माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२० नोव्हेंबर, २००९

’स्टार माझा’चे आभार!

मित्रहो गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीही ’स्टार माझा’ ह्या वाहिनीने घेतलेल्या ’ब्लॉग माझा’ ह्या स्पर्धेत मी भाग घेतला होता.
आज सकाळी जीमेल मधील पत्रव्यवहार पाहताना एक वेगळेच पत्र दिसले. ते होते श्रीयुत प्रसन्न जोशी ह्यांचे. त्यात त्यांनी स्पर्धेचा निकाल पाठवलेला होता.

निकालात बरीच परिचित नावं दिसत होती. स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणारी नीरजा पटवर्धन(नीधप).
विशेष उल्लेखनीय म्हणून ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यातले हरिप्रसाद भालेराव(छोटा डॉन),देवदत्त गाणार(देवदत्त), राजकुमार जैन(राजे), दीपक कुलकर्णी(कुलदीप) आणि आनंद घारे(आनंदघन).
ही सगळी नावं आणि एकूणच पत्रातला सगळा मजकूर इंग्लीशमध्ये असल्यामुळे वरील सगळी नावं एकदोनदा वाचल्यावरच कळली. :)
पण त्यात अजून एक नाव दिसत होते....जे मला कुठे तरी ऐकल्यासारखे वाटत होते...पण ती व्यक्ती नेमकी डोळ्यासमोर येत नव्हती. इंग्लीशमध्ये स्पेलिंग लिहिलेले होते...पीआरएएमओडी डीइव्ही.
बराच वेळानंतर प्रकाश पडला की ते नाव....माझेच होते. ;)
मी माझ्या देव आडनावाचे डीइओ असे स्पेलिंग करतो त्यामुळे कुणी त्याचे डीइव्ही असे केले तर ते मला नेहमीच अनोळखी वाटत असते.

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर एक सांगेन ते म्हणजे ह्यावर्षी मला पारितोषिक मिळेल असे मी अजिबात गृहित धरलेले नव्हते...गेल्या वर्षी मात्र का कुणास ठाऊक पण ठाम खात्री होती. :D आणि गंमत म्हणजे गेल्या वर्षी न मिळता पारितोषिक अचानक ह्यावर्षी मिळाले...हे देखिल थोडे धक्कादायक वाटले. :D
मध्यंतरी ही स्पर्धाच रद्द झाली अशी माहिती एका मित्राकडून मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर तर आज आलेला निकालाचा मेल अजून जास्त धक्कादायक वाटला. असो. तरी देखिल आपला समावेश पारितोषिक पात्रांमध्ये झाला हे वाचून इतके दिवस जे काही वेडेवाकुडे लिहिले त्याची कुणीतरी दखल घेतंय ह्याची जाणीव झाली आणि बरंही वाटलं.
मराठीतून,तेही देवनागरीतून लिहीणार्‍या....लिहू शकणार्‍या ब्लॉगर्सना इंग्लीशमधून...म्हणजे लिपीही रोमन आणि मजकूरही इंग्लीशमध्ये... हा निकाल पाठवण्याचे कारणच काय?
तर, खुलाशात असं लिहिलेलं आढळलं....की एखाद्याच्या संगणकात देवनागरी फॉंट न दिसण्याची अडचण असू शकते. मला काही हे पटलं नाही. देवनागरीतून अट्टाहासाने लिहीणार्‍यांकडे अशी अडचण असणारच नाही असे माझे मत आहे. अर्थात....कुणी सांगावं ते म्हणतात तसे काही लोक असतीलही.....पण ते तसे असतील तर माझी त्यांना नम्र विनंती की...आपल्या संगणकाला काँप्लेक्स स्क्रीप्ट्सचा पाठिंबा आहे की नाही ते तपासून पाहावे आणि तो तसा नसल्यास सर्वप्रथम तो स्थापित करून घ्यावा.
अधिक काय सांगू?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मला पारितोषिक ’पात्र’ ;) ठरवल्याबद्दल स्टार माझाचे मन:पूर्वक आभार.

६ नोव्हेंबर, २००९

महाजालीय शारदीय अंक!

मंडळी,माझ्या मनात एक आयडियाची कल्पना आलेय. महाजालीय दिवाळी अंकासारखाच एक महाजालीय शारदीय अंक काढावा...ज्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण.
ह्या अंकासाठी लेखनाचा विषय कोणताही चालेल. तरीहीलोकांनी विचारणा केल्यामुळे अजून सविस्तर लिहितोय.
लेखनाचे विषय राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/प्रवासवर्णन/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन इत्यादि कोणतेही चालतील.

लेखन पाठवण्याची शेवटची तारीख ३०नोव्हेंबर २००९ अशी आहे. लेखनासोबत छापण्यासाठी आपले छायचित्रही जरूर पाठवावे. नाताळच्या आसपास हा अंक प्रसिद्ध करण्याचा मनसुबा आहे.
केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन इथे प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही.

ह्या अंकाचे स्वरूप ब्लॉग पद्धतीचेच राहील...कारण मला स्वत:ला तांत्रिक गोष्टीत फारसे गम्य नाही. तरीही काही उत्साही आणि जाणकार मंडळी मदतीला मिळाली तर ह्या अंकाचे स्वरूप अधिक आकर्षक करता येईल.

तरी ह्या अंकाबाबत काही सुचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
attyaanand@gmail.com
लेखन पाठवताना.....शारदीय अंकासाठी....असे लिहून पाठवावे.....म्हणजे माझ्या वैयक्तिक पत्रव्यवहारापेक्षा वेगळे म्हणून लगेच लक्षात येईल.
चला तर मग आता लागा कळफलक बडवायला. कथा,कविता,लेख वगैरे जे हवे ते लिहा आणि पाठवा.
तथास्तु!!!

४ नोव्हेंबर, २००९

ही बालगीते कोणाकडे आहेत काय?

मी ५वी ६वीत असताना म्हणजे सुमारे ४० वर्षापूर्वी ही दोन बालगीते पाठ करून त्यावर शाळेत बक्षिसे देखील मिळवली होती.पण ती बालगीते आता मला पुसटशी आठवतात ती अशी....

१) अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली

कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली.......वगैरे वगैरे.

आणि

२) मेथाबाईचे लगीन निघाले
दुध्या-भोपळा नवरा झाला
पुढे काशीफळ आघाडीला
वांगी-बटाटे दोहो बाजूला....... वगैरे वगैरे

ह्या बालगीतांचे कवी कोण हे देखिल मला आठवत नाहीत.आपणा पैकी कोणाला ह्याबद्दल काही माहिती असल्यास कळवण्याची कृपा करावी.

३ नोव्हेंबर, २००९

कांद्याची पीठ पेरून भाजी!

मंडळी मी माझी एक आवडती पाककृती इथे चढवतोय.
बरेचजण विविध भाज्या बनवताना त्यात कांदा घालतात. पण मी आज फक्त कांद्याची भाजी कशी करतात हे सांगणार आहे.अर्थात हा पदार्थ तसा काही नवीन नाहीये. ही भाजी मी माझ्या लहानपणापासून खात आलेलो आहे....म्हणजे ही केवळ ही एकच भाजी नाही बरं का. :D
माझी आई ही भाजी अतिशय चविष्ट आणि खमंग अशी बनवायची. तुमच्यापैकी कैक जणांकडेही कदाचित ही भाजी केली जात असेल. असो. आता नमनाला वाटीभर तेल वापरल्यावर मूळ कहाणीकडे आपण आता वळू या....अहो तो ’वळू’ नाही हो. ;)
ह्या भाजीला लागणारे साहित्यः
४ कांदे,२चमचे चण्याचे पीठ(बेसन),तिखट,मीठ,साखर,तेल,मोहोरी,हिंग इत्यादि.
कृती:प्रथम कांदे सोलून,चिरून घ्यावेत. चिरताना कांदे उभे(खाली दाखवल्याप्रमाणे) चिरावेत.



त्यानंतर कढईत दोनतीन चमचे तेल घालून हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्या फोडणीत चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात चवीपुरते लाल तिखट,मीठ आणि चिमूटभर साखर(साखरेमुळे खमंगपणा येतो.) घालून कालथ्याने सगळं एकजीव करावं.
त्यानंतर भाजीत बेसन घालावे... बेसन घालताना ते चमच्याने आधी हातावर घ्यावे आणि नीट पसरून भाजीवर पेरावे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. पुन्हा कालथ्याने भाजी सारखी करून मग त्यावर झाकण ठेवून एक हलकीशी वाफ द्यावी जेणेकरून बेसन कच्चं राहणार नाही.



अशा तर्‍हेने आपली भाजी तयार झाली.
करून पाहा आणि खाऊन सांगा कशी वाटली.
तळटीप: कांदे चिरल्यावर जरी जास्त दिसले तरी त्याची भाजी चोरटी होत असते. तेव्हा केवळ हे एकच तोंडीलावणे असल्यास अशी भाजी करताना आपण किती लोकांसाठी ही भाजी करणार आहोत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणात कांदे आणि इतर साहित्य वापरावे.