरोबरच्या कुटुंबातल्या गृहमंत्री मात्र घोड्यावर चढण्यात अयशस्वी झाल्या आणि त्यांनी लगेच माघारच घेतली..त्या निमूटपणे जाऊन गाडीत बसल्या.


आमचे घोडे निघाले...घोड्यावर आमच्यासारखे एकेकटे प्रवासी....चारपाच घोडे एकमेकांना जोडून स्वत: चालत आणि घोड्यांना एका मागोमाग चालवत नेणारे घोडेवाले...वाट चढणीची होती आणि त्यात पावसाने माती कालवलेली...त्यामुळे निसरडी झालेली...घोडे एकापाठोपाठ चालत होते...एखादे वेळी रस्त्याच्या अगदी कडेने चालायचे...बाजूचा उतार पाहून मनात कुशंका यायची, इथून खाली घसरतात की काय अशी मनात धास्ती... कधीकधी मध्येच थांबायचे...मग ते घोडेवाले एखादी शिवी हासडून किंवा चक्क लाथ मारून त्याला पुढे ढकलायचे... कधी चढ तर कधी उतार...चढ असला की घोड्यावर स्वार असलेल्याने पुढे झुकायचे...आणि उतार असला की पाय पुढे ताठ करून अंग मागे ताणायचे...अशी सगळी कसरत करत आमची रपेट अत्यंत सावकाशीने सुरु होती....मध्येच एक बराच खोलगट भाग होता...तिथे चक्क गुडघाभर पाणी साठलेलं....चांगला २००-३०० फुट लांब असा तो पट्टा असेल....त्यातून चालतांना घोडेदेखिल डुचमळत होते....त्यांच्या चालीमुळे अंगावर चिखल उडत होता आणि मनात एक भिती...हा मध्येच बसला तर? :(
पण सुदैवाने तसे काही झाले नाही...मजल दरमजल करत..साधारण अर्धा-पाऊण तासात आम्ही इच्छितस्थळी पोचलो आणि घोड्यावरून उतरलो....एकदाचे! हुश्श!

तिथे पाहण्यासारखे खास असे मला तरी काही आढळले नाही...एकदोन निसर्गदृष्य सोडली तर... खरं तेच सांगतो(बाकी ते ३८० रुपयेवाले घोडे जिथपर्यंत जात असतील तिथे नेमके काय होते/असेल मला ठाऊक नाही)....हं,एक घोड्यावर बसून इथपर्यंत येण्याचा अनुभव जरी रोमांचक आणि कचरवणारा होता तरी इथले वातावरण पाहता तो अनुभव...तोही विकत घेण्याची खरंच काही गरज नव्हती असे माझे प्रामाणिक मत आहे....तुम्ही म्हणाल की मग लोक काय वेडे आहेत काय तिथपर्यंत जायला?
वेडे की शहाणे..ज्याचे त्याने ठरवावे....तिथे काय काय होतं सांगतो.....
तिथे एक सफरचंदाची बाग होती...सद्द्या सफरचंदाचा हंगाम नाहीये त्यामुळे आम्हाला फक्त झाडंच पाहावी लागली असती..जुलै-ऑगस्टमध्ये जायला हवं तर सफरचंद लगडलेली दिसतील...ही बाग पाहायलाही तिकिट होतं म्हणून आम्ही नाही गेलो...दुसरं एक म्हणजे गुलाबाची बाग....ती काय हल्ली आपल्या शहरातही पाहायला मिळते(पण एक आहे की..इथले गुलाब खूपच टपोरे असतात)....आणि तिसरे म्हणजे...आपल्या इथल्या एस्सेलवर्ल्ड सारखी खेळनगरी...आता हे(सफरचंदाची बाग सोडून) सगळं पाहायला मुंबईत मिळत असतांना तिथे कोण तडफडायला जाईल? असो एकूण हा बार फुसका निघाला....आता वाटेत अनुभवलेलं सृष्टी सौंदर्य जमेस धरता वेळ अगदीच फुकट गेला असं मात्र नाही वाटलं.

चंशिकुम! ४

चंढीगढच्या बाहेर पडलो आणि हिमाचलच्या वाटेला लागलो...परिस्थितीत इतका आमुलाग्र बदल झालेला दिसला की काही विचारू नका. कडक शिस्तीतून बाहेर पडून मोकळ्य़ा वातावरणात गेल्यावर कसं वाटतं तसं अगदी हलकं हलकं वाटायला लगलं. अहो चक्क माणसं दिसायला लागली...नुसती वस्ती असून उपयोग नाही तर माणसांची जागही दिसावी लागते,माणसांची वर्दळ,लगबग असं सारं दिसावं लागतं आणि तेच आता दिसायला लागलं आणि आम्ही पुन्हा एकदा माणसात आलो.

हिमाचल म्हटला की डोंगराळ प्रदेश हे समीकरण मनात होतंच आणि त्याला आता दिसणारं दृश्यही पूरक असंच होतं. रस्ता अगदी वळणा-वळणांचा...नागमोडी शब्दही थिटा पडेल इतका आणि तोही हळूहळू चढत जाणारा.सुरुवातीला रस्त्याच्या दूतर्फा दिसणारी घरं आणि वस्त्या हळूहळू मागे पडत होत्या. आता एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला उतार दिसत होता. त्या उतारांवरही दूर दूर कुठे काही एकटी-दुकटी घरं बांधलेली दिसत होती. तिथपर्यंत पोचायचा रस्ता कुठून आणि कसा असेल ह्याची कल्पना करणेही आमच्यासारख्या शहरी लोकांना शक्य नव्हतं. रोज इतकी चढ-उतार करून ही माणसं आपापल्या कामावर कशी आणि कधी पोचत असतील? उन-पाऊस आणि थंडीत इथे कोणकोणत्या अडचणींचा मुकाबला हे लोक करत असतील? असले प्रश्न डोक्यात रुंजी घालायला लागले.पण डोक्यावर सूर्य तापत होता आणि जेवणही अंगावर यायला लागले होते..गाडीतले वातानुकुलनही आता जाणवायला लागले होते...ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून डोळे मिटायला सुरुवात झाली होती पण बाहेरचे दृष्यही डोळ्यात आणि प्रग्रात साठवण्याजोगे होतेच. अधूनमधून डुलक्या घेणे सूरु होतेच आणि जाग आली की एखादे सुंदर दृष्य टिपण्याचे सुरूच होते.

मे महिना असूनही सगळीकडे हिरवळ दिसत होती.काही ठिकाणी गर्द वनराई तर काही ठिकाणी उतारावरची शेती आणि एकटी-दुकटी घरं. रस्त्यावरची रहदारी फारशी नव्हतीच. येणारी जाणारी, अगदी तुरळक वाहनं दिसत होती त्यामुळे गाडी चालक निर्धास्तपणे गाडी चालवत होता. अशा वळणावळणांच्या आणि चढत जाणार्‍या रस्त्यांवरही तो किमान ७०-८० च्या वेगाने गाडी हाकत होता...जणू काही घाटांचा राजा असावा अशा रूबाबात.

बघता बघता आम्ही खूप उंचावर पोचलो होतो.हवामानातही सुसह्य असा बदल जाणवत होता. वातानुकुलन बंद करून खिडक्या उघडाव्याश्या वाटल्या...आम्ही तेही केलं आणि मग बाहेरची ताजी हवा आत आली...मनसोक्त वारा प्यायला सुरुवात झाली.आजूबाजूला हिरवाईने नटलेले डोंगर,वळणवळणांचा पण अतिशय व्यवस्थित बांधलेला रस्ता,सुसाट वेगात चालणारी गाडी आणि आल्हादक हवा...अशा सगळ्या वातावरणात सगळा शीण दूर झाला. मी पुन्हा माझा प्रग्रा सावरला आणि दिसेल ते दृष्य वेड्यासारखे टिपू लागलो. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर छायाचित्रण करण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग...त्या शास्त्रातलं काही म्हणता काही माहीत नाही..फक्त पडद्यावर पाहायचं आणि बटण दाबायचं इतकंच माहीत असलेला मी...धडाधड बटणं दाबत होतो.

(प्रग्रा म्हणजे प्रतिमा ग्राहक...म्हणजेच सगळ्यांना माहीत असलेला कॅमेरा....प्रगा हा शब्द पुण्याचे आमचे मित्र श्री. विनायक रानडे ह्यांनी निर्माण केला...अतिशय नेमका आणि नेटका शब्द असल्यामुळे तो मला भावला आणि म्हणूनच मी तो वापरतोय)

आत्तापर्यंत क्वचित प्रसंगी एखाद दोन छायाचित्र काढण्याचा प्रसंग माझ्या वाट्याला आलेला....कारण प्रग्रावरचा हात स्थिर असावा लागतो..ज्यात मी नेहमीच कमी पडत होतो...त्यातून माझी कन्या प्रग्रा हाताळण्याच्या बाबतीत खूपच पुढारलेली(माझ्या तुलनेत) असल्यामुळे माझ्या हातात प्रग्रा कधीच येत नसे. मलाही त्याचे फारसे सोयर सुतक नव्हते. हा प्रकार आपल्यासाठी नाहीच मुळी अशी मी माझ्या मनाशी खूणगाठ बांधून घेतली होती.पण हल्लीच तिने एक नवीन प्रग्रा घेतल्यामुळे हा जुना झालेला प्रग्रा माझ्या हातात अनायासे आला आणि मी त्या संधीचा फायदा घेतला...मला जमतील तशी छाचि काढलेली आहेत...ती जर चांगली आली असतील तर ते प्रग्राच्या क्षमतेमुळे आणि खराब असतील तर माझ्यातल्या कौशल्याच्या अभावामुळे.असो.

आता हळूहळू रस्त्याच्या आजूबाजूची आणि डोंगर उतारावरची वस्तीही वाढू लागली होती. शहर जवळ आल्याची ही निशाणी होती आणि हा हा म्हणता आम्ही शिमला शहरात पोचलो सुद्धा. इतका वेळ सुसाट चालणारी गाडी आता मात्र अधूनमधून चक्क थांबवावी लागत होती....कारण आता रहदारी कमालीची वाढली होती...वाहतूक पोलिस वगैरे गोष्टींचे अस्तित्त्वही जाणवायला लागले होते. गजबज प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. जिथे पाहावं तिथे...एकावर एक चढलेली घरं दिसत होती. डोंगर उतारावर तर मोकळी जागाही दिसेनाशी झालेली..सगळीकडे घरंच घरं....आत्तापर्यंत फक्त छायाचित्रात पाहिलेले दृष्य प्रत्यक्षात पाहात होतो. घरांचे रंगही वैविध्यपूर्ण होते...त्यातही विशेषत्वाने त्यांची छपरं...काही लाल तर काही हिरवी....आजूबाजूच्या वनराईच्या हिरव्या रंगाच्या छटांमध्ये हे रंगही आपली भर घालत होते...हे दृश्य खरंच मनोहारी आहेच होते...चित्तवेधक होते....वेड लावणारे होते...माझ्या प्रग्रात मी जमेल तेवढे ते साठवलंय.

आता वेळ होती आमचं वसतीस्थान शोधण्याची...संध्याकाळ झालेली...सूर्यास्त व्हायला थोडाच अवधी होता... आधीच ठरल्याप्रमाणे ब्राईट लाईन नामक हॉटेलकडे आम्ही मोर्चा वळवला.पण तिथे गेल्यावर कळलं की आमच्या नावाने तिथे कोणतेही आरक्षण झालेले नाहीये. मग पुन्हा फोना-फोनी झाली. त्यात अर्धा-पाऊण तास गेला.मग कळलं की आमच्यासाठी ब्रिज व्ह्यू रिजन्सीमध्ये राह्ण्या-जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. चालकाने गाडी त्या दिशेने दौडवली आणि मग कळलं की ते हॉटेल उंचावर....शिमल्याच्या खास भागात द मॉलवर(माल रोड असेही काही लोक म्हणतात)...जिथे गाड्यांना मज्जाव आहे. तिथे पायीच जावं लागणार. :(
पायी जाण्यासाठी किमान अर्धा तास चढून जावं लागेल....हे राम! मग,आता काय करायचं?

काही काळजी करू नका. इथे एक सरकारी लिफ्ट आहे...तिचं माणशी ७ रू तिकीट आहे...त्यातून वरपर्यंत जाता येईल..आणि तिथून... बस्स, एक मिनिटावर हे हॉटेल आहे....इति: एक हमाल मुकादम.
झालं,मग काय गाडी त्या लिफ्टच्या पलीकडे बर्‍याच लांब थांबलेली...तिथून हमाल करून आमची वरात निघाली लिफ्टच्या दिशेने. लिफ्टला ही मारूतीच्या शेपटीसारखी रांग लागली होती...त्यात आम्हीही सामील झालो.

आधी तिकिट काढावे लागते....ही माहीती आम्हाला रांगेतच कळली...मग आमच्यापैकी एकाने जाऊन ती तिकिटं आणली.ह्या लिफ्टचेही दोन टप्पे आहेत. एका लिफ्टमधून काही अंतर जायचे....मग एका अधांतरी पण व्यवस्थित छप्पर आणि कठडे असलेल्या लाकडी रस्त्याने दुसर्‍या लिफ्टपर्यंत जायचे आणि तिने अजून वर जायचे. ज्यांना हे माहीत होते(बहुधा स्थानिक लोक असावेत) ते भरभरा दुसर्‍या लिफ्टच्या दिशेने धावत सुटले...आम्ही मात्र...कुठे आणि कसं जायचं ह्या संभ्रमात त्या घोळक्यात वाहवले जात होतो. त्यात मध्येच वीज जात होती...लिफ्ट बंद होत होती...सगळीकडे अंधारच अंधार व्हायचा...बराच वेळ ताटकळत बसावं लागलं... पुन्हा वीज यायची....काही झालेच नाही असे दाखवून पुन्हा सगळा व्यवहार पूर्ववत होत होता....आम्ही वर पोचेपर्यंत किमान चार वेळा वीज गेली होती...विद्युत जनित्र(जनरेटर) वगैरेची काही व्यवस्था नसावी असे जाणवले.असो.

शेवटी एकदाचे वर पोचलो...अगदी खरंच..समोरच हॉटेल होतं....त्यांचा स्वागत कक्ष मात्र सातव्या मजल्यावर...इथेही लिफ्टपर्यंत पोचण्यासाठी एक मजला पायर्‍या चढून जावं लागलं. :)
हॉटेलच्या लिफ्टने एकदाचे स्वागत कक्षात पोचलो...खोल्या ताब्यात घेतल्या....तोवर सूर्यास्त केव्हाच होऊन गेलेला...एक चांगली संधी हुकली...छायाचित्रणाची. ;)

३ जून, २०११

चंशिकुम! ३

जेवण बाकी मस्तच होतं त्यामुळे आधीचा सगळा मनस्ताप दूर झाला.


सगळाच घोळ झाला होता. आम्हाला न्यायला कुणी ’अरूण’ नावाची व्यक्ती येणार होती असं आमच्या मुंबईच्या सहल आयोजकाने सांगितले होते...आणि त्याच्याऐवजी आला होता रमेश. हे कमी म्हणून की काय, ह्या रमेशला अरूण कोण तेच माहीत नव्हतं आणि आपण ज्यांना आणायला जातोय त्यातल्या गटप्रमुखाच्या नावाव्यतिरिक्त दुसरं काहीही माहीत नव्हतं. मुंबईतला आमचा आयोजक आणि इथला स्थानिक संयोजक ह्यांच्यामध्ये कुठेच काही ताळमेळ नसल्याचं जाणवलं होतं. मग आम्ही आमच्या मुंबईतल्या आयोजकाला धारेवर धरलं....त्याने मग झटपट सुत्र हलवली आणि एकदाचे शिक्कामोर्तब झाले की रमेश हा आमच्यासाठीच आलेला माणूस आहे...कारण आम्हाला जो भ्रमणध्वनी क्रमांक दिला गेला होता तो त्याच्याचकडे होता...त्याच्या गाडीवरही तोच लिहिला होता.

मग आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम त्याला समजावून सांगितला...आधी चंढीगढमधील रॉकगार्डन दर्शन आणि मग तिथून थेट शिमल्याला प्रयाण.

चंडीगढमधले आखीव-रेखीव रस्ते आणि नगररचना ही गोष्ट माझ्यासारख्या जुन्या मुंबईकराला पहिल्या दर्शनात आवडली. तिथे एक मात्र प्रकर्षाने जाणवलं की.....प्रशस्त रस्ते आहेत,रस्त्यांच्या नावाच्या पाट्या आहेत,चौकाचौकात रस्ता विभाजक अशी गोलाकार छोटेखानी उद्यानं,मैदानं आहेत...रस्त्यांवर दिसणारी आधुनिक वाहनं आहेत...आजूबाजूला एकसारख्या दिसणार्‍या एकमजली-दुमजली इमारती आहेत पण.....पण इथे माणसांचा अभाव आहे. रस्त्यावरून चालणारी माणसे नाहीत; मुंबईत कुठेही सहज दिसतील अशी दुकाने,विडी-काडी-चहाच्या टपर्‍या नाहीत...थोडक्यात रस्त्याच्या दूतर्फा मैलोन-मैल शुकशुकाट आहे.
ह्याचा अर्थ असा नव्हे की तिथे दुकानं वगैरे मी जे वर म्हटलंय ते नाहीये...आहेत, तीही आहेत..पण ठराविक जागी, ठराविक साच्यामधली...त्यामुळे असलीच तर माणसांची वर्दळ तेवढ्याच विभागापुरती..बाकी सगळे निर्मनुष्य. आम्ही गेलो होतो तेव्हा टळटळीत दुपार होती...त्यामुळेही शक्य आहे की लोक आपापल्या कार्यालयात,घरात असावेत आणि म्हणूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसला...जी काही कारणं असतील ती अगदी खरी मानली तरी मुंबईसारख्या सदैव माणसांच्या गर्दीत वाढलेल्या माझ्यासारख्याला मात्र हे शहर थोड्याच वेळात नावडू लागले...साचेबद्धपणा सुरूवातीला कितीही आकर्षक वाटला तरीही थोड्याच वेळात त्याचा कंटाळा येतो हे मी इथे प्रकर्षाने अनुभवले....एखाद्या शिष्ठ आणि सदैव शिस्तीत राहणार्‍या माणसाच्या घरात कसे अगदी सगळं जागच्या जागी आणि टापटीप असतं, पण कोणतीच वस्तू हाताळता येत नाही...तसं काहीसं मला वाटलं...हे शहर शिष्ठ वाटलं मला. मुंबई हे चोवीस तास जागणारं शहर आहे तर चंढीगढ हे सुस्तावलेलं शहर वाटलं मला. तसंही प्रत्येक शहराचं वैशिष्ठ्य  वेगळं असतंच म्हणा....ज्याला त्याला आपलं शहर,गाव आवडतं हेच खरं.

पण ह्या शहरात मला काय आवडलं असेल तर ते आहे रॉक गार्डन!
हे रॉकगार्डन प्रकरण खरंच खास आहे. ’टाकाऊतून टिकाऊ’ असे हे प्रकरण आहे. दगड-गोटे,दगड-धोंडे,तुटक्या-फुटक्या टाईल्स,फुटक्या बांगड्या,कपबश्या आणि अशाच कैक फेकून देण्यालायक गोष्टीतून हा प्रकल्प जन्माला आलाय. सगळ्यात आधी हे ज्याच्या डोक्यात आलं त्याला सलाम आणि ज्या कुण्या कलाकारांनी हे प्रत्यक्षात आणलं..त्यांना तर भरभरून सलाम. इथे उभारलेली शिल्प ही मनात येतील तशी उभारलेली नाहीत तर त्याच्यामागेही निश्चित अशी काही संकल्पना दिसून येते. डोक्यावर रणरणतं ऊन आणि संध्याकाळच्या आत शिमल्याला पोचायचं होतं...ह्या दोन कारणांमुळे म्हणावे तसे फार बारकाईने,रसिकतेने आम्ही ते पाहू नाही शकलो..पण जमेल तेवढी छायाचित्र घेण्याचा मी प्रयत्न केलाय..त्यातूनही आपल्याला बरंच काही समजू शकेल अशी अपेक्षा आहे. एक मात्र सांगेन की हे रॉ्गा केवळ प्रेक्षणीयच नाहीये तर ते अभ्यासण्याजोगे देखील आहे. ह्यावर एक माहितीपटही बनवता येईल इतके वैविध्य इथे आहे...तसेच आकारानेही बरेच मोठे आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचे असल्यास किमान तीन-चार तास तरी लागू शकतात.
दूधाची तहान ताकावर भागवता यावी म्हणून ही काही छाचि आपल्यासाठी सादर करतोय....

१ जून, २०११

चंशिकुम! २

बाबा,चला.
कन्येच्या हाकेने मी जागा झालो. म्हणजे,ते विमानचालकाशी बोलणे वगैरे सगळं मनातल्या मनातच होतं तर! :)
मी स्वत:शीच हसलो आणि उठून प्रवेशद्वाराकडे चालायला लागलो. प्रवेश परवाना दाखवला आणि प्रत्यक्ष विमानतळावर प्रवेश केला. बरीच विमानं तिथे उभी होती. आम्हाला न्यायला एक बस आली होती...जेमतेम ५०-१०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या विमानाकडे जाण्यासाठी बस...वा ! वा! काय ही सरबराई! बसमध्ये चढलो आणि दोन मिनिटात उतरलो...विमानाजवळ. तिथे एक शिडी लावलेली होती...पुन्हा प्रवेशपरवाना दाखवून मग त्या शिडीवरून एकेक पायरी चढत मी प्रत्यक्ष विमानात प्रवेश कर्ता झालो.

सगळे प्रवासी चढल्यावर विमानाचा दरवाजा बंद झाला. मग काही प्रात्यक्षिकं दाखवली गेली...सीटबेल्ट कसा लावायचा/सोडायचा. आपत्कालीन परिस्थितीत विमानाच्या बाहेर कसे आणि कूठून जायचे....नाही,नाही. ह्याचे प्रात्यक्षिक नाही दाखवले...फक्त सांगितलं...की तुमच्या सीटच्या समोरच्या खणात एक पत्रक आहे ते वाचा म्हणून. ;)
विमान पाण्यात पडलं तर...अंगात घालायचं जीवरक्षक जाकिट कसं घालायचं/फुगवायचं वगैरे दाखवून झालं.
मग पट्टा आवळायची सुचना झाली...विमान जागेवरून हललेलं होतंच आणि ते आता धावपटीकडे निघालं होतं. सगळ्यांनी आपापले पट्टे आवळले आणि विमान धावपट्टीवर पोचलं....काही क्षण तिथे थांबलं आणि मग सुसाट धावत सुटलं....दोनतीन मिनिटं धावलं आणि अचानक....अलगद हवेत उडालं...पोटात छोटासा खड्डा पडला..पण तेवढ्यापुरतेच.

विमान हवेत उंच उंच जात राहिलं...मध्येच थरथरत होतं..मधेच स्थिर होत होतं...हळूहळू उंची वाढत गेली...आता आजूबाजूला फक्त ढगच ढग दिसत होते...पाहता पाहता ते ढगांच्याही वर गेलं....आणि आता मात्र विमान पूर्णपणे स्थिर झाल्याचं जाणवलं..जणू काही ते एका जागीच थांबलंय...बाहेरचं दृश्य म्हणजे फक्त अथांग पसरलेलं आकाश...बाकी दुसरं काही नाही.

खिडकीबाहेर पाहतांना जाणवलं की विमानाचा एक पंख आणि पंखा दिसतोय....मी लगेच माझा प्रग्रा बाहेर काढला आणि एखाद्या कसलेल्या छायाचित्रकाराच्या आवेशात दोन छायाचित्र घेऊन मोकळा झालो.  ;)


दोन तास कसे गेले ते कळलंच नाही(खरं तर ते दोन तास कंटाळवाणे गेले...पण तसं बोलायचं नसतं ना!  ;)  )  आणि आता उद्घोषणा होत होती की विमान चंडीगढला पोचलंय आणि उतरण्याच्या तयारीत आहे...पुन्हा एकदा पट्टे आवळले गेले....विमान आता खूपच खाली आलं होतं...आजूबाजूचा परिसर दिसायला लागला होता....पुन्हा एकदा प्रग्रा सावरला आणि काही छाचि टिपली. <

पाहता पाहता विमान खाली उतरलं आणि एक बर्‍यापैकी धक्का देत जमिनीला टेकलं आणि तसंच धावत राहिलं...हळूहळू त्याचा वेग कमी झाला आणि मग ते हळूहळू चालत  धावपट्टीच्या बाहेर जाऊन त्याला नेमून दिलेल्या जागी थांबलं..शिडी लागली आणि एकेक करून आम्ही विमानाच्या बाहेर पडलो.

विमानतळाच्या बाहेरच्या इमारतीत आल्यावर मग आपापलं सामान  घेण्यासाठी सरकत्या पट्ट्याकडे मोर्चा वळवला...पाच-दहा मिनिटात तेही आलं...मग आमची वरात इमारतीच्या बाहेर निघाली. आम्हाला घ्यायला कुणी तरी येणार होतं....कोण ते आम्हालाही माहीत नव्हतं...त्यामुळे आमच्या नावाचा फलक घेऊन तिथे कुणी उभं आहे का हे आम्ही उत्सुकतेने आणि अधीरतेने पाहात होतो...पण त्या गर्दीत तसं कुणीच दिसत नव्हतं...पाच मिनिटं गेली...दहा मिनिटं गेली...अर्धा तास गेला तरी कुणीही दिसेना...विमानात,विमानतळाच्या इमारतीत एक बरं होतं...तिथे वातानुकुलित वातावरणात वावरतांना कोणताच त्रास जाणवला नव्हता पण आता ह्या बाहेरच्या रखरखाटात उभं राहणं फारच त्रासदायक होत होतं. मुंबईतल्या आमच्या सहल आयोजकाशी फोनवरून बोलणं झालं...त्याने अमूक अमूक माणूस गाडी घेऊन येईल म्हणून सांगितले आणि त्याचा भ्रमणध्वनी क्रमांकही दिला....त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ तिकडून उत्तरंच येत नव्हतं...शेवटी एकदाचं उत्तर आलं...तो जो कुणी होता त्याने आपण गाडी घेऊन आलोय आणि पार्किंगमध्ये गाडी लावलेय  असं सांगितलं....पाचदहा मिनिटाने तो देखिल आला...पण हाय रे दैवा...ना आम्ही त्याला ओळखू शकत होतो ना तो आम्हाला. मग पुन्हा भटक्यावर संपर्क साधला आणि तो आमच्या समोरच  आमच्याशी बोलतोय हे त्याला आणि आम्हाला एकाच वेळी कळलं आणि एकदाची ओळख पटली....हुश्श!
जवळजवळ पाऊण तास वाट पाहिल्यावर आम्ही एकमेकांसामोर आलो होतो...मग सामान घेऊन गाडीकडे निघालो...सामान गाडीत टाकलं आणि आधी कुठे जेवण मिळेल तिथे गाडी घ्यायला सांगितली.....

तुमच्या मनात शंका आहेत..मला माहीत आहे...आमच्याही मनात होत्या की हे असं कसं झालं....त्याबद्दल सांगतो....पण आता जरा पोटभर जेवू द्या...आणि हो तुम्हीही घ्या जेवून.... ताट पाठवतो...तुमच्यासाठी.